‘नमस्कार!’ मिसेस हंसा रामचंद्रनने हात जोडले आणि म्हणाली, ‘तुम्ही तर माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच तरुण आहात.’
‘हो. २९ एप्रिल १९८८ या दिवशी आमीर खानचा ‘कयामत से कयामत तक’ रिलीज झाला आणि त्याच दिवशी माझा जन्म झाला!’
मिसेस रामचंद्रन आपले पातळसे, नाजूक ओठ रुंदावत, दोन्ही बाजूंना खळ्या पाडत, कळीदार शुभ्र दात दाखवत, मोजकं तरीही मनापासून हसल्या. जणू सोनेरी व्हिस्कीच्या अर्ध्या भरलेल्या ग्लासावर कुणी चांदीच्या चमच्याने नाजूक आघात करावेत, तसा त्या हास्याचा गोडवा होता.
‘ब्रिटिश रॉयल नेव्ही इम्पिरियलच पुढे सुरू ठेवायची, की ब्रँड बदलून बघणार तुम्ही?’
हंसा रामचंद्रनने या प्रश्नाने त्याची विचारपूस करून त्याच्यावर तिचं किती बारीक लक्ष होतं हे दाखवून दिलं.
‘काहीच नको, आपण कामाचं बोलू या.’
‘गुड. मी फार वेळ घेणार नाही. कौशिकीबद्दल तुम्हाला कल्पना असेलच. ती गायब झाली होती आणि जवळपास…’ ‘ते सगळं सविस्तर माहिती आहे मला. पेपरमध्ये वाचलं आणि टीव्हीवरही पाहिलं. ती सुखरूप परत आल्यावर आता तुमचं माझ्याकडे काय काम असू शकतं याबद्दल मी विचार केला, पण मला काही तसं खास सुचलं नाही. शिवाय…’
‘शिवायच्या पुढे तुम्हाला काय बोलायचं आहे ते मला माहिती आहे. अंडरवर्ल्डशी माझी चांगली ओळख असताना मी तुमच्याकडे काही काम घेऊन यावं, याचं आश्चर्य वाटतंय तुम्हाला.’
‘फक्त ओळख?’
आपल्या भावना चेहऱ्यावर उमटणार नाही याची काळजी घेऊनही, हा प्रश्न फार आवडला नाही, हे हंसा रामचंद्रनच्या चेहऱ्यावर थोडंसं उमटलंच. त्यांनी प्रश्नाचं उत्तर मात्र टाळलं नाही. ‘केटी होता तेव्हा त्याचे जवळचे संबंध होते या सगळ्यांशी, तसे आणि तेवढे मी ठेवलेले नाहीत. पण मी हे तुम्हाला सांगण्याची खरंतर गरज नाही की, मुंबईत केबलचा व्यवसाय चालवायचा असेल आणि त्यातलं वर्चस्व टिकवून ठेवायचं असेल, तर या अंडरवर्ल्ड आणि तसल्या लोकांची गरज असते. तेवढ्यापुरताच संबंध आहे माझा या लोकांशी. केटी खूप अॅम्बिशिअस होता, त्याला धंदा वाढवायचा होता, मी फक्त आहे तेवढा सांभाळते आहे.’
‘ओके. मला त्याच्याशी काही देणं-घेणं नाही. मी तुमच्यासाठी नेमकं काय करायचं आहे? मी प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे. खासगी गुप्तहेर. अंडरवर्ल्डच्या भानगडीत मी कधीच पडलो नाही. पडणारही नाही. पोलिसांच्या कामातही हस्तक्षेप करत नाही मी कधी.’
‘मला माहिती आहे ते. पण माझं तुमच्याकडे जे काम आहे ते काम पोलीस करू शकणार नाहीत, किंवा असं समजा की, मला पोलिसांकडे जायची इच्छा नाही.’
‘अंडरवर्ल्डमधली माणसंही करू शकणार नाहीत?’
या प्रश्नावर हंसा रामचंद्रनने थोडं तिखट नजरेने अगस्तीकडे पाहिलं. तिला थोडा रागही आला असावा, पण तिने स्वत:ला सावरलं आणि बोलणं सुरू ठेवलं. ‘आज एक ऑक्टोबर, कौशिकीला घरी येऊन दोन महिने होतील येत्या तीन तारखेला. त्याआधी दीड वर्ष ती गायब होती, म्हणजे एक वर्ष आणि सात महिने झाले. घरी परतल्यावर तिला नॉर्मल व्हायला महिना लागला, त्यादरम्यान तिला कोणी काहीही विचारलं नाही. त्यानंतर मात्र तिच्याशी बोलायचा, तिला विचारायचा खूप प्रयत्न केला आम्ही; पण मधल्या दीड वर्षात ती कुठं होती, त्या काळात काय झालं, यातलं काहीही कौशिकीला आठवत नाही.’
‘आठवत नाही? की… आय मीन, नकोत त्या आठवणी आता… असं वाटू शकतं तिला?’
‘नाही, ती खोटं बोलत नाहीये. तिला पळवून नेलं तेव्हा बहुधा काहीतरी प्यायला देऊन किंवा इंजेक्शन वगैरे देऊन बेशुद्ध केलं होतं. शुद्धीवर आली तेव्हा ती एका काळोख्या खोलीत, जमिनीवरच अंथरलेल्या गादीवर झोपलेली होती. त्यानंतरच्या काळात एक जण तिला अधूनमधून येऊन कसल्या तरी गोळ्या द्यायचा आणि खायलाही द्यायचा. त्या काळात ती सतत झोपेच्या अमलाखालीच होती. तिथं तिचा छळ केला गेला नाही किंवा टॉर्चरही केलं गेलं नाही. कौशिकीचं म्हणणं आहे की, पहिल्या काही महिन्यांनंतरचं तिला काहीच आठवत नाही. तिला दिवस-रात्र काहीही कळत नव्हतं. मध्ये किती काळ गेला ते तिला कळलं नाही आणि त्यानंतर कधीतरी अचानक तिला परत थोडं थोडं भान येऊ लागलं होतं. मग एक दिवस तिला ठाण्यात आणून सोडलं गेलं… बस्स! माझा असा तर्क आहे की, ज्यांनी कोणी तिला पळवून नेलं होतं ते नेहमीच्या क्राइम वर्ल्डमधले नसावेत. ती केटीची मुलगी आहे, हेही त्यांना बहुधा माहिती नसावं.’
‘करेक्ट. तसं असतं तर त्यांनी खंडणीची मागणी केली असती.’
‘नाही. मुळात, अंडरवर्ल्डमधल्या कुठल्याही व्यक्तीनं हे कृत्य केलंच नसतं. तिथं एका अलिखित करार असतो. कुणीही कुणाच्या कुटुंबातील सदस्यांना, तसंच काही मोठं कारण नसेल तर हात लावायचा नाही. अगदी वैयक्तिक पातळीवर शत्रुत्व असलं तरीही हे संकेत शक्यतो पाळले जातात.’
‘ओके. यात मी काय करावं असं वाटतं तुम्हाला?’
‘तुम्ही त्या दीड वर्षाचा शोध लावावा अशी माझी अपेक्षा आहे. तिच्या स्मृतींमधून हरवलेलं दीड वर्ष.’
शेवटचं वाक्य, शून्यात पाहत स्वत:शीच बोलावं अशा पद्धतीने ती बोलली. कौशिकी या दीड वर्षात कुठल्या त्रासातून गेली असावी याच्या कल्पनेने तिला खूप वेदना होत असणार, हे त्यातून सूचित होत होतं. किंचित भावनावश होऊन हंसा रामचंद्रन बसल्याजागीच क्षणभर थोडी सैल, बेसावध झाली. खांद्यावर घेतलेला साडीचा पदर निसटून खाली तिच्या मांडीवर पडला. पदराआड दडलेलं स्वर्गीय सौंदर्य झुंबराच्या प्रकाशात न्हाऊन निघालं. चांदीच्या नक्षीदार वेलबुट्टीची किनार असलेला ब्लाउजचा खोल गळा आणि त्यातून दिसणारी लोभस मध्यरेषा. त्या रेषेच्या डाव्या बाजूला वरच्या भागात दुरूनही दिसेल असा एक तीळ. तिळाने त्या प्रेक्षणीय स्थळाच्या सौंदर्यात भर घातली होती. पुढे काही बोलून आपण शांततेचा भंग करावा की ब्लाउजच्या मागे दडलेल्या दोन पुष्ट गोलाकारांच्या मध्यरेषेचं सौंदर्य न्याहाळत, ती पुढे काय बोलेल याची वाट पाहत थांबावं, अशा द्विधा मन:स्थितीत अगस्ती असतानाच हंसा रामचंद्रन सावरली. तिने पदर उचलून पुन्हा खांद्यावर घेतला. काही सेकंदांसाठी दिसलेला निसर्गाचा तो चमत्कार पदराच्या धुक्याआड नाहीसा झाला.
‘दॅट्स इट.’
‘ओके. लक्षात आलं माझ्या,’ स्वत:ला क्षणभरात नॉर्मल करत अगस्ती म्हणाला.
हंसा रामचंद्रनने त्या सोफ्यात दडलेलं कुठलं बटन कधी दाबलं ते अगस्तीच्या लक्षात आलं नाही, मात्र आत कुठेतरी नाजूक बेल किणकिणली. काही सेकंदांतच एक जण चांदीची झाकलेली थाळी घेऊन आला आणि अदबीने टेबलावर ठेवून गेला. त्या थाळीवरचं जाळीदार मखमली आवरण हटवत हंसा रामचंद्रन म्हणाली, ‘अॅडव्हान्स मिळाल्याशिवाय तुम्ही कामाला सुरुवात करत नाही, असं मार्टिन म्हणाला होता. हा पाच लाखांचा चेक’.
चेक उचलून खिशात ठेवत अगस्ती म्हणाला, ‘मार्टिननं तुम्हाला अर्धवट माहिती दिली आहे. मी अॅडव्हान्सचा चेक जरूर घेतो, परंतु घेतलेलं काम पूर्ण झाल्याशिवाय बँकेत टाकत नाही.’…
- हरवलेलं दीड वर्षं
- लेखक : श्रीकांत बोजेवार
पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल डिसेंबर २०२०
डिटेक्टिव्ह अगस्तीचे कारनामे वाचा…
‘अगस्ती इन अॅक्शन’ मालिकेतील ‘अंगठी १८२०’ कादंबरिकेतील भाग
अझमतने रियाला घातलेल्या त्या एंगेजमेंट रिंगमध्ये टॅफिएट या नावाने ओळखला जाणारा महागडा हिरा होता. दुर्मीळ निळसर, गुलाबी झाक असलेला हिरा…
‘अगस्ती इन अॅक्शन’ मालिकेतील ‘न्यूड पेंटिंग @19’ कादंबरिकेतील भाग
‘न्यूड पेंटिंग @19‘ कादंबरिकेतील भाग
‘मी राघव, वेलकम टू माय प्रायव्हेट यॉट… प्लीज कम.’ अगस्तीने हसून, मान लववून स्वागताचा स्वीकार केला. ‘काय घेणार तुम्ही? मी व्हिस्की घेतो आहे.’…