सध्याचा ‘करोना-काळ’ हा अनेक प्रकारे सत्त्वपरीक्षा पाहणारा ठरतोय. दैनंदिन जीवन जगण्यात विविध प्रकारच्या अडचणींना, बंधनांना तोंड द्यावं लागतच आहे, परंतु त्याचबरोबर अनेक प्रकारचे मानसिक ताणही झेलावे लागत आहेत. क्वचित प्रसंगी अप्रिय घटनांनाही सामोरं जावं लागत आहे. असाच एक क्वचित घडणारा प्रसंग २५ फेब्रुवारी रोजी ओढवला. माझे उत्तम स्नेही, रोहन प्रकाशनाचे खंदे हितचिंतक, ज्येष्ठ संपादक, पत्रकार व लेखक सदा डुम्बरे यांचं करोनाच्या संसर्गामुळे निधन झालं. वास्तविक पाहता, माझ्या घरात आणि परिचितांत अनेकांना हा संसर्ग झाला. त्यांत काही तरुण, तर काही सत्तरी ओलांडलेलेही आहेत. परंतु ‘मौज’ परिवारातले श्रीरंग भागवत सोडले, तर इतर सर्वचजण या संसर्गातून बरेही झाले. तेव्हा सदा डुम्बरेंसारखी उत्तम प्रकृतिस्वास्थ्य असलेली, आरोग्याबाबत सावधता बाळगणारी व्यक्ती करोनासंसर्गातून सुखरूप बाहेर पडेल अशी मनोमन खात्री होती. मात्र २५ फेब्रुवारी ला सकाळी त्यांच्या मुलीशी, चिनूशी बोललो, आणि मनात चिंतेने घर केलं… सायंकाळी साडेपाच वाजता मुकुंद टाकसाळेचा फोन आला… ‘अरे, सदा गेला…’
मन विषण्ण झालं. डुम्बरेंना करोना-संसर्ग होण्यापूर्वी काही आठवडे या ना त्या निमित्ताने आम्ही सतत संपर्कात होतो. त्यांच्या नाशिक भेटीनंतर भेटायचं, बोलायचं असं ठरलं होतं… नंतर काही दिवसांनी फोन केल्यावर मोबाइल ‘स्वीच-ऑफ’च यायचा. त्यामुळे साधं, ‘रोहन मैफल’च्या फेब्रुवारी अंकासाठी त्यांनी लिहिलेलं ‘माझी निवड’ याबाबतही बोलायचं राहून गेलं… आणि खरं तर इतर बरंच काही राहून गेलं…
१९९३-९४-९५चे दिवस आठवले. मी मुंबईहून पुण्यात स्थलांतरित होण्याच्या प्रक्रियेची ती खडतर वर्षं. ‘रोहन प्रकाशन’ तोपर्यंत भक्कम पाया रचण्याच्या मार्गावर होतं. परंतु सोबत स्थलांतराने निर्माण झालेलं अस्थैर्यही अनुभवत होतं. या मानसिक अस्थैर्याचं महत्त्वाचं कारण असतं स्थलांतरामुळे दुरावलेली माणसं… आपल्या मूळस्थानी जोडून घेतलेली, एकमेकांविषयी आस्था असलेली काही मोजकी माणसंच आपल्या सान्निध्यात असतात. त्यात आता भौगोलिक अंतर पडल्याने मनात नकळतपणे एक प्रकारची असुरक्षिततेची भावना निर्माण होते. पुण्यात आल्यानंतर आस्था असलेल्या माणसांची उणीव भरून काढण्यात सर्वप्रथम कोण होतं, तर ते ‘सदा डुम्बरे होते’ असं निश्चितपणे मला सांगता येईल.
मी आणि माझी (दिवंगत) पत्नी सुजाता ‘साप्ताहिक सकाळ’च्या ऑफिसात नवीन पुस्तकांच्या निमित्ताने जात असू. तेथूनच डुम्बरेंना आम्ही करत असलेल्या कामाविषयी आस्था वाटू लागली. आमच्या दृष्टिकोनाविषयी, काम करण्याच्या पद्धतीविषयी त्यांना अप्रूप वाटू लागलं. आमच्याविषयी मनात विश्वास निर्माण झाला, आणि त्यातूनच आमच्यात कधी स्नेहयुक्त नातं निर्माण झालं ते कळलंही नाही. याच विश्वासाच्या आपुलकीच्या नात्यातून त्यांनी उषा पुरोहित यांच्यासारख्या पाककलानिपुण लेखिकेशी आणि डॉ. वर्षा जोशी यांच्यासारख्या विज्ञाननिष्ठ लेखन करणाऱ्या लेखिकेशी ओळख करून दिली. त्यातून अनेक उत्तमोत्तम पुस्तकं निर्माण झाली. त्याचप्रमाणे ‘सुगरणीचा सल्ला’ या ‘साप्ताहिक सकाळ’मधील कॉलमचं उषा पुरोहित संपादित पुस्तक निर्माण झालं. ‘साप्ताहिक सकाळ’च्या सहसंपादिका संध्या टाकसाळे यांच्याशीही आमची छान मैत्री जुळली. मग संध्या व मुकुंद टाकसाळे, उषाताई व उत्तमराव पुरोहित, वर्षा जोशी अशी छान वर्तुळं जमली. अशी ही पुण्यात आल्यानंतर झालेली काही माणसांची कमाई… परंतु या कमाईत मध्यवर्ती भूमिका कोणाची असेल, तर सदा डुम्बरेंची…
डुम्बरे यांच्याशी स्नेह पंचवीस एक वर्षांचा. एवढ्या वर्षांच्या अवधीत मला डुम्बरे जे काही दिसले, त्या दिसण्यात एक प्रकारचं सातत्य असलेलं जाणवतं. अतिशय सहृदयी, गुणग्राहकता असलेली व्यक्ती. रसिक तितकीच चिकित्सक. त्यांच्यात स्पष्टोक्तीही होती, पण ती मन दुखवणारी, अंगावर येणारी नव्हती. तर हळुवार होती. त्या चिकित्सकतेतून, स्पष्टोक्तीतून काही सूचना मिळायच्या… उत्कृष्ट दर्जाच्या दिशेने एक-दोन पावलं पुढे जायला उद्युक्त करणाऱ्या विधायक सूचना असायच्या त्या.
सुरुवातीला मी म्हटलं आहे, ‘बरंच काही राहून गेलं…’ माझ्या मनात नेहमीच एक शल्य घर करून असतं… कामाच्या व्यस्ततेत, जबाबदाऱ्यांच्या विळख्यात अनेक हव्याहव्याशा व्यक्तींशी मनात वाटत असतात तेवढ्या भेटी होत नाहीत… करोनाने तर त्यावर आणखी मर्यादा आणल्या आणि एका सहृदयी, ‘लो-प्रोफाइल’ राहणाऱ्या हितचिंतकाला, स्नेह्याला अलगदपणे उचललंही… अगदी कल्पना नसताना… मनातली विषण्णता अधिक गडद करत…
– प्रदीप चंपानेरकर
पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल एप्रिल २०२१
संजय भागवत : स्मरणलेख
निर्मळ मनाच्या संजयचं अकाली जाणं….
त्याच्या ‘झाकल्या मूठी’त बरंच काही होतं. पण नंतर असं वाटत राहिलं की, तो ‘रेस’मध्ये पूर्णपणे उतरलाच नाही.