फॉन्ट साइज वाढवा
पल्लवी शिंदे-डेकाची भेट हा खरंतर योगायोगच. कारण ती राहते आसाममध्ये… एका छोट्याशा गावात! नवरात्रीमध्ये आसामच्या नऊ कर्तबगार महिलांचा परिचय करून देणारी एक मालिका वाचनात आली. त्यात पल्लवी शिंदे-डेका या नावाने विशेष लक्ष वेधून घेतलं. महाराष्ट्राची ही माहेरवाशीण तिथे आसामात शेती आणि शेतीपूरक अनेक व्यवसाय करते. शिवाय महिलांसाठी, मुलांसाठी तिचं काम सुरू आहे. ते वाचून तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केला. तिच्या कामाविषयीची प्राथमिक माहिती तर मिळाली होती, पण त्या पलीकडची पल्लवी माहीत करून घेण्यासाठी तिच्याशी गप्पा होणं अत्यावश्यक होतं. पल्लवीचं काम असं आहे की, त्याला वेळेचं ठराविक बंधन नाही, रविवारची सुट्टी नाही. तिची मुलगी अजून अगदी लहान आहे, त्यामुळे त्या आघाडीवरही ती व्यग्र असतेच. पण तिच्याशी संपर्क झाल्यावर मात्र दिलखुलास गप्पा झाल्या.
निवांत नोकरी, स्थिर आयुष्य आणि भविष्यात मिळू शकणाऱ्या मानाच्या अनेक संधी या गोष्टी एका निर्णयात सोडून देऊन पल्लवीला तिचा नवरा – दिगंतसोबत शेतीसारख्या तुलनेने अस्थिर व्यवसायात शिरावंसं का वाटलं असेल, आणि तेदेखील वेगळ्या राज्यात! हाच माझ्या मनात एकमेव प्रश्न होता. असं म्हणतात ना, की आयुष्याच्या एका टप्प्यावर तुम्ही कोण असता, तर – तुमचं शिक्षण, अनुभवांतून आलेलं शहाणपण, तुम्हाला भेटलेली आणि बरंच काही नकळतपणे शिकवून गेलेली माणसं, तुम्ही जिथे लहानाचे मोठे झालात तो भवताल, तुम्ही वाचलेली आणि पचवलेली पुस्तकं, पाहिलेल्या कलाकृती, सिनेमे, केलेले अनवट प्रवास – अशा सगळ्या गोष्टींचा परिपाक म्हणजे तुम्ही असता. त्यातून तुमचे निर्णय होत असतात. त्यातून तुमची वृत्ती आकार घेत असते. आणि तुमच्या छोट्या छोट्या कृतींतून हे सारं दिसत राहतं.
“तू खरं तर अजून ३-४ वर्षांनी माझी मुलाखत घ्यायला हवी होतीस, तेव्हा माझ्या मनातल्या अनेक गोष्टी प्रत्यक्षात आलेल्या तुला बघता आल्या असत्या.” आमच्या पहिल्या गप्पांच्या वेळी पल्लवीचं हे पहिलं वाक्य होतं. प्रचंड नुकसानीत गेलेली शेती हातात घेऊन आधुनिक गोष्टींची जोड देऊन ती सावरणं, सेंद्रीय शेती यशस्वीपणे करायची असेल, तर तिला दूरदृष्टीने शेतीपूरक व्यवसायांची जोड देणं, स्थानिक शेतकऱ्यांना एकत्र आणून किफायतशीर शेतीचे प्रयोग करणं, गावात महिलांना एकत्र आणून उपक्रम राबवणं, खेड्यातल्या मुलांना हिंदी, इंग्लिश असे विषय शिकवणं, त्यांना अवांतर वाचनाची गोडी लागावी, म्हणून प्रयत्न करणं – या साऱ्यात पल्लवी गुंतलेली आहे. पल्लवी आज ज्या अंतर्प्रेरणेने वेगवेगळ्या स्तरावर काम करतेय, त्या सासवडच्या लहानपणीच्या दिवसांपासून रुजलेल्या आहेत. तिच्या घरातलं वातावरण आणि प्रागतिक विचार हाच तिच्या आजच्या कामाचा पाया आहे.
तिचं लहानपण म्हटलं तर वेगळं नव्हतं आणि म्हंटलं तर पूर्ण वेगळं होतं. वडील हा हक्काचा भोज्जा होता. “आईच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे तिचा सहवास, तिचं मार्गदर्शन आणि तिचा आधार फार मिळाला नाही. त्यामुळे साधारणपणे आई आणि मुलगी यांचं जसं एक उबदार नातं असतं, ते मला कधीच मिळालं नाही. पण ‘बाबा वॉज ऑलवेज देअर फॉर मी’!!” ज्या सयंत आणि शांत स्वरात पल्लवी हे सांगते, त्या एका वाक्यातून आणि तिच्या आवाजातून तिचं अख्खं बालपण आपल्या नजरेसमोर उभं राहतं. आत्माराम शिंदे यांनी आपल्या या लेकीला केवळ मोठं केलं नाही, तर तिला स्वतःचे विचार, आवडीनिवडी यांचा आदर करायला शिकवलं. त्यासाठी धोके पत्करायची जिद्द तिच्यात रुजवली. नकाराचं सामर्थ्यही दिलं आणि मनाचा कौल ऐकून एखाद्या गोष्टीसाठी होकार दिल्यावर त्यासाठी जीवाचं रान करण्याची वृत्तीही दिली. सासवडच्या वाघिरे हायस्कूल मधून शालेय शिक्षण तिने पूर्ण केलं. ती सांगते, “बाबा इतके भक्कम पाठीशी असत की कधी काही अडचणी जाणवल्याच नाहीत. ते अतिशय प्रागतिक विचारांचे होते आणि आजही तसेच आहेत. बाबा आणि माझा भाऊ यांच्या खंबीर अस्तित्वामुळे मी पुरती टॉम बॉय झाले. शिक्षण आणि खेळ या दोन्ही गोष्टी मी मनापासून केल्या. मी व्हॉलीबॉल खेळायचे. अगदी राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धाही मी खेळले. बाबांनी अभ्यास कसा करायचा याची टेक्निक्स मला उत्तम शिकवली होती. त्यामुळे पुस्तकात डोकं खुपसून बसण्याऐवजी मी मला जे आवडत होतं त्या सगळ्या गोष्टी मनसोक्त केल्या. मी खूप पुस्तकं वाचली, मी प्रवास केले. भरपूर खेळले आणि तरी चांगले मार्क्स मिळवून पुढे जात राहिले. पुढे वाघिरे महाविद्यालयातून भूगोल विषयात बी.ए झाले. कॉलेजमध्ये गेल्यावर एक महत्वाचा बदल माझ्यात झाला तो म्हणजे मी इतर अनेक उपक्रमांत भाग घ्यायला लागले. तोपर्यंत पुढे काय करायचं आहे, आपल्याला काय आवडतंय, त्या दृष्टीने तयारी काय करावी हे माझ्या मनात ठोस नव्हतं. मला दोनच गोष्टी कळल्या होत्या, पहिलं म्हणजे – उत्तम शिकायला पाहिजे… शिक्षण महत्त्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे केवळ आपला, आपल्या घरापुरता विचार करून चालणार नाही. आपल्या भोवतालच्या लोकांची आयुष्यं सुकर व्हावीत, यासाठी आपल्याला जमेल ते करत राहायचं.” पल्लवीचे बाबा अनेक समाजोपयोगी कामात व्यस्त असत. कुणाची पैशांची गरज भागव, कुणाला इतर काही मदत कर… ते ही न बोलत आणि कोणताही गाजावाजा न करता! पल्लवी आज जी कामं हातात घेऊन पूर्ण करतीय त्याची पहिली प्रेरणा तिचे वडील हेच आहेत. तिच्या वडिलांनी मांढरमध्ये एक शाळा सुरु केली. त्या शाळेत कुणाचंही शिक्षण पैसे नाहीत म्हणून त्यानी थांबू दिलं नाही. सरकारी तत्त्वावरच्या दूध डेअरीचं काम असेल त्यांनी पैशावाचून कुणाचंही अडू दिलं नाही. त्यांच्या कमाईतला एक चतुर्थांश वाटा आजही सामाजिक कार्यासाठी जातो. हाच वारसा पल्लवी आणि तिच्या भावानेही पुढे चालवला आहे. सर्व गोष्टी फक्त पैसा कमावण्यासाठी करायच्या नसतात, हे शिक्षण त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिल्या.
बी.ए झाल्यावर तिने पुण्यातून SNDT विद्यापीठातून भूगोलातच मास्टर्स केलं. त्यात तिने विद्यापीठात पहिल्या क्रमांकासोबत सुवर्णपदक पटकावलं (तिच्या मते हा योगायोग होता!!!) आणि त्यानंतर लगेच तिने अर्थशास्त्रातही MA केलं. पुण्यातले हे दिवस तिच्यासाठी खास ठरले. कारण इथेच तिला भेटला दिगंत! दिगंत डेका त्याचवेळी पुण्यात शिकण्यासाठी आसामहून आला होता. दिगंतमध्ये तिला आयुष्याचा जोडीदार तर मिळाला. दोघांना नोकरी-व्यवसायाच्या संधीही खुणावत होत्या. पुरंदर ज्युनियर कॉलेजमध्ये पल्लवीला व्याख्याता म्हणून नोकरी मिळाली. आणि दिगंतने भागीदारीत हॉटेल सुरु केलं. अकरा वर्ष पल्लवीने हे काम अगदी आवडीने केलं. ‘आमच्या दोघांच्याही घरून लग्नाचा आग्रह होत होता, पण आम्ही दोघांनी भरपूर वेळ घेतला.’
आयुष्याची एकूण दिशा ठरते आहे असं वाटत होतं. लग्न झालं. दिगंतचा व्यवसायही उत्तम सुरु होता, आणि पल्लवीला ही कायमस्वरूपी नोकरीची ऑफर आली होती. त्यांच्या आयुष्यात तोवर त्यांची लेक याहवी आली होती. या काळात एक महत्वाची गोष्ट घडली होती, ती म्हणजे आसामच्या बारपेटा जिल्ह्यातल्या सारथेबरी या गावात २२ एकर जमीन त्यांनी विकत घेतली. अर्थातच शेती करण्यासाठी. पुण्यात राहत असताना ती त्यांनी स्थानिक लोकांना करायला दिली होती. सुरुवातीला ती स्थानिकांना करायला द्यावी आणि काही वर्षांनी आपण स्वतः तिथे राहून नवीन उपक्रम राबवत स्वतः करावी. पण शेती ही अशी गोष्ट आहे, की जिथे स्वतः कसायला लागतं, स्वतः घाम गाळावा लागतो. तरच तिच्या फायद्या-तोट्याचा अंदाज येतो. एका चौकटीत प्लानिंग करून शेती करता येत नाही. पल्लवी आणि दिगंत यांनी याचा अनुभव घेतला. हा अनुभव खरंतर एखाद्याला पार खचून टाकेल असं होता. लाखो रुपयांचं कर्ज दोघांच्या डोक्यावर आलं. अशा परिस्थितीत एखादा माणूस काय करेल, तर हातातली रोख कमाई असणारी नोकरी किंवा व्यवसाय करत राहून कर्ज फेडेल. कदाचित शेतजमीन विकण्याचाही निर्णय घेईल. पण पल्लवी आणि दिगंतने शेती सावरण्याचा निर्णय घेतला. पल्लवी सांगते, “त्यावेळी हा निर्णय कठीण होता. पण मी माझ्या नोकरीत आनंदात होते, मात्र समाधानी नव्हते. दिगंतचीही तिच अवस्था होती. शेतीबरोबर आपल्याला तिथे राहून भवताल अधिक चांगला करण्याच्या दृष्टीने अनेक कामं करता येतील, ही आशाही खुणावत होती. डोक्यावरचं कर्ज ही आमच्यासाठी एका वेगळ्या आणि समाधान देणाऱ्या आयुष्याकडे नेणारी पहिली पायरी होती. ती चढायचा आम्ही निर्णय घेतला. दिगंतने चांगला नफा मिळवून देत असलेलं हॉटेल बंद केलं आणि तो आधी आसामला गेला. एक वर्षाने व्याख्याता म्हणून कायमस्वरूपी मिळणारी नोकरी सोडून लेकीला घेऊन पल्लवीदेखील आसामला गेली. कर्जाचा बागुलबुवा न करता आपल्याला समाजासाठी जे करायचं आहे त्यासाठी शेती हे एक माध्यम बनवायचा निर्णय तिने घेतला. सामान्यतः आपल्या आवडीची गोष्ट करण्यासाठी त्याची पॅशन अनेकांना हट के काम करण्यासाठी उद्युक्त करते. पण नुकसान किंवा कर्ज हा एखाद्यासाठी टर्निंग पॉइंट कसा ठरतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे पल्लवी आणि दिगंत!
गुवाहाटीच्या घरी न राहता दोघांनी सारथेबारीमध्येच राहण्याचं ठरवलं आणि शेती करायला सुरुवात केली. आसाममधला प्रचंड पाऊस, वादळं या सगळ्या पार्श्वभूमीवर शेती हा अवघड व्यवसाय होता. पण पल्लवीने सर्वप्रथम कृषीकेंद्रातून एकात्मिक शेतीचं प्रशिक्षण घेतलं, मधमाशापालन तंत्रही शिकून घेतलं. मोहोरी आणि तांदूळ ही पिकं घ्यायला सुरुवात केली. त्याला जोड दिली ती डेअरीव्यवसाय, वराहपालन, मत्स्यशेती, मधमाशीपालन या गोष्टींची. शेती सेंद्रीय करण्याचा तिचा आग्रह होता, त्यामुळे खतनिर्मितीही सुरू केली. वराहपालनातून तयार होणारे खत मत्स्यशेतीसाठी पूरक असतं. शेणखतही मोठ्या प्रमाणावर तयार होऊ लागलं. मश्रूम्सची शेती सुरू झाली. पल्लवी सांगते, ‘मळक्या कपड्यात आणि सतत गांजलेल्या शेतकऱ्याची प्रतिमा आम्हाला बदलायची आहे. थोडा विचार करून गोष्टी केल्या तर फार फरक पडतो. शेतीचं सुरळीत होताच, तिने आपल्या मनातल्या दुसऱ्या गोष्टीसाठी काम सुरु केलं. लोकांसाठी काय करता येईल याचा विचार सुरु झाला. पल्लवी गावात आली तेव्हा पक्का रस्ताही नव्हता. पाठपुरावा करून त्यांनी पक्का रस्ता बनवून घेतला.’
गावात बहुतांश शेतकऱ्यांकडे अगदीच तुटपुंजी जमीन आहे. कुणाकडे अर्धा, कुणाकडे एक एकर! ही शेती किफायतशीर होणं अवघडच होतं. हळूहळू दिगंतच्या मदतीने पल्लवी स्थानिक शेतकऱ्यांशी बोलू लागली. नवीन तंत्रज्ञान, शेतीपूरक व्यवसाय या गोष्टींची माहिती देऊ लागली. एकत्र येऊन शेती करण्याचं महत्व पटवून देऊ लागली. आज तिच्या गावातले अनेक अल्पभूधारक शेतकरी एकत्र आले आहेत. २५० एकर शेतजमीनीवर शेती होते आहे. आज तिच्या वराहपालन केंद्रात एकूण ५० डुकरं आहेत, त्यापैकी ३० पिल्लं आहेत. या हँपशायर, यॉर्कशायर आणि ड्युरॉक जाती आहेत. तिच्या गोपालन व्यवसायात तयार होणारं शेणखत मोफत वाटलं जातं. जैविक शेतीचं महत्व फक्त एका शेतकऱ्याला पटून पुरेसं नाही, सभोवतालच्या सर्वाना ते पटलं तरच बदल घडू शकतो.
शेतीबाबत, त्यातल्या प्रयोगांबाबत स्थानिक लोकांच्या मनात विश्वास निर्माण केल्यानंतर पल्लवीने इतर कामांसाठी लोकांना एकत्र आणायचे प्रयत्न सुरू केले. प्रथम मुलांना हिंदी आणि इंग्लिश शिकवायला तिने सुरुवात केली. त्यांना अवांतर वाचनाची गोडी लागावी म्हणून पुस्तकांची देणगी तिने स्वतःच सुरुवात केली. मुलांच्या नंतर नंबर होता त्यांच्या आयांचा! बायकांना तिने संघटित केलं. नवीन व्यवसाय करायला उद्युक्त करण्यापासून, वेळ आणि आर्थिक नियोजन याविषयीही ती त्यांच्याशी बोलत राहिली. बायांनी कमावलेला पैसा नवऱ्याच्या दारूत जाऊ नये, यासाठी सतत त्यांना सांगत राहिली. त्याचे चांगले परिणाम दिसू लागले. १-०-१२ महिलांना तिने मधमाशीपालनतंत्राचं प्रशिक्षण दिलं, त्यांना व्यवसाय सुरु करायला मदत केली. बाईने स्वतःच्या पायावर उभं राहणं आणि त्यासाठी स्वतः कमावणं याचं महत्त्व पटवून दिलं.
पल्लवी आज शेतकरी उत्पादक संघटनेची अध्यक्ष आहे. दीडहजार शेतकरी या संघटनेचे सदस्य आहेत. जागतिक बँक, केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या योजना त्यांच्यापर्यंत पोचवणं, त्यांचा लाभ मिळवून देणं, हे काम ती या संघटनेमार्फत करते आहे. त्यात आर्थिक लाभाबरोबरच मालवाहतूक, बाजारात माल पोचवणे, सरकारी कामं या गोष्टीही केल्या जातात.
आसामी भाषा आता तिला उत्तम येते. स्थानिक लोकांना आपण उपरे वाटू नये यासाठी तिने विशेष प्रयत्न केले आहेत. तिथले पोशाख, तिथले सण, सार्वजनिक उत्सव हे सर्व तिने आपलंसं केलं आहे. ती सांगते, ‘बिहू नृत्य चांगलं येत नाही मला, पण मी ती खास साडी नेसून फेर धरते. शेवटी लोकांना एकत्र आणायचं तर आधी मलाच त्यांच्यात मिसळून जायला हवं. आणि त्यासाठीची एक ही संधी मी सोडत नाही.’
आजवरच्या या प्रवासाबद्दल तुला काय वाटतं, या प्रश्नावर तिचं उत्तर होतं – ‘समाधान! ते मला सरधोपट नोकरीत मिळालंच नसतं. पैसे मिळाले असते, मानमरातबही मिळाला असता, पण इथे जे मिळालं ते कधीही मिळालं नसतं. आणि समाधान नेमकं कसलं आहे, काय आहे – हे कधीही शब्दांत सांगायला जाऊ नये, ज्याला ते मिळत आहे, त्याने ते पुरेपूर घेत राहावं आणि ज्याला ते समजून घ्यायचं आहे, त्याने ते ओळखून जाणून घ्यावं. त्याच्या ठोस व्याख्या लिहायला जाऊच नये.’
ईशान्येच्या सप्तभगिनींना जेव्हा भेट द्याल, तेव्हा जरा वळण घेऊन सारथेबारीला जाऊ आणि स्मार्ट शेतकरी जोडीला भेटून येऊ. सामाजिक उद्योजक असे एकमेकांच्या कामातून प्रेरणा घेतच तयार होत असतात. आणि ते वेगळ्या वळणावरच भेटतात… हमरस्त्यावर नाही.
- नीता कुलकर्णी
या सदरातील लेख…
खाद्यसंस्कृतीची संशोधिका : शिल्पा परांडेकर
महाराष्ट्रातल्या ५०० गावांचा प्रवास एकटीने करून शिल्पाने विस्मृतीत गेलेले, जाऊ पाहणारे शेकडो पदार्थ आणि त्यांच्या कृती समजून घेऊन त्यांची नोंद केली आहे.
मल्हार हा मूळ चिपळूणचा! तिथलाच रहिवासी. त्याच्या घरामागे वशिष्ठी नदी वाहाते. त्यामुळे पाण्याची ओढ त्याला जन्मजात आहे….
संधीने दार ठोठवलं तर ते पटकन उघडायलाही अनेकदा धाडस करावं लागतं. योगिनीने ते केलं….
नीता,नेहमीप्रमाणे उत्तम लेख.??पल्लवी-दिगंतच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.