शेअरबाजार आणि इतर बाजार यांतील महत्त्वाचा फरक काय? अंजोरला मुळात कळलंच नाही की, आशु नक्की काय म्हणतो आहे ते.
तसं दोघांना सवड मिळाली की, त्यांचं मनमोकळं चॅट चालायचंच. त्यात काहीतरी नेहमीसारखेच उडते विषय सुरू असताना आशुकडून मध्येच हे कुठून आलं : ‘‘मी तुझं नाक आंजारलं-गोंजारलेलं तुला चालेल का?’’
ह्यावर तिने लिहिलं : ‘‘शी, घाणेरडा! त्यात मी सर्दाळू मुलगी. तुझ्या हाताला शेंबूड-मेकूड वगैरे लागायचं. यक्स…’’
आशुने लिहिलं : ‘‘तो माझा प्रश्न आहे. मी ग्लव्ज घालून चोळेन किंवा नंतर हात धुवेन. तुझ्याकडून मला एवढंच उत्तर हवंय की, तुझं नाक चोळायला तुझी परवानगी आहे का? मला उत्तराची घाई नाही. पण मला तुझी कन्सेंट हवी आहे हे नक्की.’’
‘कन्सेंट’ शब्द वाचला आणि अंजोरला कळलं की, हे काही नेहमीसारखं हलकं फुलकं ‘हाहाहूहू’तलं प्रकरण नाही, तर काहीतरी सिरीयस दिसतंय. तेव्हा आपण विचार करूनच उत्तर द्यायला पाहिजे. तिला आठवलं की, त्या दोघांच्यात आठ-दहा दिवसांपूर्वीच ‘कन्सेंट’ ह्या शब्दावर अटीतटीची चर्चा झाली होती. त्यात आशुचं म्हणणं असं होतं, ‘‘स्त्री किंवा पुरुष दोघांपैकी कुणीही जर दुसऱ्याला स्पर्श करून सेक्शुअल प्लेझर मिळवत असतील तर त्यासाठी कन्सेंट आवश्यक आहे.’’ ह्यावर अंजोर म्हणाली होती, ‘‘तू नेहमीप्रमाणे उगीचच विषय ताणतो आहेस. सेक्शुअल प्लेझर प्रत्येकाचा खाजगी प्रश्न आहे. ते कुणी कसंही मिळवू शकतात. मास्टरबेशन काय असतं? पोर्नो बघणं काय असतं? काही जण नुसतं न्याहाळून सेक्शुअल प्लेझर मिळवतात. बऱ्याचदा तर ते त्यांच्या नजरेतून दिसतंदेखील. वखवख, वाकडी नजर हे दुसरं काय असतं? तर मला त्यात काही कन्सेंट वगैरे खरं वाटत नाही. हू बॉदर्स यार… स्पर्शातून कोण काय मिळवतंय! सारखं कोण सावध राहणार? आणि मला मिळणारं प्लेझरदेखील सेक्शुअल असू शकेलच की… कोण ते सॉर्टिंग करत बसणार. आय बीलिव्ह इन स्पाँटेनिटी. माझ्या आई-बाबांनादेखील सुरुवातीला मी कुणालाही स्पर्श करते, हग करते, चुक्स करते हे जरा खटकायचं. त्यांच्या काळात तसा मोकळेपणा नव्हता ना! पण हळूहळू त्यांना सवय झाली आणि त्यांनी ते अॅ्क्सेप्टदेखील केलं.’’
आशु म्हणाला, ‘‘अगं, ते तर काहीच नाही. त्यांच्या आधीच्या पिढीत म्हणजे आपल्या आज्या-पणज्यांच्या पिढीत तर ‘विस्तवाशेजारी लोणी ठेवलं तर वितळणारच ना?’ किंवा ‘धोतराशेजारी लुगडं वाळत घातल्यावर काय होणार?’ असं काहीतरी बनेल, अश्लील बोलायचे. ते जाऊ दे, तो जमानाच तसा होता.’’
अंजोर म्हणाली, ‘‘यी, पुअर पीपल. परव्हर्ट जनरेशन. तेव्हा
कॉन्ट्रासेप्टिव्हज नव्हती, की सेफ पीरियड्सदेखील ठाऊक नव्हते. माय मॉम ओन्ली टोल्ड मी वन्स. बाप रे, वी आर लकी इनफ की आपण त्या काळात नाही जन्माला आलो. वी आर बॉर्न्ड इन मॉडर्न टाइम्स.’’
आशु म्हणाला, ‘‘यस इन अ वे ट्रू. पण आतादेखील काही ना काही कुचंबणा सुरूच असणार. प्रॉब्लेम बदलतात प्रत्येक पिढीमध्ये, एवढंच. दुसरं शरीर इन्वॉल्व आहे म्हटल्यावर प्रॉब्लेम आलेच. सो दुसरं शरीर इन्वॉल्व आहे म्हटल्यावर कन्सेंट हवीच!’’
अंजोर म्हणाली, ‘‘पुन्हा सांगते… उठता-बसता, हिंडता-फिरता होणाऱ्या स्पर्शात कोण सेक्स शोधत बसणार? हां, कपडे काढले तर सेक्स म्हणता येईल. त्यासाठी मात्र तू म्हणतोस तशी व्हर्बल कन्सेंट घेणं आवश्यक आहे, असं म्हणता येईल एक वेळ. पण मला वाटतं, बहुतेक वेळा इट हॅपन्स बातो बातो में… खेल खेल मे सॉर्ट ऑफ! खरंतर इंटरकोर्स म्हणजेच सेक्स.’’
आशु म्हणाला, ‘‘तुझं मत काहीही असलं तरी मला वाटतं की, कन्सेंट ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे पुढच्या काळात आणि ते रुळायला पाहिजे. म्हणजे मग कुणीही कुणाकडे शरीर डिमांड करू शकेल. समोरच्याने त्याला किंवा तिला होय किंवा नाही असं प्लेन उत्तर द्यावं. त्यावरून त्या विचारणाऱ्याविषयी कोणतंही भलंबुरं मत तयार होता कामा नये. असं झालं तर रिलेशन हेल्दी होतील. यू नो!’’
अंजोर म्हणाली, ‘‘तुझं म्हणणं प्रिन्सिपली मान्य आहे. पण प्रॉक्टिकली शक्य नाही. आता मला समजा, तुझ्या खांद्यावर हात ठेवून सेक्शुअल प्लेझर मिळत असेल, तर ते काय मी तुला विचारायला हवं का? त्यापेक्षा माझी आयडिया सुटसुटीत आहे. कपडे काढले तरच सेक्स.’’
तर त्यांच्या ह्या संभाषणाच्या पार्श्वभूमीवर तिला आशुचा मेसेज आठवला. ‘मी तुझं नाक आंजारलं-गोंजारलेलं तुला चालेल का?’ तिला कळलं की, तो साक्षात आशु आहे. तो चर्चेला अर्धवट वाऱ्यावर सोडणं शक्य नाही, तर विषयाचा कीस काढून सोक्षमोक्ष लावणार म्हणजे लावणार. आता आपली परीक्षा आहे. अॅलसिड टेस्ट. सत्त्वपरीक्षा. नाक चोळण्यासाठी आपण म्हणतो तसे कपडे काढावे लागणार नाहीत हे खरंच आहे. त्यामुळे त्याला ‘हो’असं उत्तर देऊन तो प्रश्न सहज सोडवता आला असता. पण तिला कळलं की, मग तो सुरू करू शकेल की, किती वेळ? कुठे? कुणाही समोर का? तिला कळलं की, आपलं म्हणणं लूज आहे. त्यात काहीतरी लूपहोल्स आहेत. आशुचं मांडणं डीप विचारातून आलेलं असणार!
तसे अंजोर आणि आशु दोघंही कमालीचे मोकळे आणि चर्चाळू होते. त्यामुळे मानवी मन, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, समकालीन वास्तव, संस्कृती, कला, निसर्ग… असा त्यांच्या गप्पांना कोणताही विषय वर्ज्य नव्हता. आशुची बरीचशी मतं अंजोरला एका मर्यादेपर्यंत आवडतदेखील, पण नंतर त्या अनुषंगाने तिच्या मनात आधी दोन विरुद्ध मतांचा कलगीतुरा, सवालजवाब सुरू होई आणि मग आशुबरोबर हुज्जत, त्यातून आणखी फाटे. ज्यात आशुचं संतुलन सहसा बिघडत नसे. अंजोरचा मात्र बऱ्याचदा तोल जाई. मग आशुच समंजस होत म्हणायचा, ‘‘लेट अस डिस्कस द इश्यू सम अदर टाइम.’’
समोरच्याचं बोलणं ऐकून घेताना प्रत्येकाची एक समरस होण्याची पातळी असते, जी विशेषत: डोळ्यांमधील भावांवरून जाणवते. आशुच्या बाबतीत ही पातळी फारच उच्च असल्याचं अंजोरला जाणवत असे. विशेषत: अंजोरशी बोलताना तर तो फारच लक्षपूर्वक ऐकायचा. त्यामुळे त्यांच्या गप्पा हा प्रोफेसर कॉमन रूममधला चर्चेचा नाही, तरी काही जणांच्या कुजबुजीचा विषय नक्कीच होता. पण त्या दोघांना त्याचं काहीच सोयरसुतक नव्हतं. तसा दोघांच्या लेक्चर्समुळे त्यांना एकत्र भेटायचा वेळ कमीच मिळायचा, पण दीड-दोन वर्षांपासून दोघांना व्हॉट्सअॅ्पवरून सतत चॅट करत बोलणं सुरू ठेवता येत होतं.
- मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट
- लेखक : सतीश तांबे
पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल फेब्रुवारी २०२१
हे पुस्तक खरेदी करण्यासाठी…
मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट
‘‘दूर कुठेतरी एका कोपऱ्यात अभिजनांचा टिचभर तुकडा आणि दुसरीकडे हा बहुजनांचा अक्राळविक्राळ प्रदेश. मी त्याच्या मध्यावर कुठेतरी उभा… अगदी एकटा. न घर का, न घाट का!’’
– ‘मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट’ कथेतून
₹250.00Add to Cart