फॉन्ट साइज वाढवा
‘रोहन प्रकाशन’चा बदलयुक्त प्रवास : ५
‘Nothing succeeds like success…’ असं म्हटलं जातं. मराठीत सांगायचं तर, ‘यशस्विता हीच यशाची जननी’ असं म्हणता येईल. पण असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा यशाची व्याख्या नेमकी कोणती, याची आपल्याकडे स्पष्टता हवी. मी पुस्तक प्रकाशन व्यवसायासंबंधी विचार करतो, तेव्हा यशाची व्याख्या ‘विक्री आणि नफा’ इतपत ती मर्यादित राहत नाही. अमुक एक गोष्ट करताना, किंवा अमुक एक पुस्तक प्रकाशित करताना, त्यामागील माझा उद्देश बहुतांश प्रमाणात ठरलेला असतो. एखाद्या पुस्तकाकडून चांगल्या विक्रीची अपेक्षा असते. ती अपेक्षा पूर्ण झाली तर, साहजिकच ते ‘अर्थपूर्ण’ यश ठरणार असतं. दुसरं एखादं पुस्तक प्रकाशित करताना मला त्यातून उत्तम निर्मितीचं पूर्ण समाधान हवं असतं, माझ्यातील सर्जनशीलतेला आव्हान हवं असतं. त्या दृष्टीने मी त्यामागे माझी ऊर्जा, माझा वेळ खर्च करत असतो. कोणत्याही निर्मितीला अनेक अंगं असतात, अनेक कंगोरे असतात. या सर्वांचं मिळून साकार होणाऱ्या निर्मितीचं एक चित्र डोळ्यासमोर असतं. परंतु प्रत्येक घटकावर स्वतंत्रपणे काम चालू असतं. आता असे सर्व घटक एकत्र येऊन एखादं पुस्तक निर्माण होतं, तेव्हा या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम आपल्या विचारबरहुकूम साधला गेला आहे का? ती निर्मिती मूळ विषयाला साजेशी झाली आहे का? ते सर्व घटक त्या निर्मितीत एकरूप होताहेत का? अशा सर्व प्रश्नांनी मनात हुरहुर निर्माण केलेली असते. या सर्व प्रश्नांची शेवटी होकारार्थी उत्तरं आपल्या मनाने दिली, तर इतर गोष्टी गौण ठरतात आणि चांगल्या निर्मितीचं समाधान मिळालेलं असतं. आणि ते समाधान हेच त्या पुस्तकाचं माझ्यासाठी यश ठरतं. काही पुस्तकांमागचा उद्देश आपल्या आवडी-निवडी, आपले विचार-कल जोपासणं हा असू शकतो, तर काही पुस्तकांमागील उद्देश भविष्यकालीन व्यापक विचार, नियोजित बदल घडवण्यातली एक पायरी, असा असू शकतो. असे विविध उद्देश जर त्या त्या निर्मितीत साध्य होत असतील, तर ते काम, ती निर्मिती माझ्या यशाच्या व्याख्येत बसेल.
‘रोहन प्रकाशना’साठी १९९४ ते १९९७ हा कालखंड पुस्तकांमागील असे विविध उद्देश सफल होणारा ठरला व एकामागोमाग ‘माझ्या व्याख्येतील’ यश प्राप्त करणारा ठरला. ती विविध प्रकारची यशप्राप्ती एकमेकांना पाठबळ देती झाली आणि अंतिमत: त्यामुळे त्याची फळंही ‘गुणाकाराने’ अर्थात, अपेक्षेपलीकडची मिळत गेली. म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं, ‘Nothing succeeds like success!’
‘क्रोशाचे विणकाम’ या १९९४ साली प्रकाशित केलेल्या पुस्तकामागे तसं म्हटलं तर ‘माफक व्यावहारिक यश’ हाच उद्देश होता. तो उद्देश अपेक्षेबाहेर सफल झाला. ‘पाहुणचार’ प्रकाशित केलं ते माझ्यातील कलात्मक ऊर्मींना, सर्जनशीलतेला वाव देण्याच्या उद्देशाने. त्या दृष्टीने त्या पुस्तकाच्या विविध घटकांवर एक दृष्टिकोन ठेवून काम केलं होतं. त्या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम साधला जाऊन ती एक ‘उत्कृष्ट कलाकृती’ निर्माण झाली. (हो, पुस्तकनिर्मिती ही एक कलाकृती असू शकते.) माझ्यातल्या कलात्मक ऊर्मी जोजवल्या गेल्या, मला मोठं मानसिक समाधान मिळून गेलं. त्याचबरोबर ‘रोहन प्रकाशन’चं स्थानही उंचावलं गेलं. या निर्मितीला चांगली प्रसिद्धी मिळाली, पुरस्कार मिळाले आणि विक्रीच्या दृष्टीने माफक यशही मिळालं. परंतु हे यश, झालेला अव्यवहार्य खर्च (वेळ आणि पैसा या रूपात) भरून काढणारं यश नव्हतं. त्यामुळे बरंच आर्थिक नुकसान सोसावं लागलं. तरीही ‘ते पुस्तक यशस्वी झालं’ असंच मी म्हणेन, कारण त्यामागील उद्देश सर्वच दृष्टीने सफल झाले होते. त्यानंतर वर्षभराने प्रकाशित झालेल्या ‘लालबहादुर शास्त्री’ या पुस्तकाने मात्र, मला सर्वच प्रकारचं यश दिलं आणि तसा त्यामागचा उद्देशही होता… या पुस्तकाला उत्तम प्रतिसाद लाभल्याने आर्थिकदृष्ट्या ते यशस्वी ठरलं, तसंच या पुस्तकाने नाव दिलं, चांगलं पुस्तक प्रकाशित केल्याचं समाधान दिलं आणि मुख्य म्हणजे मला अभिप्रेत असलेल्या बदलासाठी या पुस्तकाने भक्कम पायाही रचला.
आता यशही मनाला कधी क्लेश देऊन जातं, त्याचा अनुभव पाहू… डॉ. कमला सोहनी या ‘पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ.’ त्यांचं संशोधन मुख्यत्वेकरून आहारातील दैनंदिन जिन्नस, भाज्या, फळं या विषयीचं. त्याबाबत त्यांनी सर्वसामान्यांच्या दृष्टीने प्रयोग केले होते. त्या संशोधनातून व त्यावर आधारित असलेल्या प्रयोगांतून त्यांनी ‘आहार-गाथा’ हे पुस्तक साकारलं. हे पुस्तक प्रकाशित करणं हे माझ्यासाठी बहुमानाचंच होतं. सर्वसामान्यांत फारशा ज्ञात नसलेल्या कमलातार्इंचा आणि त्यांच्या असामान्य कर्तृत्वाचा, कार्याचा परिचय करून देणारा लेख मी स्वत: लिहून, तो मी पुस्तकात समाविष्ट केला. त्यांच्या या पुस्तकाला वर्तमानपत्रं, नियतकालिकांतून मोठी प्रसिद्धी मिळेल, सर्वसामान्यांसाठी अतिशय उपयुक्त व बहुमोल अशा पुस्तकातील ऐवजाला मोठा प्रतिसाद मिळेल अशी माझी अटकळ होती. परंतु तसं काही घडलं नाही. जागतिक मराठी परिषदेच्या ‘इस्रायल येथील संमेलनात’(ऑक्टोबर १९९६) पुस्तक प्रकाशित झालं. ‘रोहन प्रकाशना’ने बऱ्यापैकी जाहिरात केल्याने पुस्तकाला बऱ्यापैकी उठाव मिळाला, इतकंच. परंतु, वर्ष झालं तरी, पहिली आवृत्ती संपली नव्हती. कमलातार्इंसोबत फोनवर होणाऱ्या बोलण्यात पुस्तकाला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल मी फारशा उत्साहाने त्यांना सांगू शकत नव्हतो. नंतर काही महिन्यांनी ‘कमलातार्इंच्या कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली गेल्या’ची बातमी झळकली. दिल्ली इथे २८ जून १९९८ रोजी एका खास कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना गौरवण्यात येणार होतं. मी त्यांचं फोन करून अभिनंदन केलं. सोबत त्यांना पुस्तकाची दुसरी आवृत्ती लवकरच प्रसिद्ध होईल असं सांगितलं. त्यांना आनंद झाला. कार्यक्रम चांगला पार पडला आणि… अघटित घडलं… काही अवधीतच त्या तिथेच कोसळल्या, अनपेक्षितपणे त्यांचं दु:खद निधन झालं. हे सर्व धक्कादायक होतं. (ह्याच अंकात कमला सोहनींचा परिचय करून देणारा लेख अंतर्भूत केला आहे.)
त्यानंतर दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांत कार्यक्रमाच्या आणि कमलाताईंच्या निधनाच्या मोठमोठ्या बातम्या प्रसृत झाल्या. त्यातील अल्पपरिचयात एका ओळीत लिहिलं होतं– ‘‘कमला सोहनी यांनी लिहिलेलं एकमेव पुस्तक म्हणजे ‘आहार-गाथा’.” झालं… या एका ओळीच्या बळावर पुस्तकाला मोठी मागणी आली. पुस्तकाला उशिरा लाभलेलं ते मोठं यशच होतं. परंतु कमलाताई हे यश अनुभवण्यासाठी हयात नव्हत्या, याचं मोठं शल्य मनात साचून राहिलं आहे. समाधानाची एकच बाब होती, ती म्हणजे, जो उद्देश ठेवून कमलाताईंनी पुस्तक लिहिलं होतं, तो उद्देश सफल होत होता… अर्थात, पुस्तक सर्वसामान्यांपर्यंत पोचत होतं. त्यांच्या इच्छेनुसार मी पुस्तकाची किंमत आधीच कमी म्हणजे रु.७५ ठेवली होती. परंतु त्यांना श्रद्धांजली म्हणून मी ती किंमत आणखी कमी करून रु. ६० केली, तशी जाहिरातही केली. माझ्या अंदाजानुसार मी दाखवलेल्या या सौजन्याने लोकांना हे पुस्तक घेण्यास जास्तच उद्युक्त केलं असावं… अशा प्रकारे एकाच अनुभवात ‘शल्य’ आणि ‘यश’ एकत्रपणे नांदण्याचा विक्षीप्त योग मला दिसून आला.
असो, आहार-आरोग्य हा विभाग उत्तमोत्तम पुस्तकांनी बहरत जाण्याचे ‘रोहन प्रकाशना’चे ते दिवस… कमलाताईंसारख्या शास्त्रज्ञ लेखिकेच्या पुस्तकानंतर ‘रोहन’कडे या विभागात आलेलं उल्लेखनीय पुस्तक म्हणजे, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे योगगुरू, योगाचार्य बी.के.एस. अय्यंगार लिखित ‘आरोग्य-योग’. योगविद्येचे गहन अभ्यासक अय्यंगार हे काही कर्मठ गुरू नव्हते. तर, विचाराने प्रागतिक होते. सुदृढ आरोग्यासाठी आणि शरीराच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी योगासनांना त्यांनी सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणलं. (‘सर्वसामान्य’ हा शब्दप्रयोग इथे लवचिक शरीरं नसणाऱ्यांसाठी वापरला आहे.) त्यासाठी त्यांनी योगासनं साध्य करण्याच्या स्वत:च्या पद्धती विकसित केल्या. म्हणूनच त्यांचा योग ‘अय्यंगार योग’ म्हणून जगभर ओळखला जातो.
एका जगविख्यात लेखकाचं हे पुस्तक ‘रोहन’कडे आणण्याचं श्रेय माझे मित्र, ज्योत्स्ना प्रकाशनाचे मिलिंद परांजपे यांच्याकडे जातं. योग हा त्यांच्या प्रकाशनाचा प्रांत नसल्याने ‘रोहन’चं नाव त्यांनी ‘अय्यंगार इन्स्टिट्यूट’च्या प्रतिनिधी उमा ढवळे यांना सुचवलं. गुरुजींच्या ८०व्या वाढदिवशी म्हणजे १४ डिसेंबर १९९८ रोजी त्यांची ‘आरोग्य-योग’ आणि ‘योग : एक कल्पतरू’ ही दोन पुस्तकं प्रकाशित करायची होती. माझ्याकडे तीन-चार महिन्यांचा अवधी होता. वेळ कमी होता. परंतु ते आव्हान स्वीकारून मी पुस्तकं वेळेत मार्गी लावली. गुरुजी आणि त्यांच्या सर्व पदाधिकारी आणि प्रतिनिधींना पुस्तकं अतिशय आवडली. त्यांचा माझ्यावर, माझ्या कामावर दृढ विश्वास बसला. पुढे गुरुजींची आणि त्यांची कन्या गीताताई यांची अनेक पुस्तकं प्रकाशित करण्याची संधी मला मिळत गेली.
इथे गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वाविषयी एक अनुभव आवर्जून सांगावासा वाटतो. योगगुरू म्हणून ते अतिशय कडक आणि तापट होते. परंतु एक व्यक्ती म्हणून ते खूपच प्रेमळ, कनवाळू होते. व्यवहारात ते तर्कसंगत होते. पहिल्या दोन पुस्तकांचं करारपत्र करताना त्यातील काही मुद्द्यांविषयी माझी आणि त्यांच्या प्रतिनिधींची सहमती होत नव्हती. तोपर्यंत गुरुजींशी माझी भेटही झाली नव्हती. मी त्यांची भेट मागितली. भेटीत मी त्यांना माझी भूमिका सांगितली. गुरुजींनी शांतपणे सगळं ऐकलं आणि वेळ न दवडता म्हणाले, “What Mr. Champanerkar says is right. I agree his points. Let us sign the contract.” आंतरराष्ट्रीय कीर्ती लाभूनही त्यांच्यात अहंकार नव्हता. त्यांनी झटपट गुंता सोडवला. मला एका सर्वच दृष्टीने थोर असलेल्या व्यक्तीच्या उमदेपणाची प्रचीती पहिल्याच भेटीत आली. अशी प्रचीती मला पुढे संपूर्ण अय्यंगार परिवारातून येत गेली (परिवारात कुटुंबीय आणि संस्थेचे प्रतिनिधी सर्वांचा समावेश आला) आणि आज त्यांच्या पश्चातही येत आहे. अखेर परिवाराचा प्रमुख तिथे कोणती संस्कृती, कोणतं वातावरण रुजवतो, ते महत्त्वाचं असतं आणि हा वारसा सर्व परिवार सदस्य, पुढची पिढी पुढे नेत राहते हेही एक मोठं यश असतं… नाही का?
-प्रदीप चंपानेरकर
पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल जून २०२१