२. रुळाच्‍या जोडाचे प्रकार

रेल्‍वेच्‍या एका रुळाची लांबी १३ मीटर असते. हे दोन रुळ ज्‍या ठिकाणी जोडले जातात त्‍या ठिकाणाला रेल जॉइंट म्‍हणतात. हे रेल जॉइंट्स दोन प्रकारांत असतात. एक म्‍हणजे दोन रुळांच्‍या स्‍थितीप्रमाणे होणारा जोड आणि दुसरा जोड म्‍हणजे स्लीपरच्‍या स्‍थितीप्रमाणे होणारा.

A) रुळांच्‍या स्‍थितीप्रमाणे होणाऱ्या जोडाचे दोन प्रकार असतात.

१. स्क्वेअर जॉइंट (Square Joint) –

यामध्ये एका रुळाच्‍या जॉइंटच्‍या अगदी बरोबर समोर दुसऱ्या रुळाचा जॉइंट असतो. सरळ मार्गावर ही पद्धत वापरली जाते.

२. स्‍टॅगर्ड जॉइंट (Staggered Joint) –

यामध्ये एका रुळाचा जॉइंट दुसऱ्या रुळाच्‍या अगदी समोर नसतो. हा सर्वसाधारण समोरच्‍या जॉइंटच्‍या मध्यावर असतो. सर्वसाधारणपणे वळणावर (कर्व्हेचर) अशा प्रकारचे जॉइंट्स असतात. याचे कारण म्‍हणजे वळणावर बाहेर ढकलणारा सेंट्रिफ्युगल फोर्स काम करीत असतो. या फोर्सची प्रवृत्ती ट्रॅक, आउट ऑफ लाइन करण्याची असते. जॉइंट हा रुळाचा अत्‍यंत कमकुवत भाग असतो. समोरासमोरील रुळाचे जॉइंट अगदीच समोरासमोर आले (स्क्वेअर जॉइंट), तर या सेंट्रिफ्युगल फोर्समुळे तेथील रुळांचा धोका वाढतो, पण तेच जॉइंट वेगवेगळ्या पोझिशनला असल्‍याने रुळांचा धोका कमी होतो. थोडक्यात त्यांची ताकद व स्‍थिरता वाढते. या प्रकारचे जॉइंट्स शक्‍यतो सरळ मार्गावर वापरले जात नाहीत.

B) स्लीपरच्‍या पोझिशनप्रमाणे होणारे जॉइंट्स.

१. सस्‍पेंडेड जॉइंट्स (Suspended Joints) – 

या प्रकारचा जॉइंट हा शेजार-शेजारच्‍या स्लीपरच्‍या बरोबर मध्यावर असतो. रुळांच्‍या या पोझिशनमुळे स्लीपरवर समान वजन वितरित होते. त्‍याचप्रमाणे ट्रॅकला खूप जास्‍त प्रमाणात लवचीकता मिळते. तसेच त्‍याचप्रमाणे ट्रॅकला जी लाटेसारखी (क्रीप) परिस्‍थिती तयार होते त्‍याचे प्रमाण कमी केले जाते. परंतु यांची देखभाल जास्‍त करावी लागते. या प्रकारच्‍या जॉइंट मोठ्या प्रमाणात वापरला जातो.

२. सपोर्टेड जॉइंट (Supported Joint) – 

या प्रकारच्या जॉइंटमध्ये स्लीपर हा अगदी बरोबर जॉइंटच्‍या खाली असतो. जॉइंट हा रुळाचा सर्वात कमकुवत भाग असतो. त्‍याखालीच हा स्लीपर असल्‍याने त्‍याला आधार मिळतो. पण तरीही या प्रकारचे जॉइंट्स हल्‍ली वापरात नाहीत. याचे कारण हेवी ॲक्‍सल लोडला हे आधार देत नाहीत. यामुळे ट्रॅकची इलॅस्‍टिसिटी म्‍हणजे लवचीकतासुद्धा कमी होते.

३. ब्रिज जॉइंट (Bridge Joint) – 

हा जॉइंट सस्‍पेंडेड जॉइंटसारखाच असतो. फक्‍त यामध्ये फरक इतकाच असतो की, यामध्ये दोन रुळांच्‍यामध्ये पुरेशा लांबीची धातूची पट्टी (स्ट्रिप) वापरलेली असते. या पट्टीमुळे रुळाला बेंडिंग स्‍ट्रेस राहात नाही. हा ब्रिज म्‍हणजे धातूची पट्टी रुळाच्या खाली व स्लीपरवर घातलेली असते.

Tags: No tags

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *