फिशप्लेटचे मुख्य कार्य, म्हणजे दोन रुळांना भक्कम जोड देणे, ट्रॅकमध्ये कन्टिन्यूइटी म्हणजे सलगता ठेवणे आणि त्याचप्रमाणे ऋतूप्रमाणे बदलणाऱ्या तापमान बदलानुसार निर्माण होणारी गरज पूर्ण करणे. दोन रुळ जोडताना त्यामध्ये थोडी गॅप म्हणजे फट ठेवलेली असते. उन्हाळ्यात रुळाचे प्रसरण होते, तर थंडीत आकुंचन होते. अशा वेळीसुद्धा फिश प्लेटमुळे रुळ एकसंध राहण्यास मदत होते. फिश प्लेट ही हाय कार्बन स्टीलची बनवलेली असते. ही एखाद्या लोखंडी पट्टीसारखी असते. हिची लांबी ४५६ मिमी. असते व जाडी २० मिमी. असते. फिश प्लेटला चार छिद्रे असतात. त्यांचा व्यास ३२ मिमी. असतो. तिच्या दोन छिद्रांच्या केंद्रामधील अंतर ११४ मिमी. असते. रुळाच्या शेवटाला जी २-२ छिद्रे असतात ती फिश प्लेट बसवण्यासाठी ठेवलेली असतात. त्यांचा व्यास साधारणतः ५० मिमी. असतो. त्यामुळे उन्हाळ्यात रुळ जेव्हा प्रसरण पावतात, तेव्हाही ते बोल्टने रुळ धरून ठेवायला अडचण येत नाही. फिश प्लेट रुळाच्या आतील व बाहेरील अशा दोन्हीही बाजूंनी बसवली जाते. दोन नटबोल्ट एका रुळाला व दोन नटबोल्ट दुसऱ्या रुळाचे फिटिंग करतात. रुळाच्या दोन्ही बाजूला फिश प्लेट असल्यामुळे रुळांना उभ्या व आडव्या अशा दोन्ही स्थितीत स्थिरता मिळते. फिश प्लेटची ताकद ५.५८ ते ६.५१ टन इतके वजन घेण्याची असते. फिश प्लेट रुळाच्या वेब पोर्शनवर बसवली जाते. परंतु अगदी अचूकपणे सांगायचे झाल्यास, ती वेबवर असलेल्या फिशिंग प्लेनवर बसवली जाते. त्याप्रमाणे तिचा आकार दिलेला असतो. त्यामुळेच ती फिशिंग प्लेनला फ्लश फिक्स करता येते.
भारतीय रेल्वेमध्ये चार प्रकारच्या फिश प्लेट्स वापरल्या जातात.
१. स्टँडर्ड फिश प्लेट्स – स्टँडर्ड फिश प्लेटस् हल्ली सर्वत्र वापरल्या जातात. ही इंग्रजी सी (C) लेटरच्या आकाराची असते.
२. जॉगल फिश प्लेट – या प्रकारची फिश प्लेट तुटलेले रुळ ज्या ठिकाणा वेल्ड केलेले असतात, तिथे तुटलेल्या रुळांसाठी इमर्जन्सी म्हणून वापरली जाते. त्याचप्रमाणे ही LWR लाँग वेल्डेड रेल जेथे वेल्ड केले जातात, तिथे अधिक काळजी घेण्यासाठी म्हणूनही वापरतात.
३. स्पेशल फिश प्लेट – ज्या ठिकाणी रेल ट्रॅक ब्लॉक सेक्शनमध्ये विभागला जातो, त्या ठिकाणी ही वापरली जाते. यासाठी दोन्ही ट्रॅकला इन्स्यूलेटेड करून त्यांवर ही फिश प्लेट लावतात. इन्स्यूलेटेड केल्यामुळे दोन ट्रॅकमध्ये इलेक्ट्रिकल सर्कीटचे कॉम्बिनेशन होत नाही. हे इन्स्यूलेशन लाकूड, नायलॉन किंवा ग्लू (रंग) अशा प्रकारांनी केले जाते.
४. कॉम्बिनेशन फिश प्लेट किंवा जंक्शन फिश प्लेट – कॉम्बिनेशन फिश प्लेटचा वापर दोन वेगवेगळ्या रेल सेक्शनकडून आलेले रुळ जोडण्यासाठी केला जातो. आपल्या भारतीय रेल्वेमध्ये ब्रॉड गेजसाठी ५२ किग्रॅ., ६० किग्रॅ. व ५०Rचे रुळ वापरले जातात. समजा, एका सेक्शनमध्ये ५२ किग्रॅ. रुळ वापरले असतील व दुसऱ्या सेक्शनमध्ये ९०R वापरले गेले असतील व हे दोन्ही सेक्शन्स जेव्हा एकत्र येत असतील, त्या वेळेस ते रेल जॉइंट करायला या कॉम्बिनेशन फिश प्लेट वापरल्या जातात. तसेच ५२ किग्रॅ. व ६० किग्रॅ. एकत्र येत असतील तेव्हाही असा वापर होतो. यात प्रत्येकाचा हेड साइज, वेबसाइज व फूट साइज हा वेगवेगळा असतो. त्यामुळे त्या त्या रुळावर बसणाऱ्या फिश प्लेटचा आकारही लहान-मोठा असतो. त्यामुळे त्या कॉम्बिनेशनमध्ये वापराव्या लागतात. यामध्ये चार कॉम्बिनेशन फिश प्लेट्स किंवा जंक्शन प्लेट्सचा सेट असतो. चारही जंक्शन प्लेट्स एकमेकांपेक्षा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात.
त्या आउट साइड लेफ्ट (OL), इन साइड लेफ्ट (IL), आउट साइड राइट (OR), इन साइड राइट (IR) याप्रमाणे ओळखल्या जातात. ५२ किग्रॅ. व ६० किग्रॅ. रेल सेक्शन जेव्हा एकत्र येतात, तेव्हा जी कॉम्बिनेशन फिश प्लेट वापरली जाते, तिची एकूण लांबी ६१० मिमी. असते. रेलमध्ये ३२ मिमी.चे छिद्र असते व फिश प्लेटचे छिद्र २७ मिमी.चे असते. ५२ किग्रॅ. रेलच्या हेडची रुंदी ६७ मिमी. असते व ६० किग्रॅ. रेलच्या हेडची रुंदी ७४.३ मिमी. असते. म्हणजे त्यातला फरक ७.३ मिमी. असतो. तसेच ५२ किग्रॅ. रेलची उंची १५६ मिमी. असते व ६० किग्रॅ. रेलची उंची १७२ मिमी. असते. म्हणजे त्यातला फरक १६ मिमी. आहे. अशा वेगवेगळ्या डायमेन्शनचे रुळ एकत्र येतात, त्या वेळी नेहमीची फिश प्लेट वापरता येत नाही. ती या दोन सेक्शनमधील रुळांची उंची व हेडची रुंदी विचारात घेऊन खास प्रकारे बनवावी लागते व ती वापरावी लागते. तिलाच कॉम्बिनेशन फिश प्लेट म्हणतात. हे दोन रेल सेक्शन जोडताना (दोन्हीचे हेड म्हणजे रुळांचे वरचे भाग एकाच लेव्हलला ठेवले जातात) व दोन्हींचे गेज फेस (दोन्ही रुळांची आतली बाजू) मॅच केले जातात. परंतु ६० किग्रॅ.चा हेड ७.३ मिमी.ने (रुळाच्या बाहेरील बाजूला) बाहेर आलेला असतो. तो जुळत नाही. त्यामुळे हा मोजमापातला फरक गृहीत धरून, त्या बाजूची फिश प्लेट बनवली जाते व आतील गेज साइड मॅच केलेली असल्याने ती आतील बाजूने सपाट असते. अशा तऱ्हेने या जंक्शन प्लेट्सद्वारे (कॉम्बिनेशन फिश प्लेटद्वारे) सेक्शन रेल जोडले जातात.
कुठल्याही प्रकारच्या फिश प्लेट्स या कधीही खूप घट्ट बसवल्या जात नाहीत. त्यामुळे रुळांच्या आकुंचन व प्रसरणाला वाव मिळतो. रेल्वे वारंवार रुळांवरून गेल्यामुळे फिशप्लेट्स ढिल्या होतात व वेळोवेळी त्या ठरावीक मर्यादेपर्यंत पुन्हा घट्ट केल्या जातात.



