कुतूहलाचा गोष्टीवेल्हाळ धांडोळा
‘इति-आदि’ या पुस्तकात आपल्या खाद्यसंस्कृतीचा आणि घरगुती वापरातील वस्तूंच्या इतिहासाचा धांडोळा घेण्यात आला आहे. हा विषय टिकेकरांच्या अकॅडमिक अभ्यासाशी संबंधित नाही. ते प्राय: मुंबई शहराच्या इतिहासाचे प्रतिष्ठाप्राप्त तज्ज्ञ. शिवाय महाराष्ट्राच्या प्रबोधनपर्वाचे ख्यातकीर्त अभ्यासक. पण टिकेकरांचा वाचन-वावर इतक्या विविध क्षेत्रांत होता की, ते एकाच वेळेस अनेक विषय वाचू शकत आणि त्यावर लिहू शकत. तरीही खाद्यसंस्कृतीचा इतिहास हा खासच वेगळा विषय. पण गंमत म्हणजे टिकेकर कुतूहलाचा भाग म्हणून या विषयात शिरले असणार आणि त्यात केलेल्या मुशाफिरीतून लिहिते झाले असणार. कदाचित खाद्य-पेयापासून पेहरावापर्यंत आणि अन्न-वस्त्र-निवाऱ्यांपासून चित्रपट-नाटक-वाङ्मयादी कलांपर्यंतच्या बाबींना पारंपरिक इतिहास-लेखनाच्या साधनांमध्ये स्थान नसल्याने त्यांनी या बाबींचा शोध घेण्याचा विचार केला असावा. कदाचित काहीतरी वेगळं लिहावं या इच्छेतून ते या विषयात उतरले असण्याची शक्यताही आहेच. काही असो; खाद्यसंस्कृतीच्या एखाद्या गाढ्या अभ्यासकाने हा विषय जसा हाताळला असता, त्यापेक्षा टिकेकरांची हाताळणी अगदी सहज, सुलभ आणि गोष्टीवेल्हाळ आहे. त्यामुळे त्यांच्या मुशाफिरीत आपण वाचकही सामील होतो आणि त्यांच्यासोबतच खाद्यसंस्कृतीच्या विविध अंगांचा आस्वाद घेऊ लागतो.
वाचक या मजकुरात गुंततो याला काही कारणं आहेत. एकतर टिकेकरांची रसाळ, गोमटी भाषा. त्यांच्या लिखाणाला गेल्या दोनशे वर्षांतील भाषासौंदर्याचा सुगंध आहे. त्यांच्या लेखनाला जुन्या पिढीने कमावलेलं सौष्ठव आहे. इतकी चांगली भाषा हल्ली कुठे वाचायला मिळते? मिळालीच तर त्यात क्लिष्टता, पंडिती जडपणा आणि अभिजात उग्रता असते. पण टिकेकरांच्या या लिखाणात नितांतसुंदर सहजता आहे. हा विषय लिहिण्याचा आनंद ते स्वत: घेत असल्याचं हा मजकूर वाचताना वाटत राहतं. त्यामुळेच त्यांच्यासोबत आपणही या आनंदात सहभागी होऊ शकतो. ‘माझ्या वाचनात मला ज्या अजबगजब गोष्टी कळल्या त्या तुम्हाला सांगतो’, असा या लेखनाचा बाज आहे. त्यामुळे वाक्यागणिक नवनवी माहिती आपल्याला कळत जाते आणि आपण या सुग्रास माहितीचा आस्वाद घेऊ लागतो. दुसरी गोष्ट म्हणजे, टिकेकरांचं वाचन बहुविद्याशाखीय असल्यामुळे त्यांचं लेखन आपल्याला समृद्ध करत जातं. इतिहास, भूगोल, साहित्य, भाषाशास्त्र, समाजशास्त्र, व्युत्पत्तीशास्त्र, मानववंशशास्त्र अशा कितीतरी अभ्यासशाखांतील संबंधित माहिती ते आपल्याला उलगडून देतात. त्याशिवाय वैद्यक, उद्योग-व्यापार, आहारशास्त्र वगैरेमधील आवश्यक संदर्भही पुरवतात. त्यामुळे त्यांचं बोट धरून चालताना मौज तर येतेच, शिवाय लहान मुलं आजी-आजोबांकडून गोष्ट ऐकताना ‘आणखी सांगा, आणखी सांगा’ असं म्हणतात, तसंही म्हणावंसं वाटतं. टिकेकरही त्या त्या विषयातील गमतीशीर, चमकदार आणि चमत्कृतीपूर्ण माहिती सांगत जातात. या माहितीमुळे आपण या पुस्तकात रमत जातो.
या पुस्तकात रमण्याचं आणखी एक कारण म्हणजे, टिकेकरांची मानवी जीवनाविषयीची आतुरता आणि आत्मीयता. मानवी जीवन कसकसं उलगडत गेलं आणि समृद्ध होत गेलं, नाना खाद्यपदार्थ आणि जीवनोपयोगी घरगुती वस्तूंतून ते कसं दिसतं, याचा उलगडा हे पुस्तक वाचताना होतो. विविध धान्य-भाज्या-फळं-पदार्थ-पक्वान्नं आणि सुई-आरसा-मच्छरदाणी-पंखा-कात्री-दागिने-भांडीकुंडी अशा जीवनोपयोगी वस्तू यांचा माणसाच्या इतिहासाशी आणि त्याच्या अलीकडच्या विकासाशी असलेला संबंध टिकेकर आपल्याला जोडून दाखवतात. आपल्या हल्लीच्या दैनंदिन जगण्यात सवयीच्या बनलेल्या चीजवस्तू आपल्या जगण्यात कोणत्या काळात आल्या, जगाच्या कोणत्या संस्कृतीतून कोणामार्फत आपल्यापर्यंत पोहोचल्या, या वस्तूंचे उल्लेख आपल्या प्राचीन साहित्यात कुठे सापडतात, कोणत्या वस्तू किंवा कोणती खाद्यं कोणत्या प्रांतांमध्ये केव्हापासून स्थापित आहेत आणि कोणते पदार्थ कोणत्या वस्तूपासून कसकसे बनत नि बदलत गेले असं बरंच काही टिकेकर सांगत जातात. हे सर्व सांगताना जन-महाजन-अभिजन या श्रेणींच्या सामाजिक-सांस्कृतिक सवयींचा आणि त्यांच्या प्रतिष्ठेच्या कल्पनांचा धागा ते जोडून दाखवतात. शिवाय कशाकशाबद्दलच्या लोकसमजुती, लोकविभ्रम, लोकसंकेत, दंतकथा, उक्ती-म्हणी असंही जाता जाता सांगतात. या सर्व माहितीच्या भांडारात आपण शिरत जातो आणि प्रसंगी हरवतही जातो. वाचताना ही माहिती आपल्याला गुंगवून टाकते खरी, पण ती विविध विद्याशाखांतून मिळवलेली असल्याने एकाच वाचनात ही सर्व माहिती आपल्या मेंदूत साठवणं अवघड होऊन बसतं.
आपल्याला अचंबित करणारी ही माहिती त्यांनी कुठून कुठून मिळवली आहे, हे ते लिहिता लिहिताच सांगतात. त्यातून त्यांच्या चौफेर वाचनाचा आवाका आपल्याला कळतो. त्यांच्या लिखाणात विश्वकोश, संस्कृतिकोश या एतद्देशीय कोशांप्रमाणेच इंग्रजी भाषेतील जुन्या-नव्या अनेक कोशांचा उल्लेख येतो. ‘फिलॉसॉफिकल अँड पोलिटिकल हिस्टरी ऑफ सेटलमेंट अँड ट्रेड ऑफ युरोपियन्स’पासून ‘इंग्लिश थ्रू द एजेस’ अशा एरवी आपल्याला माहीत नसलेल्या अनेक ग्रंथांचा ते सहज उल्लेख करतात. त्याशिवाय नाना इतिहासकार, संशोधक, ब्रिटिश अधिकारी, संत, ह्यू-एन-त्संगसारखे प्रवासी, तत्त्वज्ञ यांच्याही साक्षी देतात. महानुभावांपासून बौद्धवाङ्मयापर्यंत आणि ‘भोजनकुतुहलम’, ‘मानसोल्लास’, ‘तांबुलपुराण’, ‘काव्येतिहास’ संग्रहापासून कुणाकुणाच्या चरित्र, आत्मचरित्र आणि दप्तरनोंदींपर्यंत अनेक ठिकाणांहून एखाद्या मधमाशीप्रमाणे ते मधु-माहिती गोळा करून आणतात आणि त्यावर सुयोग्य प्रक्रिया करून आपल्यासमोर ठेवतात. आपल्या वाचनाचा, अभ्यासाचा आणि व्यासंगाचा कोणताही अडथळा ते वाचकाला येऊ देत नाहीत, हेही त्यांच्या येथील लिखाणाचं वैशिष्ट्य म्हणायला हवं. त्यांचं विवेचन आस्वादक असल्याने वाचक अडखळत नाही, त्यांच्यासोबत विहरत राहतो. मोठा आवाका असलेला लेखकच ही गोष्ट साध्य करू शकतो, हे सांगणे न लगे.
या पुस्तकातील सर्वच लेख वाचनीय असले, तरी खाद्यसंस्कृतीचा धांडोळा घेणारे लेख मला विशेष आनंद देऊन गेले. माणसाचं जीवन अन्नाच्या शोधार्थ घडत नि बदलत गेलेलं असल्याने अन्नपदार्थांना मानवी संस्कृतीत महत्त्वाचं स्थान असणं स्वाभाविक आहे. त्यामुळे माणसाचं आर्थिक, सामाजिक, भौतिक आणि धार्मिक जीवनही अन्नपदार्थांनी प्रभावित झालेलं असणार. गेल्या पन्नास-साठ वर्षांत खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासाकडे गांभीर्याने पाहिलं जाऊ लागल्याने याबाबत अधिक प्रकाश पडू लागला आहे. त्यातून नवनव्या गोष्टी वाचकांसमोर येऊ लागल्या आहेत.
-सुहास कुलकर्णी
- इति-आदि दैनंदिन चीजवस्तूंचा उगमापासून आजपर्यंतचा कुतूहलजनक प्रवास
- लेखक : डॉ. अरुण टिकेकर
पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल मार्च २०२०
रोहन शिफारस
इति-आदि
दैनंदिन चीजवस्तूंचा उगमापासून आजपर्यंतचा कुतूहलजनक प्रवास
या पुस्तकात रमण्याचं आणखी एक कारण म्हणजे टिकेकरांची मानवी जीवनाविषयीची आतुरता आणि आत्मीयता. मानवी जीवन कसकसं उलगडत गेलं आणि समृद्ध होत गेलं, नाना खाद्यपदार्थ आणि जीवनोपयोगी घरगुती वस्तूंतून ते कसं दिसतं, याचा उलगडा हे पुस्तक वाचताना होतो. विविध धान्य-भाज्या-फळं-पदार्थ-पक्वान्न आणि सुई-आरसा-मच्छरदाणी-पंखा-कात्री-दागिने-भांडीकुंडी अशा जीवनोपयोगी वस्तू यांचा माणसाच्या इतिहासाशी आणि त्याच्या अलीकडच्या विकासाशी असलेला संबंध टिकेकर आपल्याला जोडून दाखवतात….” – सुहास कुलकर्णी
₹500.00Add to Cart
अभ्यासक, लेखक, संपादक व संशोधक अरुण टिकेकर यांच्याबद्दल…
निश्चित अशी वैचारिक बैठक असलेले आणि अभ्यासक, संशोधक असा डॉ. अरुण टिकेकरांचा नावलौकिक आहे. अभ्यासपूर्ण आणि संशोधनात्मक लेखन हा टिकेकरांचा मुख्य लेखन-प्रांत असला तरी त्यांनी ललित लेखनासह लेखनाचे अनेक बंध लीलया पेलले आहेत.