माझे जीवन… वाचत राहणे !

निरंजन घाटे हे मराठी लेखकांमधलं एक अत्यंत आदरणीय, आघाडीचं नाव आहे. लेखक म्हणून घाटे सुपरिचित तर आहेतच; पण उत्तम वाचक म्हणूनही त्यांची ओळख आहे. कुठल्याही विषयावर आपण लिहायला घेतलं आणि त्याविषयी घाटेंशी बोलणं झालं तर त्यांच्याकडून लगेचच कुठून कोणते संदर्भ मिळतील, कुठल्या पुस्तकात कशावर उत्तम मांडणी झालेली आहे, अशा गोष्टी एकदम पटापट बाहेर येतात. ‘चालता बोलता माहिती-ज्ञानाचा खजिना’ असं त्यांचं वर्णन करता येईल. मराठीत विज्ञानावर उत्तम लिखाण करणारे लेखक म्हणून घाटेंची ओळख सगळ्या महाराष्ट्राला तर जास्तच आहे. अशा निरंजन घाटे यांनी लिहिलेलं ‘वाचत सुटलो त्याची गोष्ट’ हे पुस्तक म्हणजे विविध विषयांमध्ये रस असलेल्या कुणासाठीही अगदी मोलाचा ठेवाच आहे.

Niranjan Ghate

काही लोकांनी काय-काय वाचलं हे आपण वाचल्यामुळेच खूप समृद्ध होतो. घाटे यांचा क्रमांक या यादीत अगदी वरचा आहे यात शंकाच नाही. या पुस्तकामध्ये त्यांनी असंख्य वेगवेगळी पुस्तकं कशी मिळवली त्याविषयी दिलेल्या कहाण्यासुद्धा अगदी रंजक आहेत. एखादा ‘हाडाचा’ वाचकच असं करू शकतो. मागे अरुण टिकेकर यांचं ‘अक्षरनिष्ठांची मांदियाळी’ हे ‘रोहन’नेच प्रसिद्ध केलेलं पुस्तक किंवा सतीश काळसेकर यांचं ‘वाचणा‍ऱ्याची रोजनिशी’ पुस्तकांची या निमित्तानं आठवणही होते. वाचनाविषयीचे महत्त्वाचे दृष्टांतही घाटे अगदी सहजपणे देतात.
उदाहरणार्थ : आपल्या मनोगतातच ‘आपण वाचतोय’ अशी जाणीव मनाशी बाळगली की, वाचनाकडे आपलं दुर्लक्ष होतं हा अत्यंत मोलाचा मुद्दा घाटे मांडतात. म्हणजेच घाटे जणू अगदी सहजपणे आपल्याला सांगून जातात ‘माझे जीवन…वाचत राहणे !’

घाटेंच्या वाचनाला कुठलाही विषय वर्ज नाही. रहस्यकथा, शृंगारकथा ते विज्ञानकथा आणि शब्दकोश हे सगळं त्यांनी पालथं घातलं आहे. यातल्या अनेक पुस्तकांच्या खरेदीविषयीचे त्यांचे अनुभव आणि किस्से अत्यंत वाचनीय आहेत. त्यातून कुठली पुस्तकं कुठे मिळतात, ती स्वस्तात कशी मिळवायची वगैरे गोष्टी त्यांना उलगडत गेल्या. आज लुप्त झालेल्या पुस्तकांच्या अनेक दुकानांविषयी आणि अगदी रद्दीच्या दुकानांविषयीही घाटे ओघाओघात सांगून जातात. कुठल्याही गोष्टीचं वस्तुनिष्ठ आणि परखड परीक्षण करण्याची त्यांची वृत्ती ठिकठिकाणी दिसून येते. पसरवण्यात आलेले अनेक भ्रम दूर करण्यासाठी वाचनाचा कसा उपयोग होतो याचे ते दाखले देतात. इंग्रजीमधल्या लिमरिक्स या वात्रटिकांकडे झुकणा‍ऱ्या प्रकाराला ‘बाष्कळिका’ म्हणावं असं ते सुचवतात. इंग्रजी वाचनाकडे घाटे अगदी लहानपणीच वळल्याचा त्यांना खूप फायदा झाला. अनेक विषयांमधलं उत्तम साहित्य त्यांच्या वाचनात आलं. जगभरामधली उत्तमोत्तम पुस्तकं त्यांनी साठवली व काही वेळा वाचनालयातून मिळवली. या सगळ्याचा त्यांना त्यांच्या लिखाणात खूप उपयोग झाला हे वेगळं सांगायला नकोच. काही यशस्वी लेखक ‘मला लिहायचा शीण आल्यावर मी वाचतो’ असं म्हणतात; त्याची इथे प्रचीती येते. घाटेसुद्धा एवढं कसं काय वाचू आणि लिहू शकतात यामागचं रहस्य कदाचित हेच असावं !

वाचनात रस असलेल्या कुठल्याही माणसाला या पुस्तकात अक्षरश: पानोपानी अनेक पुस्तकांची नावं सापडतील. खास करून आपल्या आवडीच्या विषयामधली कोणती पुस्तकं वाचली पाहिजेत याचं भानही त्यामुळे नक्कीच मिळेल. खास करून या पुस्तकात शब्दकोशांसंबंधीचा तर एक मोठा खजिनाच सापडतो. अत्यंत दुर्मीळ शब्दकोश, निरनिराळ्या प्रकारच्या संदर्भांसाठीचे शब्दकोश हे सगळं या पुस्तकात विस्तारानं येतं. त्याचबरोबर लेखकाच्या कुतूहलाविषयी आणि वाचनाविषयी विचार करून आपण खरोखर थक्क होतो. असाच प्रकार चरित्रं-आत्मचरित्रं यांच्या बाबतीतही घडतो. उदाहरणार्थ : समर्थ रामदासांची तीन चरित्रं घाटेंनी वाचली आहेत! याच्या जोडीला शब्दकोश आणि चरित्रं कशी असावीत याविषयीची भाष्यंही ते करतात.

आपल्या मनोगतातच ‘आपण वाचतोय’ अशी जाणीव मनाशी बाळगली की, वाचनाकडे आपलं दुर्लक्ष होतं हा अत्यंत मोलाचा मुद्दा घाटे मांडतात. म्हणजेच घाटे जणू अगदी सहजपणे आपल्याला सांगून जातात ‘माझे जीवन…वाचत राहणे !’

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हे सगळं घाटे अगदी सहजपणे सांगतात. त्यात कुठेही ‘मी कसा महान वाचक आहे’ असा सूर येत नाही. तसंच उगीच ‘नेम्सड्रॉपिंग’ केल्यासारखी एक जंत्री आपल्यावर फेकायची असंही होत नाही. आपलं आयुष्यच पुस्तकमय झाल्याची कबुली देताना तर ते जरा ओशाळलेलेच वाटतात. हा सच्चा सूर आपल्याला सतत भावतो. अर्थातच म्हणून घाटे अगदी गुळमुळीत लिहितात असं अजिबातच नाही. उलट काय कसं वाचावं, लिहावं हे सगळं ते रोखठोकपणे सांगतात. त्यात ठामपणा आणि साधेपणा, हे मुद्दे जाणवत राहतात.
इंग्रजीत आणि आता मराठीतही ‘कुठली पुस्तकं वाचावीत आणि का?’ अशा प्रकारची पुस्तकं आहेत. ती चांगलीच आहेत. या पुस्तकाचं वेगळेपण म्हणजे लेखकाचं आयुष्य त्या पुस्तकांशी इतकं जोडलं गेलेलं आहे की, ती जोड अनुभवत वाचत जाणं हा खूपच मजेशीर प्रकार आहे. त्यातून आपण लेखकाच्या विश्वात डोकावत डोकावत अजून आपण केवढं आणि काय काय वाचलं पाहिजे, या मुद्यांविषयी विचार करत राहतो. कदाचित म्हणूनच पुस्तकाच्या सुरुवातीलाच लेखक हे आपलं आत्मचरित्र नसल्याचं आवर्जून सांगतात. लेखक आणि प्रकाशक या दोघांनाही ही स्पष्टता असल्यामुळे या पुस्तकाचा रोख एकदम नीटनेटका आहे. विनाकारण लेखकाच्या खाजगी आयुष्याचा फापटपसारा न मांडतासुद्धा गरज असेल तिथे, रंजक तपशील पुरवून योग्य समतोल साधण्यात आला आहे. किंबहुना आपल्या वाचनाविषयीसुद्धा एकदम तटस्थपणे कसं लिहावं याचा हा उत्तम नमुना आहे.

-अतुल कहाते

वाचत सुटलो त्याची गोष्ट / निरंजन घाटे / समकालीन प्रकाशन

  • मला आवडलेली इतर काही पुस्तकं
    • असा घडला भारत / संपादक : सुहास कुलकर्णी, मिलिंद चंपानेरकर / रोहन प्रकाशन.
    • गांधीजी आणि त्यांचे टीकाकार / लेखक- सुरेश द्वादशीवार / साधना प्रकाशन.
    • कॉर्पोरेट कल्लोळ / लेखक- नीलांबरी जोशी / मनोविकास प्रकाशन.
    • यांनी केलं विनोदविश्व समृद्ध / लेखक- प्रदीप कुलकर्णी / रोहन प्रकाशन.
    • ऐवजी / लेखक- नंदा खरे / मनोविकास प्रकाशन.
    • प्रकाशवेध / लेखक- माधवी ठाकूरदेसाई / राजहंस प्रकाशन.
    • आधुनिक भारताचे विचारस्तंभ / मूळ लेखक- रामचंद्र गुहा / अनुवाद- शारदा साठे / रोहन प्रकाशन.

पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल जानेवारी २०१९


रोहन शिफारस

अक्षरनिष्ठांची मांदियाळी

ग्रंथ-शोध आणि वाचन-बोध

ग्रंथलेखन आणि पत्रकारिता यांचा वारसा लाभलेल्या तिसर्‍या पिढीचं प्रतिनिधित्व करणारे अरुण टिकेकर प्राध्यापक, वाङ्मयतज्ज्ञ, संदर्भ-विभाग प्रमुख, संशोधन-किभाग प्रमुख, साहाय्यक संपादक अशा पदांवर अनुभव घेत सप्टेंबर १९९१ मध्ये दैनिक ‘लोकसत्ता’चे संपादक झाले. दशकाहून अधिक वर्षं त्या पदांकर ते कार्यरत राहिले. इंग्रजी वाङ्मयशाखेचे विद्यार्थी असलेल्या टिकेकरांनी बहुशाखीय अभ्यासाचा तसंच संशोधनाचा पाठपुरावा केला. वाङ्मयेतिहासाबरोबर स्थानीय इतिहास, सामाजिक व सांस्कृतिक इतिहास या इतिहासलेखनाच्या नवप्रवाहांत रुची निर्माण झाल्यानं त्यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासलेखनास उपयुक्त ठरतील अशा इंग्रजी आणि मराठी अशा ग्रंथांचा शोध घेतला. त्यातून झालेल्या वाचन-बोधातून त्यांचे ग्रंथ-जीवन साकारले.

Aksharnishthanchi-Mandiyali

190.00Add to Cart


MN_Dec20
तुम्हाला हेही वाचायला आवडेल…

प्रगत पुस्तक संस्कृतीचा मनोज्ञ मागोवा (वर्षा गजेंद्रगडकर)

अनेक पाश्चात्त्य लेखकांची, ग्रंथवेड्या संग्राहकांची, प्रकाशकांची, ग्रंथविक्रेत्यांची, मुखपृष्ठकारांची, ग्रंथालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आणि अगदी पुस्तकचोरांचीही पुस्तकांविषयीची अफाट असोशी स्पष्ट करणारं हे पुस्तक आहे.

लेख वाचा…

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *