‘रोहन प्रकाशन’चा बदलयुक्त प्रवास : ३

नोव्हेंबर २२, १९९२ रोजी माधव गडकरी लिखित आमची दोन पुस्तकं समारंभपूर्वक प्रसिद्ध झाली. त्यानंतर दोनच दिवसांनी ‘रोहन प्रकाशन’चे अध्वर्यू व एक संस्थापक आणि माझे वडील मनोहर चंपानेरकर यांचं देहावसान झालं. वास्तविक तत्पूर्वी वर्षभर; ते गंभीर आजाराने ग्रस्त होते. त्यामुळेच त्यांचं निधन होणं ही एक दुर्दैवी बाब असली, तरी धक्कादायक नव्हती. त्यात आम्ही त्याच दरम्यान मुंबईहून पुण्यात स्थलांतरित झालो होतो.

गेल्या मनोगतात मी म्हटल्याप्रमाणे आता ‘रोहन’ची दशकपूर्ती झाली होती… पाळंमुळं रुजू लागली होती… नवे विषय, नवा विचार करायला आत्मविश्वासपूर्वक काम करायला ग्राऊंड तयार झालं होतं. इतकी वर्षं ‘रोहन प्रकाशन’ ही एक हौस म्हणून सुरू केलेली; पण मनापासून आणि गांभीर्याने चालू ठेवलेली संस्था होती. पण छापील पुस्तकाचं महत्त्व लक्षात घेतलं, तर एक प्रकाशक म्हणून असलेली माझी जबाबदारी मोठी होती. त्यात आता मी या सर्जनशील क्षेत्रात मनाने अधिक रमू लागलो होतो. ‘प्रकाशन’ हे पूर्ण वेळ देऊन काम करण्याचं क्षेत्र आहे, याची मला पूर्ण जाणीव झाली होती. म्हणूनच आता इतर सर्व व्यवसाय बंद करून ‘प्रकाशन क्षेत्र’ हीच माझी पूर्ण वेळ कर्मभूमी असणार होती. माझं उपजीविकेचं साधन हेच असणार होतं आणि ज्या आस्थेच्या विषयांविषयी, विचारांविषयी, मूल्यांविषयी आत्मीयता आहे, त्या अनुषंगाने काम करण्याची हीच संधी असणार होती, आणि मानसिक ‘चैन’ही तीच असणार होती.

म्हणजेच १९९२ हा आयुष्यातला एक स्थित्यंतराचा मोठा टप्पा होता. वडलांच्या निधनामुळे सर्व प्रकारची जबाबदारी खांद्यावर, त्यात इतर सर्व व्यवसाय बंद, मुंबईहून पुण्यात स्थायिक, वयाच्या चाळिशीत प्रवेश, डोळ्यांवरही चाळीशी लागलेली… तेव्हा ‘रोहन प्रकाशन’कडेही आता चष्मा बदलून पाहावं लागणार होतं… किंवा असं म्हणता येईल की ‘सर्व आयुष्यच चष्मा बदलून जगण्याची ही संधी’ होती. कोणतंही स्थित्यंतर हे म्हटलं तर संधी, आणि म्हटलं तर जोखीम… जे काही असेल ते. पण एवढं खरं की, आव्हान मोठं होतं. पुढची दिशा कशी असणार हे ठरवण्यापूर्वी हातात असलेली पुस्तकं पूर्ण करायची होती. वडलांच्या प्रदीर्घ आजारामुळे आणि त्यात स्थलांतराच्या गुंत्यामुळे; कामं ठप्प झाली होती. त्यामुळे आर्थिक स्थैर्याकडून पुन्हा आर्थिक ओढाताणीकडे प्रवास सुरू झाला होता. तरीही हातातली पुस्तकं मी नेटाने मार्गी लावली आणि ती उत्तम निर्मितिमूल्यात काढली. जास्त करून त्यात ‘उपयुक्त पुस्तकां’चा भरणा होता. काही आरोग्यविषयक पुस्तकं होती, तर काही माहितीपर; पण ती सर्वदृष्टीने दर्जेदार होती. आमच्या पुस्तकांच्या किमती माफकच नाही, तर कमी म्हणाव्यात अशा होत्या. आकर्षक मुखपृष्ठांसह इतर निर्मितिमूल्यंही उत्कृष्ट म्हणावीत अशीच होती. जाहिरातींचा माराही लक्ष वेधून घेईल असाच, आणि वितरण व्यवस्थाही चोख होती. त्यामुळे या सर्वाचा एकत्रित परिणाम चांगली मागणी निर्माण होण्यात व्हायचा. ‘रोहन’ने निर्माण केलेली ‘ब्रँडव्हॅल्यू’ दिवसागणिक; काकणभर सरसच होत राहील याची मी दक्षता घेत होतो.

इथं एका पुस्तकाचा वेगळा उल्लेख करणं श्रेयस्कर ठरेल… ते पुस्तक म्हणजे मंगला गोडबोले या सुप्रसिद्ध लेखिकेचं ‘माझी पालकनीती’. मंगला गोडबोले यांचं हे लिखाण म्हणजे रेडिमेड उत्तर सांगणारं ‘सरसकट मार्गदर्शन’ या प्रकारचं नव्हतं, तर पालकांना आपल्या मुलांच्या संगोपनासाठी विचारप्रवृत्त करणारं लिखाण होतं. असं असूनही या पुस्तकाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. एक हजार प्रती संपवतानाच नाकात दम आला. शाळेत जाणाऱ्या वाढत्या वयाच्या मुलांच्या समस्यांसाठी आणि साहजिकपणे उद्भवणाऱ्या प्रश्नांसाठी दृष्टिकोन देणारी ‘पालकनीती’ फारशी यशस्वी झाली नाही, तरी ती प्रगल्भ, सजग वर्गाकडे पोचली होती, आणि त्यामुळे रोहन प्रकाशनही त्या वर्गाकडे पोचलं होतं. त्याचप्रमाणे एक चांगलं पुस्तक प्रकाशित करण्याचं समाधानही त्यातून मिळालं होतं. दरम्यान, ‘रोहन’ची आर्थिक आघाडीही पूर्ववत स्थैर्याकडे मार्गक्रमण करत होती.
याचदरम्यान आणखीही एक सकारात्मक म्हणावी अशी घटना घडली. २७ नोव्हेंबर १९९४ रोजी ‘रोहन प्रकाशना’चे पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात (पुण्याच्या भाषेत सांगायचं तर ‘गावात’) उत्तमरीत्या इंटिरियर केलेलं कार्यालय सुरू झालं. उद्घाटनप्रसंगी मुंबईचे काही प्रमुख लेखक, विक्रेते व प्रकाशक हजर होते. कार्यालयाची फीत कापली ती सुप्रसिद्ध लेखक व.पु. काळे यांनी… आणि पुणे कार्यालयाच्या उद्घाटनाचे निमित्त साधून प्रकाशित करण्यासाठी तयार ठेवलेलं पुस्तकही वपुंच्याच हस्ते प्रकाशित झालं… वपुंचं लेखन आणि या पुस्तकाचा विषय यांचा काडीचाही संबंध नव्हता, पण वपुंनी जणू जादूची काडी फिरवावी असं झालं. पुस्तकाला मोठं यश प्राप्त झालं. ते पुस्तक होतं, प्रतिभा काळे लिखित ‘क्रोशाचं विणकाम.’

‘रोहन प्रकाशन’ने विणकाम क्षेत्रातील पुस्तकांत प्रथमच प्रवेश केला होता. मोठा खर्च करून पुस्तकासाठी अप्रतिम छायाचित्रं काढून घेतली होती. मुखपृष्ठासाठी मीच तयार केलेली संकल्पना हटके होती. उत्कृष्ट छायाचित्राने ती संकल्पना उत्तमरीत्या साकारली गेली होती. या सर्वाची रंगीत छपाईही उत्तम प्रकारे होईल, विणकामाच्या वस्तूंची वीण न वीण ही वेगळी दिसेल, आणि पुस्तकाच्या मदतीने विणकाम करणाऱ्या व्यक्तीचं काम सुकर होईल, अशी दक्षता घेतली होती. तरीही पुस्तकाच्या यशाबद्दल मी साशंक होतो. तेव्हा निर्मितीसाठी मोठा खर्च केलेल्या या पुस्तकाची जाहिरात मात्र मी एक कॉलमची (तेव्हाचा साडेचार सेंमी. बाय सहा सेंमी.) अशी लहान आकाराचीच करून ‘सकाळ’ व ‘लोकसत्ता’ या वर्तमानपत्रांत रिलीज केली. ‘रोहन’च्या मोठ्या आकाराच्या प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींच्या तुलनेत हे सर्व खूपच हातचं राखून आखलेलं धोरण होतं. विणकामाच्या विषयात फारसा रस कोणाला असणार? ‘तेव्हा झाला तेवढा खर्च बास झाला’ असं सावध धोरण होतं ते. परंतु पुस्तकाला अनपेक्षितपणे मोठं यश मिळालं. अल्पावधीतच आवृत्त्यांवर आवृत्त्या निघाल्या. उत्कृष्ट निर्मितीचं जसं ते फळ होतं, तसंच विषयाच्या निवडीचंही ते यश होतं. विणकामाची अनेक पुस्तकं बाजारात असली, तरी क्रोशाच्या विणकामावरचं म्हणजेच एका सुईवरील विणकामाचं ते पहिलंच पुस्तक होतं!
‘रोहन प्रकाशन’ निर्मितिमूल्यांबाबत सुरुवातीपासूनच दक्ष होतं. दिवसागणिक याबाबतचा काटेकोरपणा, त्यातील नावीन्यता वाढत होती, प्रयोग होत होते. मुख्य म्हणजे त्या निर्मितीमागे काही एक विचार होता आणि जसजशी पुस्तकं प्रकाशित होत होती, तसतशी त्या विचारात प्रगल्भता येत होती, हे माझं मलाच जाणवत होतं. निर्मितीप्रमाणेच विषयाचा विचारही वेगळा होत होता. उपयुक्ततावादी विषय असला, तरी त्या विषयाच्या वेगळ्या पैलूचा, कंगोऱ्याचा धांडोळा घेण्याचा ध्यास होता. असंच एक ध्यास घेतलेलं पुस्तक म्हणजे, ‘पाहुणचार : शानदार पाककृती’.

पाककृतीची नावीन्यपूर्ण अशी अनेक पुस्तकं आम्ही प्रकाशित केली होती. तेव्हा आता वेळ येऊन ठेपली होती, ती या विषयावर काहीतरी लक्षवेधी करण्याची. पुण्यात आल्यावर थोड्याच अवधीत मी ‘दिल्लीवाल्या’ म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या उषा पुरोहित यांच्याशी ओळख करून घेतली. ‘साप्ताहिक सकाळ’मधील ‘रुचिपालट’ हा त्यांचा कॉलम लोकप्रिय होता. उषा पुरोहित यांचं वैशिष्ट्य जोखलं. कोणतं, तर पारंपरिक पदार्थांपेक्षा, आधुनिक, नावीन्यपूर्ण पदार्थांकडे त्यांचा असलेला कल, आणि त्यात असलेली पारंगतता. तेव्हा त्यांच्यासोबत पुस्तकाची आखणी करताना मी अशाच पदार्थांच्या पाककृती त्यांना लिहिण्यास सांगितल्या. पाहुणे आले असताना घरी करू शकता येणारे आणि हॉटेलला न जाता, त्या चवीचे पदार्थ घरीच करण्याचं समाधान मिळवून देणारे पदार्थ… ते पदार्थ अस्सल किंवा ‘ऑथेन्टिक’रीत्या करता यावेत यासाठी विश्वसनीय मार्गदर्शन करणारं पुस्तक. पदार्थांच्या वेगळेपणासोबतच या पुस्तकाचं ‘प्रेझेंटेशन’ वेगळं असावं, त्यातील कलात्मकता वेगळी असावी; छायाचित्रं, रेखाचित्रं, मुखपृष्ठ संकल्पना, लेआऊट, आकार सर्व काही वेगळं असावं, असाच मी दृष्टिकोन ठेवला आणि असंच धोरण राबवलं. पुस्तकाच्या अंतरंगाबाबत आधुनिकता हाच निकष ठेवला. तरुण पिढी डोळ्यासमोर ठेवली. उदाहरणार्थ, पुस्तकाच्या ‘अॅपिटायझर्स’ या सुरुवातीच्या प्रकरणात इतर पेयांसोबत मी चक्क ‘लिकर-बेस्ड’ कॉकटेल्सचं उपकरण जोडलं, तशा वातावरणनिर्मितीसाठी मंद प्रकाशयोजनेमधलं छायाचित्रही काढून घेतलं.
एकंदर पुस्तकामागे आधुनिकतेकडे कल दर्शवणारा दृष्टिकोन ठेवला. त्यामुळे ‘अॅपिटायझर्स’ ते ‘डेझर्ट्स’पर्यंतचा सर्वसमावेशक पदार्थांचा पूर्ण प्रवास आधुनिकतेकडे झुकणारा राहिला… हेच धोरण पुस्तकाचं नामकरण करताना ठेवलं… आणि त्याचं बारसं केलं ‘पाहुणचार’ नाव ठेवून. उषा पुरोहितांना या नावाबाबत सुरुवातीला थोडं रिझर्वेशन होतं. पण प्रत्यक्ष पुस्तक डोळ्यासमोर आल्यानंतर मात्र त्यांची सर्व रिझर्वेशन्स कोलमडून पडली… आणि पुस्तकनिर्मितीच्या या प्रक्रियेत चंपानेरकर-पुरोहित या दोन कुटुंबात एक छान मैत्रही जमलं…

Pradeep Champanerkar photo

इथं एक गोष्ट आवर्जून नमूद करावी ती अशी… ‘क्रोशाचं विणकाम’ असो वा ‘पाहुणचार’ – अशा विषयांवरील हस्तलिखितांना आकार देताना संपादकाला भरपूर मेहनत घ्यावी लागते. त्या विषयाला उत्तम रचनेचं कोंदण दिलं, त्यात पुरक माहितीची व्हॅल्यू अॅडिशन्स केली तर ती पुस्तकं वैशिष्ट्यपूर्ण ठरतात. हे काम सर्जनशील संपादक, प्रकाशकाचं असतं… लेखकाने आपलं ज्ञान, कौशल्य शब्दरूपात प्रकाशकाच्या हवाली केलेलं असतं. त्याला पुस्तकरूप देण्याची सर्जनशीलता प्रकाशकांच्या ठायी असावी लागते.

‘पाहुणचार’ने रोहन प्रकाशनाला वेगळ्या ‘लीग’वर नेऊन ठेवलं. आणि त्याच्या निर्मितीतलं वेगळेपण त्यातील ‘एक्स्लूसिव्हिटी’ मला वेगळं स्थान देऊन गेली. मला काही गंभीर विषयांकडेही वळायचं होतं, त्या दिशेने कूच करण्यासाठी हे स्थान ऊर्जा देऊन गेलं… त्याचंच एक फळ म्हणजे– ‘लालबहादुर शास्त्री : राजकारणातील मर्यादा पुरुषोत्तम’ हे ६ फेब्रुवारी १९९७रोजी प्रसिद्ध झालेलं पुस्तक…
‘रोहन प्रकाशना’ला वेगळं वळण देण्यास सर्वच दृष्टीने साहाय्यभूत ठरलेलं पुस्तक… त्याविषयी अर्थातच पुढील मनोगतात…

-प्रदीप चंपानेरकर

पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल एप्रिल २०२१


रोहन शिफारस

पाहुणचार

शानदार पाककृती

नव्या आवडी-निवडी व जीवनशैली लक्षात घेऊन सिद्ध केलेलं, पाहुणचाराच्या सज्जतेसाठी उपयुक्त सूचना करणारं, पारंपरिक पदार्थांना आधुनिकतेची डूब देणारं, प्रसंगानुरूप आवश्यक अशा पारंपरिक तसेच अत्याधुनिक व्हेज व नॉनव्हेज आणि सूप्सपासून डेझर्टपर्यंत सर्व प्रकारच्या पदार्थांच्या पाककृती विस्ताराने देणारं… पाहुणचार पाककृतीचं एक सर्वाथानं आधुनिक पुस्तक.

150.00Add to cart

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *