AatmaSwar_michelle obama

‘आत्म’स्वर! – मिशेल ओबामा

READING TIME – 6 MINS

‘बिकमिंग’…मिशेल रॉबिन्सन ओबामाचं हे आत्मकथन! मिशेलचं नाव आज जगभर प्रत्येकाला माहीत आहे. अमेरिकेची फर्स्ट लेडी अर्थात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी म्हणून मिशेल फार डौलाने आणि अंगभूत सौजन्याने वावरली.

फर्स्ट लेडी ही राष्ट्राध्यक्षांइतकाच चर्चेचा, बातम्यांचा, टीकेचा विषय असते. रोज लक्षावधी नजरा तिच्या प्रत्येक कृतीचं निरीक्षण करत असतात.

तिने काय पोषाख घातला आहे, हेअरस्टाईल कशी आहे, कोणत्या लोकांत, कोणत्या मेळाव्यात, कोणत्या देशात ती कशी वावरते आहे, तिच्या वागण्याबोलण्यात सहजता आहे की धोरणीपणा आहे, त्यावरून अनेक तर्क लढवले जाता.

अनेकदा असं म्हटलं जातं, की फर्स्ट लेडी किंवा तत्सम पदं ही ‘काटेरी मुकुटा’सारखी असतात. मिशेलने मात्र ते काटे अगदी व्यवस्थित हाताळले. त्यांचा टोकदार बोचरेपणा तिने तिच्या व्यक्तिमत्त्वाने बोथट करून टाकला.

इंग्लिशमध्ये तीन फार देखण्या अर्थाचे शब्द आहेत. – ग्रेस, पॉइस आणि कंपोजर! मिशेल ओबामा हे नाव उच्चारताच हे तीन शब्द डोळ्यांसमोर येतात. तिचं दिलखुलास हसणं आणि डोळ्यातून सतत दिसणारी सहवेदना या दोन गोष्टींनी ही फर्स्ट लेडी अक्षरश: जगभरात सर्वांची लाडकी बनली.

तिचा राष्ट्राध्यक्षांची पत्नी म्हणून व्हाईट हाऊसमधला काळ होता – 2009 ते 2017! मात्र व्हाईट हाऊसमध्ये जाण्याच्या अनेक वर्ष आधीपासून मिशेल बराक ओबामा यांच्या जोडीने कार्यरत होत्याच.

‘बिकमिंग’ हे त्यांचं आत्मकथन वाचताना या दाम्पत्याच्या सहजीवनाबद्दल दोघांच्याही प्रवासाबद्दल वाचताना अनेकदा वाचक स्तिमित होतो. अनेकदा भारावून जातो. अनेकदा मनातून हलतोही!

‘बिकमिंग’मध्ये मिशेल आणि ओबामा सातत्याने एकत्र दिसत राहतात, आणि तरीही मिशेल ठसठशीतपणे दिसते.

मिशेलच्या व्यक्तिमत्त्वाचंही हे मोठं वैशिष्ट्य आहे की तिचं नाव ओबामांच्या नावाशी एकरूप झालं असलं तरी तिचं व्यक्तिमत्त्व हरवून गेलेलं नाही. ते कणखरपणे दिसत राहतं.

‘बिकमिंग’ तीन विभाग आहेत – Me, Us आणि More! तीनही भागात वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या परिस्थितीत तिचं व्यक्तिमत्त्व कसं घडत गेलं हे ती सांगते, पण या आत्मकथनाला फक्त ‘स्व’ची चौकट नाही. ते बंदिस्त नाही.

मिशेलने घेतलेले कमालीचे वैविध्यपूर्ण आणि चौफेर अनुभव हीच या आत्मचरित्राची भक्कम बाजू आहे. शिवाय, हे अनुभव केवळ ती फर्स्ट लेडी बनल्या नंतरचे नाहीत, ते अगदी लहानपणापासूनचे आहेत.

वर्ण-वंश, समान संधी या विषयीचे आहेत. अजिबात आत्मविश्‍वास नसणार्‍या एका मुलीचे आहेत, आपल्या क्षमतेबद्दल कुणीही शंका घेऊ नये यासाठी धडपडणार्‍या आणि फार तळमळीने आणि मनापासून अभ्यासापासून ते कामापर्यंत सर्व गोष्टी करणार्‍या एका बाईचे आहेत.

कृष्णवर्णीय समाजातून अनेक अडचणींचा सामना करत पुढे येऊन सार्‍या जगाला आपल्या सहजसाध्या पण प्रभावी भाषणाने मोहित करणार्‍या बाईचे हे अनुभव आहेत.

अनेकदा राजकीय नेत्यांच्या पत्नींच्या लेखनात काही चौकटी अगदी स्पष्टपणे दिसत राहतात. काही गोष्टी, काही तपशील त्यांना देता येत नाहीत. खाजगीपणा कसोशीने जपावा लागतो. मिशेलच्या लेखनात ही गोष्ट तिने सांभाळली असली तरी, ती त्रुटी म्हणून खुपत नाही आणि याला कारण ही तिचं व्यक्तिमत्त्व हेच आहे!

मिशेल ही शिकागोमधल्या साऊथ साइडची कन्यका! कृष्ण आणि गौरवर्णीय संघर्षात फार महत्त्वाचं ठिकाण असणारी ही वसाहत!

या उपनगरातलं तिचं बालपण, वयात येण्याच्या संवेदनशील वयात वर्णद्वेषाचे सोसावे लागलेले चटके बालरोगतज्ज्ञ बनण्याचं तिचं स्वप्न अशा अनेक आठवणी तिने पहिल्या भागात जागवल्या आहेत.

तिच्या घराविषयी आणि आई-वडलांच्या चिवट जिद्दीविषयी वाचणं हे फार बळ देणारं आहे. मुलांच्या स्वप्नांना आकर देण्यासाठी पराकाष्ठा करणारे आई-वडील, अत्यंत मौल्यवान अशी कौटुंबिक मूल्यं कितीही विपरीत परिस्थिती आली तरी मुलांची स्वप्नं मोडू न देण्याची काळजी घेणारं घर याबाबत मूळातूनच वाचायला हवं. या गोष्टी पुस्तकभर सतत पार्श्‍वभूमीवर दिसत राहतात.

अर्थात मिशेल कधीच खचली नाही असं नाही. एका टप्प्यावर ती खचली, आपल्यात काही चांगलं आहे का खरंच? हा प्रश्‍न तिच्या मनात वादळासारखा घोंघावत राहिला. ‘Am I good enough?’ हा प्रश्‍न ती सतत स्वत:ला विचारत असे.

आयव्ही लीगच्या विद्यापीठात शिक्षण घेणं. ही तिची आकांक्षा होती. दुर्दैवाने तिच्या शिक्षकांकडूनच ती खचेल असा सल्ला दिला गेला. पण त्या स्थितीत मिशेल फार काळ अडकली नाही.

प्रचंड कष्ट आणि सिन्सिएरीटीने तिने यश मिळवण्याचा चंग बांधला तिने प्रिन्स्टन विद्यापीठातून पदवी मिळवली आणि हार्वर्ड लॉ स्कूलमधून उच्च शिक्षणही पूर्ण केलं.

तिने कामाला सुरुवात केली ती शिकागोच्या सिडले अँड ऑस्टीन या लॉ फर्ममध्ये! अ‍ॅटर्नी म्हणून तिच्या कामाची सुरुवात झाली. व्यक्तिगत आघाडीवर अनेक बरे-वाईट अनुभव ती घेत होती.

या फर्ममध्येच काम करत असताना तिच्या आयुष्यात एन्ट्री घेतली ती मिस्टर बराक ओबामा यांनी! बराक यांची मिशेल खरं तर वरिष्ठ! पण आयुष्यातली Compassion अनेकदा भिन्न वृत्तीच्या लोकांना एकत्र आणते.

बोलक्या आणि माणूस प्रिय व्यक्तिमत्त्वाच्या बराक यांना शांत, काहीशी लाजाळू, अबोल अशा मिशेलमध्ये त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला पूर्ण करणारी जोडीदार गवसली. या दोघांच्याही प्रेमाचा प्रवास मिशेलने संयमाने पण फार छान रंगवला आहे.

या तरुणातली महत्त्वाकांक्षा तिला भावली होती. राजकीय आणि समाजकारणाच्या क्षेत्रातले त्याचे अनुभव, त्याचं काम, वर्णद्वेषाबाबतची त्याची प्रगल्भ मतं ‘नाही रे’ वर्गाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काय करावं लागेल, याबाबतचे विचार ही दोघांच्या व्यक्तिमत्त्वातली साधर्म्यस्थळं होती.

मिसेस ओबामा बनल्यानंतर मिशेल यांचं आयुष्य पूर्वीसारखं एका कोषातलं राहिलं नाही. त्या आयुष्याला सार्वजनिक चेहरा मिळाला. पण रॉबिन्सन यांच्या या लेकीने आपल्याला मिळालेल्या कौटुंबिक मूल्यांचा वारसा कधीही सोडला नाही.

तिने ओबामांच्या व्यक्तिमत्त्वाला स्थिर चित्ताने पूर्ण करताना त्यांच्या लेकींनमध्येही ठहराव रुजवला. त्यामुळे व्हाईट हाऊसपर्यंतचा या कुटुंबाचा प्रवास कधीच कुणाच्या डोळ्यांत खुपेल असा झाला नाही.

या लेखनातही या जोडप्याचा एकमेकांना असणारा भरभक्कम पाठिंबा आणि एकमेकांबद्दलचा आदर जाणवत राहतो. आपण फर्स्ट लेडी बनल्यानंतर आपले अधिकार, आपलं पद हे जगभरातल्या गरजू लोकांच्या कल्याणासाठी कसं वापरता येईल ही मिशेल यांनी स्वत:ची बांधिलकी मानली.

मिशेल यांची कथा किंवा ओबामा आणि मिशेल यांचे सहजीवन किंवा ओबामा यांचा राजकीय प्रवास, आणि कर्तृत्व या गोष्टी नव्या नाहीत. मग या आत्मकथनाचा विशेष काय आहे. तर शक्य तेवढ्या खुलेपणाने केलेलं हे लेखन आहे. कटू अनुभवांकडे पुन्हा नजर टाकताना, ते आठवताना.

या लेखमालिकेत ५ लेख आहेत –
या मालिकेतील इतर लेख वाचण्यासाठी खाली क्लिक करा.
1.‘आत्म’स्वर! – शशी देशपांडे
2. ‘आत्म’स्वर! – मिशेल ओबामा
3. ‘आत्म’स्वर! – इस्मत चुगताई
4. ‘आत्म’स्वर! – मधुर जाफरी
5.
‘आत्म’स्वर! – देवकी जैन

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *