आठ मार्च… जागतिक महिला दिन. या दिवसाची दखल ‘रोहन साहित्य मैफल’मध्ये दर वर्षीच्या मार्चच्या अंकात विशेष लेखांद्वारे घेतली जाते. तेव्हा हा अंकही या वैशिष्ट्याला अपवाद ठरू नये. त्याचप्रमाणे माझ्या संपादकीय मनोगताचा विषयही नकळतपणे या दिनविशेषाच्या अनुषंगानेच वळण घेतो… मला वाटतं, या मनोगताच्या विषयाचे संकेत देण्यासाठी ही सुरुवात पुरेशी आहे…
माणसां-माणसांतील नाती विविध प्रकारची असतात. प्रत्येक प्रकारच्या नात्याला विविध कंगोरे असतात. काही रक्ताची नाती असतात, तर काही नाती लहानपणापासू्नच जन्मतात, काही नाती जाणीवपूर्वक जमवली जातात. काहींशी सहजगत्या आपुलकीचं नातं निर्माण होतं, काही नाती आडवाटेच्या ओळखींतून जमतात, काही नाती शेजारधर्माचा पाठपुरावा करताना जमतात, तर काही नाती व्यवसाय-नोकरीच्या निमित्ताने निर्माण होतात… कोणत्या ना कोणत्या निमित्ताने आयुष्याच्या विविध टप्प्यांवर जुळलेल्या अशा अनेकानेक नात्यांचा डोलारा म्हणा किंवा गुंता म्हणा, तो पाठीवर घेऊनच आपण आयुष्य व्यतीत करत असतो. या नात्यात काही नाती जुजबी, तोंडओळखीपुरती राहतात, काही वरवरची कामापुरती. काहींशी स्वभाव-सूर जमतात, काहींशी आवडी-निवडी-छंदांपुरते सूर जमतात, काहींशी वैचारिक सूर जुळतात, काहींशी केवळ व्यवहारापुरते सूर जमतात, काहींशी सहानुभूतीपोटी सूर जमवले जातात, तर काही वेळा चक्क भिन्न प्रकृतीच्या, दोन टोकाच्या आवडी-निवडीच्या, विचारांच्या दोन व्यक्तींमध्येही ‘सुरीले’ सूर जमून जातात! यांत पुन्हा काहींशी असलेल्या नात्यात सखोलता असते, काहींशी जीवाभावाचं मैत्र जमून जातं, तर काहींशी स्नेह जुळतो.
दोन व्यक्तींमधील नात्याचे असे अंतरंग वरवर पाहता त्यांच्या एकमेकांशी वागण्या-बोलण्यातून किंवा त्यांच्या देहबोलीवरून ओळखता येतील का? दोन व्यक्तींमधील नात्याचा स्तर, त्याचा पोत आणि त्याची दृश्य अभिव्यक्ती हे दोन भिन्नच विषय आहेत. या गुंत्यातला प्रमुख घटक म्हणजे त्या दोन व्यक्तींची व्यक्तिमत्त्वं. ही दोन व्यक्तिमत्त्वं एकत्र आली की, जे ‘रसायन’ तयार होतं, ते ‘रसायन’ बहुतांश वेळा त्यांच्या एकमेकांशी वागण्या-बोलण्याचा पोत ठरवतं. अनेक वेळा असं होतं की, दोन व्यक्तींमधील ओळख दीर्घ काळाची असेल, चांगलं नातंही त्यांच्यात निर्माण झालेलं असेल, पण त्यांच्या वागण्या-बोलण्यात सहजता नसते. काहींबाबत तर अवघडलेपणच असलेलं जाणवतं. दोघंही गंभीर प्रकृतीचे आहेत म्हणावं, तर दोन्ही व्यक्ती दुसऱ्या कुणाबरोबर मनमोकळेपणे वावरताना दिसतात. दुसऱ्या बाजूला एखाद्या व्यक्तीशी तुमची नव्याने ओळख झाली असेल, नातंही फारसं दृढ झालेलं नसेल, तरीही काही भेटीतच अवघडलेपणाचे पदर दूर होतात, दडपणं निघून जातात आणि संभाषणात एक प्रकारची सहजता असलेली आढळते. ए खादी व्यक्ती आपल्यापेक्षा ज्येष्ठ असते. पदाने, कर्तृत्वानेही ती व्यक्ती मोठी असते. ती व्यक्ती स्त्री असेल किंवा पुरुष, तरीही त्या व्यक्तीशी वागता-बोलताना दडपण येत नाही, उलटपक्षी काही प्रमाणात तुम्ही थोड्या अवधीतच मैत्रीपूर्णरीत्या बोलू लागता. माझ्या लेखक-लेखिकेंविषयी मला असे अनेक अनुभव आले आहेत. जागतिक महिला-दिन लक्षात घेता काही स्त्री-लेखिका-स्नेही यांच्याविषयी लिहिताना प्रथम मला विद्या बाळ यांची आठवण येते.
विद्याताई यांच्याशी असलेल्या माझ्या नात्याचा प्रकार असाच होता. स्त्रियांच्या समस्यांबाबत समाजात जागृती निर्माण करणाऱ्या, त्या समस्यांसाठी विविधप्रकारे कार्यशील राहणाऱ्या विद्याताईंचा चेहराच आश्वासक होता. जणू तुम्हाला अभय देणारा भाव त्यांच्या चेहऱ्यावर असे. एखाद्या विषयाची माहिती नसेल तर ती जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेली निरागसताही त्या चेहऱ्यात होती. प्रसंगी मिष्किलताही त्यांच्या चेहऱ्यात दिसायची. समोरच्याला पहिल्या-दुसऱ्या भेटीतच ‘कम्फर्ट झोन’ त्या प्रदान करायच्या. त्यांचं ‘संवाद’ हे पुस्तक आम्ही १९९२ साली प्रकाशित केलं. ते पुस्तक प्रकाशित करण्यात माझे वडील मनोहर चंपानेरकर यांचा पुढाकार होता. मात्र दरम्यान त्यांचं आजारपण बळावल्याने विद्याताईंच्या संपर्कात मी येत गेलो. रोहन प्रकाशनात मी सुरुवातीपासूनच कार्यरत असलो तरी ‘फोरफ्रंट’वर येण्याचा माझा तो सुरुवातीचाच काळ होता. मात्र विद्याताईंशी होणाऱ्या ‘संवादा’तून सुरुवातीपासूनच आमच्यात स्नेहपूर्ण लहरी निर्माण झाल्या. त्यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारण्यात मनोमन आनंदच मिळे. आपलं मतही स्पष्टपणे मांडण्यात दडपण येत नसे. त्याही मला काही गोष्टी हक्काने सांगत. कुठे कार्यक्रमात भेटल्यावर त्या म्हणत, ‘काय रे प्रदीप, फारच कामात दिसतोस, भेटतच नाहीस.’ प्रत्येक वेळी मी त्यांना ‘वेळ काढून भेटतो’ असं सांगायचो आणि नंतर त्यांच्या आजारपणाचीच माहिती मिळाली. त्या अवस्थेत त्यांना फार जणांना भेटायची इच्छा नव्हती. त्या भावनेचा आदर राखणं क्रमप्राप्त होतं. त्यांचं नुकतंच निधन झालं. मृत्यूला त्या अतिशय परिपक्वतेने सामोऱ्या गेल्या. खुल्या विचारांचा मार्ग दाखवणाऱ्या विद्याताई जाताजाताही परिपक्वतेचे धडे देऊन गेल्या.
विद्याताई या सामाजिक भान देणाऱ्या चळवळ्या, तर लिली जोशी आरोग्याचं भान देणाऱ्या डॉक्टर. ‘आनंदी शरीर, आनंदी मन’ या त्यांच्या पुस्तकाच्या निमित्ताने आमची ओळख झाली. त्यांच्या हसतमुख चेहऱ्यामुळे आमच्यात स्नेह निर्माण होण्यास फार वेळ लागला नाही. पण एकंदरीतच त्या पडल्या अतिशय शिस्तशीर जीवन जगणाऱ्या आणि स्वत:च्या ‘फिटनेस’विषयी अतिशय जागृकता बाळगणाऱ्या अशा डॉक्टर, आणि मी पडलो शिस्तीविषयी फारसं काटेकोर न राहाणारा आणि ‘फिटनेस’ विषयात जरा जेमतेम मार्क मिळवणारा प्रकाशक ! त्यामुळे त्यांच्याशी गमतीने आणि स्नेहपूर्ण बोलतानाही थोडं भान ठेवावंच लागतं. कारण त्या माझ्या स्नेही, लेखिका असल्या तरी त्या आता माझ्या डॉक्टरही आहेत. त्यामुळे गंभीर इशारे हसत-खेळत त्या कधी देतात यावर लक्ष ठेवावंच लागतं. इतकं सर्व असूनही आमच्यातील स्नेहपूर्ण नात्यामुळे मी त्यांच्याशी वागण्या-बोलण्याचं बऱ्यापैकी स्वातंत्र्य घेऊ शकतो, एवढं निश्चित.
आपल्या कामाबाबत गंभीर असणाऱ्या आणि अतिशय अभ्यासू अशा पदार्थविज्ञानाच्या प्राध्यापिका डॉ. वर्षा जोशी यांची ‘स्वयंपाकघरातील विज्ञान’ या पुस्तकाच्या निमित्ताने पंधरा एक वर्षांपूर्वी ओळख झाली आणि त्वरितच आमच्यात एक विश्वासाचं नातं निर्माण झालं. एक प्रकारचा ‘गांभीर्यपूर्ण स्नेह’ असं स्वरूप आहे या नात्याचं. लेखिका म्हणून कितीही सहकार्य करायला त्या सदैव तयार असतात. त्यांची आजवर ५-७ पुस्तकं मी प्रकाशित केली. पुस्तकाचं स्वरूप, विषयाची मांडणी, रचना यांबाबत त्या माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतात. एकमेकांप्रती असलेला आदर, संपूर्ण विश्वास व अपार आपुलकी ही स्नेहाचीच स्वरूपं आहेत, असं मला त्यांच्या सोबतच्या नात्यातून उमगतं.
अगदी अलीकडील काळात म्हणजे गेल्या तीन-साडेतीन वर्षांत उत्तम स्नेह जडलेल्या मृदुला दाढे-जोशी यांच्याविषयी लिहिल्याशिवाय हे मनोगत कसं पूर्ण होईल? त्यांच्या ‘रहे ना रहे हम’ या पुस्तकासाठी मी त्यांना साधारण पाच एक वर्षांपूर्वी भेटलो होतो. तेव्हा त्या मला जरा मानभावीच वाटल्या होत्या. एकदोन वेळा पाठपुरावा करून फारसा प्रतिसाद न लाभल्याने मी माझ्या या
पुस्तकाबाबतचा उत्साह जरा आवरताच घेतला. नंतर थोड्या खंडानंतर त्यांनी स्वत:हून माझ्याशी संपर्क साधला आणि त्यापुढील लेखिका-प्रकाशक प्रवासात आम्ही उत्तम स्नेही कधी झालो हे कळलंच नाही. संगीत हा आमच्यातील सामायिक धागा. पुस्तकाचं काम बाजूला ठेवून आम्ही संगीत, जुनी गाणी यांवर भरपूर बोललो; असं अनेक वेळा घडलं आहे. पुस्तक सर्व दृष्टीने उत्कृष्ट व्हावं यासाठीची माझी कळकळ, धडपड मृदुलाला पूर्णपणे पोचली आहे. ती स्वत: संगीताची अभ्यासक, अध्यापक, आहेच आहे; परंतु त्याचबरोबर ती उत्तम गायिका आहे. गाण्यांची सखोल विश्लेषक आहे. तिने देश-विदेशात हजारो कार्यक्रम पेश केले आहेत. इतकं सर्व असूनही मृदुला स्वभावाने अतिशय साधी आहे. नावाप्रमाणेच तिचं वागणं-बोलणं मृदु आहे. मनाने ती अतिशय संवेदनशील आहे. याची मला नुकतीच प्रचीती आली. माझी आई गंभीर आजारी असताना, मृदुला तिला खास भेटायला आली. स्वत:हून ५-६ गाणी गाऊन दाखवली. माझ्या संगीतप्रेमी आईच्या चेहऱ्यावरचा निखळ आनंद पाहून ती मनापासून समाधान पावली.
….स्त्री-पुरुष, ज्येष्ठ-कनिष्ठ अशा भेदांपलीकडची स्नेहाची ही विविध रूपं समाजात अशीच जपली जावीत, अशीच भावना या जागतिक महिला-दिनानिमित्त व्यक्त करावीशी वाटते.
-प्रदीप चंपानेरकर
पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल मार्च २०२०
रोहन शिफारस
रहें ना रहें हम
हिंदी चित्रपटसृष्टीचा अर्थात चित्रपटगीतांचा सुवर्णकाळ…
चित्रपटसृष्टीला सुवर्णकाळ बहाल करणाऱ्या संगीतकारांची वैशिष्ट्यं आणि त्यांच्या अजरामर गाण्यातील सौंदर्यस्थळं…
यांचं रसिकतेने केलेलं विश्लेषण म्हणजेच…
हिंदी चित्रपट संगीताच्या मर्मज्ञ
मृदुला दाढे-जोशी लिखित एक आस्वादात्मक पुस्तक
रहें ना रहें हम…
₹395.00Add to Cart