फॉन्ट साइज वाढवा
रात्रीचा पहिला प्रहर संपतानाच जगन्नाथाचं चारी ठाव भोजन व्हायचं. अगदी छप्पन भोग खाऊन व्हायचे. त्यानंतर शशिमणी त्याच्यासाठी मोठ्या कलाकुसरीने सुरेख गोविंदविडा बांधायची. तो विडा खाताच जगन्नाथाचे ओठ रंगायला सुरुवात व्हायची. विडा चघळताना निर्माण झालेला मुखरस पोटात जाताच, त्याची शांत तंद्रा लागायला सुरुवात व्हायची आणि त्यासरशी, गर्भगृहाचे दरवाजे अलगद बंद व्हायचे… मग तिथे उरायचे फक्त दोघे जण – जगन्नाथ आणि शशिमणी. हा एकांत खास त्या दोघांचा, एकमेकांना उपभोगण्याचा. पुरीचा जगन्नाथ तर बोलून चालून लाकडाचा देव. पण, शशिमणी ती तर हाडामांसाची होती, जिवंत होती. साहजिकच तिला भावना होत्या. म्हणूनच जगन्नाथाचं खाणं-पिण झालं, की तो शयनगृहात जाण्याआधी त्याच्या मनोरंजनासाठी ती गाणं म्हणायची, नृत्य करायची. या वेळचं गाण्या-नृत्यातलं तिचं लाघव बघण्यासारखं असायचं म्हणे. जगन्नाथासाठी जयदेवाच्या ‘गीतगोविंद’मधील शृंगारिक अष्टपद्या म्हणताना ती पूर्णपणे जगन्नाथाला समर्पित झालेली असायची. त्या वेळी जगन्नाथ तिच्यासाठी केवळ लाकडाचा देव नसायचा, तो तिच्यासाठी सजीव-साकार देहच असायचा… इतकी ती जगन्नाथाशी एकरूप झालेली असायची.
म्हणूनच शशिमणीला आजही कुणी विसरू शकलेलं नाही आणि कदाचित भविष्यातही तिला कुणी विसरू शकणार नाही. कारण ती होती पुरीच्या जगन्नाथाची शेवटची देवदासी, त्याची अखेरची धर्मपत्नी… जिने जगन्नाथाचे सारे रुसवे-फुगवे काढले, त्याच्यावर राग-लोभ धरला, त्याच्यावर प्रीती अन् भक्तीही केली. इतकंच कशाला जन्मोजन्मी हाच पती मिळावा, म्हणून इतर सामान्य स्त्रियांप्रमाणे सावित्री व्रतही केलं. आयुष्यभर तिने जगन्नाथाबरोबरचं आपलं हे नातं एकनिष्ठेने राखलं. कदाचित वेळप्रसंगी तिच्याही नैसर्गिक उर्मी उफाळून आल्याच असणार, पण ‘जगन्नाथ माझा, मी जगन्नाथाची’ ही तिची मानसिक भावना इतकी प्रबळ असली पाहिजे, की तिने प्रत्यक्ष शारीर सुखाऐवजी जगन्नाथाला मनोमनच भोगले असले पाहिजे… म्हणूनच तर ती त्या मीरेसारखी आजन्म म्हणत राहिली- माझा तर फक्त जगन्नाथ, दुसरा कुणी नाही!
अशा या शशिमणीचं २०१५मध्ये वयाच्या ९२व्या वर्षी निधन झालं. त्या वेळी एकीकडे परंपरावाद्यांनी शोक केला, कारण त्यांची हजारो वर्षांची देवदासी परंपरा खंडित झाली होती. तर दुसरीकडे आधुनिकतावाद्यांनी आनंद व्यक्त केला, कारण शशिमणीच्या मृत्यूमुळे ओदिशामधील देवदासी कुप्रथेचं कायमचं उच्चाटन झालं होतं.
अर्थात, हयात असेपर्यंत शशिमणीला स्वतःला परंपरावादी किंवा आधुनिकतावादी दोघांची काहीही पडली नव्हती. देवदासी परंपरा चांगली की वाईट, याच्याशीही तिला काहीच देणंघेणं नव्हतं. तिचा संबंध होता, फक्त पुरीच्या जगन्नाथाशी. कारण कळायला लागल्यापासूनच ती जगन्नाथाची बायको म्हणून उभी राहिली होती. मिरवली होती. अवघी सहा-सात वर्षांची असताना शशिमणी पुरीच्या जगन्नाथ मंदिरात त्याच्या सेवेसाठी आली आणि दहाव्या वर्षी तिला ऋतुप्राप्ती होताच, तिचं जगन्नाथाशी लग्न लावून देण्यात आलं. त्यानंतर जगन्नाथ आणि त्याचं मंदिर हेच तिचं सर्वस्व होतं. नावाला तिला राहायला तेव्हा मंदिर परिसरात तिची म्हणून एक हक्काची मठी होती. तिचा चरितार्थही जगन्नाथ मंदिराच्या तिजोरीतूनच चालवला जायचा. पण तिला बाकी कशाचीच काही पडलेली नसायची. तिचं ध्यान तर कायम त्या जगन्नाथाशीच लागलेलं असायचं, मग ती मंदिरात असो नाहीतर स्वतःच्या घरात… अख्खं आयुष्य त्या जगन्नाथाच्याच साथीसोबतीने काढल्यावर, परंपरावादी आणि आधुनिकतावाद्यांना तिच्या आयुष्यात काहीच स्थान नव्हतं. देवाची सेवा करायला मिळतेय, हीच तिच्यासाठी सुखाची परमावधी होती.
शशिमणीची आईदेखील पुरीच्या जगन्नाथ मंदिरात देवदासी, म्हणजेच महारी किंवा महाननारी होती. मात्र जगन्नाथ मंदिरात देवदासींचे दोन संप्रदाय किंवा प्रकार होते- एक भितरगौनी आणि दुसरा बाहरगौनी. पैकी शशिमणीची आई बाहरगौनी महारी होती. बाहरगौनी महारी म्हणजेही जगन्नाथाच्या देवदासीच, पण त्यांना मंदिराच्या सभामंडपात किंवा गर्भगृहात प्रवेश नसायचा. त्या मंदिराच्या बाहेरील आवारात देवासंदर्भातील सेवा करायच्या. शशिमणी मात्र भितरगौनी महारी होती. तिला थेट देवाच्या गर्भगृहात प्रवेश होता. एवढंच नव्हे, तर रात्रीच्या वेळी तिचा देवाशी अंगसंग व्हायचा, तेव्हा गर्भगृहाचे दरवाजे लावले जायचे. अशा वेळी शशिमणी सगळा साजश्रृंगार करायची आणि देवाचं मन रिझवायची. गाण्याबरोबरच शशिमणी अतिशय अलवार असं महारी नृत्य करायची. आजच्या शास्त्रीय ओडिसी नृत्याचं मूळ, महारींच्या या ‘महारी’ नृत्यातच आहे. शशिमणी नृत्यात आणि अभिनयात अतिशय माहीर होती म्हणतात. ऐन तारुण्यात तिने गर्भगृहात देवासमोर केलेलं गायन-नृत्य प्रत्यक्ष कुणीच पाहिलेलं नाही. कारण गर्भगृहात देवासाठी महारीने केलेलं नृत्यगायन पाहण्याची मुभा कुणालाच नव्हती. म्हणूनच तर अशा वेळी गर्भगृहाचे दरवाजे बंद केले जायचे. तो एकप्रकारे देवदासींचा सन्मानच असायचा.
फक्त वर्षातून दोनच उत्सवप्रसंगी या भितरगौनी महारी जनसामान्यांसमोर बाहेर नृत्य करायच्या. पैकी पहिला उत्सव म्हणजे कृष्णजन्माष्टमीची रथयात्रा आणि दुसरा उत्सव म्हणजे झुलनजत्रा. या दोन्ही प्रसंगी देव जगन्नाथ, मंदिरातून बाहेर पडत असल्यामुळे त्याच्या मंदिरातील पुनर्प्रवेशावेळी शशिमणी आपलं नृत्यप्रदर्शन करीत असे आणि त्यावेळी तिच्या नृत्याची झलक पाहण्यासाठी भक्तांची अक्षरशः झुंबड उडत असे. कारण हे नृत्य हीच भितरगौनी महारींची खासियत होती. गायन-नृत्यातील कौशल्यामुळेच देवाच्या मनोरंजनासाठी त्यांना थेट गर्भगृहातील एकांताचा अधिकार मिळालेला होता… आणि शशिमणी ही अशा महारींमधली शेवटची होती. अर्थात कुणालाही भितरगौनी महारी होता यायचं नाही; त्यासाठी आधीच्या भितरगौनी महारींपैकी कुणी तरी नव्या तरुण महारीला बालवयातच दत्तक घ्यावं लागायचं आणि तिला गायन व नृत्यकलेत निपुण करावं लागायचं. अनेक शतकांची परंपरा असलेलं महारी नृत्य या परंपरेतूनच टिकलंय. शशिमणीदेखील या परंपरेनेच गायन व नृत्यकला शिकली. तिलाही तिच्या आईने एका भितरगौनी महारीला दत्तक दिलं होतं.
गंग राजाघराण्याच्या राजवटीत पुरीच्या जगन्नाथ मंदिरात महारी परंपरेची मोठी धामधूम होती. त्यांनीच स्थानिक नृत्यपरंपरेला राजाश्रय देऊन ती परंपरा मंदिरात आणली. बाराव्या शतकात जयदेवाचं ‘गीतगोविंद’ हे संस्कृत काव्य भलतंच लोकप्रिय झालं. कृष्णाच्या बाललीलांपासून ते त्याच्या शृंगारलीलांपर्यंत जयदेवाच्या प्रतिभेला या काव्यात बहर आलेला दिसतो… आणि पुरीचा जगन्नाथ हे श्रीकृष्णाचंच रूप असल्यामुळे साहजिकच ते काव्य त्या काळातील महारी नृत्याचा आत्माच बनलं ते अगदी आत्ताआत्तापर्यंत. किंबहुना महारी नृत्यातून आकाराला आलेल्या ओडीसी नृत्याचाही ‘गीतगोविंद’ हाच आत्मा आहे. पूर्वी या जगन्नाथ मंदिरात शेकड्याने बाहरगौनी आणि भितरगौनी महारी होत्या… कालौघात या देवदासी प्रथेतील फोलपणा आणि या प्रथेच्या माध्यमातून महारी कलावंत महिलांचं होणारं लैंगिक शोषण ध्यानात आल्यावर या प्रथेचं महत्त्व कमी होत गेलं. तरीही विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जेव्हा शशिमणीचं जगन्नाथाशी लग्न लावलं गेलं, तेव्हा साधारणपणे पंचवीसेक महारी देवाच्या सेवेत होत्या आणि त्यातल्या काही भितरगौनीही होत्या. मात्र शशिमणीने अल्पावधीतच गायन व नृत्यकलेत प्रावीण्य मिळवून आपलं स्थान पक्क केलं. अर्थात तिने कधीच ज्येष्ठ महारींचा अवमान केला नाही, उलट त्यांचा मान-सन्मान राखूनच शशिमणीने आपली कला वाढवली आणि नंतरच्या काळात ती जगन्नाथाची मुख्य महारीही झाली… आणि आपल्या कलेने जगन्नाथाला जोजवत नि रिझवतही राहिली…
जगन्नाथ मंदिराचा ताबा जोपर्यंत स्थानिक राजघराण्याकडे होता, तोपर्यंत शशिमणीची जगन्नाथाची सेवा सुखेनैव सुरू होती. मात्र १९६०च्या आसपास जगन्नाथ मंदिराचा ताबा ओदिशाच्या तत्कालीन राज्यसरकारकडे गेला आणि शासनाने देवदासींची कुप्रथा बंद केली, तसंच महारी म्हणजेच देवदासींना दिला जाणारा देवपत्नीचा दर्जाही काढून घेतला. परिणामी देवपत्नी म्हणून समाजात असलेलं महारीचं स्थान खालावत गेलं. तरीही साधारणपणे १९८० पर्यंत जगन्नाथाच्या मंदिरात हयात असलेल्या महारी प्रसंगवश नृत्य करायच्या. परंपरा म्हणून नाही, तरी धार्मिक विधीचा भाग म्हणून त्या आपलं महारी नृत्य करायच्या. मात्र त्यानंतरच्या काळात तेही बंद झालं. ज्या उरल्यासुरल्या महारी होत्या, त्या नावापुरत्याच महारी होत्या.
पण शशिमणी तिथेही उजवी ठरली. खरंतर वय झाल्यामुळे तिने नृत्य आधीच बंद केलं होतं, त्यात एकदा मंदिरातून घरी जाताना एका बैलाने तिला ढुशी मारली आणि शशिमणी खाली पडली. या अपघातात तिच्या पायाला इजा झाली. परिणामी तिचं नाचणं पूर्णपणेच थांबलं. तरीही आपल्या घरातील देवघरात प्रतिष्ठापना केलेल्या जगन्नाथाच्या प्रतिमेची ती नित्य पूजा करत राहिली. केवळ नित्य पूजाच नाही, तर ती त्याच्यासमोर बसल्या जागी हस्तमुद्रा आणि अभिनय करून त्याचं मनोरंजनही करायची. तिचं म्हणणं होतं- महारी परंपरेवर कायद्याने बंदी आली, ते ठीक आहे. पण मी लहानपणापासून केवळ जगन्नाथालाच आपलं मानलं, त्याचं काय करू? आता या वयात त्याला सोडून कुठे जाऊ? मंदिरात नाही तर नाही, मी माझ्या घरातच त्याची पूजा बांधेन…’
परंपरा मोठ्या जिवट आणि चिवट असतात. त्या सहसा नष्ट होत नाहीत; झाल्या तरी लोकांच्या स्मरणातून जाण्यासाठी खूप काळ जावा लागतो. देवदासी परंपरा लोकांच्या मनातून-स्मृतीतून जाण्यासाठीही बराच काळ जावा लागेल. स्वतः शशिमणीसारख्या महारीच्या मनातून या ही परंपरा कधीच गेली नव्हती. तिला या प्रथेचं सामाजिक-सांस्कृतिक महत्त्व किंवा त्यातून होणारं मानवतेचं अवमूल्यन याबद्दल काहीही ठाऊक नव्हतं. कळायला लागलं, तेव्हापासून तिच्यावर परंपरेनं फक्त एवढंच बिंबवलं होतं की- ‘तू जगन्नाथाची बायको आहेस, आता हाच तुझं सर्वस्व!’ एखादी गोष्ट सातत्याने सांगत राहिली की खरी वाटते, तेच शशिमणि आणि इतर महारींच्या संदर्भातही झालं.
त्यामुळे ‘आपणच देवदासी का? इतर उच्चभ्रू समाजातील कुणीच देवदासी का नाही’ असा साधा प्रश्न शशिमणी किंवा इतर कुणालाही कधी पडला नाही आणि असे प्रश्न पडले नाही, की पंरपरा सुरळीत सुरू राहते… आणि तशी ती सुरू राहावी म्हणून छुपेपणाने काही कमी प्रयत्न झाले नाहीत. ज्या पद्धतीने शशिमणिला एका जेष्ठ महारीने दत्तक घेतलं होतं, तद्वतच शशिमणीने एखाद्या कुमारिकेला दत्तक घ्यावं आणि तिला आपलं गाणं-नृत्य शिकवावं, असा प्रयत्न जगन्नाथ मंदिराशी संबंधित काही मंडळींनी केला होता. पण शशिमणीने मुलगी दत्तक घ्यायला ठाम नकार दिला. तिने एखाद्या मुलीला दत्तक घेतलं असतं आणि तिला गाणं-नृत्य शिकवून तयार केलं असतं, तर कदाचित तिची परंपरा पुढे चालू राहिली असती. पण तिला ही परंपरा पुढे न्यायची नव्हती का? किंवा तिच्या या नकारामागे तिचा सुधारणावादी दृष्टिकोन होता का? ठाऊक नाही. मात्र तिच्या या निर्णयामुळे एक परंपरा संपूर्णपणे नामशेष व्हायला मदतच झाली, एवढं मात्र खरं!
… आणि याचं श्रेय निःसंशय शशिमणी देवीना द्यायलाच हवं…
- मुकुंद कुळे
या सदरातील लेख…
बाई सुंदराबाईंनी एवढं वैविध्यपूर्ण गायन केलं, तरी त्यांची आज जनमानसातली ओळख आहे ती, बैठकीची लावणी गाणारी गायिका म्हणूनच!
आयुष्याचं उत्तरपर्व गोव्यातील फोंड्याच्या शांतादुर्गा मंदिराजवळ असलेल्या स्नेहमंदिर वृद्धाश्रमात व्यतीत करणाऱ्या प्रसिद्ध गायिका-नर्तिका मेनकाबाई शिरोडकरही अशाच झुरल्या असतील का आपल्या माणसांसाठी?
बालगंधर्वांनाही ज्यांच्या लावण्या प्रिय होत्या, त्या कौसल्याबाई कोपरगावकर यांची नावनिशाणीच आज कालपटलावरून पुसली गेली आहे, जणू काही कौसल्याबाई झाल्याच नाहीत…
शरीराची गरज असेपर्यंत आश्रय द्यायचा आणि ती भागली की वाऱ्यावर सोडायचं, या पुरुषी वृत्तीचा तिला वीट आला नि संतापानेच तिने निश्चय केला- आता नागरत्नम्माला मोठी कलावंत करायचं !
भामाबाईंच्या कलेचं कोणत्याच प्रकारचं दस्तऐवजीकरण आज उपलब्ध नाहीय. परंपरेतील माणसं त्यांचं नाव घेताना आजही कानाला हात लावतात, हेच भामाबाईंचं मोठेपण!
थोड्याच काळात रसूलन एखाद्या जाणत्या गायिकेसारखी गायला लागली. बघता बघता बनारस घराण्याची आन-बान-शान बनली!
बैठकीच्या लावणीतला टवटवीत ‘गुलाब’
…आणि अवघ्या बारा-तेरा वर्षांच्या गुलाबबाई ‘गुलाबबाई संगमनेरकर संगीतबारी’च्या मालकीण झाल्या.