काळाचा महिमा असा की, एकेकाळी ज्या घरात भारतीय स्वातंत्र्यावर चर्चा झडल्या तिथे धाकट्या काकामुळे हिंदी चित्रपटाचे चोरटे स्वर घुमू लागले. छपरीत बसलेल्या आजोबांना हे अजिबात पसंत नसे. त्यांना तसंही संगीताचं वावडंच. आजोबांच्या रामराज्यात, म्हणजेच महात्मा गांधींच्या कल्पनेतल्या देशात हिंदी चित्रपटांवर आणि त्यांच्यातल्या पांचट गाण्यांवर कायम बंदी असणार होती. त्या मोहंमद रफी आणि मुकेशला सक्तमजुरीची शिक्षा ठरलेली होती. पण बेट्या, ह्या जवाहरलाल नेहरूलाच हे सगळं हवं आहे. कशाला हवं ते छातीवर गुलाबाचं फूल? राजाने रसिक होऊ नये, सेवकच राहावं. पण हे कोणाला सांगायचं? आता सगळेच रसिक व्हायला निघालेले दिसतात. एवढी स्वातंत्र्यचळवळ पार पडली. चलेजाव झालं. देश स्वतंत्र झाला. पण आपल्या बाया आणि माणसं कामं सोडून हिंदी गाणीच म्हणताना दिसतात. चरखा चालवण्याऐवजी खिखिखिखि हसतात. टकळी चालवण्याऐवजी सिनेमे बघायला थेटरात गर्दी करतात. बायका नट्टापट्टा करून आणि पुरुष केसांचे कोंबडे काढून रस्त्यावरून जा – ये करतात. बेचाळीसची चळवळ आणि त्या महात्म्याचा त्याग सगळे विसरले.

 Oon Cover BC
ऊन कादंबरीचं मलपृष्ठ

यावं, त्या महात्म्याने परत एकदा जगात यावं आणि ह्या देशाला जागृत करावं. पण तो जर खरोखरच परतून आला तर हे लफंगे राज्यकर्ते त्याचं ऐकतील? हे बेमान हाकलून लावतील त्याला देशाबाहेर. किंवा परत गोळी घालतील त्याला…स्वातंत्र्यासाठी तुम्हाला गांधी हवा, पण ते मिळाल्यानंतर मात्र तुम्ही त्या महात्म्याला विसरून गेलात. अमृतराव आपल्या आयुष्याच्या सायंकाळी स्वत:शी असा प्रक्षुब्ध विचार करत बसून राहत. तेव्हा त्यांची एकापेक्षा एक उच्छृंखल नातवंडं बागेत धुडगुस घालत असत. नेमकं त्या वेळेस नागूताई स्वयंपाकघरात आपल्या सुनांच्या मदतीने पाककौशल्याच्या विविध स्पर्धा आयोजित करत असत. मग अमृतरावांना आपल्या गेलेल्या मुलाची आठवण येत असे. ‘बळवंता हकनाक गेला, त्याला वाचवता आलं नसतं का?’ ते आर्तपणे स्वत:ला विचारत, आणि दु:खाचा सुस्कारा टाकत. मग त्यांना वसंताची आठवण येई. ती कायम राणीच्या आठवणीत घोसळलेली असे. ती हे घर सोडून गेली तरी बेटी…आपल्याला इतकी का आठवते? काय होतं असं तिच्यात? तेज होती पोरगी. वसंता पेलू शकला नाही तिला. अशा मुलींनी तिथे, इंग्लंड-अमेरिकेतल्या मुलांशी लग्न करायला हवं. वाचतो ना आपण तिथले थेर…तिचा विचार आपण करतोय हे जर यशवंताला कळलं तर तो चिडेल. मग तिचा विचार अमृतराव निग्रहपूर्वक मनातून झटकून टाकत. मग त्यांना पमा आठवे. वसंता नागपुरात आला की ती कशी धावून येई! काहीतरी झालं आणि तिने घर टाकलं. बरं झालं. उगाच नस्त्या फंदात वसंता पडत होता. त्यांना काय झालं ह्याची अंधूक कल्पना होती. नागूतार्इंनीच त्यांना कुंदाचा प्रताप सांगितला होता. कुंदाने योग्यच केलं. एरवी वसंताने नसतं कोणाचं ऐकलं. एकदा तेज मुलीशी लग्न करून फसला, आता त्या नटवीशी करून दुसऱ्यांदा फसला असता. बरं झालं, त्याची त्या जाधवांच्या पोरीपासून सुटका झाली ते. मॉडेल मिलमध्ये जॉबर होता तिचा बाप. बेचाळीसच्या आंदोलनात लाठ्या खाल्ल्या होत्या. पुढे बाई आणि बाटलीच्या मागे लागला असं म्हणतात. शेवटी गेला लौकरच. असला माणूस उद्या आपला व्याही राहिला असता? अमृतरावांना हा विचारच असह्य होई. मग ओठाणातून अचानक लताच्या भावगीताचे सूर छपरीत तरंगत येत. आजकाल त्यांना मोठं कौतुक वाटतं ह्या गाण्या-बजावण्याचं. त्यांना म्हणजे नागूताईंना. पण ही लता मंगेशकर, गाते बेटी सुंदरच. मग जिवाचे कान करून ते ऐकू लागले. मात्र आपल्याला भावगीतं आवडतात हे ते कोणाला सांगत नसत.
दिघ्यांच्या घरात बातम्यांसाठी खास विकत घेतलेला तीन बँड्सचा बुश रेडियो, हळूहळू गाण्या-बजावण्यासाठीच जास्त वापरात येऊ लागला होता. रात्रीच्या आठच्या बातम्या संपल्या की, सुरू ह्यांचं गाणं-बजावणं. आता तर पोट्ट्यांनीसुद्धा रविवारी सकाळी ‘बालविहार’ नेमाने ऐकणं सुरू केलंय. आणि बुधवारच्या संध्याकाळी ‘शिशुविहार’. रोज दुपारी एक वाजता ‘वनिता विश्व’ ऐकल्याशिवाय त्यांचा घास उतरत नाही घशाखाली. त्यांचा म्हणजे नागूताईंचा…

  • ऊन
  • लेखक : विश्राम गुप्ते

पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल नोव्हेंबर २०२०


रोहन शिफारस

ऊन

चेटूक’, ‘ऊन’ आणि ‘ढग’ ह्या त्रिधारेतील ‘ऊन’ ही दुसरी कादंबरी.

स्त्री-पुरुष प्रेमातला संवाद विसंवादात रुपांतरीत झाल्यानंतर दिघ्यांच्या घराला घोर लागतो. पण रोजचं जगणं कोणाला चुकलं आहे? ते सर्वव्यापी उन्हात सुरूच राहतं. इथे भेटणारी बाया-माणसं आणि मुलं जगण्याच्या नादावर डोलत मोठी होतात. खूप काही कमावतात, खूप सारं गमावतात. राणी आणि वसंताची दोन्ही मुलं प्रकाश आणि विकास कौटुंबिक प्रेमाची ऊब कमावतात. ऊन या उबेचा लख्ख उत्सव आहे. संक्रमण काळात कौटुंबिक प्रेम हे मूल्यं टिकून राहावं ही ‘ऊन’ची आकांक्षा आहे.

 Oon Cover

300.00Add to cart


Vishram Gupte Photo
कादंबरीकार, समीक्षक विश्राम गुप्ते यांच्याबद्दल अधिक जाणून घ्या…

धर्म, स्त्री-पुरुष नातेसंबंध, मानवी मन, कुटुंबव्यवस्था हे त्यांच्या चिंतनाचे विषय असून यांबद्दल ते आपल्या कादंबरी तसंच ललितेतर लेखनातून चिकित्सा करत असतात.

वाचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *