बोलकी पुस्तकं
फेसबुकमुळे अनेक चांगले मित्र-मैत्रिणी मिळाले, त्यांच्यातली वैशिष्ट्यं मनाला मोहवून गेली. या सगळ्यांकडून आजही भरभरून काही ना काही मिळतं….त्यातच पुस्तकं म्हटलं की, गेल्या काही दिवसांत काही मित्र-मैत्रिणींनी अनेक पुस्तकं दिली. त्यांतलाच एक फेसबुकवरचा मित्र म्हणजे फारूक एस. काझी!
कुरियर आलं आणि त्यात एकच पुस्तक असावं असं मी गृहीत धरलं. पण जेव्हा वाचण्यासाठी पार्सल उघडलं, तेव्हा चार चार पुस्तकं बघून मी हरखून गेले. ‘प्रिय अब्बू’, ‘मित्र’, ‘चित्र आणि इतर कथा’ आणि ‘तू माझी चुटकी आहेस आणि इतर कथा’ ही चार पुस्तकं! ताजे रंग, बोलकी चित्रं मुखपृष्ठावर बघून मन आनंदून गेलं. यांतली दोन पुस्तकं रोहन प्रकाशनाची!
फारूक एस. काझी हे अनेक पुरस्कार मिळवलेले शिक्षक! मुलांच्या मनात काय चाललंय हे अचूकपणे ओळखणारा हा माणूस! त्यांना न भेटताही त्यांची पुस्तकं वाचताना हे कळत जातं. मला ही चारही पुस्तकं आवडण्याचं कारण म्हणजे यात मुलांना कुठलाही उपदेश केला नाही. बरं का मुलांनो, कथेत कुठेही काही सल्ला दिलेला नाही आणि पुस्तकात कुठेही बोजड भाषेचा वापर केलेला नाही. यातल्या दोन पुस्तकांमध्ये कोण्या थोरामोठ्यांची प्रस्तावना दिलेली नाही, तर मैत्री आणि कबीर या दोन बालमित्रांची मनोगतं आहेत हे विशेष!
ही पुस्तकं लहानांसाठी असली, तरी मोठ्यांना लहान करण्याची ताकद या पुस्तकांमध्ये आहे. पर्यावरण, स्वावलंबन, परिश्रमाचं महत्त्व, अनाथांचं दु:ख, प्राणिप्रेम, मानसिक आणि शारीरिक विकलांगता असे अनेक विषय हळुवारपणे लेखकाने हाताळले आहेत. यातली चुटकी असो, की जैश्यूची अम्मी असो- ही मंडळी डोळ्यांत आसवं आणतात. गोष्टी म्हणू किंवा कथा म्हणू- अतिशय छोट्या आहेत. मुलांनी वाचायला किंवा ऐकायला सुरुवात केल्यावर कधी संपल्या न कळणाऱ्या. पण त्यानंतर मात्र कितिक वेळ मनात रेंगाळणाऱ्या, विचार करायला लावणाऱ्या आहेत.
प्रत्येक पुस्तकावर माझ्या नावाने सस्नेह पाठवलेली भेटाक्षरं मला चकित करून गेली. अतिशय सुरेख हस्ताक्षर! जपून ठेवावं असं!
फारूक, इतकी सुंदर भेट पाठवल्याबद्दल मी कुठल्या भाषेत आभार मानावेत खरंच कळत नाही. पण खरोखरच, ही पुस्तकं, त्यांतली पात्रं मला इतकी आवडली की, माझं मन आता माझ्या आसपास उबेद आणि इतरांना सतत शोधत राहणार हे नक्की!
–दीपा देशमुख, पुणे
सकस आणि बालकथेच्या कक्षा रुंदावणाऱ्या बालकथा
फारुक एस. काझी. आजचं मराठी बालसाहित्यातील महत्त्वाचं नाव. बालकांसाठी सातत्याने लेखन करणाऱ्या या लेखकमित्राचे दोन बालकथा संग्रह वाचनात आले. ‘चित्र आणि इतर कथा’ आणि ‘तू माझी चुटकी आहेस आणि इतर कथा’.
मराठी बालकथेची कक्षा रुंदावणारे हे दोन्ही संग्रह आहेत. यांतील प्रत्येक गोष्ट ही स्वतंत्र जीवनानुभव घेऊन वाचकांसमोर येते. विषयांचं वैविध्य हे या संग्रहाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य. गोष्ट सांगण्याची फारुकभाईंची स्वतंत्र शैली आहे. जी शैली वाचकाला भिडते, त्याच्या मनात गोष्टीला रुजवते. संग्रहांतील सर्वच गोष्टी अतिशय उत्तम उतरल्या आहेत. विशेषत: ‘अब्बूंना पत्र’सारखी गोष्ट मला विशेष स्पर्शून गेली. तिने अक्षरश: डोळ्यांत पाणी उभं केलं.
फारुकभाईंनी गेल्या काही वर्षांत अतिशय सकस अशी बालकथा लिहिली आहे. यामागे त्यांचं सातत्याने वाचन आणि चिंतन दिसून येतं. ते जागतिक आणि भारतातील इतर भाषांतील बालसाहित्याचं जाणीवपूर्वक वाचन करतात आणि त्यावर चिंतन करतात. यातून बालसाहित्याविषयी व्यापक होत जाणारा दृष्टिकोन त्यांच्या लेखनात दिसून येतो. रोहन प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या या दोन्ही संग्रहांत समाविष्ट करण्यात आलेली प्रत्येक गोष्ट ही प्रयोगशील आहे. यातील प्रत्येक गोष्टीत बालकादंबरीची बीजं आहेत असं म्हटल्यास वावगं ठरू नये. नीलेश जाधव यांचं मुखपृष्ठ आणि आतील चित्रं खूप सुंदर आहेत. एकंदरीत या संग्रहातून एक समर्थ बालकथा आपल्या समोर आली आहे असं म्हणता येईल. प्रत्येक बालकाला वाचायला द्यायलाच हवेत असे हे संग्रह आहेत.
–डॉ. विशाल तायडे, औरंगाबाद
पालकत्वाबद्दल मार्गदर्शन करणारं पुस्तक
‘करोनाकाळातील कल्पक पालकत्व’ हे तुम्ही लिहिलेलं पुस्तक वाचलं. खूप सोप्या भाषेत तुम्ही मांडणी केली आहे. सध्या असं वातावरण झालं आहे की, फक्त पालकांनाच नाही, तर मुलांनाही समजून घेणं गरजेचं आहे. मुलांकडून नेहमीच अपेक्षा ठेवल्या जातात. परंतु मुलांनाही पालकांकडून काही अपेक्षा असतात आणि तुम्ही ते एकदम सोप्या भाषेत मांडलं आहे. अचानकपणे आपलं जे दैनंदिन जीवन होतं ते बंद झालं त्यामुळे मुलं आणि पालक फार गोंधळून गेले आहेत. त्यामुळे पालकांनासुद्धा मुलांच्या डोक्यात जो गोंधळ चालू आहे तो सोडवणं कठीण होत आहे. परंतु तुम्ही या पुस्तकात मुलांना वेळ कसा देता येईल यापासून ते आपण मुलांचे मित्र कसे बनू हे सगळं मांडलं आहे.
-दीप्ती जाधव
वण्डरलँडचं वेस्टलँड
96 मेट्रोमॉल – ‘मयंक इन वेस्टलॅण्ड’ ही अॅलिसला दिलेली समकालीन प्रतिक्रिया आहे. ससोबाच्या जागी येतो मोबाईलड्यूड, तर सतत सर्वांची डोकी उडवण्याचे हुकूम देणाऱ्या राणीच्या जागी येते मिडीयाराणी (ही रिप्लेसमेंट तर अगदी दाद द्यावी अशी) ‘वंडरलॅण्ड’मध्ये नंदाला भेटणारे वेगवेगळे प्राणी आजच्या काळात तुमचा-आमचा अभिन्न भाग झालेले वेगवेगळे गॅजेट्स होतात. एक महत्त्वाचा फरक आहे. अॅलिसचं स्वप्न आपल्या हेतूशून्य, वखवखशून्य असण्याचा निरागस उत्सव आहे; मयंकचं स्वप्न मात्र आजच्या चंगळवादाचा, भोगासाठीच्या वखवखीचा हेतूत: आयोजलेला कार्निवल आहे. यातली जादू तुमच्या जगण्यातला ग्राहकाव्यतिरिक्त असलेला सगळा शांतरस पिळून काढत सगळीकडून तुम्हाला शोषत राहते. वंडरलॅण्ड ही कालची परीकथा आहे हवीहवीशी, वेस्टलॅण्ड हे आजचं, कदाचित उद्या आणखी भेसूर होऊ शकणारं भयस्वप्न. पण शेवट मात्र काहीशी पळवाट वाटावा असा येतो. हे फार सुलभीकरण वाटतं. टीपेला पोचलेल्या भोगलालसेला उत्तर एकदम आदिवासी होणं? तरीही एकदा अनुभव घ्यावाच अशी ही रोलर कोस्टर राईड आहे.
–नीतीन वैद्य (फेसबुकवरून साभार)
पूर्वप्रकाशित रोहन साहित्य मैफल २०२१ जानेवारी
खरेदी करण्यासाठी…
96 मेट्रोमॉल
₹170.00करोना काळातील कल्पक पालकत्व
₹80.00चित्र आणि इतर कथा
₹60.00तू माझी चुटकी आहेस
₹60.00वाचकांचे समाजमाध्यमांवरील प्रतिसाद
लैंगिकतेचा वेध घेणाऱ्या दीर्घकथा (दीपा देशमुख)
दोन्ही दीर्घकथा लैंगिकतेभोवती फिरत असल्या तरी त्या कुठेही अश्लील वाटत नाहीत किंवा आपला ताळतंत्र सोडत नाहीत…