२९ जून हा ज्येष्ठ व श्रेष्ठ साहित्यिक दि.बा. मोकाशी यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्ताने दि.बां.चे नातू, प्रसिद्ध दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी लिहिलेलं हे स्मरण…
‘आली का शाम्याची मुलं?’ असं म्हणत दिबा आमचे स्वागत करीत. बर्याच वेळा मी त्यांना जमिनीवर किंवा कॉटवर पालथे पडून लिहीत असलेले पाहिले आहे. आम्ही दारात आलो की लगबगीने उठून दारापर्यंत येत वरील उद्गार निघायचे. दिबांसाठी आम्ही ‘श्यामची मुले’ होतो. मालू आजी आत काहीतरी करत असे, तीही दिबांपेक्षा दुप्पट प्रसन्न चेहर्याने स्वागत करी. त्यांच्या मुली, म्हणजे नात्याने माझ्या आत्या, बिंबा व ज्योती यांच्याशी आमची चांगलीच गट्टी होती.
मी व माझा धाकटा भाऊ त्या वेळी खूपच नकळत्या वयात होतो. मी सहा तर भाऊ दोन. पुढे सलग दोन-तीन वर्षं आमच्या भेटी झाल्या, त्यांच्या मृत्यूच्या आधी एक-दोन वर्षं त्या भेटी थांबल्या.
ते कर्करोगाने गेल्याचे मला कळले. मला काळजी होती ती त्यांच्या रेडियोच्या दुकानाची. तिथल्या रेडियोंचे कसे होणार, याची. मला साहित्यिक दिबा माहीतच नव्हते; माझ्यासाठी दिबा म्हणजे रेडियोचे दुकान असलेले आजोबा!
आमचे घर लोणावळ्याला, दिबा कुटुंबीय पुण्यात. आमची भेट मुख्यत्वे उन्हाळ्याच्या सुट्टीत व्हायची. आई-बाबा आम्हाला पुण्यातल्या नातेवाइकांच्या भेटी घडवायला घेऊन जायचे. त्या वेळी सगळ्यात मोठे आकर्षण म्हणजे दिबांचे रेडियोचे दुकान.
पेरूगेट पोलीस चौकीच्या समोर एक छोटे दुकान होते. नाव नसलेले, पाटी नसलेले. तसे ते एकच त्या ओळीत. त्यामुळे तीच एक खूण झाली होती दुकानाची. त्यात जुन्या पद्धतीचे, लाकडी रेडियो उघडून ठेवलेले असायचे. आतले ते छोटे छोटे चकचकीत काचेचे-धातूचे फुगे, नळ्या मला खूपच आवडायच्या. एखादा मोडलेला अर्धवट रेडियो मला लुडबुड करायला मिळायचा. त्याच्या कुठल्या तारेला स्क्रू ड्रायव्हर लावल्यावर ‘कुइचुइल्ल्ब्डटिंगगित्न्ब्रेचिळळिईयाईई’ असे आवाज येतात, ते आजोबा दाखवायचे. ते रेडियो दुरुस्त करीत नसत तेव्हा गप्पा मारत असत. कोण कोण माणसे त्यांना भेटायला यायची. तो एक अड्डा होता पुण्यातल्या त्यांच्या साहित्यिक मित्रांचा.
दिबा गेल्यावरही त्यांच्या कुटुंबीयांशी गट्टी कायम राहिली, वाढली. सरकारी भाषेत मी कुमार वयोगटात गेल्यावर जे पहिले बालसाहित्य वाचले ते दिबांचे – ‘गोमा’ व ‘सोन्याची साडी’. पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर त्यांच्या इतर लेखनाची ओळख झाली. प्रथम ते अगदीच साधे वाटले; थोडा मोठा झाल्यावर तेच किती अवघड असते हे कळले. पण तरी मुलांसाठी त्यांनी लिहिलेली पुस्तके मला नेहमीच वरचढ वाटली आहेत. जशा विंदांच्या मुलांसाठीच्या कविता मला नेहमीच अधिक आवडल्या आहेत. आपल्याकडे ‘फक्त प्रौढांसाठी’चा दबदबा. त्यामुळे आयुष्यात गंभीररस, वास्तवरस उच्च स्थानावर. दिबांच्या रेडियोतले ते चित्र-विचित्र आवाज आठवेनासे झाले आणि त्याबरोबर जीवनातले ते चुइंगत्व गेले. पण पिंड तोच असल्याने पुढे केव्हातरी परत तो आवाज सापडला व एकदोन काठावर पास कलाकृती हातून झाल्या. ती तार मधेच निसटते, नीट सापडत नाही. जमेल न जमेल, पण किमान हे तर कळले की ते ‘कुइचुइल्ल्ब्डटिंगगित्न्ब्रेचिळळिईयाईई’ छान असते; स्क्रू ड्रायव्हर घेऊन लुडबुड करत राहिली पाहिजे.
– परेश मोकाशी
लेखक व विचक्षण वाचक, पुस्तकप्रेमी व संग्राहक पंकज भोसले यांनी दिबांच्या दुर्मीळ पुस्तकांवर, त्यांच्या पुस्तकांच्या शोधप्रवासावर, दिबांच्या लेखकीय वेगळेपणावर लिहिलेला दीर्घलेख…
इथे वाचा….
रोहन प्राइम
वाचकांसाठी खास सभासद योजना!
‘रोहन प्राइम’ म्हणजे भरघोस सवलती, विशेष कार्यक्रम आणि नाविन्यपूर्ण उपक्रम… फक्त सभासदांसाठी! मेंबरशिप घेतल्यावर रु.१००चे कूपन भेट…. हक्काची २५ टक्के सवलत आणि बरंच काही…
अधिक माहिती जाणून घ्या..
₹250.00Add to cart
रोहन शिफारस
हरवलेले स्नेहबंध
जनमानसावर ठसा उमटवणाऱ्या काही प्रतिभावंतांच्या स्मृतींना उजाळा देणारे स्मरणलेख या संग्रहात समाविष्ट केले आहेत. या लेखांची शैली अनलंकृत, तरीही लालित्यपूर्ण असून त्यांतून या व्यक्तींचा सहवास लाभलेल्या चपळगावकरांनी मौलिक अनुभवकथन केलं आहे. लेखांमधल्या स्मृतींच्या हिरव्याकंच पानांखालून ही माणसं आपल्याला सोडून गेल्याच्या जाणिवेचा एक दुखरा झराही सतत वाहत राहतो. अनुभव समृद्ध करता करता कातर करणारा स्मरणलेखांचा संग्रह…!
₹200.00Add to cart