लोकाभिमुख अमेरिकन लेखक म्हणून नावाजलेल्या नोबेल पुरस्कारप्राप्त जॉन स्टाइनबेक यांच्या ‘द ग्रेप्स ऑफ रॉथ’ या १९३९मध्ये सर्वप्रथम प्रकाशित झालेल्या दीर्घ कादंबरीने अमेरिकेतील विस्थापित स्थलांतरितांच्या समस्येला वाचा फोडली आणि समाज ढवळून निघाला. या वास्तववादी कादंबरीद्वारे त्यांनी या समस्येच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक पैलूंवर मोठ्या सर्जनशीलतेने आणि मानवी दृष्टिकोनातून भाष्य केलं. ही कादंबरी १९३०च्या दशकातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवरील असली, तरी भारतातील विस्थापितांच्या समस्यांबाबत आजही विचारप्रवृत्त करू शकेल, अशी आहे. तिच्या मराठी अनुवादातील काही अंश…
शेतजमिनींचे मालक वारंवार गावात आले किंवा त्यांच्याहीपेक्षा अधिक वारंवार मालकांचे प्रवक्ते गावात आले. ते बंद वाहनांतून आले, आणि जमिनीचा कस जाणून घेण्यासाठी त्यांनी आपल्या हातांच्या बोटांनी कोरड्या जमिनीला स्पर्श करून पाहिला. आणि काही वेळा ते जमीन खोदण्यासाठी मोठी गिरमिटं घेऊन शेतांमध्ये पोहोचले – मातीची चाचणी करण्यासाठी. खंडाने वाहिती करणाऱ्या कुळांच्या घरांचे दरवाजे उन्हाने तडकून निघालेले होते. ती बंद वाहनं शेतांच्या बाजूच्या रस्त्याने येऊ लागली की, ती कुटुंबं अस्वस्थ होऊन दरवाज्यांशी उभी राहत होती आणि सुरू झालेल्या अशा सर्व गोष्टी पाहत होती. अखेरीस, ते मालक लोक आपल्या मोटारगाड्या घेऊन थेट त्यांच्या घरांच्या आवारात येऊन थडकले. गाडीतच बसून राहून, खिडक्यांच्या काचा खाली करून, ते थाटात त्या कुटुंबांना बोलणी करण्यास बोलावू लागले. कुटुंबातील पुरुषमंडळी काही वेळ मोटारगाड्यांच्या बाजूला उभी राहिली आणि नंतर खाली जमिनीवरच उकीडवी बसली.घरातील पुरुषमंडळी त्या मालकांशी काय बोलत आहेत त्याकडे बायका आणि मुलं लक्ष ठेवून होती. ते स्तब्ध होते. मालकांपैकी काहीजण असे होते की, त्यांना जे काही करायला लागत होतं, त्याचा तिटकारा वाटत असल्याने जरा दयाबुद्धीने वागत होते, आणि काहीजण रागात होते, कारण, त्यांना दुष्ट व्हावं लागण्याचा तिटकारा वाटत होता; आणि काही जण अत्यंत थंडपणे वागत होते, कारण, त्यांना पूर्वीच याची जाणीव झालेली होती की, भावनाशून्य झाल्याशिवाय कुणीही मालक बनू शकत नाही. आणि त्यांच्यातील सर्वच जण, त्यांच्या स्वत:च्याही आकलनापलीकडे ठरेल, अशा मोठ्या बिकट परिस्थितीत सापडले होते. त्यांतील काहींना गणिती आकडेमोड करण्याचा तिटकारा होता, आणि काही जण घाबरून गेलेले होते, आणि काही जणांनी मात्र गणितभक्तीचा मार्ग पत्करला होता; कारण मानवी विचार आणि भावभावना यांपासून दूर राहण्यासाठी गणितभक्तीच्या आसऱ्याला जाणं सोयीस्कर ठरत होतं. जमिनीची मालकी जर का एखाद्या बँकेकडे किंवा पतपुरवठा करणाऱ्या कंपनीकडे गेलेली असेल, तर मालक म्हणत होता, त्या बँकेला किंवा त्या कंपनीला त्या जमिनीची गरज आहे. त्यांना ती जमीन पाहिजे आहे, पाहिजेच आहे, आग्रहपूर्वक पाहिजे आहे. स्वत:कडे असायलाच हवी, असं वाटायला लावणारी आहे. जणू काही ती बँक किंवा कंपनी ही एक अक्राळविक्राळ दैत्य होती, जिला विचार व भावना होत्या, आणि जिने त्यांना जाळ्यात पकडलेलं होतं.
अखेरीस, बँक वा कंपनीच्या कृतींसाठी ही मालक लोकं कोणतीच जबाबदारी स्वीकारणार नव्हते, कारण, ती माणसं होती व दास होती आणि बँक वा कंपनी या यंत्र होत्या, स्वामी होत्या–एकाच वेळी दोन्ही. काही मालक-माणसांना अशा भावनाशून्य, थंडगार आणि शक्तिमान अशा स्वामींचे आपण दास असल्याचा अभिमान वाटत होता. मालक-माणसं आपल्या गाडीत बसून राहिली आणि त्यांनी सर्व गोष्टी स्पष्ट करून सांगितल्या – तुम्हाला माहितीये जमीन निकृष्ट झालेली आहे. तुम्ही ती किती वर्षं खरवडत बसलात, ते ईश्वरालाच माहीत.
मालक लोक आपला मुद्दा पुढे रेटत राहिले – “तुमची जमीन कशी आहे, ते तुम्ही ओळखून आहात, दिवसेंदिवस निकृष्ट होत चाललेली आहे. कपाशी जमिनीचे काय हाल करते, ते तुम्हाला माहितीये; तिचं सर्वस्व लुटून घेते, तिचं सर्व रक्तच शोषून घेते.” बसकण मारून बसलेल्या माणसांनी मान डोलावली. त्यांना माहीत होतं, ईश्वर जाणून होता. त्यांनी आलटून-पालटून वेगळी पिकं घेतली, तर ती पिकं पुन्हा त्या जमिनीत जीव ओततील…“माफ करा,” मालकमंडळी म्हणाली, “बँक, पन्नास हजार एकरवाले मालक हे काही यासाठी जबाबदार ठरू शकत नाहीत. जी जमीन तुमची नाहीये, त्यावर तुम्ही वसलेले आहात. एकदा का तुम्ही सीमा पार करून गेलात की, तुम्हाला रस्त्यात कपाशी वेचण्याचं काम मिळू शकेल. असंही होऊ शकतं की, तुम्ही निराश्रितांच्या छावण्यांत आश्रय घ्याल. नाहीतर, तुम्ही पश्चिमेला कॅलिफोर्नियात का नाही जात? तिथे कामं मिळू शकतात, आणि तिथे कधीच थंडीही फार नसते. इतकंच काय, तिथे तुम्ही कुठेही पोहोचा आणि झाडावरील संत्री काढण्याचं काम करा. इतकंच काय, तिथे काही न काही पिकं घेतली जातात आणि अशा शेतांत तुम्हाला काम मिळू शकतं. तुम्ही तिथे का नाही जात?” आणि असं म्हणून मालकमंडळींनी आपल्या गाड्या सुरू केल्या आणि ते तिथून निघून गेले.
आता खंडकरी पुरुषमंडळी पुन्हा जमिनीवर उकिडवी बसली; काडीने धूळमातीत रेघोट्या मारण्यासाठी, समजून घेण्यासाठी, आणि काय करावं त्याचा विचार करण्यासाठी. त्यांचे उन्हाने रापलेले चेहरे काळवंडले आणि त्यांचे उन्हाचा मारा झेललेले डोळे मलूल झाले. दरवाज्यात उभ्या असलेल्या बायका सावधपणे त्यांच्या पुरुषांपाशी गेल्या आणि मागोमाग मुलं त्या बायकांच्या मागे जाऊन उभी राहिली, तिथून कधीही पळ काढण्याच्या बेताने. मोठी मुलं आपल्या वडिलांच्या जवळ जाऊन बसली, कारण या परिस्थितीने त्यांना प्रौढ पुरुष बनवलेलं होतं. काही वेळाने बायकांनी विचारलं, “त्यांना काय हवं होतं?” पुरुषमंडळींनी क्षणभर वर पाहिलं; त्यांची नजर वेदनेच्या दाहाने धुमसत होती. “आपल्याला इथून जावं लागेल. इथे आता एक ट्रॅक्टर आणि एक अधीक्षक – फॅक्टरीसारखंच.”
“आपण कुठे जाणार?” त्या बायकांनी विचारलं. “आम्हाला माहीत नाही. खरंच माहीत नाही.” आणि बायका पटकन, पण शांतपणे घरात परत गेल्या आणि त्यांच्या मागून आलेल्या मुलांना त्यांनी आपल्या जवळ घेतलं.
- द ग्रेप्स ऑफ रॉथ
- लेखक : जॉन स्टाइनबेक
- अनुवाद : मिलिंद चंपानेरकर
पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल एप्रिल २०२०
ही महाकादंबरी खरेदी करण्यासाठी…
दे ग्रेप्स ऑफ रॉथ
लोकाभिमुख अमेरिकन लेखक म्हणून नावाजलेल्या नोबेल पुरस्कारप्राप्त जॉन स्टाइनबेक यांच्या ‘द ग्रेप्स ऑफ रॉथ’ या १९३९ मध्ये सर्वप्रथम प्रकाशित झालेल्या दीर्घ कादंबरीने अमेरिकेतील विस्थापित-स्थलांतरितांच्या समस्येला वाचा फोडली आणि समाज ढवळून निघाला. या वास्तववादी कादंबरीद्वारे त्यांनी या समस्येच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक पैलूंवर मोठ्या सर्जनशीलतेने आणि मानवी दृष्टिकोनातून भाष्य केलं. ही कादंबरी १९३०च्या दशकातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवरील असली, तरी भारतातील विस्थापितांच्या समस्यांबाबत आजही विचारप्रवृत्त करू शकेल अशी आहे. सर्जनशील रचना आणि आगळी संवादशैली या प्रमुख वैशिष्ट्यांनिशी साहित्य क्षेत्रात नवे मापदंड निर्माण करणाऱ्या या कादंबरीचा ‘साहित्य अकादमी’ पुरस्कारप्राप्त मिलिंद चंपानेरकर यांनी साधलेला हा तितकाच प्रयोगशील असा मराठी अनुवाद. लोकांच्या समस्या लोकांसाठी लोकभाषेत व्यक्त करणारी ‘द ग्रेप्स ऑफ रॉथ’.
₹700.00Add to Cart
विचक्षण वाचक नीतीन वैद्य ‘द ग्रेप्स ऑफ रॉथ’बद्दल लिहितात…
कालजयी, अभिजात साहित्यकृतींची हरेक काळात बदललेल्या संदर्भात नवी वाचनं संभवतात. अलिकडे पाहिलेल्या उलट्या, सुरक्षित उबदार घरट्यांकडे झालेल्या स्थलांतराचे पडसाद कायम असताना, त्रयस्थपणे सुरक्षित कुंपणाआडून का होईना अनुभवलेले (होय हे केवळ वाचणे नव्हे, मूर्त झालेला साक्षात अनुभव आहे) हे जगण्याच्या शोधातले पार जगातल्या दुसऱ्या टोकाकडे झालेले स्थलांतर अधिकच व्याकूळ करते. या अस्वस्थ वर्तमानात अगदी नेमक्या वेळी समेवर यावे तसा हा अनुवाद आला आहे…