मौज प्रकाशन गृहाचे प्रकाशक संजय भागवत यांचं ३ फेब्रुवारी २०१९ रोजी निधन झालं. एक मित्र म्हणून संजयच्या व्यक्तिमत्त्वाचं केलेलं एक अवलोकन… या विशेष मनोगतात.

मे २०१६ मधला एक दिवस. त्या दिवशी संजय ‘विशेष मूड’मध्ये दिसला. म्हणजे, बाह्यांगी तशा ‘मूड’च्या खाणाखुणा नव्हत्या. तशा त्या दिसण्याची शक्यता संजयच्या बाबतीत विरळच. कारण त्याचं व्यक्तिमत्त्वच तसं नव्हतं. कोणत्या प्रतिकूल घटनेने फार खचलेला संजय कधी दिसला नाही, की कोणत्या अनुकूल घटनेने हुरळून गेलेला संजय मी पाहिला नाही. तो स्थितप्रज्ञच होता. अरसिक नक्कीच नव्हता. किंबहुना त्याच्यात जरा जास्तच रसिकता होती. परंतु, त्याची अभिव्यक्ती अगदी ‘सटल’. तर त्या दिवशी मी मुंबईला गेलो होतो. दीर्घकाळ टिकलेल्या दुखापतीच्या फेऱ्यातून बाहेर पडून संजय नुकताच ‘मौज’च्या कार्यालयात रुजू झाला होता. मी फोन करून त्याला विचारलं, ‘‘संजय, भेटायचं का?’’ तो म्हणाला, ‘‘भेटू, पण बाहेर नको, ऑफिसमध्येच ये.’’ आम्ही छानपैकी तास-दीड तास गप्पा मारल्या. स्वत:विषयी स्वत:हून कधीच न बोलणारा संजय नव्या घराचं ‘पझेशन’ मिळाल्याचं स्वत:हून सांगत होता. तो राहत असलेल्या इमारतीचं ‘रीडेव्हलपमेंट’ पूर्ण झालं होतं. संजय, यामुळे एकंदरीत आनंदित होता हे मी टिपू शकलो होतो. ‘नॉर्मल संजय’ भेटल्याची ही शेवटची वेळ. नंतर काही दिवसांतच तो आरोग्याच्या गंभीर समस्यांच्या फेऱ्यातच सापडला.
संजयशी माझी ओळख ३० वर्षांपासूनची, छपाईच्या कामानिमित्त झालेली. नंतर भेटी वाढल्या. संजयशी सूर जुळत गेले व छान मैत्री जमली. त्याचप्रमाणे मी, संजय, विकास परांजपे, अशोक कोठावळे, राजेंद्र मंत्री, दिलीप भोगले असे पुस्तक व्यवहारामुळे जुळले गेलेले मित्र मुंबई-पुण्यात सातत्याने भेटत राहिलो.

बऱ्याच वर्षांपूर्वी मी त्याला एक प्रश्न केला होता, ‘‘संजय, तू ‘बॅकफूट’वर का राहतोस, थोड्या जास्त उमेदीने का नाही उतरत?’’ त्यावर तो म्हणाला होता, ‘‘मी बस पकडण्यासाठी तिच्या मागे धावणारा गडी नाही, मी ‘लंबे रेस का घोडा’ आहे.’’

एके काळी ‘मौज’मध्ये रोहन प्रकाशनाच्या पुस्तकांची पूर्ण छपाई होत असे. त्या निमित्ताने संजयसोबत दीर्घ भेटी व्हायच्या. कधी कधी रात्री उशिरापर्यंत काम चालायचं, तेव्हा संजयशी अनेक विषयांवर चर्चा व्हायची. त्यामुळे संजय मितभाषी आहे, हा समज खोडला जायचा. उलट, संजयला विविध विषयांवर बोलायला आवडायचं. काही जाणून घ्यायलाही तो उत्सुक असायचा, पण त्याच्या पद्धतीने. तो करत असलेली टिप्पणीही मार्मिक असायची. मिष्किल अंगाने तो भाष्य करायचा. त्याची स्वत:ची अशी मतं होती, मात्र ती मांडताना समोरच्यालाही सामावून घेण्याकडे त्याचा कल असायचा. मतांबद्दल तो ठाम असायचा, मात्र ती समोरच्यावर लादण्यासाठी तो आग्रही नसायचा. त्याच्या बोलण्यात मी कधीच आवेश अनुभवला नाही. मात्र याचा अर्थ असा नव्हे की, त्याचा स्वभाव मवाळ होता. सर्वार्थाने ‘लिबरल’, उदारमतवादी असं त्याला संबोधता येईल. एखाद्या उच्चपदस्थाशी किंवा मान्यवर लेखकाशी बोलताना त्याला कधीच दडपण यायचं नाही. त्याच्यात ‘मौज’चं मोठेपण मिरवण्याचा भाव नसायचा. त्याच्या खास शैलीत स्पष्टपणे; पण सहजगत्या बोलायची त्याची ती पद्धत होती. त्याचा तो स्थायीभावच होता. त्यामुळे समोरच्या व्यक्तीचा उपमर्दही व्हायचा नाही, की ती व्यक्ती दुखावलीही जायची नाही. मनाने तो नखशिखान्त निर्मळ होता. काही वेळा तो निरागसच वाटायचा, पण तो मला निर्विकार कधीच वाटला नाही.
परंतु, एक मित्र म्हणून राहून राहून वाटतं… त्याची बौद्धिक क्षमता उत्तम होती, पण ती पणाला लागली का? असा प्रश्न पडतो. त्याने निश्चितपणे काही गोष्टी साध्य केल्या आणि काही उत्तम पुस्तकंही निर्मिली, पण यापलीकडेही पुष्कळ काही साध्य करायची त्याची कुवत होती. टोकदार महत्त्वाकांक्षा किंवा आक्रमकता त्याच्या व्यक्तिमत्त्वातच नव्हती. पण विचार करता असं वाटतं, त्याच्या व्यक्तिमत्त्वातली ही वैशिष्ट्यं राखूनही तो बरंच काही साध्य करू शकला असता.

बऱ्याच वर्षांपूर्वी मी त्याला एक प्रश्न केला होता, ‘‘संजय, तू ‘बॅकफूट’वर का राहतोस, थोड्या जास्त उमेदीने का नाही उतरत?’’ त्यावर तो म्हणाला होता, ‘‘मी बस पकडण्यासाठी तिच्या मागे धावणारा गडी नाही, मी ‘लंबे रेस का घोडा’ आहे.’’ त्याची ही भूमिका मला खूपच आश्वासक वाटली. त्याच्या ‘झाकल्या मूठी’त बरंच काही होतं. पण नंतर असं वाटत राहिलं की, तो ‘रेस’मध्ये पूर्णपणे उतरलाच नाही. असं का व्हावं हे मला तरी एक कोडंच वाटतं. कदाचित वर उल्लेखलेले त्याच्या व्यक्तिमत्त्वातले पैलूच त्याच्या आड आले असावेत. त्यात मागील तीन-साडेतीन वर्षांत संजयला आरोग्याच्या समस्यांनी अक्षरश: ग्रासून टाकलं. वयाच्या साठीलाच हा निर्मळ मनाचा मित्र कायमचा निवृत्त झाला, याचं मनात मोठं शल्य आहेच… पण जीवन-मरण आपल्या हातात नसतं, तेव्हा संजयचं ‘एक झाकली मूठ’ राहणं, ही रुखरुख मनात कायम राहील…

– प्रदीप चंपानेरकर

पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल मार्च २०१९


Pradeep Champanerkar photo
हेही वाचून पहा…

आयुष्य संपन्न करणारे तीन बाबू मोशाय

या तिघांत गुणविशेष असले तरी, त्यांच्या व्यक्तिमत्त्वांत अनेक विसंगतीही होत्या. पण त्याचमुळे नात्यात ‘मनॉटनी’ येत नाही, नाती अधिक दृढ होतात…

लेख वाचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *