आजच्या काळाचा वेध घेणाऱ्या कथा


बंगाली साहित्य म्हटलं की सामान्यत: पहिलं नाव डोळ्यासमोर येतं ते शरदबाबूंचं. याचं एक कारण असं असावं की, शरदबाबूंचं बहुतेक सर्वच साहित्य मराठीमध्ये अनुवादित केलं गेलं आणि रसिकांनी ते उचलून धरलं. पथेर पाँचालीसारख्या कादंबरीनंही मराठी रसिकाला भुरळ घातली आणि त्या कादंबरीनं अनेकांच्या मनात कायमची जागा पटकावली. मात्र आताच्या काळात बंगालीमध्ये काय प्रकारच्या कथा लिहिल्या जात आहेत, तिथले लेखक कोणते विषय हाताळत आहेत, त्या विषयांची मांडणी ते कशी करत आहेत, त्यांच्या व्यक्तिरेखा कोणत्या वर्गातल्या आहेत, नवीन युगाची आणि त्या युगानं अगदी सामान्य माणसाच्या जीवनावरही केलेल्या परिणामांची प्रतिबिंबं आजच्या बंगाली साहित्यात दिसतात का, अशा प्रश्नांची उत्तरं ‘बंगगंध’ या सुमती जोशी यांनी अनुवादित केलेल्या कथांच्या संग्रहातून मिळतात.

या कथा वाचताना लक्षात येतं की, या गोष्टी आजच्या काळातल्या आहेत. आजच्या काळातल्या माणसांच्या जीवनातल्या ताणतणावांतून, घटनांतून, त्यांच्या आशा-आकांक्षांतून, त्यांच्या स्वप्नांतून, त्याच्या दु:ख-वेदनेतून, त्यांच्या भोवतालच्या परिस्थितीतून त्या तयार झाल्या आहेत. मात्र असं असलं तरी त्या आजच्या काळाच्या चौकटीतच अडकून पडणाऱ्या नाहीत. याचं मुख्य कारण त्यांतल्या भाव-भावना, विचार-विकार माणसाच्या आयुष्याशी निगडित, अशा मूलभूत स्वरूपाचे आहेत. त्यामुळंच या कथा वाचकाला निव्वळ आकर्षित करत नाहीत, तर त्या असीम असा आनंद देऊन जातात. हा आनंद आपलीच कथा वाचायला मिळाल्याचा असतो. मुख्य म्हणजे संग्रहातल्या कथांमधल्या घटना फक्त बंगालातच नाहीत, तर भारताच्या कोणत्याही राज्यात घडू शकतात आणि अशी माणसं आपल्याला कुठंही, कधीही भेटू शकतात! या कथा मनाला स्पर्श करण्याचं हेसुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे.

वानगीदाखल काही कथांचा आपण विचार केला तरी काही गोष्टी आपल्या लक्षात येतात. उदाहरणार्थ, ‘माझं प्रेम आहे तुझ्यावर’ या कथेत रिक्षामध्ये पडलेला मोबाइल रिक्षाचालकाच्या घरापर्यंत जातो आणि चालकाच्या बायकोच्या हातात पडतो. त्या घटनेतून उभं राहणारं नाट्य, या कथेत अतिशय बहारीनं रंगवलं आहे. रिक्षाचालकाच्या तरुण पत्नीच्या नैसर्गिक भावनांचा व ऊर्मींचा पडताळा यामध्ये येतो, तसाच तो संवेदनशील वृत्तीच्या आणि विचारी मनाच्या रिक्षाचालकाच्या सरळपणाचाही येतो. परंतु, त्याहूनही या कथेचं विशेष म्हणजे ‘मोबाइल फोन’ला या कथेत त्याचं असं एक ‘स्वतंत्र व्यक्तिमत्त्व’ लेखकानं दिलं आहे.

‘अभ्यंगस्नान’ या कथेमध्ये नायिका ओऱ्हान पामुक वाचत बसली असल्याचा उल्लेख आहे. पामुक हा आताच्या काळातला महत्त्वाचा लेखक. ‘नोबेल पारितोषिक’ मिळवणारा. त्याच्या साहित्याचा असा ओझरता उल्लेखसुद्धा ही कथा आणि त्यात उभ्या केलेल्या व्यक्तिरेखा कोणत्या काळातल्या आहेत, काय सांस्कृतिक जीवन जगताहेत, त्यांच्या एकंदर आयुष्याचा स्तर आणि पोत काय आहे, याची स्वच्छ कल्पना देऊन जातो.
‘मिरवणूक’ ही कथा सध्याच्या काळात नोकरी करणाऱ्या तरुणीच्या भावविश्वाचं चित्रण करता करताच राजकीय परिस्थिती, मध्यमवर्गीय किंवा उच्चमध्यमवर्गीयांची ढोंगी वृत्ती, तरुण मुलीच्या आई-वडिलांची होणारी घुसमट, अशा अनेक गोष्टींना स्पर्श करते. याच लेखकाची ‘पुढारी’ ही गोष्ट सद्यकालातील राजकीय नेत्यांच्या मनोवृत्तीवर प्रकाश टाकणारी आहे. बंडखोर वृत्तीच्या आजच्या तरुणीची कहाणी ‘अभ्यंगस्नान’ या कथेत मांडण्यात आली आहे. प्रचलित मानसिक, वैचारिक, भावनिक चौकटींना आव्हान देतानाच माणसाच्या मनोव्यापाराचा वेध घेणारी ही कथा वाचकाच्या मनात घर करणारी आहे. ‘स्पर्श’ ही कथा तर वाचकाच्या मनाचा ठाव घेते, त्याला विचार करायला लावते. ‘दु:खांना अंत नसतो. ती संपली तर जीवनही संपेल,’ किंवा ‘सर्व दुःखं चेहऱ्यावर प्रतिबिंबित होऊ शकतात का? नाही, नाही होऊ शकत. ती रक्तात लपून राहतात. त्वचेच्या तळाशी गुपचूप बसून राहतात. ती दिसू शकत नाहीत, अमृतदा,’ यांसारखी अर्थगर्भ वाक्यं या कथेत सहजपणे येतात. वाचकाला अंतर्मुख करतात. ‘दाही’ आणि ‘फिबोनाच्ची सीरिज’ या अगदीच वेगळ्या प्रकारच्या कथा हे या संग्रहाचं एक बलस्थान आहे, तर ‘पोस्टमॉर्टेम’, ‘कृशाणू’ या मानवी जीवनातील अतर्क्यता अधोरेखित करणाऱ्या कथा या संग्रहाचं मोल वाढवणाऱ्या आहेत.

सर्वच कथा या वाचकाला अनोखा आनंद, समाधान देणाऱ्या, परिचित जगाचं अनोखं रूप दाखवणाऱ्या आणि त्यातल्या माणसांच्या मनाचे अनेकविध पैलू दाखवणाऱ्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे कथांचा अनुवाद हा इतका सहज आणि सुंदर आहे की, या बंगालीतून मराठीमध्ये आणलेल्या कथा आहेत, असं वाचकाला जरासुद्धा जाणवत नाही. आजच्या काळाचं दर्शन घडवणाऱ्या या कथा आताच्या काळातल्या माणसांच्या मनोव्यापाराचा, विचारांचा, भावनिक घुसळणीचा, आशा-आकांक्षांचा वेध घेणाऱ्या आहेत.

– श्रीराम शिधये

बंगगंध / अनुवाद : सुमती जोशी / उन्मेष प्रकाशन
मूळ कथालेखक : प्रचिती गुप्त, तिलोत्तमा मजुमदार, चंचलकुमार घोष, समरेश मजुमदार, कृष्णेन्दु मुखोपाध्याय, हर्ष दत्त, शेखर मुखोपाध्याय, स्मरणजित चक्रबर्ती, सुचित्रा भट्टाचार्य, बातमी बोशू, विश्वदेव मुखोपाध्याय, सुनील गंगोपाध्याय, शीर्षेन्द्रु मुखोपाध्याय, आशापूर्णा देवी, विकास सरकार, उल्लास मलिक

  • मला आवडलेली इतर काही पुस्तकं
    • तीन पायांची शर्यत / लेखक- डॉ. बाळ फोंडके / मॅजेस्टिक प्रकाशन.
    • ऑफबीट भटकंती (भाग १, २, ३) / लेखक- जयप्रकाश प्रधान / रोहन प्रकाशन.
    • सेपिया / लेखक- आनंद अंतरकर / हंस प्रकाशन.
    • सहावं महाभूत आणि मी ! / लेखक- शोभा बोंद्रे, सतीश जोशी / मॅजेस्टिक प्रकाशन.
    • अटलजी / लेखक- सारंग दर्शने / राजहंस प्रकाशन.
    • ग्रीकपुराण / लेखक- सुप्रिया सहस्रबुद्धे / रोहन प्रकाशन.
    • जाता पश्चिमेच्या घरा / लेखक- डॉ. नरेंद्र बुधकर / मॅजेस्टिक प्रकाशन.
    • आपले बुद्धिमान सोयरे / लेखक- सुबोध जावडेकर / राजहंस प्रकाशन.
    • ‘ती’चं अवकाश / मूळ लेखक- लीला गुलाटी, जसोधरा बागची / अनुवाद : मीना वैशंपायन / रोहन प्रकाशन.

पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल मे २०१९


लक्षणीय कथासंग्रह

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *