दैनिक लोकसत्तामधील लोकरंग पुरवणीत ‘नाकारलेला’ या पुस्तकाचे सुकुमार शिदोरे यांनी लिहिलेले परीक्षण!
महाराष्ट्रातल्या गडचिरोली या संघर्षग्रस्त भागात आदिवासी आपले दैनंदिन जीवन कसे जगत आहेत? गेली चार दशके एकीकडे सुरक्षा दले आणि दुसरीकडे नक्षलवादी, या कैचीत सापडलेल्या आदिवासींना सतत कशा स्वरूपाचे आतंकित जीवन जगावे लागत आहे? अशा प्रकारच्या प्रश्नांचा वेध घेणाऱ्या कथा आणि व्यथा वाचकांसमोर फारशा येत नाहीत. तेच चितारण्याचा प्रयत्न विलास मनोहर यांनी ‘नाकारलेला’ या आपल्या कादंबरीद्वारे सर्जनशीलतेने केला आहे.
लेखक विलास मनोहर १९७५ पासून गडचिरोली भागात सामाजिक कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत. १९८०च्या दशकात या भागात नक्षलवादाचा शिरकाव झाल्यावर आदिवासींची स्थिती कशी होती त्याचे चित्रण मनोहर यांनी त्यांची पहिली कादंबरी ‘एका नक्षलवाद्याचा जन्म’ यामधून केले होते. त्या कादंबरीचा पुढील भाग म्हणजे, ‘रोहन प्रकाशन’तर्फे प्रकाशित झालेली प्रस्तुत कादंबरी. या कादंबरीचा नायक लालसू वड्डे हा मूळचा इथला असला तरी पुढे पुण्यात स्थलांतरित होऊन उच्चशिक्षण आणि कॉम्प्युटर क्षेत्रातील चांगली नोकरी दोन्ही प्राप्त करून सुस्थित झालेला आहे. त्याचे आप्त, परिचित आणि पूर्वीचे सवंगडी – ज्यांनी आता व्यापार, पत्रकारिता ते प्राध्यापकी, सुरक्षा दलातील जवान ते नक्षली ‘दलम’चे सभासद ते खबरी होणे असे विविध मार्ग पत्करले आहेत – अशा अनेकांच्या सहव्यक्तिरेखा यात आहेत. एकंदरीत, मध्यवर्ती व्यक्तिरेखेच्या तटस्थ नजरेतून आणि त्याचप्रमाणे, अशा अनेक सहव्यक्तिरेखांच्या नजरेतून येथील स्थितीचे दर्शन घडावे या दृष्टीने या दीर्घ कादंबरीची प्रकरणवार रचना केलेली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील कुटेर गावच्या माडिया जमातीत जन्मलेला लालसू वड्डे येथील आश्रमशाळेतील शिक्षण पूर्ण झाल्यावर, म्हणजे, वीस वर्षांपूर्वीच पुण्याला गेलेला असतो आणि तेव्हापासून तो आपल्या गावात कधी फिरकलेला नसतो. मात्र, त्याची मैत्रीण अनिता त्याला सोडून गेल्यावर त्याला प्रथमच आपल्या प्रदेशाची ‘पुनर्भेट’ घेऊन तेथील स्थिती जाणून घ्यायची इच्छा होते. सुट्टी काढून आपल्या कुटेर गावाला जाण्यासाठी निघतो. घरी जाताना त्याची वृद्ध ‘आवल’ अर्थात, आई (मैनी), नक्षलवाद्यांमध्ये सामील झालेले वडील (जुरू दादा), आणि लहान भाऊ (गोंगलू जो पोलिसांसोबतच्या ‘चकमकी’त ठार झालेला असतो) असे सर्व त्याच्या डोळ्यांसमोर तरळून जातात. बहीण रुपी एका बंगाली ठेकेदाराशी (सुभाषशी) लग्न करून सुखवस्तू जीवन जगत असल्याचे त्याला समजले असते.
सुरुवातीच्या ‘पुनर्भेट’ प्रकरणात, लालसू नागपूरहून बसचा प्रवास करून जसा गडचिरोली जिल्ह्यातील बोलेपल्ली बस स्थानकावर उतरतो, तसे पोलीस त्याला संशयास्पद व्यक्ती म्हणून ‘हेरतात’ आणि प्रश्न विचारणे सुरू करतात; त्याला पकडून पोलीस स्टेशनवर नेण्याची धमकीही देतात. पण पोलिसांमधला वरिष्ठ जमादार देवू (जो लालसूचा जुना शाळा-सहकारी असतो) तिथे पोहोचतो आणि संकट टळते. परंतु, अगदी पोहोचताच आलेल्या या अनुभवामुळे लालसूला या टापूतल्या संशयाच्या आणि भयाच्या वातावरणाची जाणीव होते. त्या जाणिवेने तो धास्तावून जातो.
लालसू गावात पोहोचल्यावर अजूनही पडक्या घरात, दारिद्र्र्यात, एकाकी जीवन जगणाऱ्या आपल्या वृद्ध ‘आवल’ला अर्थात आईला भेटून व्यथित होतो. मोठ्या उत्साहाने तो त्याच्या आश्रमशाळेतल्या जुन्या आदिवासी सवंगड्यांना भेटतो. ते आता वेगवेगळे व्यवसाय करीत असतात – उदाहरणार्थ, देवू (पोलीस जमादार), पेका (हेड मास्तर), मादी (दुकानदार), विजय (प्राध्यापक), कोमटी (‘दादा’ लोकांचा खबऱ्या). त्याचप्रमाणे, चिन्ना (मूळ आदिवासी धर्माची ‘ओळख’ जपू पाहणारा) आणि इतर अनेकांशी लालसूचा संवाद होतो. त्याचवेळी, येथील ‘पाळती’च्या वातावरणात फक्त आई-बहीणच नाही, तर हे सवंगडीदेखील काहीतरी दडवून, हातचे राखून बोलतात हे त्याला प्रकर्षाने जाणवत राहते.
आपले ‘मृत’ घोषित केलेले वडील जिवंत आहेत, परंतु आपल्याला भेटू इच्छित नाहीत हे समजल्यावर तर लालसू हादरूनच जातो. आदिवासींना अशा तणावग्रस्त परिस्थितीतून मुक्त करण्यासाठी आपल्याला काय करता येईल ते जाणून घेण्यासाठी तो त्या भागात संचार करून अनेक घटकांशी संवाद साधतो. त्या प्रक्रियेत त्याची पोलीस अधिकारी, कमांडो ते नक्षलवाद्यांमधील उच्च नेता ‘वेणू’, त्याची सहकारी ‘सुनीता’, ज्येष्ठ पत्रकार अशा अनेकविध लोकांशी भेट होते. त्यातून त्यांचे मनोव्यापार तर समोर येतातच, पण येथील भेदक परिस्थितीही आपसूकच उलगडत जाते. मात्र, या प्रक्रियेत लालसू स्वत:च अडचणीत येऊ लागतो, ‘पाळतग्रस्त’ होऊन (पोलीस आणि नक्षल दोन्ही बाजूने) संशयाने कमालीचा घेरला जातो… आपण स्वत:च नाही, तर पूर्ण आदिवासी समाजच मुख्य प्रवाहातून ‘नाकारलेला’ आहे या जाणिवेने कमालीचा व्यथित होतो. या कादंबरीत अनेक स्त्री व्यक्तिरेखा आहेत. जुन्या आदिवासी मूल्यांनिशी जगणारे ‘आवल’ आणि सन्नो, व्यवहारचातुर्य राखून जगणारी रुपी ते आदिवासी स्त्री-पुरुष संबंधांतील मोकळेपणा व नागरी जीवनशैलीचं अप्रूप यांचा सहज मेळ साधण्याची क्षमता असलेली आधुनिक आदिवासी तरुणी नूतन, अशा अनेक आदिवासी स्त्री व्यक्तिरेखांचा पट या कादंबरीतून उलगडतो. एकंदरीतच, किमान कपडे घातलेले, दु:ख-दैन्य डोळ्यात लेऊन जगणारे स्त्री-पुरुष अशी जी आदिवासींची साचेबंद प्रतिमा उभी केली जाते, त्याला ही कादंबरी पूर्ण छेद देते आणि आजच्या बदलांची नोंद घेत आपल्या डोळ्यांसमोर वास्तव परिदृश्य उभे करते. हे या कादंबरीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरावे.
- सुकुमार शिदोरे
नाकारलेला : विलास मनोहर, रोहन प्रकाशन, पाने – ४३२, किंमत – ५७५
sukumarshidore@gmail.com
परिक्षणाची लिंक – https://www.loksatta.com/lokrang/book-review-of-nakarlela-a-novel-by-vilas-manohar-depicts-the-harrowing-lives-of-tribals-in-conflict-of-police-and-naxalites-gadchiroli-psg-98-4479874/?utm_source=whatsapp&utm_medium=social&utm_campaign=WhatsappShare