फॉन्ट साइज वाढवा
शत्रुसेनेचा पाहुणा
‘जर तुमच्याच सेनेकडून तुमच्यावर गोळी चालवली जाणार असेल, तर ती दयनीय गोष्ट ठरेल.’
‘ते तुमचं कुविख्यात जंगल पोस्ट,’ ब्रिगेडिअर नूर भारतीय सेनेच्या एका चौकीकडे निर्देश करत म्हणाले. ‘पीर पंजल’ पर्वतराजीच्या वरच्या भागात असलेली ती चौकडी भारताच्या जम्मू-काश्मीर भागातील पूँच शहराच्या जवळच आहे. त्या पर्वतराजीच्या पायथ्याच्या भागातून आमची लष्करी जीप जात होती. जीपच्या खिडकीतून डोकं बाहेर काढत मी त्या डोंगरांकडे पाहत होतो. त्यांनी त्या चौकीला ‘कुविख्यात’ म्हटलं, कारण त्यांच्या मते, त्या चौकीतील भारतीय जवान जंगलभागातील गर्द झाडांच्या पडलेल्या पालापाचोळ्यात लपून पाकिस्तानी जवानांवर आणि गावांवर गोळीबार करत होते आणि त्यामुळे प्राणहानी संभवत होती आणि मोठा नाशही होत होता.
‘ते तसं का करत असतील?’ त्यावर मी विचारलं.
‘मर्जी उनकी,’ नूर यांनी प्रतिक्रिया दिली. पुढे म्हणाले, ‘जो चाहे कर सकते हैं, कदर नही करते.’
नूर चुकीचं बोलत नव्हते. ‘एलओसी’वरील जवान बरेच वेळा विनाकारण गोळीबार करत असतात. जम्मू-काश्मीरलगतच्या ‘आंतरराष्ट्रीय सीमे’वर (‘इंटरनॅशनल बॉर्डर’ –‘आयबी’वर) मात्र युद्ध-प्रसंगांचा अपवाद वगळता सहसा असं होत नाही. परंतु ब्रिगेडिअर नूर ‘एलओसी’बाबत एक गोष्ट सांगत नव्हते – ती अशी की, दोन्ही बाजूने तसं केलं जातं. ‘मन मानेल’ तेव्हा गोळीबार करण्याची प्रेरणा होण्यामागील मूळ कारणं अनेक आहेत; त्यांपैकी काही म्हणजे, निव्वळ कंटाळा येणं आणि नैतिकदृष्ट्या वर्चस्व असल्याचं दर्शवून देण्याच्या लष्करी संस्कृतीतून उद्भवणारी कारणं.
काही वेळा कारणं निव्वळ ‘वैयक्तिक’ असू शकतात. निवृत्त पाकिस्तानी जनरल सिकंदर अफझल यांनी एकदा मला सांगितलं की, ‘जवान एकसुरीपणा घालवण्यासाठी अनेक गोष्टी करतात. सीमेपलीकडील जवानांनी सुकण्यासाठी वाळत घातलेल्या कपड्यांना गोळीबार करून छिद्र पाडणं, हा त्यांतलाच एक प्रकार. मनोरंजनासाठी त्यांच्याकडे फारच कमी मार्ग असतात.’ आणि काही वेळा जवान केवळ गंमत म्हणून गोळीबार करतात, त्यात दुसऱ्या बाजूकडील कुणाला इजा पोहोचवण्याचा उद्देश नसतो. वरिष्ठ पाकिस्तानी जनरल गाझी १९८०च्या दशकातील गोष्टींचा संदर्भ देऊन खिलाडूपणा आणि मौज म्हणून केलेल्या गोष्टींची परिणती ‘शस्त्रसंधी उल्लंघना’त कशी होते, त्याबद्दल सांगत होते – ‘(….) फालतू प्रसंग, जसे की, तुमच्याकडे भेटीसाठी कुणी आलेले असतात, उदाहरणार्थ, वरिष्ठ अधिकारी, कॉलेजचे विद्यार्थी किंवा कुटुंबातील लोक (…) तुम्हाला त्यांना प्रत्यक्ष गोळीबार कसा केला जातो, ते दाखवावंसं वाटतं आणि नाट्यमय गोष्टी मंचित केल्या जातात आणि तुम्ही शस्त्रसंधी उल्लंघनाची सुरुवात करून जाता. तो ‘गेम्समनशिप’चाच प्रकार असतो. दोन्ही बाजूंनी अशा गोष्टी केल्या जातात, आणि जेव्हा एका बाजूने अशी गोष्ट केली जाते, तेव्हा दुसरी बाजू त्याला अटकाव म्हणून उत्तर देते.’
श्रीनगरमधील माजी कोअर कमांडर जनरल हसनैन म्हणतात, “एलओसी’वर ‘नैतिक वर्चस्वा’ची एक संकल्पना असते – म्हणजे, ‘माझी सेना श्रेष्ठतर आहे’ आणि ‘नीतिधैर्य, प्रशिक्षण आणि क्षमता या बळावर मी तुझ्यापेक्षा वरचढ ठरतो’. हा मर्दानी खेळ असतो, प्रतिस्पर्ध्याच्या नजरेला नजर भिडवत खेळण्याचा.’’ अशाच गोष्टींमध्ये भर घालणारी एक गोष्ट निवृत्त भारतीय ब्रिगेडिअर अरुण सहगल यांनी सांगितली – ‘तुमचं वर्चस्व आणि तुमची त्या भागातील स्थिती, आणि सततच्या गोळीबाराद्वारे दुसऱ्याला दबावाखाली ठेवणं, यांतून तुम्ही तुमच्या नैतिक वर्चस्वाबाबत आश्वस्त करत असता.’
मी जर का तेव्हाच ‘जेएनयू’मध्ये परतून अभ्यासकांच्या संमेलनात बोलत असतो, तर त्यांना मी ‘मन मानेल’ तेव्हा, अर्थात ‘अॅट विल’ गोळीबार करण्याची संकल्पना समजावून सांगितली असती आणि ती ‘स्वायत्त लष्करी कारणां’च्या (ऑटॉनमस मिलिटरी फॅक्टर्सच्या) संकल्पनेच्या आधारे समजावून सांगितली असती. आणि याकडेही निर्देश केला असता की, अशा गोष्टी सामान्यत: दोन्ही बाजूला घडत असतात. अर्थात, आता मी ‘एलओसी’च्या पलीकडील शत्रुसेनेसोबत असल्याने मी अभ्यासकाची परिभाषा टाळत होतो. मात्र, जेव्हा नूर यांनी ‘तुमचं कूविख्यात जंगल पोस्ट’ अशा शब्दप्रयोगाचा वापर केला, तेव्हा मात्र माझ्या मनात संमिश्र भावना दाटून आल्या होत्या आणि ‘स्वदेश-निष्ठेबाबतच्या माझ्या भावनांची कसोटी’ तात्पुरती बाजूला ठेवावी लागली; तरीदेखील तेव्हा मनात एकीकडे, भारताबाबतची उत्स्फुर्तपणे दाटून आलेली ओढ, मैत्रभावना होती आणि त्याच वेळी पाकिस्तानी बाजूबाबत कोणतीही वैरभावना नव्हती. इथे मी पाकिस्तानी सेनेसोबत प्रवास करत होतो. त्यांच्या अतिथीभवनात झोपत होतो, त्यांच्याच जीपमधून फिरत होतो. त्यांचे सशस्त्र सैनिक दिवस-रात्र माझ्या अवतीभवती असायचे; याचसाठी की, मला कुणाकडूनही इजा होऊ नये – म्हणजे, भारतीय सेनेसह कुणाकडूनही. परंतु मी भारतीय आहे, आणि तिथे सीमारेषेच्या पलीकडेही मला अर्थातच, भारतीय म्हणूनच वागणूक दिली जात होती. असं असताना, तात्पुरत्या यजमानाप्रती मी निष्ठा राखणं क्षणभरासाठी तरी योग्य ठरलं असतं का? पुढील काळात जेव्हा ‘बट्टल सेक्टर’मध्ये ‘शस्त्रसंधी उल्लंघन’ झाल्याची बातमी माझ्या कानावर येईल, तेव्हा जे मारले गेले असतील, त्यांत माझ्या माजी यजमानांपैकी कुणीतरी असावं, अशी माझी इच्छा असायला पाहिजे की नको? ‘लष्करामधील कुणाचीही प्राणहानी झाली नाही’ अश्या प्रकारची वृत्तं वाचून मला दिलासा वाटावा की नाही? भारतीय जवानांवर गोळीबार करणं हे त्यांचं काम होतं आणि बहुतांश वेळा भारतीय जवानांची हत्या करणं हाच त्या कामाचा अर्थ होत होता. असं असताना, जेव्हा मी पाकिस्तानी अधिकाऱ्यांना शुभेच्छा व्यक्त करताना ‘गुड लक विथ युअर वर्क’ असं म्हणत होतो, तेव्हा त्याचा अर्थ काय होत होता? त्यांना त्यांच्या मोहिमेत यश मिळावं, अशी माझी इच्छा होती का?
थोडक्यात, मानसशास्त्रीय आणि नैतिकदृष्ट्या मी कुणाची बाजू घ्यायला पाहिजे? ज्या ‘जीप’मधून मी पाकिस्तानी सैनिकांसोबत प्रवास करत होतो त्या ‘जीप’वर जे गोळीबार करू शकत होते, अशा ‘जंगल पोस्ट’चं रक्षण करणाऱ्या भारतीय सैनिकांची, की त्या पाकिस्तानी सैनिकांची जे ‘जंगल पोस्ट’वरील भारतीय सैनिकांच्या गोळीला मी बळी पडू नये, याची शाश्वती राखत होते. अशी द्विधा मन:स्थिती इतर अनेक पेचांसह निर्माण झाली होती – माझं भारतीय असणं, पाकिस्तानी सेनेकडून माझी काळजी घेतली जाणं आणि मुळात त्या स्थितीतच व्यस्तसंगती (अॅब्सर्डिटी) सामावलेली होती, याची जाणीव होणं.
वरपांगी पाहता, हे सारं अत्यंत सरळसोपं वाटेल, परंतु प्रत्यक्षात तसं नव्हतं. एका स्तरावर, मोठी अस्तित्ववादी द्विधा निर्माण झाली होती, ज्यामुळे मी माझ्या मनातील राष्ट्रवादी व देशभक्तिपर भावनांबाबत चांगलाच गोंधळात पडलो होतो. परंतु अधिक गोंधळात यामुळे पडलो होतो की, ऐहिक गोष्टींबाबत अनुभवातीत दृष्टिकोनातून पाहिल्यागत वाटत होतं आणि त्याच वेळी जे काही वाट्याला आलं होतं, त्यासह जगणंही भाग होतं…
- द ‘एलओसी’
- लेखक : हॅपीमॉन जेकब
- अनुवाद : मिलिंद चंपानेरकर
पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल एप्रिल २०२१
हे पुस्तक खरेदी करण्यासाठी…
द ‘एलओसी’
नियंत्रण रेषेच्या दोन्ही बाजूंनी भारतीय व पाकिस्तानी सैन्यासोबत
केलेल्या सहप्रवासाची कहाणी
हॅपीमॉन जेकब यांनी २०१८मध्ये भारत पाकिस्तान या दोन देशांमधील ‘ताबा नियंत्रण रेषे’च्या अर्थात ‘एलओसी’च्या दोन्ही बाजूंनी प्रवास केला. भारतीय आणि पाकिस्तानी सैन्यदलासोबत त्यांनी केलेला सहप्रवास, दोन्हीकडील अनेक निवृत्त व सेवेतील लष्करी अधिकाऱ्यांसोबत केलेल्या चर्चा, आणि सीमाभागातील ‘शस्त्रसंधी उल्लंघन’-ग्रस्त लोकांशी साधलेला संवाद यांबद्दलचे तपशील हॅपीमॉन यांनी या पुस्तकातून दिले आहेत. दोन देशांमध्ये लोकसहभागाने शांतता प्रस्थापित व्हावी हा हॅपीमॉन यांचा मूळ उद्देश आहे. पूर्वग्रहांचे अडथळे पार करून दोन्ही देशांच्या लष्करासह सर्व प्रकारच्या लोकांशी संवाद साधण्याचं अवघड असं काम गेली कित्येक वर्षं ते करत आहेत, त्याचप्रमाणे अनेक ‘ट्रॅक टू’ संवादांतील सहभागाद्वारे शांतता प्रयत्नाच्या प्रक्रियेत सातत्याने सहभागी राहिले आहेत. ते आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्यातकीर्त अभ्यासक आहेत. दीर्घ अनुभव आणि वस्तुनिष्ठ दृष्टिकोन यांतून नवी अंतर्दृष्टी देणारं पुस्तक…
₹325.00Add to Cart