READING TIME – 6 MINS

शशी देशपांडे यांची पहिली ओळख झाली, ती That Long Silence या त्यांच्या ख्यातनाम कादंबरीमुळे!

इंग्लिशमध्ये लेखन, करणार्‍या भारतीय साहित्यिकांचा एक मोठा वारसा आहे. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून हा वारसा चालत आला आहे आणि तो अगदी आतापर्यंत सुरू आहे. या प्रवाहातलं ठसठशीत नाव म्हणजे शशी देशपांडे!

एखाद्या व्यक्तीचं आयुष्य किती वैविध्यपूर्ण… व्हर्सटाइल असू शकतं, आणि ती व्यक्ती ते आयुष्य किती समजून-उमजून जगते याची स्पंदनं नीट ऐकते, त्यांना प्रतिसाद देते, हे जर बघायचं असेल, तर शशी देशपांडे यांचं – ‘Listen to me’ हे आत्मचरित्र वाचायला हवं.

काळाचा एक मोठा पट या आत्मचरित्रातून त्यांनी उलगडला आहे. भारतात घडलेल्या अनेक स्थित्यंतरांच्या, महत्त्वाच्या घटनांच्या त्या साक्षीदार आहेत.

त्यांची निरीक्षणं, सभोवतालात होणारे बारीक-सारीक बदल, समाजाची वेळोवेळी बदलणारी मानसिकता या सगळ्याचं सूक्ष्म प्रतिबिंबं त्यांच्या लेखनात उमटत आलं आहे. म्हणूनच त्यांची स्त्रीवादी लेखिका अशी ठसठशीत ओळख असली तरी स्त्रीवादाच्या, स्त्रियांच्या प्रश्‍नांच्याही अनेक पावलं पुढे जाऊन समाजातल्या बदलत्या प्रवाहाची टिपणं त्यांच्या लेखनात दिसत राहतात.

शशी देशपांडे यांचं लेखिका म्हणून हे फार मोठं सामर्थ्य आहे, असं मला वाटतं. त्यांचं आत्मचरित्र म्हणूनच एक खूप मोठा दृष्टिकोन देऊन जातं.

वास्तविक बघायला गेलं, तर बौद्धिकदृष्ट्या अत्यंत संपन्न अशा वातावरणातच शशी देशपांडे नेहमी राहिल्या. भाषेच्या, पुस्तकांच्या समृद्ध दुनियेचा वारसा त्यांना जणू अनुवंशिक होता असंच म्हणावं लागेल.

सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न आणि अगदी शांत आयुष्याची देणगी लाभलेल्या धारवाडमधलं लहानपण हे त्यांच्या लेखिका म्हणून झालेल्या प्रवासात किती महत्त्वाचं होतं, ही गोष्ट हे आत्मचरित्र सांगतं.

त्यांचे वडील संस्कृतचे पंडीत, कादंबरीकार, नाटककार, अभिनेते – आद्य रंगाचार्य या नावाने त्यांनी लेखन केलं. ते व आई शारदा यांच्या सुजाण, डोळस आणि बुद्धिवादी पालकत्त्वाने शशी देशपांडे यांना लहानपणापासून चौफेर वाचनाचे धडे मिळाले.

इंग्लिश, संस्कृत, कन्नड भाषांतल्या साहित्याचा खजिनाच त्यांच्या समोर होता. त्यांची ‘Child hood, Growing Up, those were the days’ ही प्रकरणं वाचताना लेखिका म्हणूनच नाही, तर भूमिका घेणारी लेखिका म्हणून त्यांची घडण कशी झाली हे लक्षात येतं.

उत्तम निरीक्षण असणार्‍या बुद्धिमान मनात दाटलेले प्रश्‍न मोकळेपणाने-धाडसाने विचारणार्‍या, चिंचेच्या झाडांच्या सावलीतून अनेकदा, अनवाणीही शाळेत जाणार्‍या शशी देशपांडे यांचं वर्णन ‘open to ideas, emotions, experiences, and the languages.’ असं करावं लागेल.

ब्रिटीश कॉन्व्हेंट स्कूलमधलं शिक्षण पूर्ण करून तेव्हाच्या बॉम्बे युनिव्हर्सिटीतून त्यांनी अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्राची पदवी घेतली. कायद्याचं उच्च शिक्षण घेऊन वकील म्हणूनही काम केलं. नंतर काही काळ कायदा क्षेत्रात पत्रकारिताही केली.

धीरेन्द्र देशपांडे, यांच्याशी विवाह झाल्यावर सुरुवातीला तत्कालीन बॉम्बेतल्या परळ भागात त्यांचं वास्तव्य होतं. तिथे डॉक्टर पतीच्या हॉस्पिटलच्या परिसरातल्या, भोवतालच्या परिस्थितीचं डोळस निरीक्षण, बारीकसारीक गोष्टी टीपत राहणं हे महत्त्वाचं होतं. लेखिका नकळतपणे आतून घडत होती.

इथे शेजारी असलेल्या झोपडपट्टीतले निराशा, उदासी, यांचे वंचित सूर त्यांच्यापर्यंत पोचत होते. कुटुंब आणि पुस्तकांच्या सुरक्षित जगातून या आवाजांनी त्यांना बाहेर आणलं.

त्यानंतर पती व दोन मुलांसह इंग्लंडमध्ये झालेला एक वर्षाचा संसारही त्यांच्या लेखनप्रवासाला कारणीभूत ठरला. तिथे त्यांना प्रथम एकाकीपणा, संसाराच्या रूढ चक्राचा कंटाळवाणा अनुभव आला.

भारतात परत आल्यावर या सगळ्या अनुभवांवर लिहावं या उर्मीने त्यांनी पहिली कथा लिहीली ‘The Legacy.’ त्यानंतर सातत्यपूर्ण लेखन त्या करत राहील्या. लेखिका होण्याचा निर्णय जरी अगदी ठरवून घेतलेला नसला तरी लेखिका म्हणून त्या सातत्याने घडत होत्या. कोणत्याही लेखकाचं लेखन वाचताना- त्याला किंवा तिला हे कसं सूचलं असेल – असा विचार अनेकदा वाचक म्हणन मनात येत.

त्यांना स्वत:ला कादंबरी हा प्रकार त्यांच्यासाठी म्हणजे लेखक म्हणून अधिक योग्य वाटतो. कादंबरी लेखन म्हणजे अनेक आश्‍चर्यांचा अनुभव असतो. या आत्मचरित्रात त्यांच्या, साहित्य कृतींच्या मागच्या कथा वाचणं, हा फार उत्तम अनुभव आहे.

त्यांनी त्यांच्या लेखनाविषयी, त्यांच्या साहित्यातल्या पात्रांविषयी सांगितलं आहे. त्यांनी परळ, इंग्लंड नंतर बंगलौर इथे राहत असताना स्थानिक स्तरावरच्या आणि राष्ट्रीय स्तरावरच्याही स्थित्यंतरांच्या नोंदी मांडल्या आहेत.

लेखन प्रांताविषयीची त्यांची मतं, काही समकालीन लेखकांबरोबरचे मतभेद, साहित्य प्रांतात आपण नेमक्या कुठे आहोत हा सतत घेतलेला धांडोळा, लेखकांनी भूमिका घ्यायला हवी, सभोवतालचा डोळस वेध घ्यायला हवा, पटत नसलेल्या गोष्टी धाडस करून मांडायला हव्यात, हे त्या सांगतात.

स्त्रियांनी केलेल्या लेखनाकडे बघण्याच्या काहीशा निम्न दृष्टिकोनाबाबत तर त्या नेहमीच बोलत आल्या आहेत. Listen to me मध्येही त्या प्रखरपणे बोलतात.

स्वत:च्या लेखनाबद्दल त्या म्हणतात-

“I write about people. They just happen to be women. Novel after novel I kept hoping that my work would be recognised not as being about women but about the predicament of human beings, but never seemed to happen.

स्त्रियांचे प्रश्‍न मांडणारी लेखिका, परदेशी भाषेत लिहीणारी लेखिका – म्हणून त्यांच्यावर भरपूर टीका झाली. पण त्या आणि त्यांच्या काळातल्या अनेक लेखिकांनी ही टीका पचवून लेखन सुरू ठेवलं म्हणून पुढच्या पिढीच्या लेखिकांचा मार्ग सुकर झाला, ही वस्तुस्थिती आहे.

देशातले गेल्या काही दशकांतले बदल समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचायला हवं, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक भूमिका घेणं म्हणजे काय, त्यासाठी काय करावं लागतं, काय सोडावं लागतं – हे जाणून घेण्यासाठी वाचावं.

शेवटी लेखक होणं म्हणजे काय – हे समजून घेण्यासाठी वाचावं म्हणूनच Listen to me वाचून संपवलं, की आपण नकळतपणे पुस्तकाचं पहिलं पान पुन्हा उघडतो. त्यावर लिहीलं आहे –

From Listening to the stories of others, we learn to tell our own.’
मार्गारेट अ‍ॅटवूड या लेखिकेचं हे वाक्य.

‘Listen to Me’ हे शशी देशपांडे यांचं आत्मचरित्र आपल्याला इतरांच्या कथा ऐकण्याचा कान देतं… कधी तरी आपणही आपली गोष्ट सांगावी – या सुप्त इच्छेचं बीजही मनात रुजवतं.

या लेखमालिकेत ५ लेख आहेत –
या मालिकेतील इतर लेख वाचण्यासाठी खाली क्लिक करा.
1.‘आत्म’स्वर! – शशी देशपांडे
2. ‘आत्म’स्वर! – मिशेल ओबामा
3. ‘आत्म’स्वर! – इस्मत चुगताई
4. ‘आत्म’स्वर! – मधुर जाफरी
5.
‘आत्म’स्वर! – देवकी जैन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *