बादशहा जहांगीरची बेगम नूरजहान ही मोठीच हिकमती आणि महत्त्वाकांक्षी होती. आपल्या बुद्धिचातुर्याच्या आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या बळावर तिने दुबळ्या आणि व्यसनाधीन बादशहाचा कारभार आपल्या हातीच घेतला. नूरजहानची कर्तबगारी बादशहा जहांगीरला साह्यकारक ठरली. दोघांचाही शेवट शोकात्म ठरला, तरी नूरजहानच्या कर्तबगारीची नोंद इतिहासाला घ्यावीच लागली. नूरजहानची राजकीय कर्तबगारी वादग्रस्त ठरली, तरी ती स्वत: सौंदर्यासक्त असल्याने कलात्मक, शिल्पकलात्मक आणि एकूणच संस्कृती-संवर्धनाच्या बाबतीतील कामगिरी आजही नोंद घेण्यासारखी आहे. आग्रा आणि काश्मीर इथल्या ‘मुघलगार्डन’ तर तिच्या नावे रुजू आहेतच, पण संगमरवरी दगडांमध्ये कोरीव काम करून त्या कोरलेल्या नक्षीत रत्नादी दुर्मीळ, बहुमूल्य दगड बसवण्याची प्रथा सुरू झाली आणि ती ‘ताजमहाला’त विकसित झालेली आजही पाहायला मिळते, तिची सुरुवात नूरजहानने आपल्या वडिलांची इत्मदुद्दौला यांची- आग्र्यात जी कबर बांधवली तिनं झाली. महिलांच्या ‘फॅशन’बद्दल, विणकाम-भरतकाम केलेल्या वस्त्रप्रावरणांत, महिलांच्या प्रसाधन-वस्तूंमध्ये विशेष अभिरुची असलेल्या नूरजहानबद्दल एक कथा सांगितली जाते…

गुलाबफुलाचं अत्तर नूरजहानने तयार करण्यापूर्वीच गुलाबपाणी भारतीयांना ज्ञात होतं आणि त्याचा वापर होत होता, असं अनुमान काढता येतं. ‘गुलाब अत्तर’ भारतात आणि इंग्लंडमध्ये इ.स.१६०० ते १८०० या काळात श्रीमंत वर्गात प्रिय झालं.

बादशाह जहांगीरशी तिच्या झालेल्या शाही शादीच्या प्रसंगी गुलाबपाण्याचा (गुलाबपाणी वेगळं आणि गुलाब अत्तर वेगळं!) महालात खासा कालवा निर्माण करण्यात आला होता. त्यामुळे आसमंत सुगंधित राखण्यास मदत मिळत होती. खळबळणाऱ्या पाण्यावर पाकळ्या तरंगताना नूरजहानला दिसल्या. तिने तो सगळा ‘कचरा’ गोळा केल्यावर तो सुगंधी गुलाबपाकळ्यांचा असल्याचं तिला आढळून आलं. त्या पाकळ्या रगडून तिने तेल काढलं, तेच गुलाब-अत्तर! अर्थात तिने त्या सुगंधी द्रव्याला नाव दिलं ‘इत्र-इ-जहांगिरी’. असा गुलाब अत्तर शोधून काढण्याचा मान बेगम नूरजहानकडे जातो. ही कथा ‘हॉब्सन जॉन्सन’ या हेन्री यूल आणि ए.सी.बर्नेल यांच्या अलौकिक ग्रंथात (१९०५) दिली आहे. गंमत बघा, गुलाबाच्या अत्तराला इंग्रजीत ‘ऑट्टर’ किंवा ‘ऑट्टो’ म्हणतात. हे दोन्ही शब्द ‘अत्तर’ या शब्दाचे अपभ्रंश! पण मुळात ‘अत्तर’ हा शब्दच अरबी भाषेतल्या ‘इत्र’ या शब्दाचा अपभ्रंश आहे! ‘रोझ ऑट्टो’ म्हणायचंसुद्धा कारण नाही. पुनरुक्तीचा दोष ठरेल तो! ‘पिवळं पीतांबर’ म्हणतो का आपण? ‘ऑट्टर’ किंवा ‘ऑट्टो’ म्हणजेच (गुलाब) अत्तर! आणि गुल+आब म्हणजे गुलाब-पाणी.

जीवनानंद वृद्धिंगत करण्यासाठी सुगंधी पदार्थ, द्रव्य, वस्तू यांचा वापर करणं आणि दुर्गंधी घालवण्यासाठी त्याचा वापर करणं हे उद्देश दोन असले, तरी अंतिम उद्दिष्ट एकच. त्यामुळे प्रत्येक संस्कृती ही आमोदवृद्धी करणाऱ्या सुगंधांच्या शोधात असल्याचंच इतिहास सांगतो. भारतीय संस्कृतीत सुगंध परिपोषाच्या कल्पना किती विकसित झाल्या होत्या, हे संस्कृत वाङ्मयात वारंवार येणाऱ्या प्रसाधन आणि सुगंध यांच्या उल्लेखांवरून कळतं. प्राचीन भारतीयांनी ‘गंधशास्त्र’च निर्माण केलेलं होतं. ‘गंधशास्त्र’ म्हणजे प्रसाधन आणि सुगंध यांचं शास्त्र. दुसरा एक शब्द संस्कृत वाङ्मयात वापरला आहे, तो म्हणजे ‘गंधयुक्ती’. ‘गंधयुक्ती’ म्हणजे प्रसाधनांसाठी तसंच सुगंधनिर्मितीसाठी उत्पादनं निर्माण करण्याची कला. गंगाधर नावाच्या लेखकाने ‘गंधसार’नावाचा ग्रंथच लिहिला आहे. डॉ. परशुराम कृष्ण गोडे यांनी ‘गंधवाद’ नावाचं ‘गंधसारा’वरील मराठीतलं भाष्यही शोधून काढलं आहे. त्यांच्या अनुमानानुसार संस्कृत ‘गंधसार’ आणि मराठी ‘गंधवाद’ हे दोन्ही ग्रंथ इ.स.१२०० ते १६००च्या काळात निर्मिले गेले असले तरी त्यांचे मूलाधार असलेले ग्रंथ इ.स. ५०० ते १००० या काळातले असावेत.
डॉ. गोडे यांनी भारतीय ग्रंथशास्त्रावर लिहिलेल्या अकरा मौलिक शोधनिबंधात पाश्चात्त्य संदर्भांसह भारतीय संदर्भाचा सांगोपांग शोध घेऊन इतिहास-लेखकांवर मोठेच उपकार करून ठेवले आहेत. अर्थात, संपूर्ण भारतीय ग्रंथशास्त्राचा परामर्श या लेखात घ्यायचा नसल्याने डॉ. गोडे यांच्या या विषयावरील सर्व शोधनिबंधाचा सारांश सांगण्याचं कारणही नाही. पण गुलाबफुलाचं अत्तर नूरजहानने तयार करण्यापूर्वीच गुलाबपाणी (गुलाब-पाणी हा शब्द अयोग्य आहे. गुल+आब म्हणजेच गुलपुष्प-पाणी, पण गुलाबपाणी हा शब्द सर्रास वापरला जातो म्हणून तो तसा वापरायचा.) भारतीयांना ज्ञात होतं आणि त्याचा वापर होत होता, असं अनुमान काढता येतं. ‘गुलाब अत्तर’ भारतात आणि इंग्लंडमध्ये इ.स.१६०० ते १८०० या काळात श्रीमंत वर्गात प्रिय झालं.

रघुनाथाच्या ‘राजव्यवहार कोशा’तला (१६७६) ‘अत्तर: पुष्पसार:’ हा उल्लेख गुलाब-अत्तराचा आहे, हे निश्चित. ना.गो. चापेकरांच्या ‘पेशवाईच्या सावली’त (१९३७) या उपयुक्त पुस्तकात १७८३मध्ये पेशव्यांकडे असलेल्या वस्तूंची यादी दिली आहे, त्यात दोन ‘गुलाबदाण्या’ असल्याचा उल्लेख केलेला आहे. त्याच पुस्तकात नाना फडणीसांच्या खास भोजनासाठी केलेल्या खर्चात गुलाब अत्तरासाठी (१७९४) पाच रुपये खर्च केल्याचा उल्लेख आहे. १७९४ मध्ये टिपू सुलतानावरील स्वारीत सांगलीकर परशुरामभाऊ पटवर्धनांकडे ब्रिटिश आणि मराठे अशा दोन्ही संयुक्त फौजांचं नेतृत्व होतं. ब्रिटिश फौजेचं नेतृत्व एखाद्या एतद्देशियाने करण्याचा हा एकमेव प्रसंग ब्रिटिश-मराठे संबंधाच्या इतिहासात नमूद आहे. ‘अ नॅरेटिव्ह ऑफ द ऑपरेशन्स ऑफ कॅप्टन लिटिल्स डिटॅचमेंट अ‍ॅण्ड ऑफ द मरहट्टा आर्मी, कमान्डेड बाय परसेराम भाऊ, ड्युरिंग द लेट कॉन्फेडरसी इन इंडिया अगेन्स्ट द नबाब टिपू सुलतान बहादुर’ अशा लांबलचक शीर्षकाचा वजनदार ग्रंथ लेफ्टनंट एडवर्ड मूरने १७९४ साली प्रसिद्ध केला. त्यात तांबूल (विडा) आणि त्यात टाकले जाणारे पदार्थ, तुला करणं, नारळाचे विविध उपयोग, बाया पक्षी, मराठी भाषा, साखर आणि तीळ यांचं उत्पादन, नाणी पाडण्याची पद्धत अशी कितीतरी, समाजशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त अशी टिपणं आहेत. शिवाय स्वागत करण्याच्या आणि निरोप देण्याच्या परंपरेचं वेधक वर्णन आहे. गुलाब-पाणी शिंपडणं आणि अत्तर लावणं या क्रियाही सांगितल्या आहेत.
अत्तराविषयी अधिक माहिती पुरवताना एडवर्ड मूरने असंही म्हटलंय की, ‘‘शुद्ध निर्भेळ अत्तर मिळणं हे हिंदुस्थानातसुद्धा कठीण जातं. दुर्मीळच झालंय ते. निर्यात होणाऱ्या अत्तराच्या पाचशे भागांतलं फार तर पाच भाग शुद्ध, अस्सल असतं.’’ म्हणजे अस्सलतेची शंका येण्यासारखी परिस्थिती दोनशे वर्षांपूर्वीही होती म्हणायची.
बिशप हेबर हाही एक प्रवासी धर्मगुरू मुंबई-पुण्याला १८२४ मध्ये येऊन गेलेला. त्यानेही आपल्या प्रवासाची हकिगत दोन खंडात्मक ग्रंथात लिहून ठेवली आहे. त्यानं अत्तर कसं करतात हेही सांगितलं आहे. तो म्हणतो – ‘‘ऊप Aूूar ग्े दूंaग्हा् afूी ूप rदो-ैaूी ग्े स्a, ंब् ोूूग्हु ग्ू दल्ू ्ल्rग्हु ूप हग्ुप्ू aह् ूग्त्त् ेल्हrग्ो ग्ह ूप स्दrहग्हु ग्ह त्arुा दजह नोतर््े ोज्दो् ूद ूप aग्r aह् ूपह
ेव्ग्स्स्ग्हु दff ूप ोोहूग्aत् दग्त् ैप्ग्म्प् fत्दaूे aू ूप ूदज्.”


लेफ्ट. कर्नल पॉलिअर याने तर ‘एशियाटिक रिसर्चेस’साठी ‘अत्तर’ करण्याच्या पद्धतीवर स्वतंत्र लेखच लिहिला आहे (खंड १, पृ. ३३२). ती प्रक्रिया समजून घेऊन त्यानं स्वत:च अत्तर तयार केलं. तेही लखनौत १७८७ साली. त्याच्या लेखामुळे अनेक गोष्टींचा उलगडा होतो. विशेषत: भेसळ का केली जाते, या प्रश्नाचं उत्तर मिळतं. त्यानं लिहिलं आहे की, १७८७ साली त्याला फक्त १६ तोळे वजनाचं अत्तर एकंदर ५४ मण (१ मण • ४० शेर • आजचे अंदाजे ३५ किलो) वजनाच्या गुलाबांपासून करता आलं. एवढे गुलाब मिळायला ३३ बिघा जमिनीत रोपटी लावली होती. ३३ बिघा जमीन म्हणजे अंदाजे ११ एकर! अर्थात एवढ्याच जमिनीवर लावलेल्या गुलाबातून दर वेळी एवढंच अत्तर मिळेल असं नाही. वेगवेगळ्या वर्षी, वेगवेगळ्या देशात कमी-अधिक अत्तर मिळतं, असं पॉलिअरने म्हटलं आहे. अत्तर काढणाऱ्यावर जसं ते अवलंबून आहे, तसं गुलाबाच्या दर्जावरही ते अवलंबून आहे. शंभर पौंड वजनाच्या गुलाबातून युरोपमध्ये अर्धा औंस वजनाचं अत्तरच काढतात, तर हॅम्बर्गमध्ये तेवढ्याच वजनाच्या गुलाबातून एक औंस अत्तर काढतात. हिंदुस्थानात मात्र सारंच अनिश्चित असतं. ‘ऐंशी पौंड गुलाबांतून चार मासे (तोळा, मासा ही पूर्वीची वैद्यराजाची वजनं!) अत्तर मिळालं तरी धन्यता मानावी, असा प्रकार!’ असं पॉलिअरने म्हटलं आहे. म्हणून हिंदुस्थानात कुणी चंदन-तेलगुलाब-अत्तरात घालतं तर कुणी गुलाब-फुलांच्या वरची हिरवी पाकळी.
एकाच मातीत असलेल्या गुलाबापासून मिळालेल्या अत्तराचा रंगही म्हणे वेगवेगळा असतो. कधी पाचूसारखा हिरवा तर कधी पिवळा-धमक तर कधी लालसर. प्राचीन-अर्वाचीन गंधशास्त्राच्या वाङ्मयाची पोतडी उघडली की, अभ्यासासाठी अनोखं दालन उघडलं गेल्याची भावना होते. एका गुलाबाची, गुलाबापासून मिळणाऱ्या गुलाबपाण्याची आणि अत्तराची ही कथा, तर इतर सुगंधी द्रव्यांचा अभ्यास करायचा तर एक जिंदगी अपुरी पडेल. जनसामान्यांना परवडणारं त्यातल्या त्यात ते गुलाबपाणी. मंगलप्रसंगी गुलाबपाणी शिंपडण्याची एखादी तरी गुलाबदाणी घरोघरी होती, असाही एक काळ होता. आता नाना तऱ्हेचे आधुनिक सुगंधाचे फवारे उपलब्ध झाले आहेत.
अर्क काढलेलं पहिलं द्रव्य म्हणजे ‘गुलाबपाणी’. इब्न सिना नावाच्या प्राचीन वैज्ञानिकाने ही किमया इ.स. दहाव्या शतकात करून दाखवली. अरब देशात म्हणून गुलाबपाण्याचा प्रसार सर्वदूर झाला. इस्लामी संस्कृतीचा गुलाबपाणी हा अविभाज्य घटक ठरला. गुलाब अत्तर आणि गुलाबपाणी दोन्हीही वेगळे. गुलाबपाणी खाद्यपदार्थांतसुद्धा घालता येतं. सौंदर्यप्रसाधनासाठीही गुलाबपाणी वापरतात. गुलाबपाण्याचे उपयोग अनेक. अत्तर नुसतंच सुवासिक, सुगंधी. मात्र गुलाबपाण्याबद्दल जितक्या दंतकथा आहेत, तेवढ्याच अत्तराबद्दलही सापडतात. शोधाव्यात तितक्या सापडतात.

  • इति-आदी – दैनंदिन चीजवस्तूंचा उगमापासून आजपर्यंतचा कुतूहलजनक प्रवास – पुस्तकातील निवडक अंश
  • लेखक : अरुण टिकेकर

पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल मे २०२०


रोहन शिफारस

इति-आदि

दैनंदिन चीजवस्तूंचा उगमापासून आजपर्यंतचा कुतूहलजनक प्रवास

या पुस्तकात रमण्याचं आणखी एक कारण म्हणजे टिकेकरांची मानवी जीवनाविषयीची आतुरता आणि आत्मीयता. मानवी जीवन कसकसं उलगडत गेलं आणि समृद्ध होत गेलं, नाना खाद्यपदार्थ आणि जीवनोपयोगी घरगुती वस्तूंतून ते कसं दिसतं, याचा उलगडा हे पुस्तक वाचताना होतो. विविध धान्य-भाज्या-फळं-पदार्थ-पक्वान्न आणि सुई-आरसा-मच्छरदाणी-पंखा-कात्री-दागिने-भांडीकुंडी अशा जीवनोपयोगी वस्तू यांचा माणसाच्या इतिहासाशी आणि त्याच्या अलीकडच्या विकासाशी असलेला संबंध टिकेकर आपल्याला जोडून दाखवतात….” – सुहास कुलकर्णी

Iti-Aadi-Cover

500.00Add to cart


अभ्यासक, लेखक, संपादक व संशोधक अरुण टिकेकर यांच्याबद्दल…

निश्चित अशी वैचारिक बैठक असलेले आणि अभ्यासक, संशोधक असा डॉ. अरुण टिकेकरांचा नावलौकिक आहे. अभ्यासपूर्ण आणि संशोधनात्मक लेखन हा टिकेकरांचा मुख्य लेखन-प्रांत असला तरी त्यांनी ललित लेखनासह लेखनाचे अनेक बंध लीलया पेलले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *