संभ्रमिताची डायरी…
जाणिवेच्या मागावर मी वयाच्या चाळीशीनंतर जाणं सुरू केलं. हा शोध मी डायरीतून सुरू केला. माझी डायरी मी फक्त माझ्यासाठीच लिहीत नव्हतो; तर त्यातून माझ्यासाठी आणि वीणासाठी, म्हणजे माझ्या बायकोसाठी काही गोष्टी स्पष्ट करणं हा तिचा उद्देश होता. तिची काही पानं मी वीणाला अधूनमधून वाचून दाखवत असे. ह्या डायरीतल्या एका भागाला मी शीर्षक दिलं होतं : ‘एका संभ्रमित तरुणाची डायरी’.
माझ्या लहानपणीच्या आठवणीतला काही भाग मी आज वीणाला वाचून दाखवला. तो ऐकून ती प्रक्षुब्ध झाली. “तुझ्या वेदनांसाठी जी माणसं जबाबदार आहेत त्यांना तू हे का नाही सांगितलंस?” तिने मला विचारलं. “तू तुझा राग दाबून ठेवतोयस. ज्यांनी तुला दुखावलं त्यांच्या विरुद्ध चकार शब्द बोलायचं नाहीस, अशी भूमिका तू घेऊ बघतोयस” असं ती म्हणाली. ह्यावर मी म्हटलं, “मला ह्या सगळ्याबद्दल राग नाही वाटत, फक्त दु:ख वाटतं. कदाचित हाच माझा मूळ स्वभाव असेल. ह्याचा अर्थ असा नाही की मला राग येत नाही. मी खूप तापट माणूस आहे. पण काही बाबतीत माझा राग उफाळूनच येत नाही.” दिवसभरामधल्या बारक्यासारक्या निराशा मात्र मी भयंकर रीतीने व्यक्त करतो. कालपर्यंत दाबून धरलेला सुमारे पंचवीस वर्षं साचलेला तो राग मी लग्नानंतर मोकळेपणाने व्यक्त करू लागलो. ह्या कोंडलेल्या रागाची आणि निराशेची पहिली बळी वीणाच ठरली. रटरटणाऱ्या भावनांच्या अदृश्य प्रेशर कुकरमध्ये पुरेशी वाफ तयार झाली की त्याची शिटी वाजते. माझ्या कुकरमधली ही वाफ लग्नानंतर शिगेला पोहोचली, आणि शिट्यावर शिट्या वाजणं सुरू झालं. पण मी लहान असताना राग हे एक निरर्थक शस्त्र आहे हे मला अबोध पातळीवर जाणवलं होतं का? ते तसं मला जाणवलं हे मी वीणाला सांगितलं.
मी तिला म्हटलं : रागामुळे तुम्ही तुमचं इतरांपासून संरक्षण करू शकत नाही, किंवा त्याद्वारे तुम्ही तुम्हाला जे हवं आहे ते मिळवू शकत नाही हे मला सहा-सात वर्षांचा असतानाच कळलं. कुठल्याही लहान मुलाला राग येणं स्वाभाविक आहे. तो जर घरातल्या घरातच व्यक्त होत असेल तर ते चांगलंच. मुलाचा राग आई ब्लॉटिंग पेपर होऊन शोषून घेते. पण माझ्याजवळ असा ब्लॉटिंग पेपरच नव्हता. म्हणून राग माझ्याजवळ साचून राहिला. आणि पुढे तो अचानक बेभान रीतीने व्यक्त झाला. त्याची एक गोष्ट अचानक आठवली.
मी आठेक वर्षांचा असताना बाबांनी दुसरं लग्न केलं होतं. आमच्या अठरा जणांच्या कुटुंबात त्यामुळे हलकल्लोळ माजला होता. दुसरी आई, म्हणजे कुमारी चंदा जोशी. ही त्या काळी नागपुरातली नामांकित सिनेगायिका होती. ती ऑर्केस्ट्रात लता मंगेशकरची हिंदी आणि मराठी गाणी हुबेहूब लताच्याच आवाजात आणि सुरात गायची. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर ती एक ‘सिलेब्रिटी’ होती. बाबांचा हा दुसरा प्रेमविवाह होता. त्याची शहरात चर्चा होती. त्या चर्चेचा आम्हा दोघा भावांना त्रास झाला. मुलं मलाच ‘लव्ह मॅरेज’ म्हणून चिडवायचे. जणूकाही लव्ह मॅरेज मीच केलं होतं!
त्या दिवसांत लालबहादुर शास्त्री पंतप्रधान होते. एका जाहीर सभेसाठी ते नागपुरात येणार होते. त्यांची मिरवणूक विमानतळापासून शहरात ज्या रस्त्याने येणार होती त्याच रस्त्यावर आमची कुंदाआत्या राहत असे. तिच्या गॅलरीत उभं राहून शास्त्रीजींच्या ताफ्याचं दर्शन लोकांना होणार होतं. ते घ्यायला आमचे बाबा आणि नवी आई त्या ढगाळलेल्या दिवशी कुंदाआत्याकडे जाणार होते. मला पण त्यांच्यासोबत जायचं होतं; पण त्यांनी नाही नेलं मला. तेव्हा मी आयुष्यात पहिल्यांदाच जबरदस्त हट्ट केला. मी खूप रडलो, भेकलो आणि हातपाय आपटून खूप त्रागा करून घेतला. आजी, आणि दोन्ही काक्या माझा तो अवतार गप्प बसून बघतच होत्या. त्यांना खरं तर त्या प्रसंगी नव्या आईची परीक्षा घ्यायची होती. आपल्या सावत्र मुलाचा हट्ट ही बाई पूर्ण करते की नाही, हे तिघींना बघायचं होतं. तिने नाही केला हट्ट पूर्ण. आजी आणि दोन्ही काक्यांच्या मते परीक्षेत दुसरी आईसुद्धा नापास झाली होती.
त्या सायंकाळी आई आणि बाबा माझ्या आकांताकडे दुर्लक्ष करून शास्त्रीजींना बघायला निघून गेले. मग मी दाणदाण पावलं वाजवत माडीवर आलो. तिथे कोणीच नव्हतं. मी एकटाच होतो. मग खूप जोराने रडू लागलो. आश्चर्य म्हणजे तेव्हा मला कोणीच समजवायला माडीवर आलं नाही. कोणी येईल ह्याची मी खूप वाट बघितली. कोणीच आलं नाही. मग मी तिरीमिरीने उठलो. नव्या आईने लग्नानंतर सोबत निळी ट्रंक आणली होती. ती एका कोपऱ्यात ठेवली होती. ती मी उघडली. त्याबरोबर अत्तराचा घमघमाट माझ्या नाकात शिरला होता. त्या ट्रंकेत नव्या आईच्या सुळसुळीत साड्या होत्या. ट्रंकेच्या कोपऱ्यात पुठ्ठ्याचा काटकोनी आकाराचा एक डबा मी बघितला. तो मी उघडला. त्यात तिच्या नव्या लाल-हिरव्या बांगड्या होत्या. त्यांपैकी चार-पाच बांगड्या मी हातात घेतल्या आणि कडाकडा मोडून टाकल्या. तसं करताना नेमका प्रकाश वर आला. त्याने मला त्या बांगड्या फोडताना बघितलं; पण त्यावर तो काहीच बोलला नाही. आपण काही बघितलंच नाही असं त्याने दाखवलं. प्रकाशच्या मागोमाग इतर भावंडं माडी चढून वर आली. पण ती सगळी भेदरलेली होती. कारण माझा अवतारच तसा होता.
त्या संध्याकाळी मी रडून अगदी थकून गेलो. मग मेल्यासारखा निपचित पडून गेलो. अजिबात हललो नव्हतो मी. माझ्या भोवताली वावरणारी भावंडं घाबरून जवळपास येत नव्हती. जाई-जुई, गौरी, डाकडूक आणि मश्टू सतत बडबडणाऱ्या बहिणी, पण त्या सायंकाळी त्यासुद्धा गप्प होऊन माझा आक्रोश बघत होत्या. अतीव निराशेपोटी मी मेल्याचं सोंग करून खूप वेळ पडून राहिलो. म्हणजे तेव्हा मला अगदी मरून जावंसं वाटलं होतं. नाही मेलो. मग रात्र दाट झाली. मला पुढचं काहीच आठवत नाही.
म्हणजे त्या रात्री पुढे खूप काही झालं असेलच. रात्र अधिकच चढली असेल. काक्यांनी मला भावंडांसोबत जेवायला वाढलं असेल. मी जेवलो असेन. मग उशिरा केव्हा तरी आई-बाबा लालबहादुर शास्त्रींना बघून घरी आले असतील. खूप काही झालं असेल. ते होतंच असतं; पण मला ते काही आठवत नाही. सगळ्या गोष्टी आठवत नाहीत तेच बरं. नाहीतरी माणसं वेडीच होतील. एका संपूर्ण आठवणीतले काही निवडक भागच तेवढे आपल्याला आठवत असतात. बहुतेक विसरले जातात. त्या रात्री मी दुसऱ्या आईच्या पाच बांगड्या फोडल्या, मग इतरांचं लक्ष वेधून घेण्यासाठी मेल्यासारखा पडून राहिलो हे नीट आठवतं, पण त्या रात्री जेवणात कुठली भाजी होती हे नाही मला आठवत. त्या रात्री आजी आणि दोन्ही काक्या माझ्यावरून आपसात काय बोलल्या हे नाही आठवत. आजोबा आणि तीन काका माझ्या रडक्या अवताराबद्दल काय म्हणाले हेसुद्धा मला नाही आठवत.
एक मात्र खरं, माझी निराशा, माझा राग, किंवा माझं दु:ख त्या सायंकाळी पहिल्यांदाच मी असं जाहीरपणे व्यक्त केलं होतं. म्हणजे जन्माला आल्यानंतर मूल जितक्या मोठ्याने रडतं तितक्या मोठ्याने मी त्या सायंकाळी रडलो होतो. ‘पोट्ट्याने असा आकांत ह्यापूर्वी कधीच केला नव्हता’ असं आजीने कुसुमकाकीला सांगितल्याचं मात्र मला अगदी आजही आठवतं…
- ढग
- लेखक : विश्राम गुप्ते
पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल डिसेंबर २०२०
रोहन शिफारस
ढग
‘ढग’ ही ‘चेटूक’ आणि ‘ऊन’नंतर त्रिधारेतील शेवटची कादंबरी.
‘चेटूक’मधून सामाजिक, ‘ऊन’मधून कौटुंबिक आणि ‘ढग’मधून व्यक्तिगत… अशा आत्मशोधक जाणिवांचा प्रवास हे ह्या त्रिधारेचं वैशिष्ट्य आहे. ‘मी कोण ?’ हा ‘ढग’चा काळीजप्रश्न आहे. ह्या प्रश्नाचे निनाद काही माणसांच्या मनात कायम गुंजत असतात. पण जगण्याच्या झटापटीत त्याकडे दुर्लक्ष होतं. ढग ह्याच आद्य प्रश्नाशी झुंज देते. ती घेताना आठवणीचा पासवर्ड वापरून ती भूतकाळाच्या गुहेचं दार उघडते.
₹350.00Add to Cart
कादंबरीकार, समीक्षक विश्राम गुप्ते यांच्याबद्दल अधिक जाणून घ्या…
धर्म, स्त्री-पुरुष नातेसंबंध, मानवी मन, कुटुंबव्यवस्था हे त्यांच्या चिंतनाचे विषय असून यांबद्दल ते आपल्या कादंबरी तसंच ललितेतर लेखनातून चिकित्सा करत असतात.