रेल्वे ट्रॅक स्लीपर्सवर पक्का बसवलेला असतो. पूर्वीच्या काळी लाकडी स्लीपर्स वापरात होते. त्याचप्रमाणे लोखंडी म्हणजे मेटल स्लीपर्सही वापरले जात होते. रेल्वे ट्रॅक हा, त्या त्या प्रकारच्या स्लीपरवर लावण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे खिळे (Spikes) वापरले जातात.
पूर्वी जेव्हा वूडन स्लीपर्स व मेटल स्लीपर्स वापरले जायचे त्या वेळेस रुळ स्लीपरवर फिक्स करण्यासाठी चेअर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या कीज वापरल्या जायच्या. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे स्पाइक्स वापरले जायचे. डबल हेडेड व बुल हेडेड रूळ स्लीपरवर फिक्स करण्यासाठी चेअर्स वापरल्या जात होत्या. या चेअर्स फिक्स करण्यासाठी स्पाईक्सचा वापर केला जायचा. चेअर्स वापरल्यामुळे रुळावर पडणारा गाडीचा भार जास्त क्षेत्रफळावर विभागला जायचा. चेअरमध्ये रुळ बसवताना इनर जॉ रुळाला खेटून पक्का केला जायचा व त्याला अजून मजबुती देण्यासाठी आउटर जॉ व रुळ यांमध्ये ‘की’ घालून तो पक्का केला जायचा. त्यासाठी वूडन की किंवा मेटल की वापरली जायची. चेअर स्लीपरवर पक्की करण्यासाठी वेगवेगळे स्पाइक्स (खिळे) वापरले जायचे. डॉग स्पाइकचा वापर वूडन स्लीपरवर रुळ पक्का बसवण्यासाठी केला जात असे. हे वापरण्यामधील एक दोष म्हणजे रेल्वे जेव्हा वारंवार रुळांवरून जायची, तेव्हा हे ढिले होऊन हळूहळू वर येऊ लागत. त्यामुळे ते पुन्हा पक्के करणे हे काम करावे लागत असे. हे कमी करण्यासाठी नंतर स्क्रू टाईप स्पाइक्सचा वापर सुरू झाला. त्यामुळे रुळ स्लीपरला धरून ठेवण्याची क्षमता खूपच वाढली. राउंड स्पाइक्स हे बूल हेडेड रुळ, वूडन स्लीपर्सवर पॉइंट व क्रॉसिंगच्या ठिकाणी वापरले जात असत. त्याचप्रमाणे कास्ट आयर्नची चेअर पक्की करण्यासाठी स्टँडर्ड स्पाइक वापरले जात असत. त्यानंतर इलास्टिक स्पाइक्स वापरले जाऊ लागले. हे जास्त उपयुक्त ठरले. कारण त्यामुळे रुळाची होणारी आडवी व उभी हालचाल शोषली जायची. या चेअर्सना ‘बेअरिंग प्लेट’ असेही म्हणतात. वरील आकृतीमध्ये special cast iron bearing plate कशा रितीने बसवलेली असते ते दाखवले आहे. या शिवाय अजून तीन प्रकारच्या बेअरिंग प्लेट्सही वापरल्या जायच्या.
१. Mild Steel canted bearing plate :
ही बेअरिंग प्लेट माईल्ड स्टीलची असते. या प्लेटला १:२० अँगल (स्लोप) दिलेला असतो. तो आतील बाजूस दिलेला असतो. त्यामुळे व्हीलचा फ्लँज घासून खराब होत नाही व दोन्ही व्हील्स मध्यभागी राहतात.
२. Flat mild steel bearing plate :
या प्लेटला कॅन्ट (म्हणजे अँगल) दिलेला नसतो. ही फ्लॅट असते. ही प्लेट पॉइंट व क्रॉसिंगवर वापरली जाते.
३. Cast iron anti-creep bearing plate :
ही बेअरिंग प्लेट रुळाला ज्या ठिकाणी क्रीप होण्याचा संभव असतो, तेथे वापरली जाते. क्रीप म्हणजे रेल्वे जेव्हा रुळावरून पुढे जाते, त्या वेळेस जॉइंटपाशी रुळाची आडवी हालचाल होते. म्हणजेच त्याचा भाग थोडा पुढे-मागे होण्याची शक्यता असते. तिथे जॉइंट नसेल तर रुळाची लाटेसारखी उभी व आडवी हालचाल होते. यालाही १:२०चा स्लोप (कॅन्ट) दिलेला असतो.
परंतु जेव्हा कॉन्क्रिट स्लीपर्स वापरात आले त्या वेळेस या सर्व गोष्टी वापरणे एकदम बंद झाले व रुळ स्लीपरवर फिक्स करायची एकदम सोपी पद्धत वापरात येऊ लागली. त्यासाठी रुळाच्या आतल्या व बाहेरच्या बाजूला एक छिद्र असलेली प्लेट कॉन्क्रिटमध्येच पक्की केलेली असते. त्या छिद्रामधून एक क्लीप घालून तिचा दुसरा भाग रुळाच्या शूवर घट्ट बसवला जातो. या क्लिपला पँड्रोल क्लीप म्हणतात. सिलिका, मँगेनिज हे घटक असलेल्या स्प्रिंग स्टीलबार पासूनही बनवतात. ही जिलेबीच्या आकाराची असते व ती २१०० किग्रॅ.चा दाबही व्यवस्थित घेऊ शकते. यामध्ये इलॅस्टिसिटीचे गुणधर्म असतात. त्यामुळे रेल्वेच्या व्हायब्रेशननेसुद्धा या क्लिपला काही होत नाही व स्लीपरवर रुळांना घट्ट धरून ठेवण्याचे काम करते. कॉन्क्रिट स्लीपर्ससाठी याच क्लिप्स सर्वत्र वापरल्या जातात.
रुळ स्लीपरवर बसवले जातात ती ‘फासनिंग सिस्टिम’ दोन प्रकारची असते. एक रिजिड फासनिंग म्हणजे पक्की बांधणी पद्धत व दुसरी इलॅस्टिक फासनिंग म्हणजे लवचीक बांधणी पद्धती. वूडन स्लीपर व मेटल स्लीपरवर बसवलेले रुळ हे रिजिड फासनिंग (Rigid Fastning) सिस्टिममध्ये मोडतात व कॉन्क्रिट स्लीपरवर पँड्रोल क्लिपने रुळ बसवले जातात. त्याला इलॅस्टिक फासनिंग सिस्टिम म्हणतात.
•वूडन स्लीपर्सवर रुळ बसवण्यासाठी स्पाइक्स व बेअरिंग प्लेटची आवश्यकता असते.
•मेटल स्लीपरवर रुळ बसवण्यासाठी जॉज, कीज, टायबार्सची आवश्यकता असते.
•कॉन्क्रिट स्लीपरवर रुळ बसवण्यासाठी पँड्रोल क्लिप, लायनर व रबर पॅडची आवश्यकता असते. खालील आकृती पाहावी.
इलॅस्टिक फासनिंग सिस्टिममध्ये स्लीपर व रुळ यांच्यामध्ये (रुळाचे खाली स्लीपरवर) रबर पॅड घातले जाते. त्यामुळे वरून पडणारे वजन समानरीत्या विभागले जाते व स्लीपरवर रुळ घासला जात नसल्याने स्लीपर चांगले टिकतात. त्याचप्रमाणे ही कंपने कमी करण्याचे काम व इन्स्यूलेशनचे काम करते. या पॅड्समध्ये पिंपल्ड पॅड व ग्रुव्हड् पॅड असे दोन प्रकार वापरले जातात. या इलॅस्टिक फासनिंग सिस्टिममधील दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे लायनर. लायनरवर पँड्रोल क्लिप बसवतात. पँड्रोल क्लिप जर लायनरशिवाय रुळावर बसवली, तर रुळाचे वजन कमी क्षेत्रफळावर वितरित होईल. कारण त्याचा रुळावर टेकणारा भाग अगदीच थोडा राहिला असता. वजन जास्त क्षेत्रफळावर वितरित व्हावे म्हणून रुळ व पँड्रोल क्लिपमध्ये लायनर टाकतात. हे लायनर दोन प्रकारचे असतात. एक मेटल लायनर व दुसरा GFN लायनर म्हणजे ग्लास फिल्ड नायलॉन लायनर. हा GFN लायनर उत्तम प्रकारे इन्श्युलेटर म्हणजे विद्युतरोधक म्हणून काम करतो. त्यामुळे ट्रॅक सर्किटेड एरियामध्ये हा वापरला जातो. या सिस्टिमचा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे पँड्रोल क्लिप म्हणजेच ERC (Elastic Rail Clip). त्याची माहिती यापूर्वी दिलेली आहे. याचा इलॅस्टिक म्हणजे लवचीकता या गुणधर्मामुळे रुळावर जो भार पडतो, तो कमी होताच रुळ मूळ पदावर व होत्या त्या स्थितीत आणण्याचे महत्त्वाचे काम या क्लिपमुळे होते. ही क्लिप बसवायला अत्यंत सोपी असते व देखभालही कमी लागते. (या सर्वांसाठी मागील पानावरील आकृती पाहा.)
कॉन्क्रिट स्लीपरवर रुळ जिथे बसतो, तिथे दोन छिद्रे असलेले शोल्डर्स असतात. त्यामध्ये प्रथम रबर पॅड घातले जाते व त्यावर रुळ ठेवला जातो. रुळाचे फूटवर लायनर ठेवला जातो व शोल्डरच्या छिद्रांमधून पँड्रोल क्लिप घालून तिचे दुसरे टोक लायनरवर पक्के केले जाते. (मुख्य आकृती पाहावी) अशा रितीने दोन्ही बाजूचे रुळ घालतात व ट्रॅक तयार होतो. हल्ली सर्वत्र याच पद्धतीचे कॉन्क्रिट स्लीपर्स व इलॅस्टिक फासनिंग सिस्टिमचा वापर केला जातो.



