READING TIME – 6 MINS

ही मालिका मनात आकार घेत होती, तेव्हापासूनच काही पुस्तकं माझ्या मनात पक्की झाली होती. तेजस्वी व्यक्तिमत्त्वाच्या आणि कणखर मनाच्या काही बायका माझ्या मनात तेव्हापासून घर करून होत्या.

ज्या काळात त्या जन्मल्या, ज्या कार्यक्षेत्रात ठामपणे उभं राहण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला. त्यांचा लढा पुढच्या अनेक पिढ्यांसाठी मोलाचा ठरला. आधुनिक, तर्कशुद्ध विचारांची बिजं त्यांनी पेरून ठेवली.

यापैकीच एक अतिशय महत्त्वाचं नाव म्हणजे – इस्मत चुगताई! या नावाची भुरळ आजही तशीच आहे. या नावाशी असणारी स्त्रीवादी लेखक-लेखिंकाची नाळ अद्याप घट्ट आहे.

आजही तरुण मुलामुलींना या लेखिकेबद्दल वाटणारं कुतूहल आणि आदर तसाच आहे. म्हणूनच ही मालिका लिहायला घेण्यापूर्वीच इस्मत यांच्या आत्मचरित्राचं नाव माझ्या मनात नक्की झालं होतं.

‘कागजी है पैहरन’ या नावाने त्यांनी उर्दुमध्ये आत्मचरित्र लिहीलं आणि त्याचाच इंग्लिशमध्ये अनुवाद केलाय एम. असदुद्दिन यांनी. या आत्मचरित्राची ओळख करून देण्याच्या आधीच एम. असदुद्दिन यांना विशेष श्रेय देते.

इस्मत यांच्या आत्मचरित्राचा अनुवाद सहज-सोपा नक्कीच नसणार, पण त्यांचं आयुष्य इंग्लिशमध्ये आणताना इस्मत यांच्या शब्दातला, शैलीतला, अनुभवांतला आणि एकूणच आयुष्यातला प्रवाहीपणा असदुद्दिन यांनी जराही हरवू दिलेला नाही.

ज्या ‘शान’मध्ये इस्मत जगल्या, जे संघर्ष त्यांनी जिद्दीने अंगावर घेतले, पण आपल्या विचारांची आधुनिकतेची आणि समानतेची लढाई एक क्षणही त्यांनी थांबवली नाही – ती त्यांची धडाकेबाज वृत्ती हे आत्मचरित्र प्रत्येक पानांत सांगत राहतं.

आत्मचरित्राच्या सुरुवातीपासून अगदी घरगुती- कौटुंबिक स्वरूपाच्या संघर्षापासून इस्मत त्यांच्या आयुष्याविषयी सांगत जातात. सिद्धहस्त लेखिका असणार्‍या इस्मत यांनी नंतर चित्रपटांसाठीही लेखन केलं, त्यामुळे आत्मकथा सांगतांना प्रसंग उलगडत नेण्याचं तंत्र त्यांनी अचूक वापरलं आहे.

उत्तर प्रदेशातल्या बदायूनमध्ये 21 ऑगस्ट 1915ला नुसरत खानम आणि मिर्झाकासीम बेग चुगताई यांचं त्या नववं अपत्य! या दाम्पत्याला एकूण दहा मुलं होती. सहा मुलं आणि चार मुली!

मुलींच आयुष्य ज्या काळात शिवण-टीपण, स्वयंपाक पाणी यातच सार्थकी मानलं जात असे. दहा मुलांना जन्म देऊन कावलेल्या आईच्या हाताखाली वाढताना मुलांची कशी तारांबळ होई इथूनच इस्मत यांनी आत्मकथन सुरू केलं आहे.

लहानपणीच्या आठवणी, घरातली माणसं, एकत्र कुटुंबातली शिस्त वडील आणि मोठा भाऊ – मुन्नेभाई (अझिम बेग चुगताई) यांचा इस्मतना मिळणारा पाठिंबा या सर्व स्मृतींचा पट आपल्या डोळ्यासमोरून सरकत राहतो.

इस्मत लहान असतानाच त्यांच्या मोठ्या बहिणींची लग्न झाली, त्यामुळे त्यांच्यावर खरा प्रभाव होता तो त्यांच्या भावांचा! त्यातही वडील अब्बा मियाँ आणि मुन्नेभाई यांनी या शेंडेफळला फार समजून घेतलं.

त्यांची शिकण्याची, नव्हे उच्च शिक्षण घेण्याची ओढ, बुरख्याबद्दलची नापसंती या गोष्टी त्यांनी समजून घेतल्या आणि या ना त्या मार्गाने दोघांनी इस्मतच्या स्वप्नांना खतपाणीच घातलं. इस्मतच्या या अशा विचारांना आईचा विरोधच होता.

अर्थात धाडसी, फटकळ आणि मनसोक्त आनंदी जगण्याची वृत्ती असणार्‍या इस्मत यांच्या मनातल्या काही भीती, काही त्रास, काही दु:स्वप्नं याबद्दलही त्या सांगतात.

शालेय शिक्षण पूर्ण करून चिकाटीने त्यांनी उच्चशिक्षण अलिगढ मुस्लीम विद्यापीठातून घेतलं. अलिगढ मधल्या त्यांच्या शिक्षिका मुमताज जहान आणि रशिद जहान यांच्या आठवणी फार कृतज्ञतेने त्यांनी नमूद केल्या आहेत.

याच काळात प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशनशी त्यांचा संबंध आला. रशिद जहान या तेव्हाच्या प्रसिद्ध स्त्रीवादी लेखिका! इस्मत यांच्याजवळ अनुभवांची कमी नव्हतीच. या सगळ्या प्रभावातून त्या लिहू लागल्या.

कर्मठ विचारांना विरोध करताना होणारा संघर्ष, त्याचा मनस्ताप त्यांच्या कथांवर अश्‍लिलतेचा होणारा आरोप – त्यासाठी पार लाहोरपर्यंत जाऊन लढलेल्या कायदेशीर लढाया, प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशन मधला सुहृद आणि लेखक सादत हसन मंटोची मिळालेली साथ, फाळणीच्या दिवसांतली होलपट हे सारं चित्र इस्मत यांची लेखणी जिवंत करते.

आजही इस्मत यांचं नाव घेताक्षणी त्यांची लिहाफ ही त्या काळी फार वादग्रस्त ठरलेली कथाच अनेकांना आठवते, पण इस्मत यांच्या लेखनाचा आवाका किती मोठा आहे, हे त्यांचं चरित्र सांगतं.

लेखनावर जीव असणार्‍या इस्मत एके ठिकाणी म्हणतात –

“I feel the same kind of pleasure in writing as in reading. I have enjoyed my most fulfilling moments while writing, and my writings have helped me cope with my most difficult moments. I have unburdened myself of many woes in my writings, as I have taken upon myself many other burdens. The pen is my provider as well as my friend and confidant, a friend who keeps my company in my hours of loneliness.”

लेखन त्यांच्यासाठी किती महत्त्वाचं होतं, हे यावरून लक्षात येतं. त्यांनी धर्म, संस्कृती यावरची आपली मतं व्यक्त करताना या दोन्ही गोष्टीं एकत्र आणण्याबाबत नापसंतीही व्यक्त केली आहे.

यातल्या काही प्रकरणांचा विशेष उल्लेख करावासा वाटतो. सर्वात आधी एम. असदृद्दिन यांनी लिहीलेला 16 पानी परिचय म्हणजे इस्मत यांच्या आयुष्याबद्दल आणि त्यांच्या कामाबद्दलचं गाईडच आहे. ते संदर्भ म्हणूनही वाचायला हवं. इस्मत यांच्या व्यक्तिमत्त्वाची छोटी झलक हा परिचय देतो.

In the name of those married Women PHYSICS या प्रकरणात त्यांच्या लेखनावर झालेले आरोप, आणि मंटो आणि इस्मत यांच्यावर चाललेला तो बहुचर्चित खटला याबद्दल सविस्तर वाचायला मिळतं.

लेखन, अध्यापन, चित्रपटलेखन, चित्रपट-निर्मिती, स्त्रीवादी चळवळीतला सहभाग अशा चौफेर कामातून इस्मत यांची फार सविस्तर ओळख हे चरित्र करून देतं.

एखादी बाई विशिष्ट पद्धतीने का वागते, ती लागट का बोलत असेल याची कारणं त्यांनी बाईच्या मनानेच शोधली एखाद्या बाईच्या मनात किती संताप असू शकतो, त्यातून तिची घुसमट का होत असेल – हे त्यांनी संवेदनशीलपणे टिपलं. म्हणूनच म्हणावंसं वाटतं, की She was a woman above all.

इस्मत यांनी ही जीवनकथा सलग क्रमाने सांगितली नाही, पण चौकटी मोडणं हेच तर त्यांचं व्यक्तिमत्त्व होतं.

“There’s something in me that militates against putting faith in anyone uncritically… One should first examine all points of disagreement before coming to a consensus…”
असं ठामपणे सांगणार्‍या या बाईला फक्त बंडखोर इतकंच बिरुद कसं चिकटवून चालेल कारण तिच्या इतकं विवेकी तारतम्य सहसा दुर्मीळच!

इस्मत यांच्या व्यक्तिमत्त्वातल्या अशाच दुर्मिळ छटा दाखवणारं हे आठवणीवजा लेखन वाचायलाच हवं.

या लेखमालिकेत ५ लेख आहेत –
या मालिकेतील इतर लेख वाचण्यासाठी खाली क्लिक करा.
1.‘आत्म’स्वर! – शशी देशपांडे
2. ‘आत्म’स्वर! – मिशेल ओबामा
3. ‘आत्म’स्वर! – इस्मत चुगताई
4. ‘आत्म’स्वर! – मधुर जाफरी
5.
‘आत्म’स्वर! – देवकी जैन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *