AatmaSwar_madhur jaffrey

‘आत्म’स्वर! – मधुर जाफरी

READING TIME – 6 MINS

मधुर जाफरी हे नाव अगदी पहिल्यांदा ऐकलं, ते एक अभिनेत्री म्हणून! पण हळूहळू या मल्टिटास्कर व्यक्तिमत्त्वाची ओळख होत गेली.

आवडी-निवडी, छंद या गोष्टी पॅशनमध्ये… म्हणजे मनापासून करायच्या गोष्टींत बदलून जाणं ही गोष्ट काही नवी नाही. पण ज्या गोष्टींत किंवा ज्या कामात अजिबात रस नाही, त्या गोष्टींत एखादी व्यक्ती जेव्हा कुशल बनते, आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्यातनाम होते. तेव्हा तो प्रवास वेगळा ठरतो.

मधुर जाफरी यांचा प्रवास असाच आहे. आज त्या परदेशात – विशेषकरून इंग्लंड आणि अमेरिकेत ‘भारतीय स्वयंपाक कलेच्या राजदूत’ म्हणूनच ओळखल्या जातात.

अस्सल भारतीय मसाल्यांतले खास पदार्थ त्यांनी परदेशवासीयांना प्रेमाने रांधून वाढले, खाऊ घातले, भरपूर लेखन केलं.

त्याचंच पुस्तक – ‘Climbing the Mango Trees: A memoir of a Childhood in India.’ आत्मचरित्र नाही. पुस्तकाच्या शिर्षकातच म्हटलं आहे, त्याप्रमाणे या आठवणी आहेत.

या आठवणींचा विशेष म्हणजे त्या रुचकर खाद्यपदार्थांशी आणि निगुतीच्या स्वयंपाककलेशी जोडल्या आहेत. बालपण आणि मोठं होत असताना, वयात येत असताना ज्या अन्नाशी, ज्या पदार्थांशी आपलं नातं जुळलेलं असतं, त्यांचा मेळ घालत असं आठवणीवजा लेखन हीच मूळात एक वेगळी कल्पना आहे.

वाचताना आपण जितकं त्यांच्या लहानपणात रमतो, तितकंच लज्जतदार पदार्थांचा चव, गंध, पोत आपल्या भोवती सतत दरवळत राहतो. या पुस्तकाचं हे मोठं यश आहे.

दुसरा विशेष म्हणजे मधुर जाफरींच्या बहुपेडी व्यक्तिमत्त्वाचे पैलू या पुस्तकात अगदी नकळत उलगडले जातात. या कर्तृत्त्ववान बाईचा परिचय होत जाणं, ही गोष्ट वाचकांसाठीही प्रेरणादायी आहे.

मधुर आपल्या आठवणींची मालिका थेट त्यांच्या जन्मापासूनच करतात. त्या सांगतात, ‘‘माझा जन्म यमुनेच्या तिरावर आजी-आजोबांच्या भल्या मोठ्या घरात झाला. मी जन्मताच आजीने तिची करंगळी मधात बुडवली आणि माझ्या जिभेवर लिहीलं- ‘ओम.’

माझी जन्मकुंडली बधून आमच्या कुटुंबाच्या ज्योतिषाने सांगितलं, ‘हिचं नाव ठेवा – इंद्राणी – सार्‍या स्वर्गाची सम्राज्ञी!’ पण माझे वडील हे असल्या गोष्टींना फार जुमानणारे नव्हते. त्यांनी मला नाव दिलं – मधुर – मधासारखी गोड!’

मधुर यांचा जन्म 1933चा! सहा भावंडातलं पाचवं अपत्य! पूर्वाश्रमीच्या मधुर बहादूर! दिल्ली आणि कानपूरमध्ये त्याचं बालपण गेलं. खूप मोठ्या एकत्र कुटुंबात त्या लहानाच्या मोठ्या झाल्या.

आत्या, काका, बाबाजी, बिजी, भावंड असा सगळा मायेचा गोतावळा! रात्रीच्या जेवणाला चाळीसजणांची पंगत होत असे. घरातल्या सुगरणींच्या कुशल मार्गदर्शनाखाली आणि अंदाजाला सरावलेल्या नजरेखाली बनलेला स्वयंपाक आणि हसण्याखिदळण्यात झालेल्या जेवणाची चव नंतर खूप वेळ रंगत राहणारी!

मधुर यांचं कुटुंब संपन्न होतं आणि कॉस्मोपॉलिटनसुद्धा! हिंदू-मुस्लिम आणि पंजाबी अशा तीन संस्कृतींचा हा मिलाफ होता. तीनही संस्कृतीतल्या खाद्य परंपराही स्वयंपाकघरात एकत्र नांदत होत्या.

भारतासाठी तो काळ सोपा नव्हता. स्वातंत्र्याचा आनंद आणि फाळणीचं दु:ख दोन्ही गोष्टी अगदी समोर वाढून ठेवल्या होत्या. या सगळ्याबाबत लिहीतांनाही मधुर यांच्या लेखनाने ठहराव सोडलेला नाही. त्यांच्या लेखनात बालपणीच्या सुरम्य आठवणींचा निरागसपणा जराही सुटलेला नाही.

त्यांचं कुटुंब, मित्र-मैत्रिणी, पौगंडावस्थेत पदार्पण करतानाचे कडू-गोड अनुभव, ऋतुचक्राचे रंग, घरादारावर बाबाजींची असणारी करडी नजर- या सगळ्या गोष्टींबद्दल मधुर यांनी फार फार जिव्हाळ्याने लिहिलं आहे.

जेव्हा त्या पदार्थांबद्दल आणि पाककलेबद्दल लिहीतात, तेव्हा त्यांची लेखणी अधिक तळपली आहे, असं म्हटल्यास चूक ठरणार नाही. त्यांच्या ‘बडी कोठी’ मधल्या या धमाल आठवणी जरी स्वयंपाकाशी, खाण्याशी जुळलेल्या असल्या तरी लहानपणी स्वयंपाकात त्यांना मुळीच रस नव्हता हे वाचताना आपणही थक्क होतो.

स्वयंपाकशास्त्राच्या परीक्षेत बटाट्याचा रस्सा बनवायला सांगितला. मुलींना साहित्य देण्यात आलं. या प्रसंगाबाबत त्या लिहीतात –

“I cut up everything – I found – potatoes, onion, garlic, tomatoes, chillies and coriander … and threw them all into a pot with a little water. I Sprinkled a few spices and salt over the top. And then as I couldn’t bear to look at my bubbling creation and prayed.”

या परीक्षेत मधुर अर्थातच अनुत्तीर्ण झाल्या. पण नंतर अनेक वर्षांनी त्यांचा एक मित्र आणि पाककलानिपुण जेम्स बिअर्ड याला त्याच्या क्लासेसमध्ये मदत करायला म्हणून त्या न्यूयॉर्कला गेल्या.

त्या वर्गात विद्यार्थ्यांना अनेक प्रकारची कॅव्हिआ ए (एका माश्याची अंडी), अनेक प्रकारची ऑलिव्ह ऑइल्स, वेगवेगळ्या प्रकारचं मीट, अशा गोष्टी डोळे बंद करून ओळखायला लागत असे.

ते बघून त्यांच्या मनात पहिल्यांदा विचार आला – ‘चवीला स्मृती असते का?’ आणि तिथून मधुर यांचा बालपणापासूनच्या चवींचा प्रवास सुरू झाला.

तो प्रवास त्यांना कुठल्या कुठल्या आठवणींपर्यंत घेऊन गेला – त्यांना आजोबांनी घेतलेली आणि उत्तम निगराणीने जपलेली आंबा, चिंचा आणि कसल्याकसल्या झाडांची बाग, त्यात तिखट-मीठ-जिरेपूड लावून मिटक्या मारत खालेल्या कैर्‍या आठवल्या.

घरात बनणारे खास पदार्थ, एखाद्या संध्याकाळी तल्लफ आल्यावर बनणारे भज्यांसारखे चटपटीत पदार्थ आठवले.

त्यांच्या हायस्कूल मधल्या आठवणी म्हणजे तर अनेक खाद्य परंपरांचा मिलाफ आहे. हिंदू, मुस्लिम, सिंधी, पंजाबी, मांसाहारी, शाकाहारी – अशा अनेक संस्कृती शाळेतल्या वर्गात एकत्र होत्या.

एकत्र बसून डबा खाणं, एकमेकांच्या डब्यातले पदार्थ चवीने आणि अप्रुपाने खाणं या गोष्टी आनंद देतातच, पण नकळत किती काय काय शिकवतात. याबाबत मधुर यांनी फार छान उत्तम स्वयंपाककला-कुशल लेखिका बनणार, किंवा त्या का बनल्या असाव्यात, हे लक्षात येईल.

त्या सांगतात, की ‘‘माझ्या मुस्लिम मैत्रिणीने आणि मी पदार्थ एकच आणलेला असला, त्याचे घटक पदार्थ, साहित्य आणि तो करण्याची पद्धत जरी एकच असली, तरी त्यातला फरक काय आहे, ते दोन्ही वेगळे का लागतात हे मी ओळखू शकत असे.’’ त्याचं कारण म्हणजे पदार्थ रांधण्याची ऊर्जा आणि लय ही प्रत्येकाची वेगळी असते.

म्हणूनच त्या म्हणतात – “That was the peculiarity of Indian cuisines. There were dozens of traits, habits, and traditions that could be used to define regional foods. But such definitions were never entirely satisfactory.”

स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आणि अर्थातच फाळणीनंतरच्या भारतीय खाद्यपरंपरेबाबत लिहितांना त्यात उत्साहही आहे आणि व्यथाही आहे. पाकिस्तानातून भारतात आलेल्या पंजाबी लोकांनी तंदूर आणले.

एका कुटुंबाने दिल्लीत ‘मोती महल’ नावाचं हॉटेल सुरू केलं. तिथे तंदूरी पदार्थ मिळू लागले. ते लोकप्रिय झाले. पुढे तंदूरी पदार्थ भारतीय खाद्य परंपरेचा अविभाज्य भाग बनून गेले.

मधुर यांचं हे पुस्तक काही विशिष्ट कारणांनी फार खास वाटतं. ते रुचकर बनलंच आहे. त्यांची शब्दांवरची हुकमत विलक्षण आहे. कारण भारतीय पाककलेत पदार्थांत जसं वैविध्य आहे. तसंच वैविध्य पाककलेच्या भाषेतही आहे.

बारीक चिरणे, भरड चिरणे, शिजवणे, वाफ देणे, गरगट करणे, मळणे, तिंबणे, भिजवणे, फोडणीला टाकणे, फोडणी देणे, चरचरीत फोडणी घालणे, भुरभुरणे, कालवणे असे कित्तीतरी शब्द, क्रियापदं, विशेषणं ही भारतीय खाद्यपरंपरेच्या भाषेची खासियत आहे.

सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे भारतीय पाककलेला, पदार्थांना रंग, गंध, चव आणि पेातही आहे. कुरकुरीत भजी असतात, पण पोळी किंवा पराठा खमंग भाजायचा असतो. फोडणीला ‘बेताने’ तेल घालायचं असतं तर भातावर तूपाची धार घालायची असते. मधुर इंग्लिशमध्ये हे सर्व लिहितानाही हा फील उत्तमपणे वाचकाला देतात.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या सगळ्या आयुष्यावर, कामावर ‘पाककला आणि अन्न’ या गोष्टींचा ठसा आहे. या लहानपणीच्या आठवणी आहेत. म्हणून त्या सगळ्याच गोड-गोड नाहीत. त्या काळातले सांस्कृतिक सामाजिक आणि राजकीय संदर्भही खुबीने या लेखनात वीणले आहेत.

त्या जोडीला कौटुंबिक संदर्भही येतात. त्या म्हणतात – “During my childhood, did not occur to me that families came in sizes smaller than 30 people.”

भल्या मोठ्या एकत्र आणि पितृसत्ताक कुटुंबातल्या सुख आणि आनंदाबरोबर योणार्‍या व्यथा, वेदना, दडपण, तणाव, राजकारण याचंही चित्र त्या वाचकासमोर उभं करतात.

तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरात पूर्वापार बनत आलेले 30 पदार्थ त्यांच्या सविस्तर कृतींसह त्यांनी पुस्तकाच्या शेवटी दिले आहेत. त्यात ते प्रसिद्ध दहिवडे, चिंचेची चटणी यांचीही कृती आहे.

प्रिव्हिलेज्ड म्हणावं अशा घरात जन्माला येऊन मोठं होणं ही एक गोष्ट असते आणि त्यातून स्वत:चं भविष्य घडवणं ही आणखी वेगळी गोष्ट असते. मधुर यांचं वेगळेपण आणि कौतुक हेच आहे.

इंडियन फूड गुरू बनण्याआधी त्यांनी अभिनय क्षेत्रात नाव कमावलं. भारत सोडून जाण्यापूर्वी त्यांना पाककला जराही अवगत नव्हती… पण खाण्याची आवड होती.

आईने लिहिलेल्या पत्रांतून त्या पाककला शिकल्या आणि इंडियन फूड गुरू बनल्या. पाककलेत निपुण होण्यासाठी तंत्र जितकं महत्त्वाचं तितकाच उत्साही स्वभावही! तरच तुमच्या हाताला चव येते, हेही त्यांनी अचूक जाणलं. बाकी अवघड काहीच नव्हतं. कारण शेवटी ‘चवीला स्मृती असते. ती विसरता येत नाही.’

या लेखमालिकेत ५ लेख आहेत –
या मालिकेतील इतर लेख वाचण्यासाठी खाली क्लिक करा.
1.‘आत्म’स्वर! – शशी देशपांडे
2. ‘आत्म’स्वर! – मिशेल ओबामा
3. ‘आत्म’स्वर! – इस्मत चुगताई
4. ‘आत्म’स्वर! – मधुर जाफरी
5.
‘आत्म’स्वर! – देवकी जैन

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *