भारताला स्वातंत्र्य मिळालं त्याला आता सात दशकांहून अधिक काळ लोटला आहे. भारताला राष्ट्र म्हणून स्वतंत्र अस्तित्व मिळालं आणि त्याचबरोबर एक लोकशाही राष्ट्र म्हणूनही त्याचा जन्म झाला. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्या वेळी परदेशातील अनेक पत्रकार, राजकीय अभ्यासक यांनी असं भाकित वर्तवलं होतं की, भारताची अफाट लोकसंख्या, बहुविध जाती, अनेक भाषा, भिन्न धर्म व मोठ्या प्रमाणावर असणारी निरक्षरता यामुळे लोकशाही स्वीकारणारा भारत लवकरच कोलमडेल. पण आज सत्तर वर्षं तो या सगळ्या भिन्नतेसह टिकून आहे. निवडणूक प्रक्रियेत त्रुटी आहेत, चुका होत आहेत, तरी आजपर्यंत लोकशाही टिकली आहे. भारतीय समाजाने इतरांची भाकितं खोटी ठरवली आहेत. हा चमत्कार कसा झाला याचं कुतूहल सुप्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ, अभ्यासक रामचंद्र गुहा यांना वाटत राहिलं. जगाच्या नकाशावर भारत ठसठशीतपणे अनेक बाबतीत लक्षवेधी कसा ठरला आहे याचाही विचार करावासा त्यांना वाटतो आहे. या आधुनिक भारताचं वेगळेपण कशात आहे, येथील राजकीय परंपरा कशी आहे, हा भारत घडवणाऱ्या शिल्पकारांच्या राष्ट्रघडणीबाबत कोणत्या संकल्पना होत्या, भारत जगातील इतर देशांच्या तुलनेत, कितीतरी बाबतीत एकमेव म्हणावा असा आहे तो का, याची कारणं शोधताना आधुनिक भारताची जडणघडण करणाऱ्या शिल्पकारांचा त्यांनी विचार केला.
‘Makers of Modern India’ या मूळ पुस्तकाचा शारदा साठे यांनी केलेला नेटका मराठी अनुवाद म्हणजे- ‘आधुनिक भारताचे विचारस्तंभ’. आधुनिक भारताच्या शिल्पकारांपैकी एकोणीस जणांच्या प्रयत्नांचा, विचारांचा, त्यांनी भारतीय समाजाला दिलेल्या योगदानाचा परिचय वाचकांना करून द्यावा, अधिक वाचनासाठी त्यांना दिशा दाखवावी असा हेतू लेखकाने मनाशी ठेवला आहे. समकालीन वा निकटच्या इतिहासातील विचारवंत नेते आणि घडामोडींशी संबंधित अशा या ग्रंथनिर्मितीचं मोल जाणून रोहन प्रकाशनाने ही निर्मिती रसिकांपर्यंत पोचवली आहे हे विशेष.
यासाठी पुस्तकाची मांडणी वेगळ्या प्रकारे केलेली दिसते. एकूण पाच मुख्य भाग, प्रत्येक भागासाठी, त्यातील एकेक विचारवंतांसाठी प्रास्ताविक, शिवाय उपोद्घात व उपसंहार अशी विभागणी. या पाच भागांत लेखकाने निवडलेल्या विचारवंतांचं कर्तृत्व थोडक्यात सांगत, त्यांच्या समग्र लेखनामधील वेचक, महत्त्वपूर्ण उतारे असा क्रम आहे. लेखकाने मांडलेली निरीक्षणं आपलं कुतूहल वाढवतात.
विचारवंतांची ही निवड सर्वांनाच सर्वस्वी मान्य होईल असं नाही. परंतु त्या निवडीमागचे आपले निकष नि:पक्षपातीपणे लेखकाने स्पष्ट केले आहेत. याचबरोबर भारतात एकाच वेळी जीवनाच्या अनेक क्षेत्रांत कसे मूलभूत बदल घडत होते आणि सामाजिक क्रांतीची प्रक्रिया अजूनही कशी चालूच आहे ते सांगून आजच्या जगात भारत कुठे आहे याचीही जाणीव लेखक करून देतात.
एखाद्या राष्ट्राची जडणघडण होताना काही गोष्टींना परिस्थितीनुसार आकार येतो, तर तेथील नेते राष्ट्रहितासाठी काही गोष्टी जाणीवपूर्वक घडवण्याचा आग्रह धरतात. स्वातंत्र्य चळवळीत तसेच तत्कालीन राजकीय प्रक्रियेत भाग घेणाऱ्या आपल्या नेत्यांपैकी जवळजवळ प्रत्येकाजवळ राष्ट्रउभाणीसाठीच्या वेगवेगळ्या संकल्पना होत्या. त्याशिवाय आजच्या राजकीय वातावरणातील परमताबद्दलची अनुदाराची भावना, सहिष्णुतेचा अभाव, समग्र देशहिता-बद्दलची जाणीव नसणं, जात, धर्म, वर्ग यांतील गटबाजीचा भीतीदायक प्रभाव; असं भारताच्या राजकीय पटलावरचं चित्र पाहता, या पुस्तकात निर्देशिलेल्या विचारवंतांबद्दलचा आदर वाढतो आणि त्यांचा विरोधकांशीही असणारा संवाद महत्त्वाचा वाटतो. त्यांनी व्यक्तवलेल्या विचारांचं मोल आजच्या काळात अधिकच वाढल्यासारखं वाटतं.
‘भारतीय मनोदर्शन’ या भागात राममोहन रॉय या पहिल्या उदारमतवादी विचारवंताच्या विचारांची झलक दाखवणारे उतारे आहेत. सतीबंदीचा कायदा करण्यासाठी तत्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांना मदत करणारे, त्यासाठीचा आग्रह धरणारे राममोहन रॉय आधुनिक शिक्षणाच्या गरजेचं प्रतिपादन करतात. स्त्रियांच्या अंगी असणारी गुणवैशिष्ट्यं सांगत पुरुषांनी त्यांचा विचार करणं किती आवश्यक आहे हेही सांगतात. पण विशेष म्हणजे वृत्तपत्र स्वातंत्र्याविषयीचा त्यांचा लेख आजही सुसंगत आहे हे तीव्रतेने जाणवतं. त्यातील उपरोध फार लक्षणीय आहे.
‘सुधारक आणि क्रांतिकारक’ या भागात सय्यद अहमद खान, जोतीराव फुले, गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक आणि ताराबाई शिंदे यांचा समावेश आहे. या भागातील विचारवंतांचा विशेष म्हणजे यांच्यात थेट वाद-संवाद होता. ताराबाई शिंदे यांचा भर स्त्रियाचं समाजातील स्थान उंचावण्यावर होता, तर फुले यांना समाजातील खालच्या थरातील लोकांच्या उद्धाराची कळकळ होती. सय्यद अहमद खान हे पहिले मुस्लीम कार्यकर्ते होते, ज्यांनी मुस्लिमांनी आधुनिक शिक्षण घेतले पाहिजे असा आग्रह धरला होता. दोनशे वर्षांचे जुनं अलिगढ मुस्लीम विद्यापीठ ही त्यांचीच निर्मिती आहे. या सर्वांच्या भिन्न भिन्न स्तरावरील प्रयत्नांतून एकूण भारतीयांना देशात अधिकाधिक प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे हाच विचार पुढे येत होता.
‘राष्ट्राची जोपासना’ या भागात महात्माजी, डॉ. आंबेडकर, रवींद्रनाथ टागोर, महम्मद अली जीना, तामिळनाडूतील ‘क्रांतिकारक सुधारक’ ई.व्ही. रामस्वामी-पेरियार, ‘समाजवादी स्त्रीवादी’ कमलादेवी चट्टोपाध्याय यांचा समावेश होतो. गांधीजींनी टिळक-गोखले यांच्या विचारांना घासून पुसून नवं रूप दिलं आणि त्या काळाला अनुरूप असा व्यापक राष्ट्रीय कार्यक्रम तयार केला, असं सांगून लेखक दाखवतात की, या सर्वच विचारवंतांनी गांधींना विरोध केला, तर कधी त्या विचारांना व्यापक रूप दिलं. मात्र प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे गांधी हाच त्यांच्या प्रतिपादनाचा आधार होते.
‘लोकशाहीची चर्चा’ या चौथ्या भागात, जवाहरलाल नेहरू, पुन्हा डॉ. आंबेडकर, ‘हिंदू श्रेष्ठत्वाचे समर्थक’ माधवराव गोळवलकर, ‘तळागाळाचा समाजवादी’ जयप्रकाश नारायण, ‘या मातीतील समाजवादी’ राममनोहर लोहिया, ‘गांधीवादी उदारमतवादी’ चक्रवर्ती राजगोपालाचारी, ‘आदिवासींचा रक्षणकर्ता’ व्हेरियर एल्विन यांचा समावेश आहे. या भागातील बरेचजण गांधीजींचेच अनुयायी होते, मात्र त्यांच्या संकल्पनांना आपापल्या प्रवृत्तीप्रमाणे त्यांनी वळवलं, वाकवलं. गोळवलकरांचा अर्थातच नेहरूंना पूर्णपणे विरोध होता. एल्विनच्या यातील समावेशाबद्दल मतभेद असू शकतो, पण आदिवासींच्या प्रश्नांबद्दल तोच जाहीरपणे बोलत होता.
‘एका परंपरेचा पुनरुच्चार’ या भागात ‘शेवटचा आधुनिकतावादी’ म्हणून हमीद दलवार्इंचा समावेश आहे. डाव्या विचारसरणीच्या नेत्यांची मात्र इथे अनुपस्थिती आहे. वैचारिक ऊहापोह करणाऱ्या या पुस्तकाची केवळ झलक दाखवणंही इथे कठीण आहे, कारण या सर्वच विचारवंतांच्या साहित्यातील अत्यंत मौलिक उतारे काळजीपूर्वक निवडले गेले आहेत. वैचारिकतेतही पुस्तकाची वाचनीयता टिकली आहे हे विशेष. अनेक संदर्भ, तळटिपा, संदर्भ ग्रंथसूची इत्यादी उपयुक्त माहिती दिल्याने पुस्तकाचं मोल वाढलं आहे. इतकं महत्त्वाचं पुस्तक दर्जेदार रूपात मराठीत आणण्याचं आवश्यक काम रोहन प्रकाशनाने केलं आहे.
– मीना वैशंपायन
- आधुनिक भारताचे विचारस्तंभ
- संपादन व समालोचन : रामचंद्र गुहा
- अनुवाद : शारदा साठे
पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल जानेवारी २०१९
सौजन्य : दै.महाराष्ट्र टाइम्स
हे पुस्तक विकत घेण्यासाठी…
आधुनिक भारताचे विचारस्तंभ
‘भारत’ ही संकल्पना उलगडणारा ग्रंथ MAKERS OF MODERN INDIA आता मराठीत. राममोहन रॉय, सय्यद अहमद खान, जोतीराव फुले, ताराबाई शिंदे, बाळ गंगाधर टिळक, रवींद्रनाथ ठाकूर, गोपाळ कृष्ण गोखले, महम्मद अली जीना, भीमराव आंबेडकर, ई.व्ही. रामस्वामी, राममनोहर लोहिया, एम.एस. गोळवलकर, मोहनदास गांधी, कमलादेवी चट्टोपाध्याय, जवाहरलाल नेहरू, जयप्रकाश नारायण, चक्रवर्ती राजगोपालाचारी, व्हेरियर एल्विन, हमीद दलवाई या १९ विचारवंतांच्या व्यक्तिरेखा व वैचारिक भूमिका यांचा एकाच ग्रंथातून परिचय करून देणारं व त्यातून भारताची वैचारिक जडणघडण स्पष्ट करणारा ग्रंथ…
₹800.00Add to Cart