READING TIME – 4 MINS
भारतातलं क्रिकेटप्रेम काही नवीन नाही, आत्ताच पार पडलेल्या क्रिकेट वर्ल्डकपमध्ये आपण हे क्रिकेटप्रेम अनुभवलं, आपल्याकडे घराघरात क्रिकेटचे चाहते बघायला मिळतात.
इथल्या गल्ल्यांमध्ये अनेक सचिन आणि धोनी तयार होत असतात, सगळ्यांनाच मोठ्या स्टेडियमचा मार्ग गवसतो असं नाही… पण घरातल्या घरात जर प्रत्यक्ष क्रिकेट खेळण्याचा अनुभव आला तर?
भर मैदानातला अनुभव आता घरात टीव्हीसमोर खेळून घेता येणार आहे. मेटा शॉट या कंपनीने आणलेल्या स्मार्ट बॅटच्या मदतीने हा अनुभव आपल्याला घरबसल्या घेता येणार आहे.
या स्मार्ट बॅटमुळे आपल्या घराचं स्टेडियम होणार आहे. अलिकडेच मैदानी खेळांचा अनुभव घरबसल्या, पण जिवंतपणे लोकांना देण्याच्या दृष्टीने मेटा शॉट या कंपनीची स्थापना करण्यात आली.
सुरुवातीपासूनच कंपनीच्या संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. खिशाला परवडेल अशा स्वरूपात कंपनीद्वारे अनेक उपकरणांची निर्मिती केली जात आहे. यातीलच एक उत्पादन म्हणजे स्मार्ट बॅट.
आपल्या घरातील टीव्ही, संगणक किंवा मोबाईलला जोडून या बॅटने क्रिकेटचा आनंद घरात बसून घेता येतो. विशेष बाब म्हणजे प्रत्यक्ष स्टेडियममध्ये जाऊन आपण क्रिकेट खेळत असल्याचा आनंद आपल्याला यामध्ये घेता येतो.
एआय तंत्रज्ञान आणि ब्लू टूथ याच्या मदतीने हे शक्य आहे. पहिल्यांदाच अशा पद्धतीची निर्मिती करण्यात आली असून भारतात याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सध्या ही स्मार्ट बॅट ऑनलाईन उपलब्ध आहे. या स्मार्ट बॅटसोबत काही केबल्स येतात , त्यांच्या मदतीने टीव्हीला ही स्मार्ट बॅट जोडता येते.
हा गेम खेळण्यासाठी एमएच केबलने आपला मोबाईल टीव्हीला जोडला जातो आणि त्यानंतर टीव्हीसमोर उभं राहून या स्मार्ट बॅटने क्रिकेट खेळताना प्रत्यक्ष स्टेडियममध्ये खेळण्याचा आनंद घेता येतो.
स्टेडियममधले प्रेक्षकांचे आवाज , तिथला माहोल यामुळे अधिक जिवंतपणे क्रिकेट खेळण्याचा अनुभव युजर्सना यामध्ये मिळत आहे.
एखादा खेळाडू ज्या पद्धतीने बॅटिंग करताना उभा असतो त्या पद्धतीने उभं राहून हा गेम खेळला जातो, ज्या प्रकारे आपण बॅटने शॉट मारू त्याचप्रकारे स्क्रीनवर खेळाडू खेळणार असल्याने आपण प्रत्यक्ष सामनाच खेळत असल्यासारखे वाटते.
बॉलचा टप्पा, स्विंग, वेग बघून त्यानुसार फलंदाजाला आपला फटका निवडावा लागतो आणि फटका मारताना टायमिंगसुद्धा अचूक असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर त्यावेळी असलेली फिल्डिंग प्लेसमेंटसुद्धा आपल्याला लक्षात घ्यावी लागते.
हा गेम खेळण्यासाठी मेटा शॉटचे स्वतंत्र मोबाईल अॅप आहे. या अॅपमध्ये मल्टीप्लेअर लोकल असे वेगवेगळे मोडसुद्धा देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर दर आठवड्याला वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजनसुद्धा यावर केले जाते. या स्पर्धा जिंकणाऱ्या व्यक्तींना आकर्षक बक्षीसं सुद्धा यामध्ये दिली जातात.
‘वर्ल्डस फस्ट मिक्स रिएलिटी बॅट’ अशी या बॅटची ओळख तयार झाली आहे. यामध्ये सराव करण्यासाठी प्रॅक्टीस मोड , मल्टीप्लेअर मोड , टूर्नामेंट मोड असे वेगवेगळे पर्याय देण्यात आले आहेत.
‘फिल्डिंगची यंत्रणा, पॉवर प्ले यासारखे नियम तसेच क्रिकेटचे सर्व नियम’ यामुळे कोणत्याही क्रिकेटप्रेमीसाठी हा गेम एक इंटरेस्टिंग पर्याय नक्कीच ठरणार आहे.
हल्ली मुलांना खेळण्यासाठी मोठी जागा नसते, प्रत्यक्ष मैदाने नेहमी खेळण्यासाठी उपलब्ध होत नाहीत अशावेळी या गेमच्या मदतीने एकत्र येऊन मुलं आनंदाने खेळू शकतात. यामध्ये बॉलिंग आणि बॅटिंग असे दोन्ही पर्याय देण्यात आलेले आहेत.
या बॅटला चार्जिंगचा पर्याय देण्यात आला असून एकदा चार्ज केल्यानंतर सलग ७-८ तास याचा वापर करता येतो. त्याचबरोबर याला ६ महिन्यांची वॉरंटीसुद्धा कंपनीच्या वतीने देण्यात आलेली आहे.
सहसा एआर , व्हीआर वर आधारित उपकरणांची किंमत महाग असते, मात्र या गेमची किंमत आटोक्यात ठेवण्यात कंपनीला यश आले आहे त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर सध्या या गेमला प्रतिसाद मिळत आहे.
कोणत्याही क्रिकेटप्रेमी व्यक्तीने क्रिकेटच्या प्रेमाखातर एकदातरी हा गेम खेळून बघितलाच पाहिजे. आपण मॉल्समध्ये या आधी अशा पद्धतीचे तंत्रज्ञान बघितलेले आहे तेच तंत्रज्ञान यामुळे घरबसल्या सगळ्यांना अनुभवता येणार आहे.
- आदित्य बिवलकर