‘‘आपल्या मित्रापासून लांब जाण्यास राजकारण, धर्म किंवा तत्त्वज्ञान यांविषयीचे मतभेद कारणीभूत ठरतील, असे मला कधीही वाटले नाही,’’ असं अमेरिकेचे तिसरे अध्यक्ष थॉमस जेफरसन म्हणाले होते. पंडित जवाहरलाल नेहरू आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यातील मैत्रभावावर प्रकाश टाकताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारं ‘नेहरू व बोस’ हे पुस्तक वाचताना जेफरसन यांचं हे वाक्य आठवतं. इतिहासकार रुद्रांग्शू मुखर्जी यांनी या दोन समकालीन लोकोत्तर व्यक्तिमत्त्वांच्या समांतर जीवनप्रवासाचा या पुस्तकातून मागोवा घेतला आहे.
नेहरू आणि बोस या दोघांच्याही वयात दहा वर्षांहूनही कमी अंतर होतं. दोघंही संपन्न घराण्यातील, दोघांनीही केम्ब्रिज विद्यापीठात शिक्षण घेतलेलं आणि दोघंही स्वत:ला डाव्या विचारसरणीचे मानणारे. दोघांचाही समाजवादाकडे ओढा होता. हे पाहता या दोघांमध्ये मैत्रभाव निर्माण होणं साहजिकच होतं. मात्र, एका विशिष्ट मर्यादेत असलेल्या या मैत्रीतलं अंतर उत्तरोत्तर वाढत गेलं आणि त्यांचे जीवनप्रवाह कधीही एकत्र आले नाहीत. असं का झालं असावं, याचा शोध घेताना लेखक रुद्रांग्शू मुखर्जी यांनी या दोन राष्ट्रीय पुरुषांची विचारसरणी, त्यांच्यावर असलेले प्रभाव आणि तत्कालीन वातावरण यांचा लेखाजोखा मांडला आहे. नेहरू भारतात परतले त्यानंतर सुमारे नऊ वर्षांनी बोस भारतात आले. या काळात देशातील राजकीय वातावरण बदललेलं होतं. त्या काळात नेहरूंवर पाश्चात्त्य विचारसरणीचा प्रभाव मोठा होता, तर बोस यांनी आपल्या वाटचालीचा मार्ग आधीच निवडला होता. बोस भारतात परतले आणि ज्या दिवशी ते भारतात पोहोचले, त्याच दिवशी दुपारी ते गांधीजींना भेटायला गेले, यावरूनच त्यांच्या आयुष्याची दिशा स्पष्ट होते. परंतु पुढील काळात नेहरू गांधीजींकडे आकृष्ट झाले, आणि बोस गांधीजींच्या विचारांपासून दूर गेले. दोघंही असहकार चळवळीतील सहभागामुळेच तुरुंगात गेले होते. गांधीजींच्या असहकार चळवळीदरम्यान नेहरू आणि बोस यांची भेट झाली. मात्र, पहिल्या भेटीचं दोघांनाही स्मरण नव्हतं. मात्र ‘आपले वैचारिक समानधर्मी म्हणून सुभाषचंद्रांनी दूर अंतरावरून नेहरू यांचं स्वागत केलं होतं,’ असं मुखर्जी म्हणतात.
पुढच्या काळातही दोघांच्या आयुष्यातले समान धागे शोधता येतात. दोघांच्या कार्यकालाला स्वातंत्र्यलढ्याची पार्श्वभूमी असल्याने या काळातील घडामोडी, राजकारण आणि समाजकारणात वावरणारी विविध व्यक्तिमत्त्वं, सामान्य माणसं आणि त्या सगळ्यांना भेदून जाणारी दोघांच्याही मनातील वैचारिक आंदोलनं, त्यांतील अंतर्विरोध यांचे संदर्भ मुखर्जी यांच्या लेखनात जागोजागी येत राहतात. नेहरू गांधीजींकडे, त्यांच्या विचारांकडे ओढले जात असतानाच सुभाषचंद्र गांधीविचारांपासून लांब जाऊ लागले. ‘असहकार चळवळीत गांधीजींशी झालेली भेट अपेक्षाभंग करणारी आणि निराशाजनक होती,’ असं सुभाषचंद्र २० वर्षांनंतर म्हणाले होते. दरम्यानच्या काळात सुभाषचंद्रांना एमिली यांच्यापासून दूर जावं लागलं आणि कमला यांच्या निधनामुळे जवाहरलाल एकटे पडले. दोघांच्याही आयुष्यातील ही वैयक्तिक हानी त्यांच्यात भावनिक बंधही निर्माण करण्यास कारणीभूत ठरली. १९३६मध्ये झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदासाठी गांधीजींनी सुचवल्यामुळे जवाहरलाल यांची निवड करण्यात आली होती. या काळातील घडामोडींविषयी मुखर्जी यांनी तपशिलात लिहिलं आहे. या काळात सुभाषचंद्र यांची नेहरूंना साथ मिळाली असती, परंतु ब्रिटिशांनी त्यांना तुरुंगात टाकलं होतं. गांधीजींशी पत्रव्यवहार करायची त्यांना बंदी होती. नंतर १९३७मध्ये गांधीजी आणि सुभाषचंद्रांमधील दरी वाढलेली दिसून येते. गुजरातमधील हरिपुरा इथे होणाऱ्या काँग्रेसच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद सुभाषचंद्रांना देण्यात येऊ नये, अशी भूमिका गांधीजींनी घेतली होती.
बोस यांनी आपल्या आयुष्यातील १९३७पर्यंतचा काळ शब्दबद्ध करण्याचं ठरवलं होतं. त्यांना ही प्रेरणा जवाहरलाल यांच्या आत्मचरित्र-लेखनातूनच मिळाली असावी, असं अभ्यासकांना वाटतं. दोघांनीही आपापल्या लेखनामधून घेतलेल्या ‘स्व’च्या शोधाचा तुलनात्मक वेध मुखर्जी यांनी घेतला आहे. नियोजन आणि औद्योगीकीकरणाची गरज या विषयांवर उभयतांची सहमती होती. परंतु, राष्ट्रीय नियोजन समितीच्या कामातील मतभेदांमुळे दोघांमध्ये विसंवाद निर्माण झाले. यासंदर्भात दोघांची पत्रांची देवाणघेवाण झाली, त्यातून ते स्पष्ट होतात. तरीही यानंतरच्या काळातही उभयतांना वेगवेगळ्या विषयांवरील एकमेकांची मतं जाणून घेण्यात स्वारस्य होतं. मात्र, सुभाषचंद्रांचं मन हुकूमशाही वृत्तीचं आहे, असं जवाहरलाल यांचं, काही घटनांच्या संदर्भाने मत बनलं होतं. या वेळी उभयतांमधील मतभेद वाढले. ‘मला समजून घेणं तुम्हाला अवघड वाटलं; याबद्दल मला खेद वाटतो. बहुधा असा प्रयत्न करण्यात फारसा अर्थच नाही,’ असं १९३९मध्ये नेहरू यांनी सुभाषचंद्रांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं. ही उभयतांच्या मैत्रीच्या अंताची सुरुवात ठरली. तत्पूर्वी, १९३८मध्ये जर्मनीतून आलेल्या एका नाझी अधिकाऱ्याची सुभाषचंद्र यांनी भेट घेतली होती. त्याविषयीही जवाहरलाल यांची नाराजी होती. पुढच्या काळात एकीकडे गांधीचे वारसदार असलेले जवाहरलाल यांच्या हाती एकवटलेलं देशाचं नेतृत्व आणि दुसरीकडे भारतीय स्वातंत्र्यासाठी नाझींची मदत घेण्यासाठी जर्मनीत गेलेले सुभाषचंद्र; यांतून या दोन भिन्न प्रवृत्ती ठळक होतात. तरीही आझाद हिंद सेना स्थापन केल्यावर सुभाषचंद्रांनी काँग्रेसचा वारसा झुगारला नव्हता, तर सुभाषचंद्रांच्या हेतूविषयी आपल्याला शंका नसल्याचं जवाहरलाल यांनी नमूद केलं होतं. जवाहरलाल यांच्या साथीने आपण इतिहास घडवून आणू शकतो, असं सुभाषचंद्रांना वाटत होतं. मात्र, दोघांना एकमेकांची साथ लाभली नाही, एवढं खरं. तेव्हाची परिस्थिती आणि या दोघांच्या नात्यातील असे अनेक पदर या पुस्तकातून उलगडले गेले आहेत. इतिहासाच्या पानांमध्ये दुर्लक्षित राहिलेला हा समांतर जीवनप्रवास मुखर्जी यांनी अभ्यासपूर्णरित्या आणि ताकदीने जोखला आहे; आणि अवधूत डोंगरे यांच्या प्रवाही अनुवादाने तो मराठी वाचकांपर्यंत पोहोचला आहे.
-सुनीता लोहोकरे
नेहरू व बोस समांतर जीवनप्रवास / लेखक- रुद्रांग्शू मुखर्जी / अनुवाद : अवधूत डोंगरे / रोहन प्रकाशन
- मला आवडलेली इतर काही पुस्तकं
- दंशकाल / लेखक- हृषीकेश गुप्ते / राजहंस प्रकाशन.
- एन्ड ऑफ द वर्ल्ड भटकंती / लेखक- जयप्रकाश प्रधान / रोहन प्रकाशन.
- ईश्वर डॉट कॉम / लेखक- विश्राम गुप्ते / राजहंस प्रकाशन.
- शिन्झेन किस / लेखक- शिनईची होशी, अनुवाद : निसीम बेडेकर / रोहन प्रकाशन.
- इन्स्टॉलेशन्स / लेखक- गणेश मतकरी / मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस.
- असाही पाकिस्तान / लेखक- अरविंद व्यं. गोखले / रोहन प्रकाशन.
पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल फेब्रुवारी २०२०
रोहन शिफारस
नेहरू व बोस : समांतर जीवनप्रवास
स्वातंत्र्य चळवळीच्या पाश्र्वभूमीवर या दोन उत्तुंग व्यक्तिमत्त्वांच्या जडणघडणीचा शोध रुद्रांग्शू मुखर्जी यांनी या पुस्तकात सखोलतेने घेतला आहे. भिन्न राजकीय विचारधारांमुळे नेहरू व बोस यांच्यात न उमलू शकलेल्या मैत्रीचा अदमास हे पुस्तक बांधतं आणि त्याचसोबत या दोन व्यक्तिमत्त्वांमधीलभेदही अधोरेखित करतं. गांधी नेहरूंकडे आपला राजकीय वारस म्हणून बघत होते, तर सुभाषचंद्रांना मार्गभ्रष्ट पुत्र मानत होते. आधुनिक भारताच्या घडणीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान असलेल्या दोन परस्परविरोधी व्यक्तिमत्त्वांची लक्षवेधक कहाणी… नेहरू व बोस समांतर जीवनप्रवास !
₹350.00Add to Cart