‘प्रेम’ आणि ‘ताटातूट’ हे दोन शब्द अगदी सयामी जुळ्यासारखे वर्षानुवर्षं एकमेकांना धरून चालत आले आहेत. प्रेम आलं तिकडे ताटातूट आलीच. पण गम्मत म्हणजे, या दोन शब्दांना एकत्र नांदण्याची संधी मिळते केव्हा, तर जेव्हा दोन प्रेमी जीव एकमेकांपासून दुरावतात तेव्हा. तसंच काही या चालू करोनाकाळात झालं आहे.
लॉकडाउनमुळे ‘जिथे आहे तिथे’ राहायचा आदेश आल्यामुळे काहींची कोणासोबत ताटातूट झाली असली, तरी त्यामुळे त्यांना कोणासोबतच्या नेहमीपेक्षा जास्त सहवासाची संधीही मिळाली. जसं की, दोन मित्रांना, मैत्रिणींना बराच काळ भेटता आलं नसेल तेव्हाच नवरा-बायको-मुलांना जास्त काळ एकत्र घालवायची संधी मिळाली असेल ना? आणि तसं म्हटलं तर, ताटातूट झाली तरी, त्यामुळे प्रेमाचं मोलही वाढतं याचीही प्रचीती या करोनाकाळात घेता आली असेल.
प्रेम या संकल्पनेला प्रचंड संख्येने पैलू असतात. या भावनेला नेमकेपणाने शब्दांत पकडणं, अचूकपणे व्यक्त होणं तसं कठीणच आहे. म्हणूनच म्हणतात ना, एका प्रेमभऱ्या नजरेच्या कटाक्षानेही खऱ्या प्रेमाची भावना पोचवता येते किंवा जे प्रेम एका स्पर्शातून व्यक्त होतं, जी भावना त्यातून पोचते ती हजारो शब्दांच्या माध्यमातून पोचत नाही. ‘प्रेम’ या संकल्पनेचा शोध आजवर अनेक पातळ्यांवर आणि विविध प्रकारे घेतला गेला आहे. लेखकांनी आपली प्रतिभा पणाला लावून, प्रेमाकडे अनेक कोनांतून पाहून ते शब्दबद्ध केलं आहे. प्रेमाचे धागे विविध प्रकारे उलगडले आहेत. तर हजारो कवींनी, शायरांनी आपल्या कविकल्पनांची जोड देत प्रेमाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. आता आपल्या मंगेश पाडगावकरांचे पहा ना, ‘प्रेम म्हणजे काय असतं?’ या एका कवितेतून हजारो, लाखो प्रेमी मिळवले. आता पाडगावकर म्हणतात तसं, ‘‘प्रेम म्हणजे, प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं’’ असं नेहमीच असतं असं अजिबात नव्हे. पण ‘प्रेम आंधळं असतं’ असंही म्हटलं जातं. तेव्हा या उक्तीप्रमाणे पाडगावकरांचं म्हणणं खरंही ठरावं… ‘तुमचं आमचं सेम असतं!’ पाडगावकरांनी ही कविता प्रेमभरे लिहिली आहे, तर मानसशास्त्रज्ञांनी प्रेम या संकल्पनेचा विविधांगांनी अभ्यास केला आहे. मानवसमाजाच्या या उपजत भावनाविष्काराची व प्राथमिक गरजेची चिकित्सा करून या संकल्पनेची पद्धतशीर मांडणी केली आहे. प्रेमाविष्काराच्या विविध पैलूंना निश्चित अशा रकान्यांत बसवले आहे. मात्र प्रेमासारख्या तरल भावनेची शुष्कतेने अशी चिरफाड केलेलीही अनेकांना रुचत नाही.
साहित्यिकांप्रमाणेच चित्रपटसृष्टीनेही प्रेमाच्या विविध रूपांना दृष्य स्वरूप दिलं आहे. वास्तविक चित्रपटसृष्टीचा पाया, कणा, अंग सर्व काही जास्त करून ‘प्रेम’ या संकल्पनेवरच बेतलेलं असतं. परंतु बहुतांशी चित्रपटांत ते भावूक पातळीवरच रेखाटलं गेलं. बेगडी वाटावं अशा भडकपणे त्यांचं चित्रीकरण केलं गेलं आहे. चित्रपटांतील प्रेमात पराकोटीची ‘नफरत’ निर्माण होते ती क्षुल्लक कारणावरून आणि तेवढ्याच तकलादूपणे त्या नफरतीचं रूपांतर पुन्हा प्रेमात होतं, पण याला काही अपवाद असतात. काही दिग्दर्शक, लेखक प्रेम या संकल्पनेला भावूकता बाजूला ठेवून थेट भिडतात. जसं की ‘गाइड’ चित्रपटात नायक-नायिकेमध्ये विसंवाद निर्माण व्हायला सुरुवात होते तेव्हा नायिका एका प्रसंगी नायकाला सांगते, ‘‘जब मतलबसे प्यार रहता है तो प्यार से मतलब नही रहता।’’ नायकही वास्तवता नाकारत नाही. आपली बाजू मांडायला म्हणतो, ‘‘प्यार मे मतलब की मिलावट होती है, जब तुम्हे मतलब था, प्यार मिल गया…’’ नायिकाही या आरोपामुळे डगमगत नाही. ती स्पष्टपणे विचारते, ‘‘और अब तुम्हे प्यार है, तो किस मतलब से?’’ मूळ कथा आर.के. नारायण यांची असली, तरी अशा चटपटीत पण अर्थपूर्ण संवादांतून गंभीर आणि व्यापक आशय समाजापर्यंत पोचवण्याचं श्रेय पटकथा-संवाद लेखक व दिग्दर्शक विजय आनंद यांना द्यावं लागेल. प्रेमातील ‘विसंवादी सूर’ त्यांनी नि:संकोचपणे या संवादांतून स्पष्ट केला आहे. ‘गाइड’ हा पंचावन्न वर्षांपूर्वीचा चित्रपट, तर ‘बेकेट’ हा त्यानंतर मी चार-पाच वर्षांनीच पाहिलेला चित्रपट. या इंग्रजी चित्रपटातील दोन मित्रांच्या नात्यासंदर्भातला एक ‘डायलॉग’ मनामध्ये कोरला गेला आहे. राजा हेन्री-२, आर्चबिशप पदावर हेतूपूर्वक बसवलेल्या आपल्या मित्राला– ‘बेकेट’ला एका संघर्षमय प्रसंगी सांगतो, ‘‘बेकेट, आय हेट यू, बिकॉज आय लव्ह यू मोअर दॅन आय शूड.’’ अतिरिक्त प्रेम अपेक्षा निर्माण करतं आणि मित्र असूनही बेकेट आपल्या अपेक्षांची पूर्ती करत नाही म्हटलं की, त्याच्याबद्दल राजाच्या मनात तिरस्कार निर्माण होतो. प्रेमाच्या अशा विरोधाभासी छटा… प्रेमाच्या अशा विविध छटांचा अनुभव ‘टीम रोहन’ने त्यांच्या नव्या पुस्तकाच्या निमित्ताने नुकताच घेतला आहे.
लॉकडाउनच्या काळात ‘टीम रोहन’ने वातावरणात आलेलं मळभ लक्षात घेऊन पुस्तकाचा एक झटपट प्रकल्प संकल्पित केला… ‘लव्ह इन द टाइम ऑफ करोना’… आठ लेखक…आठ कथा, आणि विषय- प्रेम! लेखकांना मोकळी चौकट दिली प्रेमाची. सांगितलं, प्रेमाचे रंग तुम्ही भरा… कोणतेही भरा, कसेही भरा… चौकट आखीव-रेखीव असलीच पाहिजे असं काही नाही. चौकटीत राहून चौकटीबाहेर गेलात तरी हरकत नाही. अशा सर्व भूमिकेमुळे आठ जणांच्या आठ कथा आल्या, त्या प्रेमाचे, ओढीचे वेगवेगळे रंग घेऊन, त्यातील वेगवेगळ्या छटा घेऊन. अगदी न ठरवता…! जसं की साठीत गवसलेलं प्रेम, सब-कॉन्शन्समधलं प्रेम, गावाकडच्या ओढीतून आलेलं प्रेम, लोककथेचा बाज घेऊन आलेलं प्रेम किंवा अगदी फॅन्टसीमधून साधलेलं प्रेम…
या प्रकल्पाबाबत ‘टीम रोहन’मध्ये सविस्तर चर्चांच्या दोन फेऱ्या झाल्या. त्यात पुस्तकाचा एकंदर तोंडवळा आम्हाला अभिप्रेत काय आहे, याबाबत स्पष्टता आली. त्याप्रमाणे लेखकांच्या नावांची चर्चा झाली. ज्या लेखकांना आम्ही या प्रकल्पात सहभागी करून घेऊ इच्छित होतो, त्या नावांवर या चर्चेत एकमत झाल्यावर पुस्तकाच्या सर्वसाधारण रूपरेषेबाबत अधिक स्पष्टता आली. कितीही विपरीत परिस्थिती असली तरी माणसाच्या मनाला उभारी कोण देणार… तर प्रेमाची भावना, मायेचा ओलावा. म्हणूनच आम्हाला केवळ प्रेमी जीवांच्या कहाण्या नको होत्या, तर प्रेम या संकल्पनेचा व्यापक स्तरावरच्या विचारांची अनुभूती देणाऱ्या कथांची अपेक्षा होती. त्यानुसार लेखकांना प्रकल्पाची संकल्पना सांगणारी एक ‘नोट’ तयार करण्यात आली. त्यामध्ये ‘करोनाकाळ आणि प्रेम’ ही मध्यवर्ती संकल्पना विशद करण्यात आली. हे दोन घटक लेखकांच्या सर्जनशीलतेत जसे बसतील तसे कथेत वापरण्याचं, गुंफण्याचं त्यांना अर्थातच स्वातंत्र्य दिलं होतं. त्यामुळे मी त्यांच्याशी फोनवर संपर्क साधून अशी मध्यवर्ती संकल्पना सांगितली आणि मेलवर त्यासंबंधी ‘नोट’ पाठवली, तेव्हा सर्वांनी या पुस्तकासाठी कथा देऊन सहभागी होण्याचं उत्फूर्तपणे मान्य केलं. यात सर्व लेखकांच्या मनाचा मोठेपणा होता हे खरं आहे आणि तितकंच खरं आहे की, त्यांनी मनापासून सहभागी होण्यासाठीचा दिलेला होकार हे या प्रकल्पाचं पहिलं यश होतं. त्यानंतर सर्वच लेखकांनी दिलेल्या वेळेत म्हणजे महिन्याभरात कथा लिहून पाठवणं हे या प्रकल्पाचं दुसरं यश. तिसरं आणि सर्वांत महत्त्वाचं यश म्हणजे प्रत्येक कथेचा दर्जा उच्च होता. अशा प्रकल्पात काही कथांच्या मध्यवर्ती कल्पेनेमध्ये साधर्म्य असण्याची शक्यता असते. लेखकांकडून कथा आल्या रे आल्या की आम्ही सर्व त्या लगेचच उत्सुकतेने वाचत असू. तेव्हा जाणवत असे की, कथांचा केवळ दर्जाच उच्च नाही, तर कोणतीही कथा दुसऱ्या कथेशी साधर्म्य राखत नाही आहे. भूमी वेगळी, वापरलेले फॉर्म्स वेगळे, पोत वेगळा, आशय वेगळा, मध्यवर्ती कल्पना वेगळी, शैली वेगळी, अभिव्यक्ती वेगळी आणि प्रेमाचा, ओढीचा पैलू वेगळा… कथांच्या वैशिष्ट्यांविषयी सांगण्याजोगा आणखी एक मुद्दा म्हणजे काही लेखकांनी त्यांच्या लिखाणाच्या नेहमीच्या बाजापेक्षा पत्करलेला वेगळा मार्ग. वाचकांच्या दृष्टीने हे सर्व साधलं जाणं हा सर्वांत महत्त्वाचा मुद्दा होता. असं सर्व आता छानपैकी जमून आलं आहे, तेव्हा या प्रकल्पाच्या पदरात आता चौथं यश पडणं महत्त्वाचं आहे, ते म्हणजे पुस्तकाला वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळणं…
या पुस्तक-प्रकल्पाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यांत नव्या दमाच्या आजच्या लेखकांच्या जशा कथा आहेत, त्याचप्रमाणे नीरजा, श्रीकांत बोजेवार, यांच्यासारख्या थोड्या ज्येष्ठ लेखक मंडळींच्याही कथा आहेत. त्याचप्रमाणे या पुस्तकाच्या निमित्ताने नीरजा, गणेश मतकरी, मनस्विनी, प्रवीण धोपट यांच्यासारखी लेखक मंडळी ‘रोहन’शी जोडली गेली आहेत. या कथासंग्रहात आणखी काही लेखकांना आम्हाला सहभागी करून घेण्याची मनापासून इच्छा होती. तर काही लेखकांना आवर्जून त्यांची कथा या कथासंग्रहात असावी असं वाटत होतं. मात्र, पृष्ठसंख्येची आम्ही मर्यादा आखून घेतली होती. त्यामुळे इच्छा असूनही अशा काहींना सहभागी करून घेता आलं नाही याचं एक शल्य मनाला आहेच.
असं सर्व हे ‘प्रेम-पुराण…’ ते कथन करण्याचं प्रयोजन जरी ‘लव्ह इन द टाइम ऑफ करोना’ असलं, तरी या पुस्तकाचं प्रयोजनच मुळी वाचकांची पुस्तकासाठीची ओढ आणि त्यासाठी आवश्यक असलेला उत्साह यांतील दरी बुजवणं हा आहे. लॉकडाउन, करोनाची धास्ती यांमुळे लोक अनेक गोष्टींपासून दुरावले आहेत. त्या ताटातुटीत पुस्तकंही आली. पुस्तकांविषयी प्रेम असलं,ओढ असली तरी ती घेण्याचा उत्साह या वातावरणात कुठून आणणार? त्या उत्साहालाच पुनर्जीवित करणं हेच आहे या पुस्तकाचं प्रयोजन…
रोजच उत्तमोत्तम पदार्थ पुढ्यात आले, तर त्यांचं महत्त्व साहजिकच कमी होणार. पण अशा पदार्थांपासून काही महिने ताटातूट झाली तर..? रोहनमध्ये आम्ही हाच अनुभव घेतला. ‘ग्रेप्स’ नंतर ‘रोहन’मध्ये तब्बल १६० दिवसांनी ‘लव्ह इन द टाइम ऑफ करोना’ हे पुस्तक प्रसिद्ध होत आहे. नव्या पुस्तकांपासून ताटातूट झालेल्या ‘टीम-रोहन’मध्ये या पुस्तकाने नव-चैतन्य आणलं आहे आणि हे पुस्तक अगदी कमी वेळेत आपल्यासमोर आणण्यासाठी मुग्धा दांडेकर(अक्षरजुळणी), प्रभा वझे(मुद्रितशोधन), राजू देशपांडे, शेखर गोडबोले(मुखपृष्ठ), न्यू वे आणि हेमंत जोशी(छपाई), सुरेंद्र जाधव(बांधणी) यांनी तेवढ्याच उत्साहाने सहकार्य केलं.
…प्रेमाच्या जशा विविध छटा, तशाच असतात व्यक्त होण्याच्या तऱ्हा… शब्दाने, प्रेमभऱ्या स्पर्शाने, नजरेने किंवा तिन्ही प्रकारे… किंवा सोशल डिस्टंन्सिंग आजच्या काळात भेटवस्तूचं माध्यमही तेवढंच प्रभावी! ‘लव्ह इन द टाइम ऑफ करोना’ हे पुस्तक प्रिय व्यक्तींना भेट देऊन मी व्यक्त होणार आहे.
तुम्ही…?
– प्रदीप चंपानेरकर
पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल सप्टेंबर २०२०
रोहन शिफारस
लव्ह इन द टाइम ऑफ करोना
एका अदृश्य व्हायरसने अख्ख्या जगाचा कब्जा घेतला. सगळंच एकदम स्टॅच्यू होऊन गेलं… Standstill!
या अस्वस्थ वर्तमानामध्ये चहूकडे मरणाची दाट छाया पसरलेली असताना मनं कासावीस झाली. प्रेमाचा अंकुर मात्र सोशल डिस्टन्सिंगचा मुलाहिजा न पाळता बेभान पसरत गेला. सगळं जितकं जास्त बंद बंद होत गेलं तितकं कुणीतरी जास्त जवळचं असावं असं वाटू लागलं. या करोनाकाळात वेगवेगळ्या नात्यांमध्ये फुलणारं प्रेम हेच आता नव्याने जगण्याची उमेद देईल?