नाद-लय-ध्वनीची जमलेली शब्दमैफल

‘अनुनाद’ हे अरुण खोपकरांचे ‘मॅजेस्टिक’ प्रकाशनाने प्रकाशित केलेले नवे पुस्तक म्हणजे त्यांनीच या पुस्तकातील एका लेखात म्हटल्यांप्रमाणे ‘रूप पाहता लोचनी’ या स्वरूपाचे देखणे ग्रंथरूप आहे. प्रसिद्ध कलादिग्दर्शक विकास गायतोंडे यांनी हे रूप सजवलं आहे. बहुविध कलांवर मनस्वी प्रेम करत मुलगामी लेखन करणाऱ्या खोपकरांचे हे नवे पुस्तक त्यांच्या आधीच्या पुस्तकाच्या मालिकेतला कळसाध्याय आहे.
त्यांचे ‘गुरुदत्त : तीन अंकी शोकांतिका’ हे पुस्तक चित्रपटविषयक विश्लेषणात्मक लेखनाचा नवा मानदंड प्रस्थापित करणारे आहे, तर ‘चित्रव्यूह’ आणि ‘चलत् चित्रव्यूह’ या जोड पुस्तकांत विशेष करून त्यांनी अनेक कलावंतांच्या सर्जनशील प्रेरणांचा शोध घेतला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या ‘अनुनाद’ या पुस्तकाचं मोल अधिक आहे. सिनेमा आणि साहित्याचा सौंदर्यवेधी दृष्टीने शोध घेणारे चौदा लेख या पुस्तकात समाविष्ट केले आहेत. त्या लेखांचा अनुक्रम त्यांच्या ‘अनुनाद’ या संकल्पनेशी समांतर जाणारा आहे.

खोपकरांची हुकमत कला व्यासंगावर आहे; तशीच ती शब्दांवर आहे. त्यांची शब्दकळा नेमकी व मोहक आहे. पहिल्या भागातील लेख या शब्दप्रेमाविषयीचे आहेत.

खोपकरांची हुकमत कला व्यासंगावर आहे; तशीच ती शब्दांवर आहे. त्यांची शब्दकळा नेमकी व मोहक आहे. पहिल्या भागातील लेख या शब्दप्रेमाविषयीचे आहेत. या शब्दप्रेमातून खोपकरांनी चार आशियाई व पाच युरोपीय भाषांचे अध्ययन केले. या प्रवासात त्यांना भेटलेले भाषाप्रभू, त्या भाषिक प्रदेशातील कला, त्यातून निर्माण झालेली संस्कृती या साऱ्यांचा सौंदर्यपूर्ण धांडोळा त्यांनी घेतला आहे. त्यात त्यांची अंतर्दृष्टी, त्यांचा सौंदर्यवेध व त्यांचे विशाल संदर्भज्ञान यांचा सुरेख मेळ जमला आहे. या विभागातील लेखांत विविध भाषेतील ‘शब्दकोश’ -निर्मितीच्या वेदना व त्या शब्दांतून निर्माण झालेल्या पुस्तकांच्या अचंबित करणाऱ्या कथा व त्या कथानायकांच्या गोष्टीही त्यांनी अगदी निगुतीने सांगितल्या आहेत. त्यातूनच ग्रंथाचे सौंदर्य-सौष्ठत्व कशात आहे याचा अदमास घेत, शेलकी उदाहरणे सादर करत अरुण कोलटकरांच्या ‘सर्पास्त्र’ व ‘भिजकी वही’ या दोन देखण्या पुस्तकांच्या मांडणीचा समर्पक अल्प परिचयही करून दिला आहे.
शब्दप्रेमिक असलेल्या खोपकरांचे चित्र-भाषेबद्दलही तितकेच ममत्व व प्रभुत्व सर्वश्रुत आहे. त्यांचे लघुपट, चित्रपट व याआधीची पुस्तकं त्याची ग्वाही देतात. या विभागातील पहिला लेख ‘पर्शियन मिनिएचर’ हा इराणच्या प्राचीन व समृद्ध संस्कृतीचे ह्रद्य शब्दचित्र रेखाटणारा आहे. त्यात खोपकर म्हणतात, ‘एकीकडे इराणमधील धार्मिक अमानुषता आणि कट्टरपणा आणि दुसरीकडे इराणी सिनेमात दिसणारी अकृत्रिम सहज अनुकंपा’ असा सखोल जाणिवेचा समतोल या लेखात सर्वत्र विखुरला आहे. इराणमध्ये अनेक साम्राज्ये आली आणि गेली; पण अटळ आहे ते मनाचे साम्राज्य आणि त्याला जोडणारे मुख्य सूत्र म्हणजे फारसी भाषा याचे अत्यंत सुरेख विश्लेषण त्यांनी या लेखात केले आहे.
याच विभागात ‘कोरा कॅनव्हास’ या पुस्तकाच्या निमित्ताने नि:शब्द अभिव्यक्तीचा ध्यास घेणाऱ्या चित्रकार प्रभाकर बरवे यांचा चित्रछंद अधोरेखित केला आहे. कधी पत्रकारितेतून, तर कधी कथा-कादंबऱ्यातून सत्यकथन करणाऱ्या अरुण साधूंच्या शब्दछंदातून त्यांचे व्यक्तिमत्त्व साकारले आहे. भारतातील सर्वश्रेष्ठ अॅनिमेटर राममोहन या अबोल व्यक्तीचे आयुष्य त्यांनी शब्दरेखांनी रेखाटण्याच्या ओघाने ‘अॅनिमेशन’ या कलेचा ओनामा सविस्तरपणे नोंदला आहे.

विसाव्या शतकातील मूर्तिभंजक सिने-दिग्दर्शक म्हणून मान्यता पावलेल्या मृणाल सेन यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी जिव्हाळ्याने लिहिले आहे. ‘तीव्र मध्यम’ हा खोपकरांनी फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिकत असताना निर्माण केलेला लघुपट. या लघुपटासाठी कुमार गंधर्वांनाच गाण्याची गळ घालून लघुपट निर्मितीची गोष्ट सांगता सांगता त्यांनी या निमित्ताने स्मिता पाटीलच्या प्रथम पर्दापणाची… अर्थात एका तारकेच्या जन्माची हृद्य हकिागत सांगितली आहे. स्मिताच्या उपजत कृष्ण-धवल चेहऱ्याचे शब्दचित्र त्यातून साकारले आहे.
या विभागातील शेवटचं शब्दचित्र म्हणजे पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय उभं करणारे पी. के. नायर यांचं आणि पर्यायाने त्यांच्या संग्रहालय उभे करणाऱ्या ध्यासाची गोष्ट. ‘सिने मजनू’ या लेखात खोपकरांनी नायरांच्या सिनेप्रेमाची आणि त्यांच्या अपार तपस्येची हकिगत अगदी तपशिलात कथन केली आहे. त्यांच्या शब्दात ती एक ‘दर्दभरी दास्तान’ आहे.

या पुस्तकातील प्रदीर्घ लेख म्हणजे ‘ध्वनिमाहात्म्य’. खोपकरांच्या या शब्द मैफिलीतला हा ‘बडा ख्याल’. तो सुमारे शंभर पानांचा विस्तृत लेख आहे. ‘चित्रपट हा एखाद्या झाडांसारखा आहे. त्याला गदगदा हलवल्यावर जे जरुरीचे असते तेवढेच राहते. बाकी सारे गळून पडते’ हे चार्ली चॅप्लिनचे अवतरण उद्धृत करत खोपकरांनी ‘ध्वनिमाहात्म्य’चे पारायण केले आहे. दीर्घ व्यासंग, अंतर्दृष्टी आणि चपखल संदर्भस्रोत या त्यांच्या हुकमी त्रिसूत्रीच्या साहाय्याने खोपकरांनी गेल्या शतकातील शेकडो चित्रपटांना गदगदा हलवले असून जे वाचकांना जरुरीचे आहे तेच नेमके नोंदवून ध्वनी-नाद आणि लयीचा दीर्घ प्रवास उलगडून दाखवला आहे.
‘सिनेमा ही दृष्यकला आहे’ या विधानात एक दुष्ट अर्धसत्य लपलेले आहे, हे सोदाहरण सांगत खोपकरांनी नाद-लय-ध्वनीचा आदिकालापासून आजवरचा प्रदीर्घ प्रवास उलगडला आहे. या लेखाचा शिरोबिंदू म्हणजे चॅप्लीनच्या विस्तीर्ण कलाप्रवाहाचे दाखले देत त्यांनी या निमित्ताने देववाणी, दैत्यवाणी आणि मनुष्यवाणी या तीनही बाबतीत चॅप्लीनच्या ध्वनिविचाराचे महत्त्व विशद केले आहे. ‘ग्रेट डिक्टेटर’ या चित्रपटाचा संदर्भ देत आजच्या परिस्थितीतही हुकमशाहीची तरफदारी करणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. या पुस्तकातला हा लेख खोपकर यांच्या चौफेर ज्ञानाचा दस्तऐवजच आहे.
पुस्तकातील अखेरचा लेख ‘दूरचे प्रतिध्वनी’ हा ध्वनीविषयक विविध संस्कृतीतल्या कलाविचारात दिसणाऱ्या साम्यस्थळांविषयी आहे. हे विलक्षण साम्य हाच या लेखनाचा अनुनाद आहे. कलाविषयक समृद्ध विचार, संदर्भाची कालसुसंगत टिपणी, वेधक निरीक्षणे आणि सूचक तपशील यांनी हे पुस्तक एक समृद्ध अनुभव देते. कलाप्रेमींच्या जाणिवा समृद्ध करणारे हे लेखन आवर्जून वाचावे असे आहे. दीर्घकाळ मनात रेंगाळणारा हा ‘अनुनाद’ आहे.

सतीश जकातदार

अनुनाद / लेखक- अरुण खोपकर / मॅजेस्टिक प्रकाशन

  • मला आवडलेली इतर काही पुस्तकं
    • रहें ना रहें हम / लेखक- मृदुला दाढे-जोशी / रोहन प्रकाशन.
    • आणि मग एक दिवस -(आत्मचरित्र)/ लेखक- नसिरुद्दीन शहा -अनुवाद : सई परांजपे / पॉप्युलर प्रकाशन.
    • नाइन्टीन नाइन्टी / लेखक- सचिन कुंडलकर / रोहन प्रकाशन.
    • क्लोज एनकाउंटर्स / लेखक- पुरुषोत्तम बेर्डे / राजहंस प्रकाशन.
    • त्या दहा वर्षांतील गुरुदत्त / लेखक- सत्या सरन -अनुवाद : मिलिंद चंपानेरकर / रोहन प्रकाशन.
    • सिनेमास्कोप / लेखक- गणेश मतकरी / मॅजेस्टिक प्रकाशन.
    • सुन मेरे बंधू रे / लेखक- सत्या सरन -अनुवाद : मिलिंद चंपानेरकर / रोहन प्रकाशन.

पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल २०२१ जानेवारी


लक्षणीय पुस्तकं

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *