गोष्ट जशी शब्दांनी तयार होते, तशी चित्रांनीही होते. चित्रांचीही स्वत:ची अशी एक भाषा असते. ही भाषा वाचणं हा एक वेगळा सर्जनानंद असतो. या आनंदाबद्दल आणि त्याच्याशी निगडित आपल्या उपक्रमाबद्दल सांगताहेत चित्रकार राजू देशपांडे…
‘वाचन’ या शब्दाचा सर्वसाधारण आपण जो अर्थ लावतो तो असा – ‘पुस्तकात छापलेला मजकूर वाचणं.’ वाचन या शब्दाचा अर्थ आपण बऱ्याच वेळा फक्त लिखित मजकुराशी लावतो. परंतु लहान मुलांसाठी जी गोष्टींची पुस्तकं असतात किंवा मोठ्यांसाठी जी ग्राफिक नॉव्हेल्स असतात त्यामध्ये मजकूर व चित्र या दोहोंचाही अंतर्भाव असतो. अनेकदा त्यातली चित्रं जास्त महत्त्वाची असतात. याचा अर्थ असा की, मजकूर आणि चित्र हे दोन्ही घटक एकत्र येऊन ती गोष्ट पूर्ण होते. म्हणजेच जसा मजकूर ‘वाचला’ जातो तशीच चित्रंही ‘वाचली’ जातात. मजकुरात उल्लेख नसलेले अनेक तपशील चित्रांमधून दाखवलेले असतात. उदाहरणार्थ – मजकुरात ‘जंगल’ असा उल्लेख असतो, पण चित्रात त्या जंगलातल्या झाडांची विविधता, पानांचे वेगवेगळे आकार, रंग, दाटपणा, वन्यप्राणी, पक्षी असे अनेक घटक येतात. त्यामुळे तो मजकूर आणि ती चित्रं अशा दोन्ही बाबी मिळून गोष्ट नीट समजते. त्यासाठी मजकूर आणि चित्रं या दोन्हींचं ‘वाचन’ महत्त्वाचं ठरतं.
आता वयाने मोठे झाल्यावरसुद्धा अजूनही मला लहान मुलांची चित्रांची पुस्तकं पहायला खूप आवडतात. आणि जी पुस्तकं मी लहानपणापासून पाहत आलो आहे ती अजूनही मला भुरळ घालतात. त्यात महत्त्वाचा वाटा आहे त्यातल्या चित्रांचा. कारण आता ती चित्रं मी वेगळ्या पद्धतीने वाचू-पाहू शकतो, त्याचा अर्थ लावू शकतो.
चित्र ‘वाचणं’ यातही दोन भाग आहेत. पहिला भाग म्हणजे त्या चित्रांतून सांगितली गेलेली घटना, त्यातील घटक आणि प्रसंग यांमधून त्यातील कथानक समजून घेणं; आणि दुसरा जास्त महत्त्वाचा भाग म्हणजे ते चित्र कसं काढलं आहे ते बघणं. ते कोणत्या माध्यमात चितारलं आहे, त्यातल्या रेषा पेन्सिलच्या आहेत की चारकोलच्या, त्यातले रंग ऑइल पेस्टल आहेत की वॉटर कलर्स आहेत, का ते कॉम्प्युटरवर रंगवलं आहे, हे पाहणं महत्त्वाचं ठरतं. काही चित्रं फक्त काळ्या रेषांनीच काढलेली, काही चित्रांत फक्त तपकिरी रंगाच्या छटा, तर काही चित्रं खूपच रंगीबेरंगी असतात. चित्र कोणत्या माध्यम साधनाने काढलं आहे, याचाही चित्राच्या आशयाशी फार संबंध असतो. त्यामुळे हा दुसरा भाग मला नेहमीच जात महत्त्वाचा वाटत आला आहे.
या अशा पद्धतीच्या चित्रवाचनाकडे वाचकाला कसं वळवायचं याचा विचार करताना मनात एक कल्पना आली की, आपण मजकूरविरहित फक्त चित्रंच असलेली पुस्तकं तयार केली तर? अशा पद्धतीची दहा पुस्तकं मी तयार केली. ही छापून तयार झालेली पुस्तकं पुणे, मुंबई, दिल्ली आणि कोलकाता इथे वेगवेगळ्या पुस्तकांसंबंधीच्या आणि इतर प्रदर्शनातही मांडली. त्यातून माझ्या अनुभवास आलेल्या काही मजेशीर गोष्टी तुमच्या पुढे मांडतो.
- १. पुस्तकात भाषा नसल्यामुळे कोणतीही मातृभाषा वा लिपी जाणणारा माणूस हे पुस्तक सहज ‘वाचू’ शकतो.
- २. चित्रं पाहून गोष्टींबद्दल विचार करायचा वा गोष्ट रचायची असल्यामुळे सर्वांना चित्रं ‘नीट’ पाहावंच लागतं. त्यामुळे वाचक त्यातल्या रंगांचा, मोकळ्या जागेचा, त्यातल्या विविध आकारांचा ‘आपली स्वत:ची गोष्ट’ तयार करण्यासाठी विचार करतात.
- ३. प्रत्येक वाचकाच्या वयोगटाचा, शिक्षणाचा उद्योग-व्यवसायाचा परिणाम ते पुस्तक पाहून आपली स्वत:ची गोष्ट तयार करण्यावर होतोच. त्यामुळे एकाच पुस्तकातून प्रत्येकाच्या अनेक गोष्टी तयार होतात. तरीही त्यातली प्रत्येक गोष्ट सर्वांर्थाने ‘बरोबर’च असते, कारण ती त्या वाचकाची असते.
- ४. मोठ्या माणसांपेक्षा लहान मुलं जास्त मोकळेपणानं या पुस्तकांना सामोरी जातात. ती सहजपणे त्यातली चित्रं ‘वाचतात’, समजून घेतात आणि प्रतिसाद देतात.
या पद्धतीने चित्रलिपीतून स्वत:ला समजलेला, उमजलेला अर्थ काढून आपापली गोष्ट तयार करण्याचा ‘वैचारिक सर्जनाचा आनंद’ वाचकाला मिळतो. या पुस्तकांची निर्मिती करताना मला ही बाब फार महत्त्वाची वाटली आणि ती तुम्हाला सांगावी यासाठी हा लेखनप्रपंच!
– राजू देशपांडे
पूर्वप्रसिद्धी : रोहन साहित्य मैफल मे २०१९
राजू देशपांडे यांची कल्पक व रंजक पुस्तकं
आकाश
राजू देशपांडे
अनुवाद : प्रणव सखदेव
चित्रं आणि शब्द यांच्या माध्यमातून मुलांच्या कल्पनाशक्तीला खाद्य देणारं , वेगळा – ‘ आउट ऑफ द बॉक्स ‘ – विचार करायला लावणारं चित्र – पुस्तक . या पुस्तकामधून मुलांना रंजक पद्धतीने वेगवेगळे आकार , रंग यांची ओळख होईल . त्यांना चित्रवाचनाचीही गोडी लागेल . चित्रांमुळे मुलांची दृश्यभाषा , तर मजकुरामुळे त्यांची विचारदृष्टी विकसित व्हायला मदत होईल . मुलांसोबत मोठ्यांनीही वाचावीत , पाहावीत आणि यातल्या चित्रगोष्टींचा आनंद घ्यावा !
नवी सुरुवात

वेगळा रस्ता