फॉन्ट साइज वाढवा
थिएटर एम फॅदेममध्ये गाणं ऐकायला नियमित येणारी युटाझिमरमन माझी जवळची मैत्रीण झाली. युटा ही एक विलक्षण हुशार आणि अनेक गोष्टीत रस घेऊन आनंदानी पण महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याची जिद्द राखून जगणारी मुलगी होती. ती वकील होती. ती चित्रं काढायची ती गायची. मुख्य म्हणजे ती योगासनं शिकवायची. रूडॉल्फ फूक्स हा तिचा नवरा आणि योगासनांच्या विद्येमधला गुरू. तिच्याहून चाळीस वर्षांनी मोठा. त्याची बायको बरेच वर्षांपूर्वी मृत्यू पावली होती. मुलगा पण योगासनं शिकवायचा. ख्रिस्तियाँ फूक्सचं देखील योगविद्यालय होतं. युटाच्याच वयाचा तो. युटा रूडॉल्फला मदत करायची. त्यांच्यातली जवळीक, परस्परविश्वास इतका दृढ झाला, की त्यांनी लग्न करायचं ठरवलं. युटाच्या आई-वडलांनी विरोध केला. पण तिचा निश्चय पक्का होता. आई-वडलांनी माघार घेतली. आणि युटा-रूडॉल्फ हे लग्न करून एकत्र राहू लागले.
रूडॉल्फ इतका छान माणूस आहे. मला जे करायचं ते मी करू शकते. त्याची मला मदतच असते. मला जर घरी यायला उशीर झाला, तर त्यानी स्वयंपाक केलेला असतो. संसाराच्या जंजाळात पडण्याची मला कधीच हौस नव्हती. मी मुक्त आहे, स्वतंत्र आहे आणि प्रेमानी बांधलेली आहे, युटा सांगायची…
अशा कहाण्या इतक्या आनंदी वातवरणात भारतीय समाजा घडत असील का? कोण जाणे! समस्या कुठल्या समाजात नसतात? तशा त्या युरोपमधल्या समाजातही आहेत. विलक्षण एकटेपण तिथल्या स्वतंत्र आणि स्वावंलबी व्यक्तींना ग्रासून टाकतं. यातून वाट काढण्यासाठी आजकाल ही माणसं योगासनांकडे वळलेली दिसतात. तशीच ती रागदारी संगीत, अभिजात नृत्य या कलांकडे वळतात. मनापासून शिकतात. एका टप्प्यापर्यंत येतात आणि शिकणं सोडून देतात. युटा माझ्याकडे जवळजवळ नऊ वर्षं शिकली. एकदा ती म्हणाली, “मी भगवद्गीतेच्या काही अध्यायांना चाली लावून गायल्या, त्याची सीडी काढली. पण मी तुझ्यासारखं गाऊ शकत नाही. काय अर्थ आहे माझ्या शिकण्याला?” त्यानंतर ती शिकली नाही. गाण्याच्या मैफलींना आली नाही. भेटायला आली नाही. ती फोन उचलायची नाही, ई-मेल करायची नाही. पुष्कळ जवळची वाटणारी ही मैत्रीण नातं सोडून आपल्या ठराविक कामात गुंतून गेली. २०१७मध्ये मी स्ट्युटगार्टला असताना मला कळलं, तिच्या मृत्यूबद्दल. कॅन्सरने तिला वेढून टाकलं. तिने जगाचा निरोप घेतला. एक मुद्देसूद पण मनस्वी आयुष्य काळाआड नाहीसं झालं. एक आवडती मैत्रीण मी गमावून बसले.
मला भेटलेला आणखी एक मनस्वी मित्र म्हणजे स्टीफन कुट्झलर. स्टयुटगार्ट शहराच्या थोडंसं बाहेर बाकनाग या परगण्यात तो राहायचा, छान गायचा. तबला शिकायचा, सतार शिकायचा, योगासनं शिकायचा युटाच्या योगशाळेत. म्हणायचा, “या शिकण्यातलं व्यक्तिगत नातं मला फार आवडतं. आई-वडलांचं घर सोडल्याननंतर मला हे नातं, फक्त या कला शिकताना मिळतं.” या कलांच्या सान्निध्यात त्याला योहाना नावाची एक सुंदर युवती भेटली. बावारिया परगण्यात केम्पटन या निसर्गसुंदर गावी राहणारी. तीही माझ्याकडे गाणं शिकायची. माझी एक मैफल तिनी केम्पटनला केली. दहा जणांसाठी शिबीर योजलं. माझे दोन दिवस खूप छान गेले. योहानाची तीन मुलं होती. त्यानंतर तिचं लग्न सोडून ती एकटी राहत होती. स्टीफन आणि ती एकमेकांच्या विलक्षण प्रेमात होती. हळूहळू त्या दोघांचं कलाशिक्षण थांबलं. केवळ नात्यात ते गुंतून गेले. ते गाण्याला यायचे नाहीत, भेटायचे नाहीत.
२०१७मध्ये माझं बाकनागमध्ये गाणं होतं. मी स्टीफनला कळवलं. तो खरोखरच ऐकायला आला. मी त्याला विचारलं, “काय गाऊ?” म्हणाला, “बिहाग राग गा. बालम रे हे बिहाग रागात आहे ना?”
त्याची आठवण पाहून मी चकित झाले. गाणं झालं, जेवण झालं. आम्ही गप्पा करत बसलो. तो सांगत होता त्याची कहाणी. “मी आणि योहाना आता एकत्र राहत नाही. मला हेच नातं हवं होतं. पण तिला ते नकोसं झालं. मी इतका दु:खी झालो की माझा जगण्यातला रसच संपून गेला. काही काळ आई-वडलांबरोबर राहिलो. नोकरी व्यवस्थित करत होतो. पण जीव लागत नव्हता.”
“अरे, मग तू गाण्याकडे का नाही वळलास परत?”
“गाणं म्हणजे योहाना. ती तर जवळ असणार नव्हती मग गाणं कशासाठी?”
“आज तू किती छान ऐकत होतास!” त्याला हुरूप यावा, अशा इच्छेने मी बोलत होते. पण त्याला अर्थ नव्हता. आठवणींच्या डोहात बुडालेला स्टीफन डोकं वर काढत नव्हता.
“मी घरी जातो आता. तुलाही उशीर होतोय. बाय नीला.”
स्टीफन चालतच निघाला. हात न हलवता. संथ पावलं टाकत जाणारा पाठमोरा स्टीफन मला राजकपूरची आठवण देत होता. जगण्याची दुर्दम्य इच्छा असलेली अनेक माणसं माझ्या डोळ्यांसमोर येत होती. “आयुष्य ही आपल्याला मिळालेली देणगी आहे. ती सांभाळत राहायचं.” दुर्गाताई भागवत म्हणायच्या. वयाच्या ८४व्या वर्षी. “आता मी बाहेर जात नाही. पण जातक कथांचं भाषांतर करत असते. लेखक म्हणून जगायचं ठरवलं, तेव्हाच बेकारी पत्करली. पण निरुद्योग नाही.” अशी जिद्द होती त्यांची. त्या स्व:ला ‘जिवट’ म्हणायच्या. स्टीफनसारख्या हुशार, सुशिक्षित, देखण्या, कलात्मकतेची जाण असलेल्या तरुणाला ही जिद्द कुठेच सापडली नाही का? नात्याचं भावविश्व त्याला सोडता का आलं नाही? आयुष्याच्या अनंत सागरात तो पुन्हा नव्यानी का शिरू शकला नाही?
माझ्याकडे या प्रश्नांची उत्तरं नव्हती. भंगलेल्या विश्वाच्या स्पंदनातून, वेदनेतून मी संगीतात नवा आशय शोधू लागले होते. सहप्रवासी मित्र-मैत्रिणींच्या संगतीत पुन्हा प्रवाहाच्या लहरींबरोबर नवनवे बंध जवळ करत होते. स्टीफननी असं का नाही केलं? या प्रश्नाला हसत हसत सामोरं गेलेली अनीता द्रोग मला आठवली. अनीता एका पुस्तकांच्या दुकानात काम करायची. एक नातं संपलं. यानंतर ती राहायची एकटी. पण मनाने मित्र-मैत्रिणींबरोबर असायची. ईव्हा, मॅक्स आणि हेला मुसाल असे हे चौघं बरोबर असायचे. हेल्गाच्या थिएटरमध्ये मैफलींना यायचे. शाकाहारी चवदार जेवण बनवणं त्यांना अत्यंत आवडायचं. माझ्याकडे सर्व जण गाणं शिकायचे. सुरात गायचे. कधी मोनालिसा घोषकडे नृत्य शिकायचे. (मोनालिसा ही हेल्गाची मैत्रीण कलाकार. ओडिसी नृत्य करणारी, शिकवणारी कलकत्त्यांत राहणारी नृत्यांगना). एक दिवस मला म्हणाले, “आम्हाला संस्कृत श्लोक शिकव. जर्मन आणि संस्कृत भाषा यांचं जवळचं नातं आहे.” मला खूपच आश्चर्य वाटलं. आपलं तुटपुंजं ज्ञान पाजळायचा प्रयत्न केल्यावाचून मला राहवलं नाही. “हो. चौथ्या शतकातल्या कालिदासाचं ‘शाकुंतल’ हे संस्कृत नाटक वाचून जर्मन कवी ग्योथे (त्याचं मराठीकरण ‘गटे’ असं केलं आहे.) आनंदानी नाचला होता. हे आम्ही लहानपणापासून ऐकत आलोय.” शिवाय ‘मॅक्समुल्लर’ हा इंडॉलॉजिस्ट. “सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट” हा पन्नास खंड असलेला ग्रंथ त्याच्या मार्गदर्शनाखाली तयार झाला. किंबहुना भारतीय संस्कृतीचा विशेषत्वाने अभ्यास करण्याचा प्रारंभ मॅक्समुल्लरनी केला. पाश्चिमात्यांना/युरोपियनांना ही ओळख त्यानी करून दिली. ही जर्मन मित्रमंडळी त्याच प्रेरणांचा पाठपुरावा करू पाहताहेत. त्यांची जिज्ञासा आणि उत्साह पाहून ती स्तिमित झाले. गंमत म्हणजे लहानपणी आजोबांनी शिकवलेले अनेक श्लोक मला आठवू लागले. आपल्या स्मरणशक्तीची परीक्षा तरी घ्यावी. म्हणून मी कित्येक श्लोक लिहून काढले. ईव्हा, मॅक्स, अनीता, हेला. माझ्यासमोर बसून संथा घेऊ लागले. ‘प्रणम्य शिरसादेवं गौरीपुत्रम विनायकम्’ गणपतीस्तोत्रापासून मी सुरुवात केली. जर्मन माणसाचे उच्चार स्पष्ट असतात. त्यांना व्यवस्थित स्तोत्रं म्हणता येत होतं. मला गंमत वाटत होती. मी आले होते मैफली करायला. जमलं तर ख्याल गायकी शिकवायला. आणि त्याच्या जोडीला मी संस्कृत श्लोकदेखील शिकवत होते. माझ्या मूळबंधांमधून मिळालेली ती देणगी होती. वारसा होता. माझ्या आजोबांनी जसा मला वारसा दिला, तसा माझ्या मुलाला त्याचे आजोबा – म्हणजे माझे वडील हा वारसा देत होते, लहानपणी उच्चार सुधारण्यासाठी स्तोत्रांचा उपयोग होतो. आता संस्कृतीमधली वेगवेगळी प्रतीकं शोधायला ही स्तोत्रं साधनासारखी होतात. मनापासून करावं ते ते अंगी लागतं. अंगवळणी पडतं. काळ पुढे जातो. पण मनात वसती करून राहिलेल्या मूळबंधांना संदर्भ गवसला की अंकुर फुटतात.
अनीता नोकरीच्या जोडीला मन:शांतीसाठी वेगवेगळे उपाय शिकवायची. सर्व उपाय वेगवेगळ्या शरीर क्रियांवर आधारलेले आहेत. काही वाक्यांमधून मनोबळ वाढवायला मदत कणारे आहेत. यावर तिनी एक छोटीशी पुस्तिका देखील काढली आहे. ईव्हा वेगवेगळ शाकाहारी पदार्थांचे प्रकार बनवायची. मुंबईत श्रीमती विजया व्यंकट ज्या तर्हेने प्रयोग करायच्या, तसेच काहीसे ईव्हाचे प्रयोग होते. अजूनही असतील. हेला मुसाल आणि मॅक्स बिंडर-ईव्हाचा नवरा हे दोघंही शाळेत शिकवायचे. गेल्या काही वर्षात या चौकडीची आणि माझी भेट झाली नाहीय. पण एक खरं. या चौघांनी वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्यात काही अंदाज पक्के केले आहेत. निरोगी पण कलात्मक जगायचं. खुल्या मनानी अनेकांना आपल्या संगतीत सामावून घ्यायचं. आपण भले कलाकार नसू. पण कला आपल्यासाठी खूप काही देते. एक प्रेममय सहिष्णु जवळीक कलेमध्ये मिळते. कलाकार ती मोकळी करतात. ते कलाकार, त्यांची आयुष्यं, त्यातली ममता आपल्याला हवीशी वाटते. त्यातून सारं जगच जणू काही सृजनाच्या मार्गावर दिसू लागं. जिथे तसं नसतं, तिथे आपण काही करू या. अशा भूमिकेतून हे चौघंही नाती जोडतात. पर्यायी विश्वाचा एक सुंदर प्रवास या चौघांच्याबरोबर मी अनुभवला.
– नीला भागवत
या सदरातील लेख…
कळसूत्री बाहुल्यांच्या सान्निध्यात (१)
जगभरच्या पपेट्स तिथल्या भिंतींवर लावलेल्या होत्या. शिवाय रंगीबेरंगी गाउन्स. जरीचं काम केलेले, सॅटिनचे./p>
या सदरातील लेख…
कळसूत्री बाहुल्यांच्या सान्निध्यात (2)
एका रशियन लोककथेवर आधारलेलं हे बाहुल्यांचं नाटक आहे./p>
या सदरातील लेख…
कळसूत्री बाहुल्यांच्या सान्निध्यात (3)
भेद विसरून परस्पर मेळ साधणार्या या जोड्या पाहताना संस्कृती कशा एकजीव होतात ते जाणवतं./p>