फॉन्ट साइज वाढवा
दिवाळी अंकासाठी लेख लिहिणं हा तुम्ही लेखक आहात, या घटनेच्या असंख्य पुराव्यांपैकी एक महत्त्वाचा पुरावा असतो. दिवाळी अंकात लेख लिहिणं ही लेखक म्हणून ओळख होण्यातली एक कसोटी असेल, तर दिवाळी अंकासाठी तुमच्याकडे प्रकाशकाने लेख मागणं, हा लेखक म्हणून प्रस्थापित होण्यातला महत्त्वाचा मानदंड असतो. साधारणत: मृगाचा पहिला पाऊस पडून गेला, की दिवाळी अंक काढणारी संपादक मंडळी एकदम ‘चार्ज’ होतात. त्यांच्या मनातल्या अंकाचा मोर एकदम थुईथुई नाचायला लागतो. (आमच्या एका प्रकाशक मित्राने फेब्रुवारीतच दिवाळी अंकाचा लेख मागितला होता. तेव्हा चालू दिवाळी अंक वाचून संपले, की लिहितो, असं कळवलं होतं.) बाकी ‘या आठवड्यात वाचून टाकू’ म्हणून बाजूला ठेवलेले दिवाळी अंक पुढील ५२ आठवड्यांतही वाचले जात नाहीत, ते वेगळं. दिवाळी अंकात लिहिण्याची एक खास वेळ असते. ती वेळच तुम्हाला हाकारे घालते.
गणपती संपले, पितृपंधरवडा सुरू झाला, की हवा बदलते. हीच खरी लेखकाची दिवाळी अंकातले लेख पाडण्याची वेळ असते. काही धोरणी लेखक जानेवारीपासूनच ‘स्टॉक’ करीत जातात. काही हुकमी लेखक विषयाबरहुकूम लेख लिहून ठेवतात. ‘मागणी तसा पुरवठा’ असं त्यांचं तत्त्व असतं. आमच्या एका विनोदी लेखक मित्रानं तर एका पावसाळ्यात ५० लेख लिहून टाकले होते. त्या वर्षी मुठेऐवजी त्याच्या पेनातल्या शाईलाच पूर आला होता, असं वाटून गेलं. आठ-दहा लेख समजू शकतो, अगदी १५ देखील ओकेच; पण पन्नास? त्याच्या या बहुप्रसवा लेखणीनं मला तर भयंकर न्यूनगंड आला होता.
सुरुवातीला मी कुटुंब कल्याण कार्यक्रमाच्या धोरणानुसार ‘एक या दो… बस्स’ म्हणून थांबत असे. ते एक किंवा दोन लेख लिहितानाही पुरेशी दमछाक होई. मात्र, हळूहळू मागणी वाढू लागली. आपल्यासारख्या लेखकाला मागणी वाढली, म्हणजे दिवाळी अंकांची संख्या तरी वाढली असावी किंवा त्यांचा दर्जा तरी घसरला असावा, अशी प्रामाणिक भावना मनात येऊन गेली होती. मात्र, दिवाळी अंक लेखकाला भावना आदी गोष्टींचा फार विचार करून चालत नाही. मृग नक्षत्र उलटलं, की ‘लेख झाला का?’ असे धमकीवजा संदेश संपादक मंडळींकडून येऊ लागतात. ‘अहो, काय घाई आहे? देतो पुढच्या महिन्यात…’ असं उत्तर दिलं, की ‘सगळा अंक लावून तयार आहे, फक्त तुमचाच लेख यायचाच राहिला आहे,’ असं धादांत असत्य उत्तर तुमच्या तोंडावर फेकून ही मंडळी मोकळी होतात. खरं काय ते दोघांनाही माहिती असतं. काही संपादक मंडळी अगदी टोक गाठतात. (पूर्वी संपादक मंडळी लेखकाच्या लेखाला टोक वगैरे आहे का, हे तपासत असत. नसेल तर काढून देत असत. आता ती ‘मौज’ संपली. आता हे दुसरं टोक!) मग, पंधरा ऑगस्टच्या आत लेख आला पाहिजे, अशी प्रेमळ धमकी येते. बहुतेक संपादक-प्रकाशकांची ही आवडती, लाडकी डेडलाइन आहे. लेखकाचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिसकावून घेण्यासाठी त्यांना ‘१५ ऑगस्ट’ हाच दिवस सुचावा? या काळात फोन वाजला किंवा मेसेजची रिंग वाजली, तरी धडकी भरते. ‘लेख झाला का?’ हा प्रश्न हृदय भेदून जातो. लेख झालेला नसतोच. मग ‘झालाच आहे, एकदा परत वाचतो आणि पाठवतो,’ अशी काहीतरी पळवाट काढावी लागते. लेख युनिकोडमध्ये हवा, मेलवर हवा, सोबत फोटोही तुम्हीच जोडा, या आणि अशाच अनेक अटी-शर्तींची पूर्तता करावी लागते. कशीबशी ही डेडलाइन गाठून आपण ‘हुश्श’ केलं, की आणखी एका संपादकाची मेल इनबॉक्सात येऊन पडलेली असते.
काही मंडळी दर वर्षी अंक काढतात. मात्र, गणपती जाईपर्यंत यंदा अंक काढायचा की नाही, हेच यांचं निश्चित झालेलं नसतं. सगळं ऐन वेळी ठरतं. मग अचानक लेखाची मागणी येते. ‘तुम्हाला आवडेल त्या विषयावर द्या,’ असा संदेश आला, की समजायचं, आपल्या मजकुराचं महत्त्व दोन जाहिरातींच्या मध्ये लावायचा काही तरी मजकूर इतकंच आहे. अशा मंडळींनाही मग सस्त्यातले (अर्थात आधी कुठं तरी छापून आलेले किंवा ब्लॉगवरचे) तयार लेखच पाठवले जातात, हे सांगणे न लगे!
काही संपादक वा प्रकाशकांना एखाद्या विषयाला वाहिलेला अंक काढायची खोड असते. अत्यंत विवक्षित व नेमका विषय देण्यात ही मंडळी पटाईत असतात. उदा. चित्रपटसृष्टी असा ढोबळ विषय न देता ‘विसाव्या शतकातील सातव्या दशकातील सिंधी चित्रपटांतील स्वयंपाकघरे’ असा अतिनेमका विषय देतील. आता सांगा, ढोबळ विषयात लेखकाला जशी चौफेर फलंदाजी करता येते, तशी या नेमक्या विषयात करता येईल का? उगाच अभ्यास वगैरे नाही का करावा लागणार? अशा बाउन्सी विकेटवर खेळण्यापेक्षा ‘यंदा मी फार बिझी आहे हो’ असे सांगून चेंडू सोडून देणे फार सोपे! मग काही हौशा-नवशा-गवशा मंडळींचेही फोन सुरू होतात. त्यांना टाळता टाळता नाकी नऊ येतात. अखेर दिवाळी येते. आपण लेख लिहिलेले अंक बाजारात येतात. आपण प्रतिसादाची आणि मानधनाची वाट बघत राहतो. कुठून तरी महाराष्ट्रातल्या आडगावातून एखादे दिवशी फोन येतो आणि लेख आवडल्याचं समोरची व्यक्ती सांगते, तेव्हा तो लेख लिहिल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. मानधनाची मात्र वाटच बघायची असते. तोवर आपण पुन्हा मान खाली खालून पुढच्या फोनची वाट बघत राहतो…
– श्रीपाद ब्रह्मे
या सदरातील लेख…
वाचकांच्या मनात ‘पुढे काय होणार?’ हा तीनाक्षरी प्रश्न जन्माला येण्यातच हेरकथांचं, रहस्यकथांचं सार्थक असतं.