‘रोहन प्रकाशन’मध्ये जी काही निर्मिती होत असते ती मन लावूनच होत असते. पुस्तकांची सर्वच अंगं सुदृढ असतील याची काळजी घेतली जात असते. ३८-३९ वर्षांची ही परंपरा आहे…निर्मितीचा दर्जा एक एक पायरी पुस्तकागणिक वरच जात असतो. पण गेली काही वर्षं मात्र मनात येत आहे की, आता आणखी वेगळं काय करणार? संपूर्ण भारतातून एकाच प्रकाशकाला दिला जाणारा ‘पब्लिशर ऑफ द इयर’ हा राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कारही २०१४ साली मिळाला आहे. तेव्हा आता आहे ते जोपासूया…
पण नाही….विषय वेगळे येत जातात, लिखाणाचा बाज आणि पोत वेगळा येत जातो…आणि तेव्हा नवं काही करण्याची संधी खुणावत जाते, प्रकाशक म्हणून सर्जनशील उर्मी बाहेर पडू लागतात.
हृषीकेश गुप्ते याचं ‘गोठण्यातल्या गोष्टी’चं हस्तलिखित वाचत गेलो आणि या पुस्तकाच्या निर्मितीची वेगवेगळी चित्रं डोळ्यासमोर नाचू लागली. लिखाणतल्या व्यक्तिरेखा, प्रसंग, तो गोठण्याचा परिसर असं सर्व आकार घेऊ लागलं. पुस्तकात या सर्वांची गुंफण कशी करायची याचं मनात स्वरूप तयार झालं. मी माझ्या टीमला कल्पना दिली. चित्रकार अन्वर हुसेन यांना याबाबत विश्वासात घेतलं. मुखपृष्ठ, आतील चित्रं, सर्वकाही मनातल्या आराखड्यासारखं होत गेलं. मग पुस्तक प्रत्यक्ष मार्गी लावताना मुखपृष्ठ आणि मुखपृष्ठाला व पुस्तकाला जोडणारा आसपास, सुरुवातीची पानं, आतली पानं, चित्रांच्या जागा, योग्य टायपोग्रफी अशा सर्व निर्मितीच्या मुख्य अंगाना चोखंदळपणाची आणि हलक्याशा कल्पकतेची डूब देत गेलो. योग्य कागदाची आणि इतर निर्मिती घटकांची निवड केली. पुस्तक तयार झालं.!
आता प्रश्न होता तो या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम काय साधला जातो याचा. पुस्तक प्रत्यक्ष समोर आलं तेव्हा इतके दिवस अशांत असलेलं मन शांत झालं… नकळतपणे आलेली चेहऱ्यावरची समाधानाची छटा आरशात न पाहताही दिसू लागली.
आज या पुस्तकाला अखिल भारतीय प्रकाशक संघाचा ललित विभागात प्रथम पुरस्कार मिळाला आहे, याचा निश्चितपणे आनंद आहे. या आनंदात मी हृषीकेश गुप्ते, अन्वर हुसेन, ‘टीम रोहन’ सर्वांनाच सहभागी करून घेतो… सर्वांचच यात योगदान आहे.
आजवर अनेक पुरस्कार प्राप्त झाले. काही पुरस्कारांनी विशेष समाधान दिलं. हा पुरस्कारही त्यापैकीच एक…गोठण्यातल्या गोष्टी!
– प्रदीप चंपानेरकर
प्रकाशक, रोहन प्रकाशन
* या पुरस्कारासोबत अ. भा. मराठी प्रकाशक संघाने उपयुक्त या विभागात ‘फ्लर्टिंग विथ स्टॉक्स’ या पुस्तकालाही प्रथम पुरस्कार दिला आहे. हे पुस्तकही निर्मितीदृष्ट्या वेगळे आहे, मात्र त्याविषयी पुढील काही दिवसांत…