फॉन्ट साइज वाढवा

सोलो प्रवासातली अनिश्चितता मला आकर्षक वाटते! पण हीच अनिश्चितता कधीतरी जीवावर बेतू शकते, याचीही कल्पना मुसाफिराला असायला हवी. ‘जान है तो जहान है’ याची प्रचिती देणारा असा अनुभव मला माझ्या अगदी पहिल्याच सोलो ट्रिपमध्ये आला. मनात जपलेल्या भूतदयेचा विचका करणारा, ध्यानीमनीही येणार नाही असा प्रसंग आयुष्यात ओढवला. तो सांगण्यापूर्वी त्याआधीच्या प्रवासाची पार्श्वभूमी कथन करायला हवी.

तर त्याचं झालं असं, की कसोल फिरून तिथून बस न मिळाल्यामुळे पाठीवर भलंमोठं बॅकपॅकचं धूड घेऊन चार किमी चालत माणिकर्णला पोचलो. इथल्या प्रसिद्ध गुरुद्वारात जाऊन, दर्शन घेऊन दुपारचं जेवण इथल्या लंगरमध्ये आटपलं. पुढे जायच्या कलगा-पुलगा-तुलगा गावांसाठी बरसेनी बसची वाट पाहू लागलो. बस उशिरा मिळाली. शेवटी साडेतीनच्या सुमारास बरसेनीला उतरलो. इथून मी कलगाला जाऊन एक होम स्टे शोधला. मस्त सोय झाली. निसर्गाच्या ओंजळीतल्या या गावातून सहज एक फेरफटका मारून आलो. साडेचार वाजले होते. तसा माझ्या हातात आता वेळ बराच शिल्लक होता. त्यामुळे पुढे ‘पुलगा बघून यावं का?’ या विचारात असताना, माझ्या होमस्टेच्या मालकाला माहिती विचारली, तर तो ‘जाऊन येता येईल!’ असं म्हणाला आणि शेवटी माझी फक्त पाण्या-खाण्यासाठी असलेली छोटी बॅग घेऊन मी त्या दिशेनं मार्गस्थ झालो. जाताना मला मालकानं एक महत्त्वाची खूण सांगितली, की ‘मध्ये एक नाला लागेल तो पार करा’, तेव्हा याच नाल्याची खूण शोधत मी चालत प्रवास सुरू केला. चालतोय-चालतोय पण नाला काही येत नव्हता. शेवटी एक गावकरी मला भेटला, तेव्हा त्यानं, ‘तुम्ही त्यावरूनच आलात..’ असं सांगितलं. आसपासच्या दोन-तीन खुणा ऐकल्या तेव्हा कळलं की, मगाशी मी खळाळून वाहणाऱ्या पार्वती नदीवरचा पूल ओलांडून आलो, त्या महानदीला ही मंडळी ‘नाला’ म्हणतायत! हरकत नाही. ज्ञानात माहितीची भर पडली. प्रवास सुरू झाला. 

स्वप्नवत गाव ‘पुलगा’त पोहचलो! इराणी मुलं-मुली, इतरही परदेशी पाहुणे इथे येऊन अगदी महिनोन् महिने राहतात. गावातून फिरताना एक वूलन जॅकेट मला आवडलं ते विकत घेऊन मी माझ्या लाल बॅगेत टाकलं आणि परतीच्या वाटेवर लागलो. पुन्हा तोच रस्ता, कलगाकडे जाणारा.

चालत-चालत मगाशी जो ‘नाला’ पार केला, त्या पार्वती नदीवरील पुलापाशी आलो. आता हा पूल पार करायचा आणि पुढे मार्गस्थ व्हायचं इतकं आयुष्य सोपं होतं. पण नियतीच्या मनात, कदाचित सीमा ओलांडणारा माझा आत्मविश्वास नियंत्रित करण्यासाठी, मला इथे जबर धक्का द्यावा असं आलं असावं. झालं असं की, मी तो पूल पार करणार इतक्यात; समोरून एक गुराखी त्याच्या दोन पुष्ट गायींना घेऊन पुलाच्या पलीकडल्या बाजूपर्यंत आला. मी बापडा अलीकडे गोमाता बघून थबकलो. त्याआधी जातील मग आपण पुढे होऊ असं माझ्या मनात आलं. पण गुराख्याच्या अंगात ‘अतिथी देवो भव’ संचारलं आणि त्यानं मला ‘भाईजी आप आइये’ असं त्याच्या पहाडी लहेज्यात म्हणत, आधी मी पुढे येण्याची विनंती केली. पूल एवढा रुंद नक्कीच होता, की त्यावरून मी आणि दोन्ही गायी समांतर एकाचवेळी जाऊ शकू. त्याच्या इच्छेज्ञेनुसार मी पुढे आलो, तसं त्यानंसुद्धा गायींना हलण्याची खूण केली. पहिली कपिला शांतपणे माझ्याकडे दुर्लक्ष करून बाजूने छान चालत गेली. मी पुलाच्या मध्यावर आलो. हातात माझी लाल बॅग होती. त्या मागच्या गायीला बहुधा ती खटकली आणि तिनं तिचा आवेशच बदलला. पळून जाता येईल इतकाही रुंद नसणाऱ्या पुलावर ती माझ्या अंगावर धावून आली. तेव्हा मी चमकून माझा हात पोटाशी नेला, म्हणून तिचं तासलेलं तीक्ष्ण शिंग माझ्या हातावरती जोरदार आदळलं. मी ओरडलो, तसा त्या गुरख्यानं तिला मागून ढकललं, तेव्हा ती ‘काहीच झालं नाही..!’ या अविर्भावात पुढे निर्विकार निघून गेली. गुराखी फक्त मला ‘शॉरी भाईजी’ असं हसत म्हणाला आणि तोसुद्धा तितक्याच निःसंगपणे चालता झाला. 

‘हे माझ्यासोबत आत्ता नक्की काय घडलं’ याच धक्क्यात मी त्या नदीवरील पुलावरती मांडी घालून दुखावलेला हात दुसऱ्या हातात घेऊन बसून राहिलो. हा हात मध्ये नसता, तर त्याच्यामागे पोट होतं! काय झालं असतं मग? हे देवालाच ठाऊक. आता मी घाबरलो होतो. शेवटी त्या धक्क्यातून मी सावरण्याचा प्रयत्न करू लागलो. साडेसहा वाजून गेले. आता लवकर अंधार पडणार याची चिन्ह दिसू लागली. शेवटी धीर एकवटून मी उभा राहिलो. त्या सुन्न एकट्या आणि आता अधिक एकाकी रस्त्यावरून दुखावला हात धरून मी चालू लागलो. मन बिथरलं होतं, त्यामुळे मी येताना लक्षात ठेवल्या खुणाच मला दिसेनाशा झाल्या. मी रस्ता भटकलो. दुष्काळात तेरावा महिना म्हणजे अनेक गाईंचे कळप मला पास होत होते. त्यातल्या जवळ-जवळ सगळ्या गायी जाताना माझ्याचकडे बघत होत्या. त्यांच्या नजरेला नजर भिडवायचं धैर्य मी गमावून बसलो. ‘यातली प्रत्येक गोमाता मला तुडवायलाच येणार’ असच माझं बिथरलं मन मला सुचवू लागलं. कसाबसा निसरड्या रस्त्यावरून मानवी वस्तीत आलो. काही कुत्रे दिसले. उगीच गायी सोडून एखादा प्राणी बघून मनाला दिलासा मिळाला. अंधार गडद झाला. हिमाचलमधली थंडी प्रचंड वाढली आणि शेवटी कशीबशी  वाट सापडून धडपडत होमस्टे गाठला. एक मोठा अपघात दुखापतीवर निभावला. मग पोटभरीचं काहीसं खाऊन, उद्या कुठेच जायचं नाही हा निश्चय करताना पांघरुणात शिस्तीत झोपून गेलो. 

प्रवासाला निघाल्यानंतर ‘आपल्याला फक्त सुखद अनुभव येतील असं धरून चालू नये’, हे मला माझ्या अगदी पहिल्या सोलो प्रवासानं शिकवलं. यापुढे आपण आखीव-रेखीव सहल करायची की सगळ्या शक्यतांना खुली मुशाफिरी, हे त्याच अनुभवामुळे मी निश्चित करू शकलो. ठरल्याप्रमाणे मी दुसऱ्या दिवशी काहीही न करण्यातलं सुख घेतलं. परवाच्या दिवशी मी बुनिबुनी पास नावाचा ट्रेक केला आणि त्यानंतरचा पुढचा प्रवासही सुखरूप झाला.

मला आनंद याचा आहे, की या अशा अनुभवामुळे माझा एकट्या भटकंतीतील रस काही कमी झाला नाही, किंबहुना तो वाढतच गेला आणि आता तर तो माझी आंतरिक गरज बनला आहे. या घटनेनंतर मात्र माझ्या मनात एक भलताच फोबिया निर्माण झाला, त्याला आपण ‘cow fear phobia’ असं म्हणू शकतो. दुधाचे सगळे पदार्थ मला चालतात. फक्त आजही साध्या रस्त्यावर एखादी रवंथ करणारी गाय दिसली आणि तिच्या बाजूनं मला जायचं झालं, तर ‘चार गज की दूरी’ सांभाळून मी तिला ओलांडतो. गमतीशीर आहे, पण एकेकाळी हा व्यवहार जिवावर बेतला होता, हे मी कधी विसरू शकत नाही!

– आदित्य दवणे

RohanSahityaMaifaljpg-1-1

या सदरातील लेख…

‘गोकर्ण’: एक अस्पर्शित जादूनगरी! (एकला ‘सोलो’रे)

अचानक एका मैत्रिणीनं येऊन विचारलं, ‘You coming to Paradise beach?’ या बीचचं नावच मी पहिल्यांदाच ऐकलं…

लेख वाचा…


माणुसकीचे त्यांचे चेहरे!

– कर्नाटकातल्या छोट्याशा गावात एका शाळेच्या सहलीत मी ‘पोरा सम पोर’ होऊन मिसळून गेलो. बदामीला जायचं होतंच, पण मी अनभिज्ञ असलेलं ‘महाकुट मंदिर’ याच सहलीमुळे बघता आलं.

लेख वाचा…


Comments(2)

  • Omkar rokade

  • 2 years ago

  अनुभव ही अशी गोष्ट आहे की ती सर्वांनी अनुभवली पाहिजे ती कश्याची का नसो….??

  • Saurabh Burungale

  • 2 years ago

  एक तर पहिली सोलो ट्रीप आणि तीही थेट हिमाचल मध्ये! खरंच तुमच्या धाडसाचं कौतुक आहे सर. गोमातेसोबत घडलेला प्रसंग वाचताना वाटलं की हे सर्व आपल्या समोरच घडत आहे. त्याने लांबून जरी आपली शिंगे हलवली तरी पोटात गोळा येतो. आता पर्यंत लाल वस्तू दिसल्यावर बैल बिथरतो, रागावतो हे फक्त कार्टून्स मध्ये पाहिलं होतं. तुमच्या लेखामुळे प्रत्यक्षात देखील असं होतं हे आजच समजलं. लेखासोबतचे सर्व छायाचित्र ही फार सुंदर आहेत. नेहमीप्रमाणेच❤?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *