फॉन्ट साइज वाढवा
अनुप गंधे आणि त्याच्या ‘वास्तुचित्र’शी माझी पहिली भेट झाली, ती कर्नाटकातल्या एका मित्रामुळे! ‘वास्तुचित्र’च्या पेजवरचे हंपीमधल्या काही ठिकाणांचे अप्रतिम फोटो त्याने आवर्जून बघायला सांगितले. फोटो खरोखरच सुंदर होते आणि हंपीचे आतापर्यंत जे फोटो पाहिले होते, त्यापेक्षा ते खूपच वेगळे होते. त्यात तिथल्या वारसा स्थळांच्या जोडीला अनेक रंग असणारं दिवसाचं आणि रात्री ताऱ्यांनी भरून गेलेलं आकाश होतं, प्रचंड मोठ्या पाषाणांची, टेकड्यांची रौद्र सुंदरता होती, या रौद्रतेला प्रवाहीपण देणारी एका लयीत वाहणारी तुंगभद्रा होती, छाया-प्रकाशाची रांगोळी होती. ते फोटो पाहिल्यावर मी ‘वास्तुचित्र’ नियमितपणे बघू लागले. तिथे प्रत्येक वेळी नवीन नवीन वारसास्थळांचे सुंदर फोटो बघायला मिळू लागले. जरा शोध घेतल्यावर या फोटोंमागची ‘नजर’ अनुपची आहे, हे समजलं. जेव्हा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अवलिया माणसांवर या लेखमालिकेत लिहायचं ठरवलं, त्यावेळी अनुपचं नाव त्या यादीत वर असणं अगदीच स्वाभाविक होतं.
शिक्षण आणि व्यवसायाने आर्किटेक्ट असणाऱ्या आणि अॅनिमेशनच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अनुपला नुसतं ‘फोटोग्राफर’ म्हणणं योग्य ठरणार नाही. तो ‘व्हिज्युअलायझर’ आहे…. त्यामुळे त्याच्या कॅमेऱ्याची लेन्स फ्रेममध्ये अनेक गोष्टी अशा टिपत असते, ज्या सहजपणे आपल्याला दिसत नाहीत किंवा कदाचित लक्षातही येणार नाहीत. अनुप आर्किटेक्चरल आणि हेरीटेज फोटोग्राफर-व्हिज्युअलायझर आहे. ‘वास्तुचित्र’ नावाच्या प्लॅटफॉर्मवर त्याने टिपलेले फोटो बघायला मिळतात.
अनुपशी गप्पा मारणं हा एक वेगळाच अनुभव असतो. कारण त्याच्यामध्ये एकाच वेळी एक हायटेक तंत्रज्ञ आणि त्याच वेळी कमालीचा सर्जनशील माणूस दिसत राहतो. हे समीकरण फार इंटरेस्टिंग असतं. ‘एखादी फ्रेम कॅप्चर करताना कॉम्पोझिशन फार महत्त्वाचं असतं’, असं तो सांगतो. अनुपच्या व्यक्तिमत्त्वामुळे तंत्र आणि त्या त्या ठिकाणाचं किंवा वास्तूचं देखणेपण या दोन्हीचं कॉम्पोझिशन अचूक साधलं जातं, हे त्याचे फोटो सांगतात.
‘पहिल्यांदा कॅमेरा कधी हातात आला?’ हा माझ्या मनात आलेला पहिला प्रश्न होता. त्याचं कारण अगदीच स्पष्ट होतं. अनुपने टिपलेल्या फोटोत काही तरी विचार असतो, थीम असते. त्याच्या फोटोंत जितकं सौंदर्य असतं, तेवढीच अचूकता आणि नेमकेपणा असतो. स्वाभाविकपणे त्याने फोटोग्राफीचं रीतसर शिक्षण घेतलं असेल आणि कोणत्याही वारसास्थळाचे फोटो काढत असताना त्याची टीमही असेल, असं मला वाटलं होतं. कारण त्याने काढलेले फोटो बघताना त्यामागचे कष्ट लक्षात येतात. अनुप मात्र या सगळ्याचं उत्तर हसत हसत नकारार्थी देतो. ‘माझी टीम वगैरे काही नाही…मी शास्त्रशुद्ध फोटोग्राफी शिकलेलो नाही. पण माझी मी बसवलेली एक विशिष्ट पद्धत आहे, त्यानुसार मी फोटो काढतो.’ कला ही मुळात अंगी थोडी तरी असावी लागते… तरच ती जोपासता येते. वाढवता येते, तिला पैलू पाडता येतात.
अनुप सांगतो, ‘माझ्या घरी सगळेच इंजिनिअर्स! मीच आर्किटेक्चरची वाट निवडली. माझं कॉलेजपर्यंतचं शिक्षण अहमदाबादमध्ये झालं आणि आर्किटेक्चरचं शिक्षण सुरतमध्ये! माझ्या हातात कॅमेरा आला तो मी शाळेत असतानाच! घरच्यांसोबत मी शाळेत असताना राजस्थानला गेलो होतो, तेव्हा माझ्या हातात पहिल्यांदा कॅमेरा आला. तो होता, कोडॅकचा… फिल्मवाला कॅमेरा! फोटो काढून ते डेव्हलप करून घ्यावे लागत. त्यानंतर कॅमेऱ्याची साथ कधी सुटली नाही. आर्किटेक्चर शिकत असतानाही मी भरपूर फोटोग्राफी केली.
‘शिक्षण पूर्ण करून मी पुण्यात आलो आणि माझा व्यवसाय सुरू केला. अॅनिमेशनमध्ये मी काम करत होतो. फोटोग्राफी थांबली नव्हती. पण ‘नॉर्मल फोटोग्राफी’च सुरू होती. कधी प्रवासात, कधी कुटुंबाबरोबर फिरायला गेल्यावर, कधी हौसेने फोटो काढत होतो. अर्थातच त्यात फार काही शिस्त नव्हती किंवा फोकसही नव्हता. पण तेव्हा मी सर्व प्रकारची फोटोग्राफी करत असे. लँडस्केप, वाईल्डलाईफ फोटोग्राफीही मी भरपूर केली. जिथे जिथे भटकंती होत असे, त्यानुसार फोटोग्राफी होत असे. थोडक्यात, ती ‘ट्रॅव्हल फोटोग्राफी’च होती. आतासारखी आर्किटेक्चरल किंवा मोन्युमेंटल फोटोग्राफी नव्हती.’ अनुपने त्या दिवसांत काढलेले फोटोही फार सुंदर आहेत. फ्लेमिंगो असोत, किंवा वाघाचे, जंगलाचे… अनुपच्या लेन्सने उत्तम फोटो टिपले आहेत. त्याच्या फोटोत सगळ्यात प्रकर्षाने ज्या गोष्टी लक्ष वेधून घेतात, त्या म्हणजे रंग, प्रकाश आणि प्रपोर्शन! अर्थात प्रत्येकाची नजर फोटोंत वेगळं शोधत असतेच. कुणाला आणखी काही वेगळं दिसेल.
त्याच्या मोन्युमेंटल फोटोग्राफीची सुरुवात भोरच्या राजवाड्यापासून झाली…. आणि ‘वास्तुचित्र’चा ही जन्म झाला. अनुप भोरचा राजवाडा बघायला गेला होता. त्याच्यातल्या आर्किटेक्टच्या नजरेला तो राजवाडा अधिक जिवंतपणे दिसला. त्याचे दरवाजे, उंबरठे, खांब, दालनं या सगळ्या गोष्टी टिपत असताना त्याच्या मनात विचार आला, की हे स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने बघायला हवंच, पण यामागचं सौंदर्यशास्त्र आणि समृद्ध वारसाही कळायला हवा. अनुपमध्ये सदैव एक आर्किटेक्ट आणि अॅनिमेटर जागा असतोच. फोटोग्राफीमधून आपल्या स्थापत्यातली समृद्धता आणि पारंपरिक शहाणपण भावी पिढीपर्यंत पोचवायला हवं, हा विचार भोरच्या राजवाड्यात टिपलेल्या फ्रेम्सनी त्याच्या मनात रुजवला आणि तोच क्षण त्याच्या आवडीला स्पष्ट मार्ग दाखवणारा ठरला. आता पर्यंतचे चौफेर अनुभव आणि सर्व प्रकारची केलेली फोटोग्राफी यातून त्याने वाट निवडली – आर्किटेक्चरल आणि हेरीटेज फोटोग्राफीची! मोन्युमेंटल फोटोग्राफीची!
अनुपने सर्व प्रथम आर्किटेक्चरल फोटोग्राफीसाठी योग्य असा कॅननचा कॅमेरा खरेदी केला. एकदा त्याच्या मनासारखा कॅमेरा हातात आल्यानंतर त्याचा इतर आवश्यक अभ्यास सुरु झाला. कोणत्या ‘साईट’चे फोटो काढायचे आहेत, कोणत्या ऋतूत काढायचे आहेत, कोणत्या वारसास्थळावर तिथल्या कोणत्या पैलूंवर भर द्यायचा आहे… असा विचार करून त्यानुसार फोटोग्राफीचं वेळापत्रक तो ठरवतो. प्रत्येक ऋतूत एकच ठिकाण पूर्णपणे वेगळं दिसतं. उदा. हंपी (अनुपच्या शब्दांत – ‘फोटोग्राफर्स हेवन!’) पावसाळ्यानंतरचं हंपी वेगळं असतं, तेव्हाचे ढग, नदीचा प्रवाह, टेकड्या वेगळ्या दिसतात. डिसेंबरमधलं हंपी वेगळं असतं, तेव्हाचं आकाश, प्रकाश वेगळे असतात.
अनुप आवर्जून एक गोष्ट सांगतो, ती म्हणजे आर्किटेक्चरल फोटोग्राफीमध्ये सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘शॅडो’! कारण कोणत्याही फोटोत तिसरं डायमेंशन आणायचं असेल , तर ‘शॅडो’ हा सर्वाधिक महत्त्वाचा घटक असतो. त्यासाठी प्रकाशाचा, सूर्याचा अंदाज घ्यावा लागतो, कोणत्या वेळी, कुठे कसा प्रकाश असेल, कुठे सावली असेल याचा अंदाज बांधावा लागतो. इतकंच काय, तर आकाशाचाही अंदाज घ्यावा लागतो, कधी कुठे ढग असतील, किंवा कुठे नसतील, कधी आकाश निरभ्र असेल, कधी ढगाळ असेल – हे सारे अंदाज बांधावे लागतात. वेगवेळ्या अप्सॅवरून तो माहिती घेतो, ढग ‘ट्रॅक’ करतो. आणखी एक गोष्ट तो कटाक्षाने सांभाळतो, ती म्हणजे त्याच्या फोटोत सहसा माणसं किंवा पक्षी किंवा प्राणी पटकन दिसत नाहीत. त्याचा पूर्ण फोकस हा त्या मोन्युमेंटवरच असतो. माणसं, प्राणी, पक्षी किंवा इतर गोष्टी असल्याच तर त्या फक्त त्या विशिष्ट मोन्युमेंटची भव्यता दाखवून देण्यासाठी तुलना म्हणूनच असतात. या सगळ्या गोष्टी सांभाळून मनासारखा फोटो मिळवायला फारच वेळ जात असेल ना, या प्रश्नावर त्याचं उत्तर चकित करणारं आहे. तो सांगतो, ‘प्रत्यक्षात फोटो मी अर्ध्या तासातही काढतो, कधी अंदाज चुकलेच तर मला भरपूर वाट बघावी लागते. असंही क्वचित घडतं. पण फोटोग्राफीमध्ये मनासारख्या गोष्टी टिपण्यासाठी पेशन्स हा तुमच्यात असावाच लागतो. त्याला पर्याय नसतो. कोणत्याही वारसास्थळी लोकांची गर्दी सुरू होण्याआधी मी मोजक्या वेळात फोटो काढतो.’
अनुपची फोटो टिपण्यापूर्वीची तयारी ऐकली तर त्याला पेशन्स म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे, हे लगेच लक्षात येईल. कोणत्याही साईटवर जाण्यापूर्वी आणि तिथे गेल्यानंतर अशी त्याची दोन टप्प्यांत तयारी असते. एकदा साईट ठरली की तो तिचा पूर्ण अभ्यास करतो, त्याबाबतचे अनेक संदर्भ वाचतो, त्या ठिकाणचा इतिहास, भौगोलिक तपशील समजून घेतो, अनेक वर्षांपूर्वी किंवा जेव्हा ते ठिकाण आकाराला आलं, त्यावेळी तिथल्या वास्तू, शिल्पं कशी होती याचा तो अभ्यास करतो कारण आज त्या ठिकाणी अनेक कारणांमुळे काही वारसास्थळांवर पडझड झालेली असू शकते. त्याने आयकॉनोग्राफीचाही अभ्यास केलेला आहे. भारतीय विद्याशास्त्र म्हणजेच इंडॉलॉजीचंही वाचन केलेलं आहे. थोडक्यात कोणत्याही साईटवर जाण्याच्या आधी त्याचा या पद्धतीने अभ्यास झालेला असतो.
त्यानंतर प्रत्यक्ष साईटवर जाऊन तो रेकी करतो. त्यात प्रामुख्याने छाया-प्रकाशाचा अंदाज घेणे, कोणत्या वेळी गर्दी नसेल ती वेळ निश्चित करणे, मुख्य फोटो-सेशनच्या आधी त्या स्थळाचे अनेक फोटो तो काढून घेतो, त्यांचा अभ्यास करून त्याच्या फ्रेम्स ठरतात. कोणत्याही वारसास्थळावर त्याच्या हातात फार कमी वेळ असतो. त्यात अशा ठिकाणी ट्रायपॉड न्यायला परवानगी नसते. त्यामुळे तो ‘फुल फ्रेम कॅमेरा’ वापरतो. त्याचे फोटोही पूर्णपणे हँडल्ड म्हणजेच ट्रायपॉड न वापरता हातातच कॅमेरा धरून काढलेले आहेत. कॅनन 17mm f/4 Tilt Shift लेन्स ही लेन्स तो वापरतो. विशेषतः आर्किटेक्चरल फोटोग्राफीसाठी ही लेन्स वापरतात. फ्रेममध्ये अधिकाधिक स्पेस टिपता यावी यासाठी ही लेन्स महत्वाची आहे. कॅमेरा आणि लेन्सेस बाबत त्याला प्रयोग करून बघायला आवडतं.
ही माहिती थोडी तांत्रिक वाटली, तरी महत्वाची आहे कारण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अनुप एकट्याने या सर्व गोष्टी करत असतो, दुसरी गोष्ट म्हणजे, जसा टिपला, तसा फोटो तो आपल्याला दाखवतो. त्यामुळे पूर्व-अभ्यासाइतकंच अनुपचं तांत्रिक कौशल्यही अत्यंत महत्वाचं आहे. त्याने टिपलेली वास्तू, शिल्पं, आकाश, नदी एक वेगळा अनुभव देतात. आरशासारखी नितळ दिसणारी नदी आणि तिच्या स्तब्ध पाण्यातलं लखलखीत प्रतिबिंब याचं श्रेय तो एनडी फिल्टरला देतो.
तंत्राच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाचं सांगायला हवं. त्याच्या अभ्यास आणि व्यवसायामुळे त्याला कोणतंही ठिकाण फक्त एकाच बाजूने दिसत नाही. त्याला ते सर्व बाजूंनी दिसतं आणि त्रिमिती (थ्रीडी) मध्येच त्याच्या नजरेसमोर येतं. त्याच्या फोटोंत ही नजर अगदी स्पष्ट दिसून येते. त्याच्या व्यवसायाने तयार झालेल्या या नजरेचा आणखी एक फायदा म्हणजे तो एखादं ठिकाण त्याच्या फोटोग्राफीतून रीक्रिएट करू शकतो. उदाहरण सांगायचं झालं तर हंपी मधला तो प्रसिद्ध रथ! या पाषाण रथाला पूर्वी शीखर होतं. ते कालौघात नाहीसं झालं, पण ते असताना तो रथ कसा दिसत असेल, हे पूर्वीच्या फोटोवरून, चित्रांवरून त्याने रीक्रिएट केलेलं आहे. अशी अनेक मोन्युमेंट्स त्याने रीक्रिएट केलेली आहेत. म्हणूनच तो निव्वळ फोटोग्राफर नाही, तर व्हिज्युअलायझर आहे.
त्याने हजारो फोटो आतापर्यंत काढलेले आहेत. सर्वांत आवडता फोटो कोणता, यावर अर्थातच ‘एक नाही अनेक आहेत’ – असं त्याचं उत्तर असतं. तरीही त्याच्या काही फोटोंना विशेष दाद द्यावीशी वाटते. हंपीमधल्या विजय विठ्ठलाच्या देवळाने तर त्याला कायमची मोहिनी घातली आहे. त्याने टिपलेलं मोढेराचं सूर्यमंदिर, तिथल्या सुबक बांधलेल्या तलावातलं कासव, अडलज आणि पाटण इथल्या शिल्पकलेची कमाल अभिव्यक्ती असणाऱ्या विहिरी, पळसनाथचं धरणाच्या पाण्यात गेलेलं आणि क्वचित पाणी ओसरल्यावर दर्शन देणारं सुंदर मंदिर, खिद्रापुरच्या देवळातल्या स्वर्गमंडपाच्या गोलाकार छतातून दिसणारा पौर्णिमेचा तेजस्वी चंद्र, पन्हाळ्यावरचे दरवाजे, मध्यप्रदेशातले नर्मदेचे घाट हे सर्व कमाल आहेत. हे आपण इतरही अनेक फोटोंत बघत असतोच. पण अनुपच्या फोटोतली रानी की वाव खालून वरपर्यंत दिसते. तळातल्या अंधाऱ्या जागेवरून टिपलेली ही वाव प्रकाशात उजळून गेलेली दिसते. पळसनाथ मंदिराच्या मागच्या अंधाऱ्या आकाशात लखलखणारी आकाशगंगा दिसते, हंपीच्या मंदिरामागे तर चक्क उल्कावर्षाव दिसतो.
हे सगळं पाहिल्यावर अनुपच्या शब्दांवर ठाम विश्वास बसतो – ‘A picture is worth thousand words.’
अनुपने टिपलेला प्रत्येक फोटो काही ना काही गोष्ट सांगतो. त्याने निवडलेलं जवळपास प्रत्येक ठिकाण आव्हानात्मक आहे. पण तो म्हणतो, तसं ‘मी कधीही घाई करत नाही. प्रयोग करून बघायला मला भीती वाटत नाही. आपली सर्वच वारसास्थळं चकित करणारी, थक्क करणारी आहेत. ती उभी करणाऱ्या लोकांचा स्थापत्याबरोबरच इतर किती शास्त्रांचा अभ्यास असेल, हे लक्षात येतं. त्यांची भव्यता लोकांपर्यंत नीट पोचवायला हवी असं मला वाटतं. विशेषतः आपल्या भावी पिढीसाठी हे काम व्हायलाच हवं, असं माझं मत आहे. ही ठिकाणं आपल्याशी बोलतात, ते ऐकायचा संयम हवा.’ आपल्या देशात या वारसास्थळांच्या अनेक शैली बघायला मिळतात. हिंदू, बौद्ध, जैन, इस्लामिक वगैरे! प्रत्येक शैलीची खासियत फोटोद्वारे लोकांपर्यंत पोचवायची त्याची इच्छा आहे.
त्याच्या ‘वास्तुचित्र या प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून तो हे काम लोकांपुढे आणत आहे. भारताच्या स्थापत्यशास्त्राच्या या वारश्याचं जतन तो करत आहे. लवकरच यासंदर्भात काही वर्कशॉप्स घेण्याची त्याची योजना आहे. कर्नाटक आणि गुजरातच्या पर्यटनविभागासाठी त्याने काम केलं आहे. त्याचे फोटो इनक्रेडिबल इंडिया, लोनली प्लॅनेट इंडिया, कॅनन इंडिया अशा अनेक मानाच्या प्लॅटफॉर्मवर झळकले आहेत. ‘वास्तुचित्र’ ला आत्ता तीन वर्षं झाली आहेत.
नॅशनल जिओग्राफिकतर्फे दर वर्षी ‘हेरिटेज वीक’ आयोजित केला जातो. त्यानिमित्ताने फोटोग्राफीची स्पर्धा घेण्यात येते. या स्पर्धेत बेस्ट हेरिटेज फोटोग्राफर म्हणून काही फोटोग्राफर्सना गौरवण्यात येतं. हा मान अनुपने पटकावला आहे. गुजरातच्या पर्यटन विभागानेही त्याला वारसास्थळांचा सर्वोत्तम फोटोग्राफर म्हणून सन्मानित केलं आहे. एनडी अॅवॉर्ड्सतर्फे जगभरातल्या फोटोग्राफर्ससाठी एक स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेत अडलज येथील प्रसिद्ध विहिरीच्या त्याच्या फोटोंना सिल्व्हर स्टार अॅवॉर्ड मिळालं आहे. तर हंपीमधल्या प्रसिद्ध पाषाण रथाच्या त्याच्या देखण्या फोटोला इंटरनॅशनल फोटोग्राफी अॅवॉर्डने गौरवण्यात आलं आहे.
आता त्याला कंबोडिया, महाराष्ट्रातले किल्ले, दक्षिणेची मंदिरं इथले फोटो काढायचे आहेत.
‘कोणत्याही उत्तम फोटोसाठी ‘कॉम्पोझिशन’ महत्त्वाचं असतं,’ असं तो सांगतो. तंत्रज्ञानावरची हुकमत आणि सर्जनशील विचारप्रक्रिया यातून हे कॉम्पोझिशन साधलं जातं, हा त्याचा अनुभव आहे. ‘A great image should be one which touches some chord in your heart.’ ही त्याची चांगल्या फोटोची व्याख्या आहे. अनेक वारसास्थळं आपल्याला माहिती असतात, आपण ती बघायलाही जात असतो. पण अनुपच्या फोटोंचा हात धरून गेलो, तर ही मोन्युमेंट्स त्यांची कथा आपल्याला सांगतील, त्यांची श्रीमंती, त्यांनी पाहिलेला, झेललेला काळ, काही पूर्ण तर काही अपूर्ण राहिलेली कारागिरी – आपल्यासमोर उभी करतील. त्या ठिकाणचे ऋतू आपल्याशी बोलतील. अनुपचे फोटो बघून त्या वारसास्थळासाठी आपल्या हृदयाची एक तार झंकारेल, हे नक्की!
-नीता कुलकर्णी
__________________________________________________________
- ‘वास्तुचित्र’च्या माध्यमातून अनुपचे फोटो इन्स्टाग्रॅम, फेसबुक वर बघायला मिळतील. जरूर फॉलो करा.
या सदरातील लेख…
खाद्यसंस्कृतीची संशोधिका : शिल्पा परांडेकर
महाराष्ट्रातल्या ५०० गावांचा प्रवास एकटीने करून शिल्पाने विस्मृतीत गेलेले, जाऊ पाहणारे शेकडो पदार्थ आणि त्यांच्या कृती समजून घेऊन त्यांची नोंद केली आहे.
मल्हार हा मूळ चिपळूणचा! तिथलाच रहिवासी. त्याच्या घरामागे वशिष्ठी नदी वाहाते. त्यामुळे पाण्याची ओढ त्याला जन्मजात आहे….
संधीने दार ठोठवलं तर ते पटकन उघडायलाही अनेकदा धाडस करावं लागतं. योगिनीने ते केलं….
शेतीव्यवसायला नवी दिशा देणारी ‘पल्लवी’
महाराष्ट्राची ही माहेरवाशीण तिथे आसामात शेती आणि शेतीपूरक अनेक व्यवसाय करते.
वास्तुचित्र : वारसा आणि स्थापत्याचे अचूक कॉम्पोझिशन
महाराष्ट्राची ही माहेरवाशीण तिथे आसामात शेती आणि शेतीपूरक अनेक व्यवसाय करते.
वाह… अप्रतिम फोटो ??आणि नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण लेख, नीता ?
अनुपम! वेगवेगळ्या ज्ञानशाखांची माहिती, तंत्रकुशलता
आणि संयम यामुळे अनुपने घेलतेली प्रकाशचित्रे अप्रतिम आहेत. अनुपची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद आणि अनुप याना सदिच्छा!