प्रणव सखदेव लिखित ‘निळ्या दाताची दंतकथा आणि इतर कथा’ ह्या पुस्तकानं तीन कारणांनी माझं लक्ष वेधून घेतलं- शीर्षक, मुखपृष्ठ आणि मांडणी. कथांची रचना आणि बांधकाम हे नंतर समोर आलं आणि ते स्थापत्य तितकंच भावलं. अर्थात, प्रणव सखदेव ह्या कथनकारानं हे पुस्तकच ‘रचण्याच्या’ धारणेला अर्पण केलं आहे. या कथनाच्या प्रवाहीपणात मग्न होतानाही त्यातलं सत्त्व स्वत:च्या अनुभवविश्वाशी जोडून घेण्याची मुभा मिळत गेली, त्यामुळे या कथांचं काही अंशी परिपक्व अवकाश मला वेगवेगळ्या परिप्रेक्ष्यांतून बघता आलं.
सर्वप्रथम मला भावला शीर्षकातला निळा रंग. पण हे निळेपण भूतकालीन ‘अभिनवघननील’ नाही. त्यात वर्तमानाचा एक दाहक आणि सुदीर्घ कोरडेपणा आहे. रमा हर्डीकर-सखदेव ह्यांनी हा अभिप्रेत अंतर्भूत विरोध; मुखपृष्ठावर सुबकपणे आणि कौशल्यानं चित्रित केला आहे. निळ्याभोर सजल धूसर पृष्ठभागावर ‘दंतकथा’ हा शब्द उमटतो लाल शिरोबिंदू घेऊन. मग आपली नजर सहज घरंगळते ती खाली तरंगणाऱ्या वर्तमानपत्राच्या तुकड्यांवर. गुन्हा, जाळले, मृत्यू, हिंसाचार अशा चार ठळक शब्दांनी त्यांनी भीषण वास्तवाचा आरसा आपल्यासमोर धरला आहे आणि जळजळीत, निर्लेप सत्य दंतकथेच्या सांगोवांगी स्वरूपात कसं रूपांतरित होत जातं, ह्यावर बोट ठेवलं आहे. त्यातून निर्माण होतं एक पोखरलं गेलेलं, सडलेलं, दूषित रक्तात ठसठसणारं मिथक.

साचेबंदपणा नाकारणाऱ्या, प्रस्थापित तंत्राशी जुळवून न घेता नवी कथनलिपी रूढ करू पाहणाऱ्या ह्या कथा आहेत. त्यांतली कथासूत्रं परोक्ष वर्तमानकाळातली आहेत. मानवी संबंधातील गुंतागुंत, संकोच पावत चाललेले संवादांचे परीघ आणि मनोविश्लेषण हे काही कथांचे आरंभबिंदू आहेत...

ह्या शीर्षकात ‘निळा दात’ आहे. ब्लू टूथ… अत्याधुनिक संगणकीय युगात आभासी जगात विविध पातळ्यांवर देवाणघेवाण घडवून आणणारी एक तांत्रिक तंतुहीन यंत्रणा. प्रत्यक्षात काहीच जोडलं जात नाही, पण रक्तवाहिन्यांतून रक्त सहज सळसळत जावं तसा माहिती, स्वर, शब्द आणि प्रतिमांचा प्रवास घडवून आणणारा ब्लू टूथ. हे नाव पडलं हाराल्ड ‘ब्लूटूथ’ गॉर्म्सून ह्या डेन्मार्क आणि नॉर्वेच्या राजाच्या मृतवत निळ्या दातावरून. आंतरजाल, भ्रमणध्वनी आणि संगणक यांच्यात देवघेवीचा एक मंच, सजीव जाणिवांना अर्धमृत करून टाकणारा, आभासाचं समांतर वास्तवात परिवर्तन करणारा. व्याजवास्तवाचा विळखा घट्ट करणारी अजून एक यंत्रणा. ‘निळा दात’ आणि त्याची बनत गेलेली ‘दंतकथा’ ह्या दोन प्रतिमांनी मला जर्मन नाटककार रोलांड शिम्मेलफेनिशच्या The golden Dragon (der golden Drache) ह्या नाटकाची प्रकर्षानं आठवण करून दिली. चीनचा एक निर्वासित तरुण, बेकायदेशीररीत्या जर्मनीतील एका आशियाई हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करणारा. त्याचा दुखरा दात. नागरिकत्व नाही म्हणून संरक्षक विमा नाही, मग स्वयंपाकघरातली अवजारं वापरून त्याचा दात उपटून काढला जातो, तो अवकाशात भिरकावला जातो, त्या तरुणाची परवड आणि त्या दाताचा प्रवास कसाकसा होत जातो हे नाटकात पाहायला मिळतं. वर्गभेद, गरिबांचा संघर्ष, वंचितांचं जिणं, सामाजिक उतरंड, चंगळवाद आणि अमानुष, भावनाहीन, स्वार्थी सामाजिक वास्तवाचं अनेक टप्प्यांतलं भेदक चित्रण ह्यात आहे. दृश्यांच्या साखळीतून नाटककारानं सम्भावितांचे बुरखे लीलया फाडले आहेत, आणि तरीही त्या ओघवत्या संहितेत एक प्रगल्भ तटस्थपणा आहे. प्रणवच्या कथा तशाच आहेत. आकांडतांडव न करता भाष्य करणाऱ्या, विचार करायला प्रवृत्त करणाऱ्या. त्यांची शैली एकदम ताजी टवटवीत आहे आणि भाषेचा पोशाख एकदम वस्तुविषयाला साजेसा. तर त्यानंतर मला प्रचंड आवडलं ते परिशिष्ट. एरवीही मी प्रस्तावना सगळ्यात शेवटी वाचते. पण इथे परिशिष्ट अर्थातच कथांच्या अखेरीस येतं. तेही epilogueच्या दिमाखात. इथे आपल्याला बेर्टाल्ट ब्रेष्टच्या alienation / estrangement effect अर्थात परात्मभावाची आठवण येते. लेखकाने ‘एका झाडावरच्या दोन पक्ष्यांत’ एक बहारदार संवाद घडवून आणला आहे. आणि ब्रेष्टच्या भाषेत बोलायचं झालं तर, ह्या संवादातून जे काही हाती लागेल, ते अनेक शक्यतांपैकी एक आहे. ते एक निर्विवाद सत्य आहेच, पण संवादक बदलला की त्याची मांडणी बदलेल, कारण प्रत्येकाचं सत्य वेगळंच असतं. मोह होतोय, पण जास्त सांगणार नाही. कारण हे परिशिष्ट हा ह्या पुस्तकाचा ‘गाभा’ आहे. लेखक स्वत: आरशासमोर उभा आहे, पण कोण कुणाला प्रश्न विचारतेय हे आजवर तपशिलांच्या सोप्या प्रतिमांवर पोसलेल्या वाचकानं स्वत: डीकोड करायचं आहे, शोधून काढायचं आहे.
ह्या कथेतल्या पात्रांचं आधुनिक जगातला माणुस म्हणून असलेलं चाचपडतं आत्मभान, तुटपुंजं समाजभान, आणि अखंड डाचणारी अपुरेपणाची जाणीव प्रणवनं समर्थपणे अधोरेखित केली आहे. हा कथाकार काळाच्या ओघातल्या माणसांचं शाश्वत विखुरलेपण मान्य करणारा आहे, एक शबलित मानवी अस्तित्व ह्या कथांतून डोकावतं. शिवाय, प्रणवची कथा ही घाट, प्रतिमा, कथनतंत्र आणि भाषेचं स्वरूप ह्याबद्दल प्रयोगशील आहे.
ह्यातील काही कथा मला फार आवडल्या, त्याबद्दल खाली काही नोंदी…

हा खेळ आयडेंटिटी थेफ्टचा-
मुळातच व्यक्तिमत्त्व आणि त्यामुळे निर्माण होणारी ओळख ही सदैव बांधकाम सुरू असलेल्या इमारतीसारखी असते. केवळ फेसबुकवर नव्हे, तर स्वत:ला हवी असलेली इमेज तयार करण्यासाठी हवा तसा प्रोफाईल तयार करणारा ‘युझर’ आपण कायमच असतो. आभासी जगात आपणच निर्माण करत असलेली ही प्रतिरूपं, प्रारूपं आणि विरूपं हे खरं तर वास्तवावर एक प्रकारचं आरोपण असतं. प्रत्येकाच्या अवकाशातला एक खंडित भाग जो-तो ठिगळ लावून मिरवत असतो आणि पिंडाला ब्रह्मांड मानून त्या समांतर जगात आपले सोहळे जगत असतो. noidentity@knowidentity.com ह्या दुव्यावरून खुलवत नेलेली ही कथा आहे.
कतरा कतरा जीते है-
ह्या कथेचा घाट, रूपबंध ज्या अर्थी मला फार आवडला, त्या अर्थी ही कथा ‘देखणी’ आहे. ही चुकत-माकत जुळू पाहणारी तुकड्यांची नक्षी आहे. थेंबाथेंबानं साचणारं दैनंदिन थारोळं आहे. चंगळवाद, कॉर्पोरेट जगाची खंडित अवस्था, कायप्पा आणि ईमेल वरील तथाकथित संवादांचे अवशेष, प्रतिमा आणि शब्दांची अर्ध-आवृत साखळी ह्या सर्वांतून एकसंध चित्र निर्माण होतही नाही, आणि ते करायचा लेखकाचा मानसही नसावा. पण अनेक पातळ्यांवर कथा निर्माण होत राहते आणि लोप पावत जाते. ह्या कथेला एक अंतर्नाद आहे pidgin ह्या संमिश्र भाषालक्षणाचा. रामू रामनाथन ह्यांच्या ‘(एका) शब्दाची रोजनिशी’ ह्या नाटकातल्या ओळी इथे आठवतात: ‘…सीमेपलीकडून आपल्याला संयोगचिन्हानं जोडणारे; आपलं मागचं दार बॅकस्लॅशनं आणि हॅशटॅगनी ठोठावणारे. आपला तिरस्कार करणारे. सगळेच आपल्या विरामचिन्हहीन अभिजात साहित्याची बढाई मारत असतात…’ ही कथा ह्या दुर्बिणीतून वाचली की वेगळ्याच पातळीवर नेते.
निळ्या दाताची दंतकथा-
पत्रकार म्हणाला, “तुम्हाला एक दात आहे, निळाभोर!” बापाच्या मनात तो आवाज घुमला – ‘दंतरूपी शहाणपणा!’
एका दंतवैद्याचं स्वप्न. त्यात एका नाटकातल्या दृश्यातला निळा दात, स्वप्नातल्या त्या दाताचं क्रूर वास्तव आपल्यासमोर उलगडत जातं- दुसऱ्या महायुद्धात हजारो ज्यूंची निर्घृण कत्तल घडवून आणणारे ‘कार्ल’ हे त्याचे वडील! ह्या नृशंस इतिहासाच्या पायखुणा दाखवत वाचकाला हा कथनकार अखेर नेऊन सोडतो एका रुग्णाच्या निळ्या चमकत्या दातापर्यंत. डोळ्यांवर पट्टी बांधून मृत्युगोलात वेगाने फिरत असल्यासारखं वाटत राहिलं ह्या गोष्टीत. ह्या संग्रहातील बऱ्याच कथा मनात खेळत राहतात, वेळीअवेळी कुठे ना कुठे पुसटशा भेटतात आणि ह्यातली पात्रे तर कुठल्यातरी रूपात तुमच्या-आमच्याभोवती असतातच. त्या मानाने, भूत. के. ही गोष्ट कृत्रिम वाटली आणि ओढूनताणून रंजक बनवायचा प्रयत्न केल्यासारखं वाटत राहिलं. डावे-उजवे पांडव ही गोष्ट सैद्धांतिक पातळीवर गेल्यामुळे त्यातले संदर्भ समजून घेणं सगळ्यांनाच सहज शक्य होईल असं वाटत नाही, हेही इथे नोंदवू इच्छिते.
दंतकथेला पुरावा नसतो. ती ऐकीव, मौखिक परंपरेतून उगम पावणारी रंजक गोष्ट असते; वास्तवाच्या जवळ जाणारी असते, तरी तिला कल्पनाविश्वाचं दार खुलं असतं. प्रणवच्या कथा मला ह्या निकषावर गूढकथा, चातुर्यकथा, अद्भुतरम्यकथा ह्यांचं एक चलाख मिश्रण वाटतात. ह्या संग्रहात नऊ कथा आहेत. म्हणून ह्याला नवकथा संग्रह म्हणायचा पाचकळपणा मी करणार नाही. पण नवकथेचे निकष ह्या कथांना लागू पडतात म्हणून ह्या ताज्या दमाच्या, बांधेसूद आणि ताशीव, आटोपशीर कथांना ‘नवकथेच्या पटावरचं सशक्त पाऊल’ नक्कीच म्हणता येईल. साचेबंदपणा नाकारणाऱ्या, प्रस्थापित तंत्राशी जुळवून न घेता नवी कथनलिपी रूढ करू पाहणाऱ्या ह्या कथा आहेत. त्यांतली कथासूत्रं परोक्ष वर्तमानकाळातली आहेत. मानवी संबंधातील गुंतागुंत, संकोच पावत चाललेले संवादांचे परीघ आणि मनोविश्लेषण हे काही कथांचे आरंभबिंदू आहेत. काही कथांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान हे सजावट नेपथ्य बनून समोर येतं आणि कथानकाचं केंद्र बनून जातं. अचेतनावर केलेलं चेतनारोपण हे एखाद्या कथेतून चकवा घालतं. रोजच्या सर्वसामान्य आयुष्यात घडणाऱ्या, जाणवणाऱ्या, बोचणाऱ्या, खुपणाऱ्या अनेक मुद्यांवर ह्या गोष्टी रचल्या आहेत, मात्र ‘…रचताना जगणं तसंच्या तसं न उतरवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या processला’ आपण डोळसपणे जाणून घ्यायची गरज आहे.
वाचक, रसिक, आस्वादक आणि जिवंत माणूस म्हणून स्पंद पावताना ह्या कथांचं परिशीलन करायचं काम तुम्हाला करावंसं वाटावं ही माझी इच्छा आहे.

-जयश्री हरी जोशी

निळ्या दाताची दंतकथा आणि इतर कथा / लेखक- प्रणव सखदेव / रोहन प्रकाशन

 • मला आवडलेली इतर काही पुस्तकं
  • इन्स्टॉलेशन्स / लेखक- गणेश मतकरी / मॅजेस्टिक प्रकाशन.
  • वाचा जाणा करा (९ पुस्तकांचा संच) / लेखक- कविता महाजन / रोहन प्रकाशन.
  • लज्जागौरी / लेखक- रा. चिं. ढेरे / पद्मगंधा प्रकाशन.
  • अक्षरनिष्ठांची मांदियाळी / लेखक- अरुण टिकेकर / रोहन प्रकाशन.
  • मेळा / लेखक- दासू वैद्य / पॉप्युलर प्रकाशन.
  • माझा धनगरवाडा / लेखक- धनंजय धुरगुडे / रोहन प्रकाशन
  • भुईरिंगण / लेखक- रश्मी कशेळकर / मॅजोqस्टक प्रकाशन
  • लोककवी साहिर लुधियानवी / लेखक- अक्षय मनवानी, अनु. मिलिंद चंपानेरकर / रोहन प्रकाशन.
  • गवत्या / लेखक- मिलिंद बोकील / मौज प्रकाशनगृह.

पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल ऑगस्ट २०२०


हे पुस्तक खरेदी करण्यासाठी…

साक्षीभावाने बघताना

माझ्या बापाने तोंड उघडलं काही क्षण गेले असतील नसतील . मग पहिल्यांदा त्या पत्रकाराला माझं – या निळ्याभोर दंतराजाचं दर्शन झालं. माझा बाप विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर देत होता. पण पत्रकारांचं सगळं लक्ष केंद्रित झालं होतं, ते माझ्यावर – शहाणपणाच्या निळ्याभोर दंतराजावर! माझा बाप बोलणं थांबत म्हणाला, काय झालं? पत्रकार म्हणाला, ”तुम्हाला एक दात आहे, निळाभोर!” बापाच्या मनात तो आवाज घुमला – ‘दंतरुपी शहाणपणा!’ तो उठणार, तोच धपकन खाली पडला आणि मेला! आणि माझी रवानगी झाली त्या पत्रकाराच्या हिरडीत! मानवाची फरफट आता सुरु होणार होती. कारण माझी हि कहाणी कुणालाच ठाऊक नव्हती. खरंतर शहाणपणाचाच शाप झाला होता!’

Nila-Datchi-dantaKatha-Cover

225.00Add to cart


Pranav Sakhadeo Photo
युवा लेखक प्रणव सखदेव यांचा परिचय…

फिक्शन लेखन करणं ही त्यांची पॅशन असून त्यातून समकालातल्या प्रश्नांचा भिडणं हे त्यांना महत्त्वाचं वाटतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *