READING TIME – 6 MINS

‘‘माझ्या आयुष्याची गोष्ट वयाच्या 87व्या वर्षी सांगताना विख्यात कवी सॅम्युअल टेलर कोलरीजची ‘द राइम ऑफ द एन्शण्ट मरीन’ ही कविता मला आठवतेय… कारण त्या कवितेतल्या त्या नाविकाप्रमाणेच माझे हडकुळे हात वार्धक्यामुळे सुरकुतले आहेत, चेहरा ओढला आहे आणि केसही रूपेरी झालेत.
माझ्या आयुष्याची कथाही त्या कवितेतल्या जहाजाप्रमाणेच अनेक वादळ वारे पचवून, अनेक उधाणांना तोंड देऊन इथवर आलीय…’’

‘द ब्रास नोटबुक’ या आपल्य आत्मचरित्राच्या मनोगताची सुरुवातच देवकी जैन या शब्दांत करतात. देवकी जैन प्रखर बुद्धिमत्ता लाभलेल्या विदुषी, प्रसिद्ध गांधीवादी आणि स्त्रीवादी अर्थतज्ज्ञ! भारतात आणि परदेशातही अर्थक्षेत्रात मोठं काम केलेल्या तज्ज्ञ!

गेल्या सात-आठ दशकांतल्या अनेक आठवणी त्यांनी आपल्या ‘द ब्रास नोटबुक’ या आत्मकथनात शब्दबद्ध केल्या आहेत. ख्यातनाम अर्थतज्ज्ञ आणि नोबेल विजेते डॉ. अमर्त्य सेन यांनी या आत्मचरित्राची प्रस्तावना लिहिली आहे.

देवकी जैन यांच्या या आत्मचरित्राचे अनेक विशेष आहेत. 1933 साली जन्मलेल्या देवकी आपण ‘द बिफोर मिडनाईट्स चाइल्ड’ आहोत, असं म्हणतात.

स्वातंत्र्यपूर्व काळातल्या आठवणी त्यांच्याजवळ आहेतच. स्वातंत्र्यलढा, मिळालेलं स्वातंत्र्य, त्यानंतरचा भारत, त्याच्या समोरची आव्हानं, बदलते प्रवाह, बदलणारी मानसिकता या सगळ्या गोष्टींचा विलक्षण पट हे आत्मकथन उभं करतं.

दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या आत्मकथनाच्या शिर्षकाची कथा! प्रसिद्ध ब्रिटीश लेखिका डॉरीस लेस्सिंग यांच्याशी देवकी जैन यांची भेट 1958 साली झाली. जैन यांचं काम आणि त्यांचे अनुभव बघता त्यांनी आत्मचरित्र लिहायला हवं असा मैत्रीपूर्ण सल्ला डॉरीस यांनी देवकींना दिला.

‘तू तुझी गोष्ट लिही आणि मला पाठव’ असं त्या देवकींना म्हणाल्या. त्यानंतर साठ वर्षांनी देवकींनी आपली कथा सांगितली आणि तिला नाव दिलं ‘द ब्रास नोटबुक’ दाक्षिणात्य कुटुंबातून आलेल्या देवकींनी पितळेच्या भांड्यांचा वापर पाहिला होता.

पितळ सोन्यासारखं शुद्ध नसलं तरी तो कठीण धातू आहे. आपली कथाही परफेक्ट नसली तरी खणखणीत आहे. हेच त्यांना या शीर्षकातून सांगायचं आहे.

देवकी जैन यांचं आयुष्य विलक्षण आणि असामान्य म्हणता येईल. माहेरच्या देवकी श्रीनिवासन! उच्च वर्गीय कुटुंबात मैसूरला त्यांचा जन्म झाला. वडील तत्कालीन शासकीय सेवेत उच्चपदस्थ असल्याने त्यांचं आयुष्य ‘प्रिव्हिलेज्ड’ म्हणता येईल असं होतं.

वयाची अठरा वर्षं झाली, की लग्न करून ससरी जाऊन सुखाने नांदायचं इथपासूनच्या अनेक पारंपरिक चौकटींना देवकींनी धक्का दिला. त्या म्हणतात – ‘On reflection, I think I was born free. I did not only yearn for freedom but seized it.

मी उंच झाडांवर चढून बसत असे. मी घोडेस्वारी शिकले, भावांबरोबर हिरीरीने सायकल दामटत हिंडले… थोडक्यात त्या काळात मुलींनी करू नये अशा ठरवलेल्या सगळ्या गोष्टी मी मनसोक्त केल्या.

देवकींनी कॉलेजचं शिक्षण मैसूर विद्यापीठ व नंतर थेट ऑक्सफर्डमध्ये घेतलं. वडलांबरोबर इंग्लंड आणि युरोपात भरपूर भटकंती केली, इंग्लंडमध्ये राहिल्या. पारंपरिक भारतीय रेशमी साड्या नेसणाऱ्या या मुलीने पावलोपावली मुक्त विचार कृतीतून दाखवून दिले.

ऑक्सफर्डच्या सेंट अॅन्स कॉलेजमध्ये शिकल्या नंतर ऑक्स्फर्डच्या सेंट अॅन्स कॉलेजमध्ये शिकल्या. नंतर ऑक्स्फर्ड विद्यापीठातून तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्रात पदवी घेतली.

त्यांचं आयुष्य, शिक्षण, कार्य, आंतरराष्ट्रीय स्तरावरचं त्याचं काम या ‘गोष्टी’ सतत एकात एक हात गुंफून येतात. एक ठोस साचा त्यांना पसंतच नसावा. त्यांचे वडील आणि महात्मा गांधी यांचे उत्तम संबंध होते.

जयप्रकाश नारायण, विनोबा भावे यांच्याबरोबर त्यांनी काम केलं. गांधीवादी अर्थतज्ज्ञ लक्ष्मीचंद जैन यांच्याशी त्यांनी घरातला विरोध न जुमानता विवाह केला.
या सगळ्याचं वर्णन त्यांनी या आत्मकथनात केलं आहे.

उच्च शिक्षणामुळे किती मोठा आत्मविश्वास येतो, याचा प्रत्यय या आत्मचरित्राच्या पानापानातून येत राहतो. आपल्याला ज्या विषयात रस आहे त्यात अगदी मनापासून आणि झोकून देऊन काम केलं तर त्यातून किती वेगवेगळे रस्ते सापडतात, बांधिलकी स्वीकारून काम करणारी ज्येष्ठ माणसं भेटत जातात आणि तुमच्या सगळ्या आयुष्यालाच विशिष्ट हेतू कसा प्राप्त होत जातो… हे आत्मचरित्र आपल्याला सांगतं.

देवकी जैन यांची बहुपेडी ओळख हे पुस्तक करून देतं- संशोधिका, विश्लेषक, प्राध्यापक (त्यांनी नवी दिल्ली येथील मिरांडा कॉलेजमध्ये अध्यापन केलं आहे.) गांधी विचारांनी प्रेरित अर्थतज्ञ, स्त्रीवादी अर्थतज्ञ असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू हे पुस्तक उलगडतं.

अविकसित व विकसनशील देशांतल्या अर्थकारणाचा त्यांनी अभ्यास केला. पर्याय सुचवले. अनेक आफ्रिकन कॅरेबियन देशात प्रवास केला. भारतात इन्सिट्यूट ऑफ सोशल स्टडीज ट्रस्ट (ISST)ची स्थापना केली.

देशाच्या अर्थकारणात दारिद्य्राचा बोजा बाईच्या खांद्यावर येतो. हे सिद्ध करण्यासाठी, त्यावर पर्याय शोधण्यसाठी त्यांनी अभ्यास केला विशेषत: तळागाळातल्या स्त्रियांच्या आर्थिक हक्कांच्या चळवळीला दिशा देण्याचं काम त्यांनी केलं.

राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय स्तरावरच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांशी असलेलं त्यांचं सौहार्द पुस्तकात जागोजागी दिसून येतं. नेल्सन मंडेला, डेस्मंडटुटु, अमर्त्य सेन, ग्लोरीया स्टेइनेम, डॉ. ज्युलियस न्येइरेर, कमलादेवी चट्टोपाध्याय, आयरीस मर्डोक, हेन्री किसींजट अशी नावं पुस्तकात भेटत राहतात.

अर्थात हे लेखन म्हणजे फक्त यशस्वी कामांची जंत्री नाही. काही त्रासदायक गोष्टीही त्यांनी समंजसपणे मांडल्या आहेत. मुलगी म्हणून आलेले वाईट अनुभव, परदेशी भूमित प्राध्यापकांकडून आलेला मानहानीकारक अनुभव, त्यामुळे कोसळलेली मानसिक व भावनिक अवस्था, त्याचा शिक्षणावर झालेला परिणाम याही गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत; पण जन्मत:च असणाऱ्या लढवय्या वृत्तीने त्या अशा प्रसंगातूनही पुन्हा उभ्या राहिल्या.

लहानपणीच्या आठवणी, युरोपातली भटकंती, लक्ष्मी जैन यांची भेट झाल्यावर त्यांच्या प्रेमात पडल्यानंतरचे दिवस यांची फार सुंदर वर्णनं त्यांनी केली आहेत. त्यांच्या कामाचा गौरव म्हणून 2006 साली त्यांना ‘पद्मभूषण’ हा सन्मान बहाल करण्यात आला.

पितृसत्ताक पद्धतीत केवळ टिकून राहण्यासाठी नाही, तर ताठ मानेने यशस्वी कसं व्हावं, हे जाणून घेण्यासाठी स्त्रियांनी हे वाचावं बाया मुळीच दुर्बल आणि अगतिक नाहीत. त्यांना त्यांच्या आंतरिक शक्तीची पुरेशी जाणीव झाली, तर त्या किती उल्लेखनीय काम करू शकतात, हे माहित करून घेण्यासाठी पुरुषांनी हे आत्मचरित्र वाचावं.

स्वातंत्र्याला सात दशकांहून अधिक काळ उलटून गेलाय, तरी स्त्री-सक्षमीकरण आणि सामाजिक न्यायासंंबंधीच्या धोरणात मूलभूत त्रुटी तशाच अहेत हे जाणून घेण्यासाठी धोरण कर्त्यांनी हे पुस्तक वाचायला हवं.

हे आत्मचरित्र वाचत असताना एक मोठा काळ पाहिलेली, आपल्या कामाप्रती प्रचंड बांधिलकी असणारी, सामाजिक स्थित्यंतरं प्रागतिक मनाने स्वीकारणारी खंबीर बाई पानापानांत भेटते.

ती धाडसी आहे, ती पारंपरिक आणि सक्तीच्या चौकटी सकारण नाकारणारी आहे, तिचा आयुष्य नावाच्या गोष्टीवर नितांत विश्वास आहे. समाजातला समतोल तिला हवा आहे. आणि ती विलक्षण लोभस आहे. देवकी जैन आज 87व्या वर्षीही अनेकांची प्रेरणा आहेत.

आपण अनेक गोष्टी बिनधास्त केल्या हे सांगताना त्या लिहीतात –
The term used in those days to describe girls like me was ‘tomboy’.
I am now proud to say that this ‘tomboy’ went on to live her life as a feminist. I lived, to the extent that I could, as a free woman. And to be a free woman. With all its risks and casts, has meaning not just for my public life as a writer, scholar and activist, but my private life to love, friendship, marriage and family.

विचारांचं आणि कृतीचं ‘स्वातंत्र्य’ ही गोष्ट हक्कानं मिळवून ती शब्दश: जगणाऱ्या देवकी जैन यांचं हे आत्मचरित्र वाचायलाच हवं.

या लेखमालिकेत ५ लेख आहेत –
या मालिकेतील इतर लेख वाचण्यासाठी खाली क्लिक करा.
1.‘आत्म’स्वर! – शशी देशपांडे
2. ‘आत्म’स्वर! – मिशेल ओबामा
3. ‘आत्म’स्वर! – इस्मत चुगताई
4. ‘आत्म’स्वर! – मधुर जाफरी
5.
‘आत्म’स्वर! – देवकी जैन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *