‘लव्ह इन द टाइम ऑफ करोना’ संग्रहातील कथेचा निवडक अंश

नाउ यू सी मी…

मी जागा होतो, तेव्हा साडेसहाचा गजर व्हायला तीन मिनिटं बाकी असतात. सवयीनेच मी घड्याळाकडे पाहतो, पण त्यात काय वेळ आहे हे मला माहीत असतं. नेहमीच मी असा गजर होण्याआधी तीन मिनिटं उठतो. मग नुसतंच बिछान्यात पडून राहतो, आजूबाजूचा कानोसा घेत. प्रत्यक्ष उठण्याचा क्षण लांबवत. मी जागा झालोय हे लक्षात येताच रुडीची शेपटी हलायला लागते; पण मी उठून बसेपर्यंत तोही तसाच पडून राहतो.
मला इतक्या लवकर उठायला आवडत नाही. तीनचार वर्षांपर्यंतचं माझं ठरलेलं रुटीन होतं, ते म्हणजे रात्री दोनला झोपायचं आणि सकाळी आठला उठायचं. सहा तास झोप वॉजन्ट सो बॅड. मी अप्पांसारखा सीए नाही, इलस्ट्रेटर आहे, त्यामुळे घरूनच बरंचसं काम करतो. आता तसं पाहिलं तर गेला महिना- दीड महिना सगळेच घरून काम करतायत; जाणार कुठे. पण माझं तसं नाही. मी बाय चॉईस, ते आधीपासूनच करतो. अ‍ॅट एनी गिव्हन टाइम मला तीन-चार ठिकाणून तरी रेग्युलर जॉबच्या ऑफर्स असतात, आताही आहेत. एक नुकतीच भारतात आलेल्या एका फिल्म स्टुडिओकडून व्हिजुअलायजरच्या जॉबसाठी आहे, एक भारतीय भाषांमधली पुस्तकं इंग्रजीत ट्रान्स्लेट करणाऱ्या एका प्रेस्टीजीअस पब्लिशिंग हाउसकडून आहे, एक मुंबईतल्या पहिल्या तिनात असणाऱ्या एका अ‍ॅड एजन्सीकडून आहे. पण मला हेच बरं वाटतं. आता या सगळ्यांनी ऑफर केलेले पैसे कमी आहेत अशातला भाग नाही, आणि आय’म शुअर मी आणखी मागितले असते, तर ते देण्याइतके हे लोक फ्लेक्झिबलही आहेत. पण मलाच ते नको वाटतं. हवी ती कामं घ्यायची, दिवसाला साताठ तास काम करायचं, उरलेल्या वेळात वाचायचं, फिल्म्स बघायच्या हे माझं रुटीन आहे. हव्या त्या गोष्टी करण्यासाठी मला रिटायरमेन्टनंतर स्प्रिन्ट मारायचा नाही, अप्पांसारखा. गेली अनेक वर्षं माझं रुटीन ठरलेलं होतं. आठला उठल्यावर दोन कप कॉफी आणि सकाळचा टाइम्स संपवून मी नऊ-साडेनऊला माझ्या स्टडीत जाऊन बसायचो, ते बारापर्यंत. मग अंघोळ, जेवण वगैरे उरकून दोनला पुन्हा बसायचो, ते संध्याकाळी सहा-साडेसहापर्यंत. प्रिया एका फिनान्स फर्ममधे काम करते. ती संध्याकाळी घरी यायची तोवर मी कामबिम संपवून खाली वॉकला गेलेला असायचो. हे बदललं ते प्रिया रुडीला घरी घेऊन आली तेव्हा. मग सकाळी लवकर तर उठायला लागतंय, पण रात्री झोप मात्र वेळेवर येत नाही, अशी चमत्कारिक स्थिती होऊन बसलीय.

LITOC-1

मी रुडीला घेऊन फ्लॅटबाहेर पडतो तोवर स्पेअर बेडरूमचं दार बंदच असतं. त्यात काही विशेष आश्चर्य नाही. प्रिया शाळेत असल्यापासून सकाळी सातला उठते. आजवर कधीही त्यात बदल झालेला नाही, आणि आताही तो होईलसं वाटत नाही. आम्ही चक्कर मारून परत येऊ तोवर ती उठलेली असेल. आम्ही रुडीला फिरवण्याच्या वेळा वाटून घेतल्या आहेत. सकाळी मी नेतो, आणि संध्याकाळी ती. जेव्हा जगाचं सारं बरं चाललेलं असतं, तेव्हा रुडीला फिरवायला सकाळी सहा-साडेसहाला एक मुलगा येतो. त्यामुळे रुडीला त्याच्याकडे सोपवलं, की, वाटलंच तर मी पुन्हा झोपू शकायचो. पण सध्या नाही. कुत्री फिरवणारे, गाड्या धुणारे, मेड्स, कोणालाच सोसायटीत शिरण्याची परवानगी नाही. त्यामुळे दुसरा इलाजच नाही.

लिफ्टचं दार उघडल्यावर बाहेर एक कपल ट्रॅकसूट घालून, चेहऱ्याला मास्क लावून उभं दिसतं. मला पाहून ती दोघं इतक्या जोरात मागे होतात की, क्षणभर मी माझ्याही चेहऱ्याला मास्क असल्याची खात्री करून घेतो. पण मास्क असतो. बहुधा ते इफेंक्शनला नसून रुडीला घाबरत असावेत. ती दोघं सोडली, तर लॉबी रिकामीच आहे. काळं कुत्रं नाही. सध्या गार्डनमधे कोणालाच जायला परवानगी नसल्याने आम्ही पार्किंग लॉटमधे शिरतो, तिथे मात्र आम्हाला एक काळं कुत्रं भेटतं, ब्लॅकी. स्ट्रे डॉग आहे, पण रुडीचा मित्रच आहे तो. त्याच्याबरोबर आणखी तीन-चार कुत्री. ही सगळी इथंच राहतात, आणि रुडी आला की त्याला गराडा घालतात. रुडीचं स्नेहसंमेलन सुरू झालं की, त्याला या गोतावळ्यातून बाहेर काढणं मुश्कील होऊन जातं, पण मला सवय आहे. आजही, मी रुडीचा पट्टा धरून त्याला खेचणार एवढ्यात मला लांबवर एक काळं मांजर दिसतं, आणि मी थबकतो.

Ganesh Matakari
गणेश मतकरी

आमच्या पार्किंगमधे मी तरी आजवर मांजर पाहिलेलं नाही. हा सगळा भाग म्हणजे सोसायटीत मुक्काम ठोकून बसलेल्या कुत्र्यांची मालमत्ता आहे. पण या मांजराला कुत्र्यांची भीती वाटतेय असं पाहून तरी वाटत नाही. ते जवळ जवळ येतं, पण कुत्र्यांना जणू ते त्यांच्या आसपास वावरत असल्याचा पत्ताच नाही. एकही जण त्या दिशेला पाहत नाही, की त्या मांजरावर गुरगुरत नाही. वीसेक फुटांवर, मग दहा, मग चार…आता त्याचे दोन्ही पांढरेशुभ्र कान मला स्पष्ट दिसतात आणि आतापर्यंत विसरायला झालेलं ते कालचं स्वप्न मला आठवतं. बिल्याचं स्वप्न!
“बिल्या…’’ मी थोडा मोठ्यानेच पुटपुटतो. आज पंचवीस वर्षं उलटल्यावर माझ्या मांजराच्याच वयाचं दिसणारं हे मांजर बिल्या असण्याची काहीही शक्यता नाही हे लक्षात येऊनही मी त्या दिशेला दोन पावलं टाकतो, तेवढ्यात एका बाजूने शिटी वाजते, आणि झुपकेदार मिशा मास्कमधे दडवलेला सिक्युरिटी गार्ड हातातली काठी त्वेषाने फिरवत कुत्र्यांच्या दिशेने धावत येतो. हा गार्ड इथे नेहमी असतो. मालकांना सलाम ठोकायचे, आणि कुत्र्यांना लाथा घालायच्या, एवढंच त्याचं काम. त्याला धावत येताना पाहून कुत्र्यांची पांगापांग होते. रुडी मात्र जागीच, काहीच न झाल्यासारखा निर्विकार चेहऱ्याने त्या गार्डकडे पाहत राहतो. फ्लॅट ओनर्सच्या कुत्र्यांना बोट लावण्याची गार्डची हिंमत नाही, हे जणू रुडीला माहीतच आहे. मी आजूबाजूला पाहतो. या साऱ्या गडबडीत ते मांजर (बिल्या) अंतर्धान पावलेलं.

सिक्युरिटीचा हा तमाशा मलाही आवडत नाही. पण त्याला सोसायटीच्या ऑर्डर्स आहेत. जमावबंदीबद्दलच्या. माणसांच्या, तसंच कुत्र्यांच्याही. वास्तविक कुत्री एकत्र जमली काय आणि नाही जमली काय. त्यातून नक्की होणारय तरी काय? सध्या माणसांनी एकमेकांपासून दूर राहायचंय, कुत्र्यांनी नाही! पण हे गार्डला विचारण्यात अर्थ नाही. हा प्रश्न त्याच्या पे ग्रेडच्या पलीकडचा आहे. त्याऐवजी मी त्याला दुसराच एक प्रश्न विचारतो, “भैय्या, यहाँपे एक बोका…बिल्ली, बिल्ली देखा क्या? काला कलरका? ये इतना इतना था!’’ मी हाताने बिल्याची साधारण उंची दाखवत माझ्या मराठीमिश्रित हिंदीत त्याला विचारतो. सिक्युरिटी आपल्या मास्कच्या आडून हळूच हसतो. माझ्या हिंदीला नाही. त्याने माझं हिंदी याआधी ऐकलेलं आहे. मग हळूच म्हणतो, “मजाक कर रहे हो, साब? यहाँ बिल्ला कहा से आयेगा? ये पागल कुत्ते जान नही लेंगे उसकी?’’…

– गणेश मतकरी

  • लव्ह इन द टाइम ऑफ करोना
  • आठ कथा, आठ लेखक :
    गणेश मतकरी, नीरजा, श्रीकांत बोजेवार, परेश जयश्री मनोहर, प्रणव सखदेव, मनस्विनी लता रवींद्र, प्रवीण धोपट, हृषीकेश पाळंदे

पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल सप्टेंबर २०२०


रोहन शिफारस

लव्ह इन द टाइम ऑफ करोना

कथा प्रेमाच्या… कथा ओढीच्या…

एका अदृश्य व्हायरसने अख्ख्या जगाचा कब्जा घेतला. सगळंच एकदम स्टॅच्यू होऊन गेलं… Standstill! या अस्वस्थ वर्तमानामध्ये चहूकडे मरणाची दाट छाया पसरलेली असताना मनं कासावीस झाली. प्रेमाचा अंकुर मात्र सोशल डिस्टन्सिंगचा मुलाहिजा न पाळता बेभान पसरत गेला. सगळं जितकं जास्त बंद बंद होत गेलं तितकं कुणीतरी जास्त जवळचं असावं असं वाटू लागलं. या करोनाकाळात वेगवेगळ्या नात्यांमध्ये फुलणारं प्रेम हेच आता नव्याने जगण्याची उमेद देईल?

LITOC-cover

250.00Add to Cart


LITOC-cover
या पुस्तकावर ‘ललित’ मासिकात लिहिलेलं परीक्षण

आठ कथांचा नवरत्न खजिना (सुहासिनी कीर्तीकर)

लॉकडाउन’मधला एकाकीपणा संपवणारा ‘लॉकडाउन’ संपेलच समजा; तरीही हा खजिना न संपणारा…

लेख वाचा…


Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *