‘ग्रेप्स ऑफ रॉथ’ वाचून तीन दिवस उलटले आहेत… एवढ्या काळात सोलापुरात एक थेंबही पाऊस पडलेला नाही. ओथंबून आले आहे; पण बरसून मोकळे होत नाहीये, ते आभाळ आहे का मन? कळत नाही. तीन दिवस सगळे वाचन थांबले आहे. असे याआधी झाले नव्हते.
जमीनीच्या रूपाने आपले सुशेगाद आयुष्य गमावलेले जोड कुटुंब जगण्याच्या शोधार्थ बाहेर पडते त्यांच्या स्थलांतराचा यातनामय प्रवास वाचताना आवंढे दाटले आहेत. या काळात कार्पोरेट फार्मिंगच्या फेजमध्ये सर्वस्व गमावलेली लाखो कुटुंबं अशी रस्त्यावर आली त्याची, त्या काळाची प्रातिनिधिक कथा. जोड परीवारानं विशेषत: मा, टॉम, पा, केसी यांनी मनातली जागा सोडलेलीच नाही अजून. केसी मरून गेलाय, टॉमला पळून जाणे भाग पडलेय. बाकी उरलेले पुराच्या पाण्यापासून थोडे लांब उंचावर एका जुन्या भंगार भरलेल्या गोडाऊनमध्ये येऊन थांबलेत. रोझार्शनच्या न पोसता आलेल्या गर्भाची नुकतीच जमेल तशी विल्हेवाट लावून आलेत सगळे. एक आयुष्य उमलण्याआधीच संपले आहे. पण त्याचा शोक करण्याएवढा वेळ आणि ऊर्जा जोड कुटुंबाकडे उरलेली नाही. सगळे उपासमार, अतिश्रम आणि अस्तित्वभयानं थकून गेले आहेत. तिथं उपासमारीनं मरणाच्या दारात पोचलेले एक बापलेक आधीच आश्रयाला आलेत. रोझार्शन आईच्या सुचवण्यावरून त्या तळमळणाऱ्या मुलाकडे पाहात एक वेगळा निर्णय घेत आपला पान्हा त्याच्या भुकेल्या बापाच्या तोंडांत रिता करते.
कुठेतरी थांबावे लागते, कधी संपणारच नाही असं वाटणाऱ्या प्रवासात. स्टाईनबेक इथं थांबतो. हा कथेचा शेवट नाही अर्थात. कथा अनाहत चालूच आहे, आजपर्यंत. कदाचित उद्या आणि परवाही. सगळीकडे. स्टाईनबेक या आगळ्या, थोडेसे ठीगळ वाटेल अशा, घटनेतून फक्त एक दिशा सूचित करतो. (हा शेवट वादग्रस्त होऊनही अट्टाहासानं त्यानं कायम ठेवला) आपण जगणार आहोत, मिळून लढत जगणार आहोत.
वेगवेगळ्या संदर्भात, काळात, प्रदेशांत युगानुयुगे चालत आलेले हे स्थलांतरसूक्त. त्याची रचना प्रतिभा तितकीच अभ्यासपूर्ण आहे. तीस प्रकरणातल्या जवळपास अर्ध्या एकाआड एक मोठ्या प्रकरणांतून कथानक वाहते होते, तर उर्वरित अर्ध्या छोट्या प्रकरणांतून तत्कालीन परिस्थिती, कथानकाबाहेरचे घटक, इतिहास- पर्यावरणादी स्पष्टीकरणे येतात ज्यातून पुढच्या प्रकरणाची पार्श्वभूमी तयार होते. ही रचना लक्षात आल्यावर मला नंदा खरेंच्या ‘उद्या’ची आठवण झाली. त्यातही खरेंनी ८ प्रकरणांतून काहीशी अशीच रचना केली आहे. तसे काही साम्य नसूनही वाटून गेले, ‘उद्या’ ही कालची ‘ग्रेप्स ऑफ राथ’चीच गोष्ट आहे. अतिसामान्य माणसाचं अस्तित्व डोळ्यासमोर नगण्य होत नष्ट होत जाणं… ‘उद्या’चं कथानक बहुस्तरीय आहे. खरेंना कदाचित सगळंच एकदम सांगायचं आहे, काळातल्या झपाट्यात प्रत्येक मुद्याची वेगळी गोष्ट करण्याइतका वेळ कुठे आहे? तसंही सगळ्यांचा सारांश तर एकच आहे, आपण संपत चाललो आहोत… असंही असेल.
या स्थलांतरितांनीही (कदाचित त्यांच्या पूर्वजांनी) त्यांच्या जमिनी; पूर्वी इंडियन आदिवासींकडून अशाच दमनकारी पद्धतीनं घेतलेल्या. आपल्याकडे कुठल्याही प्रकारे सामर्थ्य येतं तसा लोक भुतकाळ विसरतात, सोईस्करपणे. सध्याची ‘सत्ता’ टिकून राहावी यासाठी येनकेन प्रकारे प्रयत्न करीत राहतात. विधीनिषेध ही परिस्थितीने पिडलेल्यांनी पाळायची गोष्ट होते, कायमच. इतिहास सतत अधिकाधिक भेसूर रूपात पुनरावृत्त होत राहतो.
दोन गोष्टींची या कादंबरी (आणि अनुवादा) संदर्भात आवर्जून नोंद करायला हवी. रॉबर्ट डिमॉट यांची अनेकार्थांनी मूल्यवृद्धी करणारी अत्यंत मौलिक प्रस्तावना (खरंतर ती संपादित स्वरूपात न देता पूर्णच द्यायला हवी होती असे वाटले) आणि अनुवादात मिलिंद चंपानेरकर यांनी ग्रामीण अमेरिकन बोलीच्या जागी केलेला वऱ्हाडी बोलीचा चपखल वापर. याआधी ज्ञानपीठविजेत्या गुरूदयालसिंग यांचा कथासंग्रह वाचला होता. आणि समजा, त्यात अनुवादक वसंत केशव पाटील यांनी ग्रामीण पंजाबीच्या जागी अस्सल ग्रामीण संवाद योजले होते, पण तिथे सांस्कृतिक फरक इतका नव्हता. इथे पदोपदी अमेरिकन संस्कृती आणि भुगोलाचे संदर्भ असूनही ही बोली त्यात खडीसाखरेसारखी विरघळून गेली आहे.(अर्थात मूळ इंग्रजी न वाचल्याने हे अधिकाराऐवजी आस्वादाच्या अंगाने म्हणतोय.)
कालजयी, अभिजात साहित्यकृतींची हरेक काळात बदललेल्या संदर्भात नवी वाचनं संभवतात. अलिकडे पाहिलेल्या उलट्या, सुरक्षित उबदार घरट्यांकडे झालेल्या स्थलांतराचे पडसाद कायम असताना, त्रयस्थपणे सुरक्षित कुंपणाआडून का होईना अनुभवलेले (होय हे केवळ वाचणे नव्हे, मूर्त झालेला साक्षात अनुभव आहे) हे जगण्याच्या शोधातले पार जगातल्या दुसऱ्या टोकाकडे झालेले स्थलांतर अधिकच व्याकूळ करते. या अस्वस्थ वर्तमानात अगदी नेमक्या वेळी समेवर यावे तसा हा अनुवाद आला आहे, त्यासाठी रोहन परिवाराचे आभार मानायला हवेत…
– नीतीन वैद्य
पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल सप्टेंबर २०२०
रोहन शिफारस
दे ग्रेप्स ऑफ रॉथ
लोकाभिमुख अमेरिकन लेखक म्हणून नावाजलेल्या नोबेल पुरस्कारप्राप्त जॉन स्टाइनबेक यांच्या ‘द ग्रेप्स ऑफ रॉथ’ या १९३९ मध्ये सर्वप्रथम प्रकाशित झालेल्या दीर्घ कादंबरीने अमेरिकेतील विस्थापित-स्थलांतरितांच्या समस्येला वाचा फोडली आणि समाज ढवळून निघाला. या वास्तववादी कादंबरीद्वारे त्यांनी या समस्येच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक पैलूंवर मोठ्या सर्जनशीलतेने आणि मानवी दृष्टिकोनातून भाष्य केलं. ही कादंबरी १९३०च्या दशकातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवरील असली, तरी भारतातील विस्थापितांच्या समस्यांबाबत आजही विचारप्रवृत्त करू शकेल अशी आहे. सर्जनशील रचना आणि आगळी संवादशैली या प्रमुख वैशिष्ट्यांनिशी साहित्य क्षेत्रात नवे मापदंड निर्माण करणाऱ्या या कादंबरीचा ‘साहित्य अकादमी’ पुरस्कारप्राप्त मिलिंद चंपानेरकर यांनी साधलेला हा तितकाच प्रयोगशील असा मराठी अनुवाद. लोकांच्या समस्या लोकांसाठी लोकभाषेत व्यक्त करणारी ‘द ग्रेप्स ऑफ रॉथ’.
₹700.00Add to Cart
‘साहित्य अकादमी’ विजेते अनुवादक व लेखक मिलिंद चंपानेकर
यांचा परिचय व पुस्तकं इथे पहा…
‘लोकशाहीवादी अम्मीस…दीर्घपत्र’ या अनुवादित पुस्तकासाठी सर्वोत्कृष्ट अनुवादाचा २०१६ सालचा ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार प्राप्त झाला आहे.