READING TIME – 5 MINS
सचिन तेंडुलकर या नावासह क्रिकेटमधल्या विक्रमांची चर्चा होते. शतकांची चर्चा होते आणि नर्व्हस नाईन्टीजची सुद्धा चर्चा होते. सचिन नव्वदीत बाद झाला त्या खेळी लक्षात राहू नयेत असं प्रत्येकच भारतीय चाहत्याला वाटतं. मात्र आपला लाडका सच्चू नव्वदीत बाद झाला होता, अशी एक खेळी आहे, जी कधीच विस्मरणात जात नाही.
पाकिस्तानचा सलामीवीर सईद अन्वरच्या शतकामधली हवा काढून टाकणारी आणि पाकिस्तानच्या तिखट गोलंदाजीच्या गर्वाचं घर खाली करणारी ती खेळी कुठली आहे, हे एव्हाना तुम्हाला कळलं असेल. २००३ च्या विश्वचषकात पुन्हा एकदा भारतानं पाकिस्तानवर मात केली. या विजयाचा खरा शिल्पकार सचिन तेंडुलकर होता. ही खेळी माझ्या नजरेतून मांडण्याचा हा प्रयत्न…
२७३ धावा फलकावर लागल्यानंतर पाकिस्तानी संघ ज्या माजात क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर उतरला होता, तो पाहूनच यांचा गर्व ठेचून टाकायला हवा असं जणू काही सचिन-सेहवाग ह्या भारतीय सलामीवीरांना वाटलं असावं. त्या दोघांनी तशीच खणखणीत सुरुवात केली. सेहवागची छोटेखानी खेळी भलतीच वादळी होती. त्यानं १४ चेंडूत २१ धावा वसूल केल्या. त्यात ३ चौकार आणि १ षट्कार हाणला होता. म्हणजे अवघ्या तीन धावा त्यानं धावून काढल्या.
यंदाच्या विश्वचषकात आफ्रिकेविरुद्ध रोहितनं ४० धावांचा राडा घातला तशीच वीरूची ती खेळी सुद्धा महत्त्वाची होती. एक प्लॅटफॉर्म सेट झाला. सहाव्या षटकांत भारतानं पन्नाशी गाठली होती. वीरू बाद झाला आणि अचानक सारं काही बदलून गेलं. कारण पुढच्याच चेंडूवर गांगुलीही बाद झाला. धडाकेबाज सलामीवीर गेला, कप्तान गेला; पण क्रिकेटचा देव मैदानावरच होता.
सचिनच्या खांद्यावर सगळीच जबाबदारी पडली, पण तो तयार होता. खरं तर त्यानं डावाच्या दुसऱ्या षटकातच ते स्पष्ट केलं होतं. अख्तरच्या गोलंदाजीवर मारलेला तो अपर कटचा फटका, तो धुवाँधार षट्कार म्हणजे केवळ एक चमत्कारच होता. त्यानंतर एक अप्रतिम फ्लिक आणि जादुई स्ट्रेट ड्राईव्ह…
पाकिस्तानी गोलंदाजीचं कंबरडं तर तेव्हाच मोडलं होतं. मोडलं काय होतं, त्याचा पार भुगा झाला होता. वीरू अन् गांगुली एकामागोमाग एक बाद होणं ही ‘मोडलेल्या हाडावरची’ निरुपयोगी ‘मलमपट्टी’ होती. सचिनची बॅट तोवर धावांचं तांडव करू लागली होती. गरज होती ती सचिनच्या अवतीभोवती इतर फलंदाजांनी भक्कमपणे उभं राहण्याची; आणि तोच तर त्यावेळी भारताच्या फलंदाजीचा ‘फुल्ल प्रूफ फॉर्म्युला’ होता!
सलामीला येऊन सचिन मैदानावर त्याचे पाय रोवणार, घोरपडीसारखा खेळपट्टीला चिकटणार आणि त्याच्या आजूबाजूनं बाकीची मंडळी विजयाचा कोंढाणा मारणार…
दुसऱ्याच षटकात षट्कार वसूल करणाऱ्या सचिननं नंतर एकही षट्कार हाणला नाही. मात्र एकूण डझनभर चौकार मात्र वसूल केले. त्याचे फ्लिक्स ब्रेडवर बटरची सूरी फिरावी इतके स्मूथ होते. त्याच्या अफलातून कव्हर ड्राईव्हच्या मागे फक्त कॅमेऱ्याची लेन्स धावत होती. नाही म्हणायला त्याचा एक झेल सुटला नक्कीच होता. मात्र ‘लक फेव्हर्स द ब्रेव्ह’ म्हणतात ना, तसंच होतं हे काहीसं!
त्याच्या चांगल्या खेळीला एक छोटंसं तीट लागलं होतं. पाकिस्तानी खेळाडूंचा संयम सुटू लागला होता. ४९ वर असणाऱ्या सचिननं दोन धावा करत अर्धशतक पूर्ण केलं. मात्र पाकिस्तानी खेळाडूंनी ओव्हरथ्रोचा चौकार त्याच्या पारड्यात टाकत त्याला थेट ५५ वर पोचवलं. सचिननं हा टप्पा गाठला त्यावेळी संघाच्या फक्त ८१ धावा झाल्या होत्या. त्यानं सूत्र कशी हाती घेतली होती, हे सांगण्यासाठी ही आकडेवारी नक्कीच पुरेशी आहे.
सचिन साठीत पोचला अन् त्याला क्रॅम्प्स यायला सुरुवात झाली. फिजिओ मैदानात दाखल झाले. २७३ धावांचा कोंढाणा सर करू पाहणारा तान्हाजी जखमी झाला. सचिनचं मन मात्र भक्कम होतं. पाकिस्ताविरुद्ध हरणं त्याला मान्य होणार नव्हतं. त्यालाच काय कुठल्याही भारतीय चाहत्याला ते मान्य झालं नसतं.
अपेक्षांचं ओझं कसं पेलायचं ते सचिन १६ वर्षांच्या कोवळ्या वयात शिकलाय. त्यादिवशी अख्तरची संशयी फेकी गोलंदाजी ठेचून काढणं त्याच्यासाठी डाव्या हाताचा (नाही पण सचिन मुळात डावखुरा आहे; त्यामुळे उजव्याच हाताचा) खेळ होता. मुळात तो फारसा धावत नव्हताच. धावत होते ते पाकिस्तानी क्षेत्ररक्षक…
भारताच्या १७७ धावा झालेल्या असताना ९८ धावांवर सचिन बाद झाला. त्यानं चेंडू मात्र अवघे ७५ खेळले होते. गड येणार होता,पण सिंह गेला. नंतर द्रविड अन् युवी शेलार मामा झाले. कोंढाण्याच्या लढाईपेक्षा इथं एका गोष्टीत मात्र फरक होता. सचिन नावाच्या तान्हाजीनं स्वतःच डाव संपण्याआधी परतीचे दोर कापून टाकले होते. त्याच्या नंतर येणाऱ्या भारताच्या मावळ्यांना विजय मिळवण्यावाचून पर्याय नव्हता.
त्यांनी तो मिळवला. २८ व्या षटकातच १७५ धावांच्या पार पोचलेली भारताची धावसंख्या ४६ व्या षटकात अगदी सहज २७५ पार झाली. शतक सईद अन्वरनं ठोकलं अन् सामना भारतानं जिंकला. कारण सचिन एक दमदार खेळी खेळला होता; नॉट शंभर, तरीही एक नंबर…!!!
– ईशान पांडुरंग घमंडे