“तुला औषधांचे प्रयोग करायला फारच आवडतं असं दिसतंय. जेव्हा बघावं तेव्हा औषध ढवळत असतोस किंवा गरम करत असतोस. यातून काही फायदा तरी होतो का तुझा?”
श्रीयुत क यांच्या घरी आलेला त्यांचा मित्र म्हणाला.
“अरे, ऐकलंस तर खूष होशील! अखेर एक मस्त औषध तयार झालंय. हे बघ.” असं म्हणून श्री क यांनी कसलीशी पूड भरलेल्या एका बाटलीकडे बोट दाखवलं. ते पाहून मित्र म्हणाला.
“ते ठीक आहे. पण हे आहे तरी कसलं औषध?”
“सर्दीचं औषध आहे हे.”
“सध्याच्या औषधांपेक्षा काय वेगळं आहे यात?”
“चल, आताच दाखवतो तुला याचा परिणाम.”
असं म्हणून श्री. क यांनी ते औषध थोडंसं प्यायलं. मित्र गोंधळून म्हणाला.
“परिणाम दाखवतो म्हणतोयस खरा, पण तुला तर मुळात सर्दी झालेलीच नाहीये!!”
“अरे, गप्प बसून बघ रे.”
थोड्याच वेळात श्री. क खोकायला लागले. काळजी वाटून मित्राने त्यांच्या कपाळाला हात लावून पाहिला.
“अरे, तुला तर ताप आलाय. आहे तरी काय हा प्रकार?”
“अरे, काळजीचं कारण नाही. हे सर्दी बरी करण्याचं औषध नाही, तर सर्दी होण्याचं औषध आहे.”
“काय हा मूर्खपणा! वेडेपणाची हद्द झाली! ती सर्दी मला देऊ नकोस रे, बाबा!”
“तसं काही होणार नाही. थांब थोडा वेळ.”
जवळजवळ तासाभराने श्री. क यांचा खोकलाही थांबला. आणि तापही उतरला. ते बघून मित्र चांगलाच चकित झाला.
“अरेच्चा! लगेच बरा झालास की काय?”
“अरे, गोष्ट अशी आहे– हे औषध घेतलं ना, की, सर्दी झाल्याची बाह्य लक्षणं दिसायला लागतात. केवळ बाह्य लक्षणं. प्रत्यक्षात त्या व्यक्तीला काही त्रास होत नसतो. एक तासानंतर परत पूर्वीसारखं होतं सगळं.”
“काय भलतीच गोष्ट शोधून काढलीयेस. पण या औषधाचा काही उपयोग तरी आहे का?”
“अर्थातच. मस्तपैकी सुट्टी घ्यायची असली की वापरायचं हे. म्हणजे नको ती कामं अंगावर पडायला नकोत.” एवढं सगळं ऐकल्यावर मात्र तो मित्र आदराने भारावून गेला.
“कळलं, कळलं. फारच अफलातून! नकोसं काम जबरदस्तीने करायला लावत असेल कोणी, तर तेव्हा हे औषध घ्यायचं, असंच ना? झकास! मलाही दे थोडं!!”
“बघ, आता कसं? तुलाही हवंसं वाटलं की नाही? ठीक आहे. देतो मी थोडं.”
छोट्याशा बाटलीत ते औषध घेऊन मित्र आनंदाने घरी परतला.
काही दिवसांनी श्री. क त्या मित्राच्या घरी गेले. त्याचा वाढदिवस असल्याने ‘नक्की ये’ असं त्याने बजावलं होतं.
पार्टी चाललेली असताना श्री. क मधेच त्रासिक चेहऱ्याने म्हणाले, “अचानक पोटात दुखायला लागलंय. माफ कर; पण मी आता निघतो.”
तो मित्र आधी जरासा भांबावला, पण मग काहीतरी लक्षात आल्यासारखं म्हणाला,
“चेष्टा करू नकोस. माझ्या घरी तुला कंटाळा आलाय आणि लवकर घरी जायचंय. असंच ना? बस रे आरामात. जा सावकाश.”
“अरे नाही. खरंच दुखतंय रे.”
श्री. क यांच्या चेहऱ्याचा रंग ओसरला. त्यांना घाम यायला लागला. आणि ते तिथेच निपचित पडले. पण तरीही मित्राला ते खरं वाटेना. त्याने हसत हसत क ला थांबवलं.
“गेल्या वेळच्या त्या सर्दीच्या औषधापेक्षाही भारी दिसतंय हे औषध! नेहमीच सर्दी झाली, तर लोकांनाही संशय येणार, म्हणून मधून मधून पोटदुखी झालेलीही चांगली, खरं की नाही?”
पण एक तास झाला तरी श्री क बरे होण्याची चिन्हं दिसेनात. उलट त्यांचं कळवळणं आणखीच वाढत होतं. अखेर हे खरंच काहीतरी दुखणं दिसतंय हे मित्राला जाणवलं आणि त्याने डॉक्टरांना बोलावलं.
घाईघाईने आलेल्या डॉक्टरांनी श्री. क यांच्यावर उपचार केले आणि म्हणाले, “नशीब समजा, मी वेळेवर आलो. थोडासा जरी उशीर झाला असता, तरी परिस्थिती हाताबाहेर गेली असती. ताबडतोब का बोलावलं नाहीत मला?” त्यानंतर श्री. क यांनी अफलातून औषधं बनवण्याचा उद्योग कायमचा बंद केला.

-‘शिन्झेन किस’ कथासंग्रहातील लघुकथा

  • शिन्झेन किस
  • लेखक : शिन्इची होशी
  • अनुवाद : निसीम बेडेकर

पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल जानेवारी २०१९


हे पुस्तक खरेदी करण्यासाठी…

शिन्झेन किस

…जपानचे सुप्रसिद्ध विज्ञानकथा लेखक आणि लघुकथांचे दैवत अशी ख्याती असलेले शिन्इची होशी यांच्या अलौकिक लेखणीतून साकारलेल्या अशा या २१ अद्भूतरम्य कथा !
अफलातून कथानक आणि धक्कादायक शेवटामुळे वाचकांना थक्क करणाऱ्या या कथा गंभीर विषयही अगदी सहजपणे वाचकांसमोर सादर करतात.
जपानी भाषेवर प्रभुत्व असलेले निसीम बेडेकर यांनी होशी यांच्या निवडक कथांचा थेट जपानी भाषेवरून मराठीत केलेला रसाळ अनुवाद…

195.00Read more


Ganesh Matakari
तुम्हाला हेही वाचायला आवडेल…

नाऊ यू सी मी… कथेतील निवडक भाग (लेखक – गणेश मतकरी)

आज पंचवीस वर्षं उलटल्यावर माझ्या मांजराच्याच वयाचं दिसणारं हे मांजर बिल्या असण्याची काहीही शक्यता नाही हे लक्षात येऊनही मी त्या दिशेला दोन पावलं टाकतो…

वाचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *