फॉन्ट साइज वाढवा
मला अनेकदा विचारलं जातं, ‘तू एकटा भटकतोस, तुला बोअर नाही होत?’ तेव्हा समोरच्या व्यक्तीला अजिबातच भ्रमात न ठेवता मी उत्तर देतो, ‘हो अगदीच… मला अनेकदा बोअर होतं!’ मग पुन्हा प्रश्न येतो, ‘मग कशाला सोलो जातोस?’ याचं मात्र उत्तर माझ्याकडे नसतं किंवा असलं तरी ते मी त्या मित्रांना देऊ शकत नाही, कारण काही अनुभव तुम्ही घेऊनच पडताळायचे असतात, त्यांची वर्णनं करत बसलं की मग त्यातली जंमत जाते!
असाच एक प्रचंड बोअर अनुभव मी तुमच्यासह मुद्दामून शेअर करणार आहे. जो मला आला ऑरोविल गावात. तामिळनाडूमध्ये चेन्नईपासून दीडशे किमी अंतरावर वसलेलं विलुपुरम जिल्हातील हे गाव – ‘ऑरोविल’. श्री अरविंद यांची शिष्या मिरा असफाई ज्यांना ‘The Mother’ असं संबोधलं जातं त्यांनी १९६८मध्ये या गावाचं निर्माण आर्किटेक्ट रॉजर अँगर यांच्या साहाय्यानं घडवून आणलं. धर्म-जात-पंथ यांच्या सीमा ओलांडून माणसातल्या माणसाला एकत्र आणणारा हा प्रकल्प, ही experimental township खरोखर विलक्षण आहे. त्या कमानीच्या आत प्रवेश करताना एका स्वप्नातल्या जगात आपण प्रवेश करतोय का? आणि बाहेर पडताना पुन्हा आपण सत्यात येतोय, असा अनुभव आपल्याला येत राहतो. अर्ध्याहून अधिक परदेशी नागरिकांनी व्यापलेली ही जागा म्हणजे जगभरातल्या संस्कृतींचं अनोखं संमेलन आहे यात शंका नाही.
आणि हेच सारं मी अनुभवायला खास चार दिवस काढून इथे येऊन राहिलो. इथे दोन प्रकारचे निवास आहेत, एक म्हणजे तुम्ही कमानीच्या आत ऑरोविल गावात राहू शकता किंवा त्याच्या कडेवर वसलेल्या काही हॉटेल्स, होस्टेलमध्ये राहू शकता, मी बाहेर एका हॉस्टेलमध्ये राहिलो. ऑरोविल गावातील प्रमुख आकर्षण म्हणजे तिथलं मेडिटेशन सेंटर, जिथे तुम्हाला तुमचा स्लॉक बुक करावा लागतो, जो मला बुकिंग्ज फुल्ल असल्यामुळे मिळाला नाही. आणि इथेच नकार घंटा सुरू झाली. या प्रवासानं एक गोष्ट मला शिकवली ती ही की, ‘अपेक्षा केली की अपेक्षाभंग होतो!’ जे मी ऑरोविलबद्दल वाचलं, ऐकलं त्यानं एका अनुभवाची अपेक्षा मनात तयार करून मी त्या ठिकाणी गेलो. अपेक्षांचे उंचचउंच मनोरे मी मनात रचले जे काही कारणांमुळे सत्यात उतरू शकले नाहीत. यात माझ्याच नियोजनाचा दोष अधिक हेही मला मान्य करायला हवं. मी या चार दिवसांसाठी एक सायकल भाड्यावर घेतली आणि तिच्यावरच या सगळ्या गावातून आडवा-तिडवा हिंडत राहिलो.
मला सर्वप्रथम या देखण्या जागेनं दिलेला आनंद प्रथम आपल्यासह शेअर करू दे. इथले पहिले दोन दिवस मी संपूर्ण ऑरोवील एक्स्प्लोअर केलं. गावाचा नकाशा खिशात घेऊन अनेक वर्कशॉप्स, उद्यानं, कॅफेज मी अनुभवले. या दिवसात काही लंडन, रशिया, चेन्नईचे मित्र झाले त्यांच्यासह पिझ्झा पार्टीत सहभागी झालो, एका अनोख्या इंटरअक्टिव्ह इव्हेंटमध्ये मी सहभाग घेतला. इथलं मेडिटेशन सेंटर म्हणजे तोच चित्रात दिसत आहे तो देखण्या वास्तुकलेचा अनोखा नमुना – हा सोनेरी गोळा, ज्यांना मेडिटेशन करायचं नाही, जे असेच जाता जाता बघायचं राहून जाऊ नये म्हणून फक्त ऑरोविलला येऊन टेकले आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांना माझ्यासरखा स्लॉट मिळाला नाही त्यांच्यासाठी दुरून बघण्याची सोय केली आहे, शेवटी तिथे जाऊन काट्यावर बसलो आणि या सुंदर दोन दिवसांची सांगता झाली. त्याच काट्यावर मला प्रश्न पडला माझं इथलं बुकिंग आणखीन दोन दिवस आहे, माझ्याकडे सायकलही असणार आहे, पण आता नक्की करायचं काय? ऑरोविलनंतर पुढे आणखीन दोन दिवस जवळच मी पाँडिचेरीला जाणार होतो, तिथेही बुकिंग नक्की झालं होतं आणि पुढे तिथूनच माझी मुंबईची गाडी होती. काही गडगंज सज्जन असतात जे असा पेच आला की सरळ केलेल्या नियोजनावर पाणी सोडून तडक विमान गाठतात आणि घरी पोहोचतात, पण एवढा माज माझ्याच्यानं आजही होत नाही, जो अर्थातच तेव्हाही मला शक्य नव्हता! शेवटी काहीतरी होईल असं मानून मी ते उरलेले दोन दिवसही तिथेच त्या गावात राहूनच काढण्याचा विचार केला आणि कट्यावरून उठलो.
विदेशी मित्र पुढच्या वाटेवर मार्गस्थ झाले होते आणि हॉस्टेलमध्ये रटाळ घट्ट चेहऱ्याची कानडी मुलं आली होती, जी त्यांची त्यांच्यातच मग्न होती. मी इतर वेळी जरी कवी असलो, तरी मला एकदाही माझ्या सोलो प्रवासात कविता सुचलेली नाही, हा माझा इतिहास आहे. शेवटी तरीही मी काही लिहायचा प्रयत्न केला, वाचायचा प्रयत्न केला, बाहेर जाऊन सायकल हाकून आलो तरी दिवस अर्ध्याच्याही वर सरला नव्हता. आणखीन चाळीस तास मला असे काढायचे होते. इतका कंटाळा मला यापूर्वीच्या कुठल्याही सोलो भटकंतीत आला नव्हता. मी उबलो होतो. आणि अक्षरशः या दोन दिवसांनी मला निष्क्रिय अर्थानं थकवलं. ‘Sitting silently, doing nothing, and the grass grows by itself’ किंवा निष्कर्मयोग वगैरे बोलायला, ऐकायला छान वाटलं तरी प्रत्यक्षात ते उतरावं इतकी साधना माझी नव्हती. शेवटी एका क्षणाला मी सारं स्वीकारूनच टाकलं आणि तेव्हा मात्र मला माझ्यावरच हसू आलं, माझ्यातल्या मीनं मला टाळी दिली.
संध्याकाळ होत आली. शेवटी सायकल काढून मी बघितलेल्या जागा पुन्हा एकदा पाहून आलो. या काळात आश्चर्यकारकरीत्या माझी कुणाशी ओळख झाली नाही, किंबहुना मला ती करावीशी वाटली नाही. मग शेवटी दुसऱ्या उरलेल्या दिवसात हॉस्टेलवरच पडून राहून कंटाळाही एन्जॉय केला. गाणी ऐकली, काढलेले फोटो एडिट केले, मनाला रुचेल तसं खाल्लं; एकंदर काय मी मुंबईत, महाराष्ट्रात अनेकदा कंटाळलोय, परंतु माझ्या आयुष्यात तमिळनाडूत कंटाळण्याचा योग आला नसता, जो ऑरोविलमध्ये केलेल्या जास्तीच्या वास्तव्यामुळे जुळून आला, हीच मुळात किती सुंदर गोष्ट होती. ऑरोविलचे रस्ते मी तिथे पुढे आणखीन चार महिने राहून गाइडचं काम करू शकतो इतके पाठ झाले.
दुसऱ्या दिवशी अजिबातच वेळ न दवडता तिथून जवळच असणाऱ्या पाँडिचेरीला निघालो. सायंकाळी तिथल्या श्री अरविंदांच्या समाधी दर्शनासाठी गेलो आणि गेल्या दोन दिवसांच्या कंटाळ्याचा क्षण एका क्षणात नाहीसा झाला. आमचे मोबाइल बाहेरच काढून घेतले गेले, मी आत शिरलो, पुस्तकांच्या प्रदर्शनातून पुढे जात समाधिस्थळी आलो. आयताकृती समाधी कधीही न पाहिलेल्या अशा विविध रंगाच्या फुलांनी भरगच्च सजली होती, सायंकाळी आभाळाच्या सावलीखाली तिथे एकवटली शांतता एक वेगळीच अनुभूती देत राहिली. लोक एका रांगेत संथ पुढे जात समाधीचं दर्शन घेऊन परत फिरत होते, काही कोपऱ्या-कोपऱ्यात ध्यानाला बसले होते. मला ओरोविल मध्ये स्लॉट न मिळाल्यामुळे त्या वातावरणात ध्यान करण्याची इच्छा राहून गेली होती आणि इथे भरून उरलेल्या शांततेनं मला ध्यानाचा बुलावा आला. उजेड संपत अंधार भरत चालला असे रंग वर आकाशात होते, त्याखाली श्री अरविंद यांच्या समाधिस्थळाभोवती एका कोपऱ्यात मी ध्यानाला बसलो आणि माझं थोड्याच वेळात ध्यान लागलं. गेलेल्या दिवसांच्या तुलनेत आत्ताचा हा क्षण मला शब्दात वर्णन करता येणार नाही इतका आणि असा आनंद देऊ लागला. पुढल्या अर्ध्या तास मी त्या वातावरणाशी एकरूप होऊन गेलो आणि एका वेगळ्याच मनःस्थितीत डोळे उघडले, बाहेर पडलो आणि राहण्याच्या ठिकाणी परतलो.
दिवस संपला होता. हॉस्टेलमध्ये बंक बेडवर आडवं होताना संपूर्ण प्रवास डोळ्यासमोरून सरकत पुन्हा पुन्हा तो भरागच्च फुलांनी भारलेल्या समाधीपाशी येऊन थांबत होता. मुळात असे सगळ्या पद्धतीचे अनुभव येणार हे गृहीत धरूनच या प्रवासाला पहिल्यापासून सुरुवात केली होती, त्यामुळे काल परवा आलेला कंटाळा आणि आजची लागलेली समाधी या एकाच आनंदाच्या दोन बाजू आहेत का? असा प्रश्न माझ्या मनात डोकावून गेला. लांबच्या प्रवासात अनेकदा कुणीच बरोबर नसतं, अनेकदा येणारी गाडी दोन-चार तास उशिराने धावत असते, एखादं स्थळ बघायला जावं तर ते अचानक बंदच असतं, नियोजन फसतं, मिळणारी सोबत अनेकदा सुरुवातीला इंटरेस्टिंग वाटते, पण नंतर कटकट होऊन बसते, कधीतरी हॉस्टेल्समध्ये जागाच उपलब्ध नसते, अशा प्रवासात भूक लागल्यावर मिळणारं जेवण भलतंच ‘थोर’ असतं, पण हे सारंच गोड मानून या प्रवासात नवनवे पल्ले तुम्हाला गाठायचे असतात. हाच प्रवास शिकवतो, तुम्हाला आतून लवचिक करतो. तुम्ही नंतरच्या तुमच्या दैनंदिन जीवनात कमीत कमी तक्रारी करू लागता, इतरांना वाटणाऱ्या समस्या तुमच्या करता ‘किस झाड की पत्ती!’ ठरतात. तेव्हा असे अनुभव येऊ द्यावेत, त्यांना उगीच जबरदस्ती थोपवू नये, कारण ध्यानाचा योग कुठे कसा जुळून येईल हे कुणालाच सांगता येत नाही…!
– आदित्य दवणे
या सदरातील लेख…
‘गोकर्ण’: एक अस्पर्शित जादूनगरी! (एकला ‘सोलो’रे)
अचानक एका मैत्रिणीनं येऊन विचारलं, ‘You coming to Paradise beach?’ या बीचचं नावच मी पहिल्यांदाच ऐकलं…
लेख वाचा…
– कर्नाटकातल्या छोट्याशा गावात एका शाळेच्या सहलीत मी ‘पोरा सम पोर’ होऊन मिसळून गेलो. बदामीला जायचं होतंच, पण मी अनभिज्ञ असलेलं ‘महाकुट मंदिर’ याच सहलीमुळे बघता आलं.
जान है तो जहान है! (कलगा-पुलगा-तुलगा)
– मी त्या नदीवरील पुलावरती मांडी घालून दुखावलेला हात दुसऱ्या हातात घेऊन बसून राहिलो. हा हात मध्ये नसता, तर त्याच्यामागे पोट होतं!
-त्या खडकांवरील अनघड चित्रांवरून हात फिरवताना मला अबोल-सर्जनशील पूर्वजांना स्पर्श केल्याचा भास झाला, पण त्यापूर्वीचा प्रवास म्हणजे एक दिव्य होतं!
-थंडी कडाडून वाढली आणि मंदिराशेजारील गरम पाण्याच्या कुंडांनी आम्हाला हाक दिली. दोघांचे डोळे एकमेकांकडे बघताना लकाकले.
आचवलांचा फॉर्म्युला आणि वेरूळ-कैलास!
-मंदिराच्या चारही बाजूंनी असणाऱ्या गुहांत भरताचे राज्यारोहण, कृष्णजन्म आणि असे अनेक पौराणिक प्रसंग रेखाटलेले आहेत. जे आपण बघताना, समजून घेताना इतके गुंगून जातो की आपलेच नकळत शिल्प होते, भान हरवते!
Manoj Sangare
Wowwww, inspired… Have a wonderful time ahead with your own self…