फॉन्ट साइज वाढवा

कठीण समयांत सगळ्याच काळात माणसांना कथांनी, गोष्टींनी तारले असल्याची अनेक उदाहरणे आहेत. शतकांची, संस्कृतींची, भाषेची, प्रकृतीची आणि माणसांची भिन्नता असूनही अनेक घटकांचे मूलभूत साधर्म्य असणारे ‘डेकॅमेरॉन’ आणि ‘चांदण्यांतील गप्पा’ हे दोन ग्रंथ मासले या लेखाचा मुख्य विषय असले, तरी त्यानिमित्ताने बरीच पुस्तकांच्या आतील फिरस्तीही आहे. हे ग्रंथ वाचणे अलीकडच्या परिस्थितीने अनिवार्य केले. त्या वाचनप्रवासाची ही गोष्ट…

कठीण समयांतील रम्यकथा…

या सगळ्याला सुरुवात झाली ती वर्षभरापूर्वी जुलै महिन्यात. न्यू यॉर्क टाइम्सच्या आठवडी पुरवणी पुस्तिकेत ‘डेकॅमेरॉन प्रोजेक्ट’ या नावाचा २९ लेखकांच्या लघुतम कथांचा नजराणा दाखल झाला तेव्हा. आपल्या संपूर्ण देशातील कठोर टाळेबंदी तेव्हा शंभर दिवसांहून अधिक काळ झाली होती. आरंभी भयग्रस्त कामगारांच्या, नंतर नव-बेरोजगारांच्या आणि त्याहीनंतर आरोग्य सुरक्षिततेसाठी गावची वाट धरलेल्या वेड-शहाण्यांच्या स्थलांतरामुळे मुंबई बरीच रिकामी आणि ओस पडत चालली होती. दिवसाचा करोनाबाधितांचा सरासरी देशाचा आकडा ३८ हजार होता. घरापासून कार्यालयापर्यंत वाहनसुविधा असल्यामुळे साप्ताहिक सुटी वगळता रोजचा दीर्घ प्रवास हाकरोनाभय, आर्थिकद़ृष्ट्या भविष्यभय आणि बातम्यांमधून अंगावर चढत जाणार्‍या चिंतासाम्राज्याच्या अधिपत्याखाली सुरू होता.

या चिंतेवर अक्सीर इलाज असल्यासारखे माझे मराठी रहस्यकथेचे वाचन आणि नोंद प्रकरण सुरू होते. दुसर्‍या बाजूला प्रवासातील उसंत वेळेत जगभरातील समकालीन लेखकांची कथानिर्मिती न्यू यॉर्कर, हार्पर्स, पॅरिस रिव्ह्यू, एस्क्वायर, व्हीक्यूआर आदी मासिकांच्या ‘समर फिक्शन’ आवृत्त्यांमधून संपवून झाली होती. आफ्रिकेच्या केन पारितोषिकासाठी नामांकित कथाजुडगाही खाऊन टाकला होता. काही जपानी लघुकादंबर्‍यांचा आस्वाद घेऊन त्यावर आपल्याकडच्या कथा-कादंबरी स्थितीशी तुलना करणारे काहीबाही खरडून प्रसिद्धही केले होते.

NYT mag
न्यू यॉर्क टाइम्सच्या आठवडी पुरवणी पुस्तिकेतील ‘डेकॅमेरॉन प्रोजेक्ट’

दैनंदिन एक इंग्रजी कथा वाचनाचा शिरस्ता कित्येक वर्षे मी नित्यनेमाने पाळत आहे, त्याला बहुतांश कारणीभूत ‘न्यू यॉर्कर’ साप्ताहिक आणि ‘इलेक्ट्रिक लिटरचेर’, ‘लिट हब’ ही संकेतस्थळे आहेत. त्यांच्याकडून आठवड्याला सरासरी तीन दिग्गज किंवा नवख्या लेखकांच्या भारदस्त कथा हमखास उपलब्ध होतात. अन् तेथील मुलाखती, लेख वाचण्याच्या फंदात पडल्यास आणखी तीन-चार साहित्यिकांच्या कथांचे संदर्भ सहज मिळू शकतात. कमी वेळात साहित्य अद्यायावतीकरणास ही तीन संकेतस्थळे अत्यंत उपकारक ठरणारी आहेत.
वाचनव्याप्त अवस्थेत यांतल्या कुठल्यातरी गोष्टींचे माहिती उत्खनन सुरू असताना न्यू यॉर्क टाइम्सच्या आठवडी पुस्तिकेचा (७ जुलै २०२०) ऐवज हाती लागला. त्यातील २९ नावे पाहून पुढल्या काही दिवसांचे वेळापत्रक आणखी ताणून घट्ट बसवावे लागणार याची जाणीव झाली. दोन अडीच पानांहून मोठ्या नसलेल्या या कथांच्या लेखकांत मार्गारेट अ‍ॅटवूड, चाल्र्स यू, एटगर केरेट, टॉमी ऑरेंज, कारेन रसेल, रेचल कुशनेर, लिझ मूर, मोना अवद, कमिला शम्सी, आलेहान्द्रो झाम्ब्रा अशा कैक इंग्रजी आणि आंग्लेतर लेखकांचे अनुवाद समाविष्ट आहेत. सार्‍यांचा गाभा हा करोनोत्तर तडाख्याशी संबंधित असल्याने त्या सर्वार्थाने समकालीन म्हणाव्यात अशा. या कथांची ओळख करून देणार्‍या कथा-कादंबरीकार रिवका गलचेन हिच्या निबंधामध्ये जिऊवानी बकाचिओ (बोकॅशिओ) या इटालीयन लेखकाच्या इ.स १३५३ मध्ये लिहिल्या गेलेल्या ‘डेकॅमेरॉन’ (डिकॅमेरन असाही उच्चार होतो) या ग्रंथाच्या प्रेरणेतून ‘न्यू डेकॅमेरॉन’ प्रकल्प पूर्ण झाल्याचे म्हटले आहे. १३४८मध्ये एका व्यापारी जहाजातून इटलीच्या फ्लोरेन्स बंदरात प्लेगचा शिरकाव झाला. सकाळी न्याहारीला धडधाकट असणारी माणसे सूर्यास्ताच्या आत आजाराने संपून जात. रस्त्यावर मृतांचा ढिग पडला. माणसांच्या मनात एकमेकांविषयी द्वेष निर्माण झाला. मृतांना घराच्या ओट्यांवरून फेकून देऊन आपला प्यारा जीव वाचवण्याची कसरत शहरांतील नागरिकांमध्ये लागली. या काळात शहरातील सात सुदृढ तरुणी आणि तीन तेजतपस्वी तरुणांचा जथा शहर सोडून गावातील एका निर्जन पण सुविधासंपन्न ठिकाणी राहायला आला. त्या स्थळी चार दिवसांचा आराम केल्यानंतर पुढल्या दहा दिवसांत प्रत्येकाने सर्वांना दर दिवशी एक नवी गोष्ट सांगितली. या दहा दिवसांतील १०० कथांचा गुच्छ म्हणजेच बकाचिओचा ‘डेकॅमेरॉन’ हा ग्रंथ. भवतालचा मृत्यूलोंढा, प्लेग कहराच्या रुपाने येणार्‍या आर्थिक, सामाजिक आणि महत्त्वाचे म्हणजे जगण्याच्या संघर्षाच्या बाबींपासून पलायन म्हणून या गोष्टींची निर्मिती झाली. ज्यात अश्लील-चावट विनोदासह धर्मसंस्था आणि राजकीय भ्रष्टाचाराचेही वाभाडे काढण्यात आले होते. धर्ममार्तंड, जोगतिणींपासून ते शेतकरी, व्यापार्‍यांच्या दैनंदिन जगण्याचे प्रतिबिंब या कथांत तिरकस शैलीत मांडले होते. व्यभिचाराचे इरसाल नमुने, पादनक्रियेपासून शौचकर्मांच्या विनोदी नोंदींचा भरणा असलेल्या या कथा म्हणजे त्या तरुणांचा अत्याधुनिक विचारांचा तात्कालिन ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’ होता आणि तेथे ‘बिंज लिसनिंग’चा कार्यक्रम दरदिवशीच्या नव्या कथांमुळे घडत होता.

ज्ञानेश्वरीनंतर तब्बल शतकानंतर लिहिलेल्या डेकॅमेरॉनच्या शंभर वर्षांत वेगवेगळ्या संस्कारित, संपादित आणि विस्तारित आवृत्त्या आल्या आहेत. न्यू यॉर्क टाइम्सच्या प्रकल्प काळात देशोदेशी करोनामुळे मृत्यूआलेख जसा वाढत होता, तसे या ग्रंथाच्या वाचनाचे महत्त्व वाढत गेले. यातल्या कथा वेगवेगळ्या माध्यमांत आज आंतरजालावर सहज उपलब्ध आहेत.

तर रिवका गलचेन हिच्या ‘डेकॅमेरॉन प्रोजेक्ट’साठी लिहिल्या गेलेल्या निबंधामुळे आणि या प्रकल्पासाठी दिग्गजांनी घाईत लिहिल्या गेलेल्या कथा वाचतांना माझ्या कुतूहलाच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचे कें द्र जिऊवानी बकाचिओ या तेराव्या शतकातल्या ग्रंथकत्र्याकडे आकर्षिले जात होते. त्याच्याविषयी मिळेल ती माहिती साठवून घेण्यासाठी पुढील काही दिवसांचे तास राखून ठेवण्यात आले.
तर या जिऊवानी बकाचिओचा जन्म १३१३चा. तोही अनैतिक संबंधांतून झालेला. लब्धप्रतिष्ठित व्यापार्‍याच्या पोटी जन्म घेतलेल्या बकाचिओला व्यापार उदिमापेक्षा काव्यशास्त्रविनोदाची अधिक असोशी होती. परिणामी तेराव्या वर्षी त्याची रवानगी दुसर्‍या फ्रेडरिक राजाने बाराव्या शतकात उभारलेल्या शिक्षणसंस्थेत केली. तेथे शिक्षणाच्या नावाने काव्य-कथांत रमलेल्या बकाचिओला वडिलांनी शिक्षण संपवल्यावर आपल्या व्यापारांत काही काळ गुंतविले. उद्योगातील सहा वर्षे शिक्षा भोगल्यासारखे जगल्यानंतर पुन्हा त्याची साहित्यक्रीडा सुरू झाली. त्याची एक कलाकृती पहिली आधुनिक सायकोलॉजिकल थ्रिलर कादंबरी म्हणून ओळखली जाते. मात्र त्याची सर्वात महत्त्वाची निर्मिती ही ‘डेकॅमेरॉन’. डाण्टेच्या ‘डिव्हाईन कॉमेडी’इतके तिचे महत्त्व. तात्कालिन समाज व्यवहारांची नोंद म्हणून या शंभर कथांना ऐतिहासिक महत्त्व आहे. या कथा लोकप्रिय झाल्या कारण त्याकाळात लॅटिन ही भाषा उच्चभ्रूंची मानली जात होती. बकाचिओने या सार्‍या कथा स्थानिक प्राकृत भाषेत म्हणजेच टस्कन भाषेत त्या उतरविल्यामुळे प्रचंड मोठा जनाधार त्याच्या पुस्तकाला लाभला. ग्रंथनिर्मिताचा हा सोस कुणाला ज्ञानेश्वरांप्रमाणेच वाटत असला, तरी त्यांच्यात आणि बकाचिओत मोठा फरक आहे तो हा की, त्या कथांच्या प्रभावातून युरोपात ‘रिबाल्ड लिटरेचर’ म्हणजेच चावट साहित्याची निर्मिती झाली असे मानले जाते.

डेकॅमेरॉन तेव्हा संपवून टाकण्याचा, नष्ट करण्याचाही प्रयत्न झाला. मात्र त्याची एक हस्तलिखित प्रत बकाचिओने स्वत: उतरवली होती. त्या प्रतीमुळे नष्ट करता येऊ शकणार नाही, इतका तिचा युरोपीय देशात प्रसार आणि प्रचार झाला. शतकोन् शतकांसाठी बकाचिओ अजरामर झाला. फ्रेंचांनी, अमेरिकनांनी त्याला डेकॅमेरॉनसह जिवंत ठेवला. तेथील अखंड सुसंस्कृत शृंगार किंवा चावटी साहित्याचे प्रेरणास्थान म्हणून बकाचिओचे डेकॅमेरॉन असल्याचे अभ्यासक, तत्त्ववेत्त्यांनी सिद्ध केले.

माझ्याकडे या ग्रंथाचे इंग्रजीत १९७२ साली जी आवृत्ती पेंग्विनने काढली, त्याच्या दुसर्‍या आवृत्तीचे (१९९५) २००३ मधील पुनर्मुद्रण आहे. दर आवृत्तीत नवी प्रस्तावना, नवी माहिती आणि नव्या तपशीलांचा ऐवज संपादक-अनुवादकांना लाभला आहे. २०१३ साली या ग्रंथाची आणखी एक नवी आवृत्ती आली. न्यू यॉर्करच्या ऑनलाइन अर्काइव्हवर शोध घेतला असता, या ग्रंथाबाबत विस्तृत विवेचन करणारा एक लेख सापडला. ज्यात नव्या ग्रंथकारांनी प्रस्तावनेपासून बकाचिओविषयीच्या माहितीत एक नवी भर घातल्याचे वाचायला मिळाले. ‘डेकॅमेरॉन’मधील कथांपैकी सगळ्याच नव्या होत्या अशातला भाग नाही. काही लोकांमध्ये आधीपासून ज्ञात होत्या. काही सांगोवांगीच्या कित्येक शतकांतल्या कथा होत्या, ज्या बकाचिओने आपल्या ग्रंथात शब्दबद्ध केल्या हा त्यातील एक मुद्दा होता. त्या मुद्द्यातून केवळ आपल्या संदर्भात डेकॅमेरॉन वाचनाला आणखी महत्त्व येऊ शकेल, अशा काही डेकॅमेरॉनउत्तर आणि डेकॅमेरॉनपूर्व मासल्यांची इथे चर्चा व्हायला हवी.

काही दिवसांपूर्वी माझ्या वाचनात ‘चोर दरवाजा’ या निरंजन घाटे यांंच्या पुस्तकातील कथा आल्या. आपल्याकडे हौशी आणि जाणकार मराठी वाचकांपैकी फार थोड्यांचा संपर्र्क आनंद साधले यांच्या ‘आनंदध्वजाच्या कथा’ या पुस्तकाशी होतो. अत्यंत सुसंस्कृत चावट कथांचा हा प्रकार मराठीतील एकमेव म्हणावा असा. कारण शृंगारिक-अतिशृंगारिक वर्णन करणार्‍यांचा साहित्य व्यवहाराने, इथल्या समीक्षक जातीवंतांनी आणि त्यामुळे समाजाने ‘काकोडकर’ केला. म्हणजे चावून चोथा होईस्तोवर वाचून, त्यांची पुस्तके आवृत्त्यांनी खपूनही ते साहित्यिकांचा पंगतीत कधी बसविले गेले नाही.

तर आनंद साधले यांच्या आनंदध्वजांसारख्याच बर्‍यापैकी सभ्यचावटी असलेल्या घाटेंच्या ‘चोर दरवाजा’तील कथा आहेत. शृंगार-अतिशृंगार, व्यभिचारी काम व्यवहार असलेल्या छोटुकल्या कथांचे जुडगे म्हणजे या कथा. घाटेंनी देवेन कौशिक या नावाने वेळोवेळी मासिकांसाठी लिहिलेल्या परकीय प्रभावातल्या या कथा आनंदध्वजाच्या कथांची वारंवार आठवण देऊ शकतात. या संग्रहाला घाटेंनी जी प्रस्तावना लिहिली आहे, ती माहितीपूर्ण आहे.

‘मोहिनी’ या मासिकाचे आनंद अंतरकरांनी जेव्हा पाक्षिकात रुपांतर केले तेव्हा ‘फ्रेंच पफ्र्युम’ या नावाने यातल्या बर्‍याच कथा प्रसिद्ध झाल्या. ‘अ हंड्रेड फ्रेंच स्टोरीज’ आणि ‘रिबाल्ड क्लासिक्स’मधून या कथा घेतलेल्या आहेत.आनंद साधले यांच्या आनंदध्वजाच्या कथांमध्ये यातल्या काही कथा मिळतील. कु. दमयंती सरपटवार या नावाने त्या संस्कृतमधून मराठीत आणल्या होत्या. ही पुस्तके आता मिळत नाहीत. वर उल्लेख केलेल्या इंग्रजी पुस्तकांमध्ये यातल्या बर्‍याच कथा मूळ संस्कृतमधल्या असून त्या अरबांनी युरोपात आणल्या असा प्रस्तावनेत उल्लेख आहे. तो हा आपल्याच पूर्वजांचा ठेवा, त्यातल्या काही नमुन्यांमधून इथे सादर केलेला आहे.
‘आनंदध्वजांच्या कथां’बाबत माझ्यासाठी ही नवी माहिती होती. कारण स्वत: आनंद साधल्यांनी त्यांच्या या बहुगुणी पुस्तकाच्या प्रस्तावनेत थोडीच माहिती दिली आहे.

त्यातला महत्त्वाचा भाग येथे देतो.
‘चातुर्भाणी’ या वेश्या जीवनावरील धाडसी दुर्मीळ संस्कृत ग्रंथाचा अनुवाद मी करावा असा नरहर कुरुंदकरांचा आग्रह होता. जे अश्लील असेल वा नसेल, पण ते चावट आहे, अशा साहित्याला इंग्रजी भाषेत जी प्रतिष्ठा आहे, ती मराठीत नाही, आजचा मराठी वाचक मात्र चावट साहित्याचा रसास्वाद घ्यावयास पात्र असा प्रौढ वाचक आहे. तेव्हा आनंदध्वज या संकल्पित व्यक्तिरेखेभोवती चावटपणाचा वास येईल, अशा कथांची गुंफण करावी आणि त्याचे ग्रंथीकरण करताना कुरुंदकरांनी ‘चावटपणा’ या रसाचे विश्लेषण करणारा साहित्यशास्त्रीय मोठाला प्रबंध त्या ग्रंथाला प्रस्तावना म्हणून जोडावा असे ठरले. मात्र आनंदध्वजाची प्रस्तावना लिहिण्यापूर्वीच त्यांचा देहांत झाला.’
उमा दादेगावकर यांनी संकलित केलेल्या ‘आनंद साधले-साहित्यसूची’ या ग्रंथाच्या पहिल्या विभागात साधले यांच्या साहित्याच्या वर्णनात्मक बृहदसूचीत आनंदध्वजांच्या कथांविषयी अंमळ अधिक माहिती मिळते.
‘भारतीय लोककथा व पाश्चात्त्य लोककथा, कल्पना यांच्यावर आधारित चावट म्हणजेच रिबाल्ड अशा बारा कथांचा संग्रह. या कथा घडविणारा आनंदध्वज हे अनोखे व्यक्तिमत्व ही लेखकाची निर्मिती. पण या व्यक्तिमत्त्वामागची बीजप्रेरणा जयवंत दळवी व वसंत सरवटे या लेखकाच्या कलावंत मित्रांची. या कथांसाठी लेखकाने वापरलेली भाषाशैलीही जुन्यापुराण्या ग्रंथांची आठवण करून देणारी, अनोखी.’
या कथा कोठून आल्या हे सांगण्याची जबाबदारी दादेगावकर यांनी घेतली असल्याने, पहिली कथा पोलिश लोककथेवर, दुसरी चिनी लोककथेवर सांधलेली, तिसरी तुर्की लोककथेचा आधार, पुढल्या चारेक कथा केवळ आधारित, एक कथा कथासरित्सागरातील वेताळपंचविशीतील प्रथम वेताळावरून असल्याचा उल्लेख आढळतो. या सार्‍या परदेशी लोककथा आणि आधरित कथांवरचा प्रभाव हा बकाचिओच्या डेकॅमेरॉनमधून आला असण्याची शक्यता अधिक आहे. अभिरुची मासिकाने काढलेल्या ‘चावट साहित्य’ विशेषांकातून साठी-सत्तरीच्या दशकात पहिल्यांदा डेकॅमेरॉनमधील कथांचे थेट भाषांतर छापून आल्याचा संदर्भ मला सापडला. मात्र तो अंक प्रयत्न करूनही हाती लागू शकला नाही.
कुरुंदकरांच्या मृत्युमुळे ‘चावटपणा’चा भारतीय इतिहास वाचण्यापासून आपण मुकलो, असलो, तरी आनंद साधल्यांच्या ‘चातुर्भाणी’साठी कुरुंदकर यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेत संस्कृत साहित्यातील चावटीची आणि त्याहीपेक्षा भारतीय समाजाच्या भूतकालीन प्रगल्भतेची जाणीव होईल. चातुर्भाणी हे पुस्तक दुर्मीळ असणार्‍यांना कुुरुंदकरांच्या ‘रंगविमर्श’ या ग्रंथात ही प्रस्तावना वाचायला मिळू शकेल. इ.स पूर्व २०० ते इ.स ७०० या कालावधीत संस्कृत साहित्याची भरभराट झाली होती. दिवाकरांच्या आधुनिक नाट्यछटांशी साधम्र्य साधणार्‍या या कालावधीतील ‘भाण’ या वीर आणि शृंगारकथा सांगणार्‍या संस्कृत नाट्यप्रकाराच्या उत्खननाविषयी माहिती देता देता कुरुंदकर या प्रस्तावनेत दीड-दोन हजार वर्षांपूर्वीचे भारतीय समाजचित्रण स्तरानुरूप करताना दिसतात. या भाणांपैकी चार भाणांविषयी त्यांनी केलेले विवेचन उद्बोधक आणि थकवणारे आहे.
ज्या काळात युरोपात, अमेरिकेत काहीही अस्तित्वात नव्हते त्यावेळी भारतीय भूखंडात ललितकला प्रचंड पुढारलेली असल्याचे तपशील संस्कृत साहित्यामुळे उपलब्ध झालेत हा मुद्दा बकाचिओची माहिती घेताना विचारात घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे युरोपातील रेनसाँ होण्याआधी आपली संस्कृती आणि सभ्यता उच्चकोटीची होती, हे दुराभिमान्याच्या वेशात न जाता ठामपणे सांगता येऊ शकते. या प्रस्तावनेमध्ये कुरुंदकरांनी भाणकालीन समाज हा वात्सायनाच्या आधीचा होता. त्यामुळे त्यांना कामसूत्र माहिती नव्हते, असा उल्लेख आहे. पण केवळ गणिकांसाठी लिहिल्या गेलेल्या दत्तकाच्या कामशास्त्र या ग्रंथाचा उल्लेख आहे. दत्तक हा या शास्त्रातील वात्सायनापूर्वीचा शास्त्रज्ञ होता. कामशास्त्र आणि कामसूत्र या दोन्ही ग्रंथांच्या निर्मितीकाळाबाबत फारशी प्रचलित नसलेली माहिती केवळ या प्रस्तावनेतूनही होऊ शकते.
आता आणखी एका ग्रंथाचा त्रोटक परिचय देतो. रिचर्ड बर्टनने आपल्या हयातीत बर्‍याच उचापत्या केल्या. त्यात पाश्चात्य जगाला जो धडाका दिला, त्यात ‘अरबांचे कामशास्त्र’ मांडणार्‍या ‘परफ्युम गार्डन’चाही समावेश होता. (अरेबियन नाइट हे लोकप्रिय असेल, तर त्या विशेषणाला यमक लावणारा आणखी एक शब्द जुळवा, मग या ग्रंथाला काय म्हणावे ते सुचेल.) महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण वस्त्रांकित असल्याची प्रतीमा जगावर ठसविणार्‍या या देशांतील कामशास्त्राचा सुरस आणि चमत्कारिक अनुवाद मराठीतही वाचायला मिळतो. सोळाव्या शतकात लिहिल्या गेलेल्या या ग्रंथातील प्रकरणांची काही नावे ‘स्त्रियांना न आवडणारे पुरूष’, ‘संभोगाची आसने’, ‘पुरुषांच्या लैंगिक अवयवांना दिलेली नावे’, ‘स्त्रियांच्या लैंगिक अवयवांना दिलेली नावे’, ‘स्वैराचारी स्त्रिया’, ‘संभोगसुख कशामुळे वाढते’, ‘इंद्रीयाचा आकार वाढविण्याचा उपाय’ अशी आहेत.

वरदा प्रकाशनाच्या ह.अ. भावे यांनी १९७६मध्ये स्वत: खपून हा अनुवाद केला (पुस्तकावर स्वत:चा नामोल्लेख टाळून. कौशिक हे टोपणनाव फक्त आत दिसते.) या पुस्तकाच्या प्रचंड आवृत्त्या काढाव्या लागतील असा त्यांचा कयास होता. मात्र इतक्या अतिमहत्त्वपूर्ण बाबींवरचे सल्ले असूनही पहिल्या आवृत्तीनंतर हे पुस्तक दिसेनासे झाले. इच्छुकांना शोध घेऊनच ते मिळवावे लागेल.
कामसूत्रकार वात्सायनानंतर कित्येक शतकांच्या काळानंतर पलंगकार्याची माहिती देणारा ग्रंथही चौदाव्या-पंधराव्या शतकातील रिबाल्ड कथांचा प्रभाव आपल्यासोबत घेऊन तयार झालेला वाटतो.

चौदाव्या शतकानंतरच्या सगळ्या रिबाल्डी साहित्यनिर्मितीचा जनक म्हणून बकाचिओच्या डेकॅमेरॉनला पाश्चात्य जगतात स्थान मिळाले असले, तरी या जनकाच्या आधी खरे रिबाल्ड म्हणावे असे साहित्य हाल सातवाहनांची गाथा शप्तशती या अडीच हजार वर्षांपूर्वीच्या ग्रंथात रचले गेले आहे.
भाण हा नाट्यप्रकार लोकप्रिय असतानाही भारतीय समाज कामजीवनात प्रचंड पुढारलेला होता, त्याचे दाखलेच्या दाखले या ग्रंथांतील गाथांमधून सापडू शकतात. स.आ. जोगळेकरांनी या गाथा सप्तशती महाग्रंथात एकत्रित करून मराठी अभ्यासकांवर मोठे उपकार करून ठेवले आहेत.
यांतील ६६७वी रातांधळे ही गाथा पहा –


‘अत्र निमज्जति श्वाश्रूरत्राहमत्र परिजन: सकल:, पथिक रात्र्यन्धक मा मम शवने निमड्क्षयसि.’ म्हणजेच ‘अहो पाहुणे, तुम्ही रातांधळे आहात ना? दिवसा उजेडी नीट पाहून ठेवा. तेथे आत्याबाई झोपतात, मी इथे आणि नोकरमाणसे तिकडे. रात्री उठलात तर वाट चुकून सरळ माझ्या बिछान्यात यायचेत, म्हणून आत्ताच सांगून ठेवते.’

आपद्धर्म ही ८८१ वी गाथा आहे. मोठी विलक्षण.
‘छप्पत्तिआ वि खज्जइ णिप्पते पुत्ति, एत्थ को दोसो?, णिअपुरिसे वि रमिज्जइ परपुरिसविवज्जिए गामे.’ म्हणजे ‘मुली, दुसरी पाने मिळत नाहीत तेव्हा षट्पर्णालाही पान मानावें लागते. त्यांत दोष नाही. एकाद्या गावांत परपुरूष प्राप्त होण्यासारखा नसला, तर पतीशी रममाण होण्यात काही दोष नाही.’

८८२ वी ‘परपुरूष’ ही गाथा आणखी थोर
‘अमुणिअपरपुरिससुहो जंपउ जं किं पि अण्णओ लोओ, णिअपुरिसेहि वि अम्हे परपुरिसो त्ति च्चि अ रमामो’ म्हणजे परपुरुषाचे सुख ज्यांनी अनुभवलेले नाही, त्यांना काय म्हणावयाचे असेल ते म्हणू द्या. आम्हाला रतिप्रसंगी पतीलाही परपुरुष कल्पिल्यावाचून समाधान होत नाही.


डेकॅमेरॉनकर्त्या बकाचिओने आपल्या या लोकप्रिय ग्रंथाइतका दुसरा ग्रंथ लिहिला नाही. फ्लोरेन्स आणि नेपल्स शहरांत आपल्या वडिलांप्रमाणेच विवाह न करता अनौरस संतती निर्मिती केली. १३७५ साली त्याचा मृत्यू झाला. तत्कालिन प्लेग संकटात स्वविलगीकरण झालेल्या व्यक्तींपैकी तो एक होता. अन् त्याच्या कथा या विलगीकरणामुळे बचावलेल्या व्यक्तींच्या गाथा आहेत. देशातील एक तृतियांश जनता मृत्यूच्या दाढेत जात असताना कथामाध्यमांतून एकमेकांचे मनोरंजन करण्याचा हा प्रकार पुढल्या सार्‍या संकटसमयांत आपसुक पुनावृत्त होत गेला. बकाचिओच्या आधी संस्कृत साहित्याच्या भरभराटीच्या काळात लिहिले गेलेले साहित्यही कठीण समयांतलेच म्हणावे लागेल. वैद्याकशास्त्र, चाकाच्या शोधानंतरची गती, वाफेच्या इंजिनानंतरची प्रगती हे सारे बकाचिओच्या नंतर झालेल्या प्रबोधन काळाची निर्मिती. त्याआधी युद्ध, रोगराई, महासाथीच्या सदोदित भयछत्रात काव्यशास्त्रविनोदात रममाण झालेला आपला इतिहास आपल्यातल्या बहुतांशांना ज्ञात नसतो. भारतावर झालेली राजकीय, धार्मिक आक्रमणे एका विशिष्ट कालखंडात मोक्षप्राप्तीच्या निमित्ताने आलेली सामूहिक वैराग्यस्थिती आणि कुंठावस्था यातून दोन पावले उलटे जात राहण्याचा आपला गुणधर्म आजचा नसून तब्बल हजार वर्षांपासून तरी एकाच स्थितीत राहिलेला आहे.  
बकाचिओच्या रिबाल्डकथेच्या निमित्ताने नैतिकतेच्या नावाखाली व्हिक्टोरिअन सोवळ्यात आपला समाज कसा अडकला, सभ्यतेचा कांगावा करीत गेल्या दीड-दोनशे वर्षांत जगण्यातला आणि साहित्यातील मोकळेपणा कापरासारखा कुठे उडून गेला, याचे अभ्यासी विच्छेदन होणे खरे गरजेचे आहे.

दुसर्‍या बाजीरावाला नेहमी कृष्णावतार म्हणून उल्लेखले जाई. लावणी साहित्यावेळची सामाजिक स्थिती मांडणार्‍या एका ग्रंथात ‘रावबाजींचे शहर नमुना पुणे ग्राम वस्ती : अहोरात्र अहोदिवस होती इष्काची कुस्ती’ असे वर्णन असलेल्या पुण्यातील स्वैराचार संपून आलेल्या विरक्तीकारणांचाही पडताळा घ्यायला हवा.
तूर्त इतक्या सार्‍या विषयांतर फैरीनंतर लेखाचा मुख्य विषय असलेल्या बकाचिओच्या डेकॅमेरॉनमधील एका कथेचा लघु स्वैरअनुवाद येथे देतो. म्हणजे ही भानगड नक्की काय याची कल्पना यावी.

कथेचे शीर्षक : मसेटो द लाम्पोरेचिओ
अर्थात ज्याचं गळतं, त्यालाच कळतं (आणि मिळतंही)

कथाकार : फिलोस्ट्राटो
कथादिवस : तिसर्‍या दिवसाची पहिली कथा.

आरंभ : फिलोस्ट्राटो सांगू लागला, ‘लोक नेहमी या शुद्ध भ्रमात असतात की जोगतीण बनलेल्या स्त्रिया आपल्या शारीरिक इच्छांचा त्याग करतात. वर लोक इतके मूर्ख असतात की त्यांना वाटते अत्यंत खडतर अवस्थेत जीवन व्यतीत करून आणि सदोदित देवाच्या प्रार्थनेमुळे जोगतिणींच्या मनातून कामेच्छेचा विलोप होतो.’
फिलोस्ट्राटो आज अशी काही गोष्ट सांगेल, की या बाबत आपल्या मनात असलेल्या सार्‍या वदंता नष्ट होतील.


Agasti-Set-Cover

अगस्ती इन अॅक्शन संच

३ थ्रिलर्स…

रोडमास्टर बाइकवरून मुंबईतल्या रस्त्यांवर आपले पिळदार दंड दाखवत अगस्ती सुसाट फिरू लागला की, समजावं… कुठेतरी काहीतरी घडलंय…अगस्ती इज इन अॅक्शन! टेक्नोसॅव्ही, सौंदर्याचा भोक्ता, फुडी आणि अॅडव्हेंचरस अगस्ती आपल्या तल्लख बुद्धिसामर्थ्याने आणि मनाचा ठाव घेण्याच्या कौशल्याने कल्पनाही करू शकणार नाही अशी काळोखी रहस्यं अशा प्रकारे उजागर करतो की, आपण थक्क होऊन म्हणतो, ‘हॅट्स ऑफ यार अगस्ती!’

खरेदी करा


कथा : नटो नावाचा एक माळी तरुण एका स्थानिक चर्चच्या बागेत छोटी-मोठी कामे करीत असे. अत्यंत तुटपुंजे वेतन असल्यामुळे त्याला त्याच्या कामात अधिक रस नव्हता. शक्य तितक्या लवकर येथून चंबुगबाळे उचलण्याच्या तयारीत तो होता. त्याबाबत कुठे काही जमेना, तेव्हा होते तेवढे पैसे घेऊन तो लाम्पोरेचिओ या आपल्या गावी परतला.
गावात पोहोचल्यावर त्याची भेट मसेटो नावाच्या एका उमद्या युवकाशी झाली. शहर आणि नोकरी सोडून आलेल्या नटोला त्याने तो नक्की कोणत्या प्रकारचे काम करीत होता व ते सोडून परतण्याचे कारण विचारले.
तेव्हा नटोने मसेटोला सांगितले की, ‘मी जोगतिणींच्या मठात वावरत होतो. त्या सगळ्याच तरुण असल्या तरी क्रूर होत्या. कितीही राबले तरी त्यांना खूष राखणे अवघड होते. शिवाय मोबदल्याच्या नावाने हाती कवडी टेकवणे त्यांना पसंत होते.’
मसेटोच्या मनात लगेचच कामविचारांची बिगूल वाजू लागली. ‘आठ तरुण जोगतिणी? म्हणजे तर माझ्यासाठी चंगळच.’ त्याने तातडीने त्या जोगतिणींच्या मठाकडे प्रयाण केले. नटोने स्वत: लाथाडलेली नोकरी आपल्याला मिळू शकेल का, याची चाचपणी त्याने केली.
त्यास हे ठाऊक होते, की त्याच्यासारखा देखण्या, सुदृढ, रांगड्या आणि सर्वगुणसंपन्न तरुणाला जोगतिणींच्या मठात कामास ठेवणे धर्माच्या नियमांविरोधात होते. तेव्हा या नियमांना वाकवण्यासाठी त्याने आपण बहिरे आणि मुके असल्याचे सोंग धरले.
शाळेच्या कारभार्‍यास आपल्या मुक्या-बहिर्‍या नाट्यावस्थेतच त्याने किती सुंदर बागकाम करू शकतो, हे पटवून दिले. कारभार्‍याने जोगतिणींच्या त्या मठाच्या प्रमुखाजवळ त्याला कामावर घ्यावे की न घ्यावे याचा निर्णय सोपविला. मठाधिकारी महिलेने मसेटोला बागकाम चांगले येत असल्यास नोकरीवर ठेवून घ्यावे, असा निकाल दिला.
अर्थातच तो बागकामात निष्णात होता. शिवाय संपूर्ण मठाच्या लेखी मुका आणि बहिरादेखील.
त्यामुळे काही दिवसांतच जोगतिणी बनण्याच्या वाटेवर असलेल्या त्या तरुणी त्याला शिव्यांची लाखोली वाहू लागल्या. बहिरा काय ऐकतोय,या विचारांनी त्यांची ही मुखशुद्धी अहोरात्र सुरू झाली.
एके दिवशी त्यातल्या दोन तरुणींनी मसेटोला बागेत झोपलेल्या अवस्थेत पाहिले आणि त्यांच्या मनात शरीरसुखासाठी सतत सुरू असलेला आगडोंब विझविण्याची क्लृप्ती शिजू लागली.
‘हीच सर्वात उत्तम वेळ आहे’, त्यातली एक तरुणी हिंदकळत दुसरीला म्हणू लागली. ‘मसेटो बोलू तर शकतच नाही, शिवाय बुद्धीनेही यथातथा आहे, त्यामुळे कुणालाच याचा थांगपत्ता लागणे शक्य नाही.’
जवळच्या झोपडीत मसेटोला नेऊन आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा कार्यक्रम त्यांनी आखला. अर्थातच मसेटोने त्यांच्या तोंडून निघालेल्या कामवटवटीला ऐकले आणि अडाण्याच्या आविर्भावात तो त्या नेतील तिथे गेला.’
थोड्याच दिवसांत या दोघींनी मसेटोसोबत केलेल्या रतिक्रीडेची पुनरावृत्ती करण्याचा मोह इतर भावी जोगतिणींनाही झाला. अर्थात त्यांनाही त्यांचा आनंदवाटा हवा होताच.
या दररोजच्या रासलीलेमुळे मसेटो स्वत:ला मठाच्या सम्राटाच्या रुपात पाहू लागला. अन् या साम्राज्यातील केवळ मठाधिपती असलेल्या महिलेखेरीज सार्‍यांनी त्याच्या कामकलेतील पारंगत प्रकारांची अनुभूती घेतली.
एके दिवशी तो योगही जुळून आला. रात्रीच्या अवघड अशा कामसत्रांनंतर थकलेल्या अवस्थेत खरोखरीच बागेत दिवसा पूर्णांशाने झोपलेल्या मसेटोवर मठाधिपतीची नजर गेली.
मठाधिपतीने आपल्या प्रासादात त्याची रवानगी केली. पुढले काही दिवस (आणि रात्रीसुद्धा) मसेटोवर केवळ मठाधिपतीची मक्तेदारी राहिली. प्रौढ आणि सर्वज्ञानी मठाधिपतीच्या सेवेत मसेटो आकंठ बुडाल्यामुळे तहानेने व्याकूळ मठातल्या इतर तरुणी तक्रारीच्या काठावर येऊन पोहोचल्या.
मसेटोला बागकाम आणि कामकाम यांतून उसंत मिळेना. आठ भावी जोगतिणी आणि एक मठाधिपती या सर्वांची तहान एकट्याने एकाच दिवशी भागवणे जेव्हा त्याला अशक्य झाले, तेव्हा त्याच्या मनात आले ‘ज्याचं गळतं, त्यालाच कळतं.’ तेव्हा आपण मूक-बधीर नसल्याचे रहस्य उकलण्याचे त्याने ठरविले.
मसेटोला बोलता अन् ऐकता येते, हे समजल्यानंतर धक्का बसला. पण त्याहूनही अधिक धक्का आख्ख्या मठाला मसेटोने काममळ्यात रुपांतर केल्याचे समजल्यानंतर बसला.
मग मठाधिपतीसमोर मसेटोने एक प्रस्ताव ठेवला. त्याच्या सेवेचे आठवड्याचे वेळापत्रक न लावल्यास आपण ही नोकरी सोडून देऊ, अशी धमकी त्या प्रस्तावात त्याने दिली.
मठाधिपती त्याने ठेवलेल्या प्रस्तावाहून अधिक मोठी शक्कल लढविली. मठाची अब्रू शाबूत राहावी आणि मसेटोचे सेवारहस्य टिकून राहावे,यासाठी तिने मठाच्या आधीच्या कारभार्‍याला हटवले आणि  तेथे मसेटोची नेमणूक केली.
तिच्या या द्रष्टेपणामुळे मसेटो म्हातारा होईस्तोवर तेथेच काम करीत राहिला आणि पुढल्या कित्येक भावी जोगतिणींना त्याने आपल्या हाताने फुलविले, याची गणनाच करता यायची नाही.


आजच्या करोनाहूनही इटलीची १३४९ सालातील परिस्थिती भीषण होती. प्लेगने टपाटप मरणार्‍यांचा आलेख उंचीवर होता. अशा अवस्थेत विनोदाची ही मात्रा वापरणारा, सरळसरळ धर्मसंस्थेतील दांभिकता उघड करणारा बोकाचिओ अजरामर का झाला, हे या एका कथा उदाहरणावरूनही लक्षांत येईल.
कुण्याएके काळी कामव्यवहारांपासून त्याच्या वर्णनांतही भीडभाड अथवा चाड न ठेवता मुक्तता असणार्‍या मरहट्टी मुलखातही प्लेग,रोगराईच्या काळात कथा लिहिल्या गेल्या असतील का, याचा शोध बकाचिओ वाचल्यानंतर मी जोमाने घेऊ लागलो. माझा शोध संपला तो काशीबाई कानेटकर यांचा शंभर वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या ‘चांदण्यांतील गप्पा’ हा कथासंग्रह लकडी पूलावर सापडल्यावर….

– पंकज भोसले



या दीर्घलेखाचे पुढील भाग

बकाचिओचा डेकॅमेरॉन आणि काशीबाईंचा कथाबटवा….(२)

२. कठीण समयांतील सभ्यकथा…

फिटनेस मंत्रा, यशशास्त्राची पुस्तके पुढे दाखल झाली. नंतर बायंडिंग केलेल्या गठ्ठ्यांत पिवळ्या रंगाची पडलेली जुनी पुस्तके समोर लागली. त्यात मला काशीबाई कानिटकरांचा ‘चांदण्यांतील गप्पा’ हा कथासंग्रह गवसला. एप्रिल १९२१ साली प्रकाशित झालेला. /p>

लेख वाचा…


बकाचिओचा डेकॅमेरॉन आणि काशीबाईंचा कथाबटवा… (३)

३. चावटी आणि सभ्यटी

बकाचिओच्या डेकॅमेरॉनमधील चावटी कथा वाचून झाल्यानंतर आणि त्यानंतर काशीबाई कानिटकरांच्या सभ्य आणि नीतीकथांनी भरलेल्या चांदण्यांतील गप्पा अनुभवल्यानंतर एक विचित्र कल्पना डोक्यात आली… /p>

लेख वाचा…


रोहन शिफारस

Mukkam-Post-Cover

मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट

‘‘दूर कुठेतरी एका कोपऱ्यात अभिजनांचा टिचभर तुकडा आणि दुसरीकडे हा बहुजनांचा अक्राळविक्राळ प्रदेश. मी त्याच्या मध्यावर कुठेतरी उभा… अगदी एकटा. न घर का, न घाट का!’’

250.00Add to cart


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *