महाराष्ट्राचा देव्हारा ज्या कुलदेवतांनी समृद्ध केलाय, त्या देवतांमध्ये खंडोबाचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. कारण खंडोबा हा खऱ्या अर्थाने बहुजनांचा लोकदेव आहे, त्यामुळे मोठं भावबळ आणि भक्तिबळ या देवतेच्या पाठीशी आहे. साहजिकच महाराष्ट्राचा उपास्यदैवत असलेल्या विठोबानंतर मराठी जनांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेली देवता खंडोबाशिवाय अन्य सापडणार नाही. जनप्रियतेच्या या अधिष्ठानामुळेच विठोबापाठोपाठ कुणाच्या कुळाचा, मुळाचा शोध घ्यायचा कसोशीने आणि असोशीनेही प्रयत्न झाला असेल, तर तो खंडेरायाचाच.

खंडोबाच्या मूळ रूपाचा शोध घेण्याचा प्रयत्न वि.का. राजवाडे, श्री.व्यं. केतकर, ग.ह. खरे, दुर्गा भागवत, रा.चिं. ढेरे, डॉ.गुंथर सोंथायमर अशा अनेकानेक देशी-विदेशी विद्वानांनी केला आहे. आणि इतिहास, समाजशास्त्र, दैवतशास्त्र, लोकसाहित्य अशा वेगवेगळ्या ज्ञानशाखांच्या माध्यमातून हा अभ्यास आजवर झालेला आहे. अर्थात, तरीही खंडोबाचं ठोसमूळ गवसलेलं नाही ते नाहीच… मात्र यातही रा.चिं. ढेरे यांनी ‘खंडोबा’विषयी अलीकडच्या काळात मांडलेलं विवेचन बहुंताशी स्वीकारलं गेलेलं आहे. किंबहुना, विठोबा आणि खंडोबा हे मूळ दक्षिणेकडील गोपजनांचे देव असल्याची त्यांनी लावलेली संगती आणि त्यांचं सांस्कृतिक उन्नयन कसं झालं किंवा केलं गेलं, त्याची त्यांनी केलेली मांडणी, आजवर महत्त्वपूर्ण मानली गेलेली आहे. किंबहुना, अलीकडच्या काळात रा.चिं. ढेरे यांनी आपल्या संशोधनाने एकूणच महाराष्ट्राचा देव्हारा नव्याने उजळून काढला. त्यांच्या पश्चात नवीन मांडणी कोण करणार? किंवा एखाद्या दैवताला विविध ज्ञानशाखांचा आधार घेऊन कोण भिडणार, असा प्रश्न होताच. तो काही अंशी डॉ.विठ्ठल बापूजी ठोंबरे यांनी सोडवलेला आहे, असं म्हणायला हरकत नाही… कारण त्यांचं अलीकडेच प्रकाशित झालेलं पुस्तक- ‘कुलदैवत खंडोबा’.

‘कुलदैवत खंडोबा’ हे पुस्तक म्हणजे ठोंबरे यांच्या चौदा-पंधरा वर्षांच्या तपश्चर्येचं फळ आहे, असं म्हटल्यास ते वावगं ठरणार नाही. कारण खंडोबा या लोकदेवतेचा-कुलदैवताचा अखंड ध्यास घेऊन डॉ.विठ्ठल ठोंबरे यांचं खंडोबावरचं काम सुरू होतं. श्रद्धेय विषय हा अभ्यासविषय कसा होतो; याचं हे पुस्तक म्हणजे उत्तम उदाहरण आहे. या पुस्तकात ठोंबरे यांनी खंडोबा या कुलदेवतेविषयी केलेली मांडणी किंवा विवेचन मला पूर्णत: पटलं आहे, असं नाही. परंतु त्यामागची ठोंबरे यांची निष्ठा व अभ्यासूवृत्ती नि:संशय गौरवास्पद आहे. कारण खंडोबा या कुलदेवतेचा मागोवा घेताना त्यांनी जो ग्रांथिक आणि क्षेत्रीय अभ्यास केलेला आहे, तो आजवर क्वचितच कुणी केला असेल. त्यामुळेच ‘कुलदैवत खंडोबा’ या त्यांच्या ग्रंथात खंडोबाविषयी इत्थंभूत माहिती मिळते. ही इत्थंभूत माहिती काटेकोर विश्लेषणाच्या पातळीवर फार जात नाही. पण ती, ‘खंडोबा’ या देवतेविषयी सामान्यजनांना असलेलं कुतूहल शमवते आणि वाढवतेही.

या पुस्तकात एकूण सोळा प्रकरणं असून विठ्ठल ठोंबरे यांनी त्यांत ‘खंडोबा’विषयीच्या विविध धारणांचा आणि धोरणांचा अभ्यासपूर्ण धांडोळा घेतला आहे. खंडोबाच्या उपासनेच्या पूर्वेतिहासापासून, महाराष्ट्र-कर्नाटक-आंध्र या ठिकाणी असलेली त्यांची असंख्य स्थळं, खंडोबासंदर्भात असलेले ऐतिहासिक-सामाजिक दस्तावेज, संशोधकांच्या नजरेतून खंडोबा आणि त्याचा परिवार, संत आणि तंत साहित्यातून खंडोबाचं घडलेलं दर्शन ते विविध पंथ-संप्रदायात खंडोबावर झालेल्या टीकेपर्यंत, विठ्ठल ठोंबरे यांनी आपल्या पुस्तकात खंडोबा या देवतेचा सामग्र्याने विचार केलेला आहे. हा विचार केवळ धार्मिक किंवा आध्यात्मिक पातळीवर न करता, ठोंबरे यांनी तो एकूणच सामाजिक-सांस्कृतिक अंगाने केल्यामुळेच या पुस्तकाचं मोल मोठं आहे, असं मला वाटतं.

या पुस्तकाची एक गंमत म्हणजे, ठोंबरे यांनी आधी केवळ खंडोबा या देवतेच्या आकर्षणापोटी तिच्याविषयी अभ्यास केला. त्यानंतर त्या अभ्यासाच्या आधारे पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं बाड डॉ. कल्याणी हर्डीकर यांच्या वाचनात आलं आणि ठोंबरे यांनी खंडोबाविषयी केलेलं हे काम मुळातच एवढं संशोधनपूर्ण होतं की, हर्डीकर यांनी ठोंबरे यांना या संशोधनावरच पीएच.डी.साठी अर्ज करण्यास सांगितलं. हे सांगण्याचा उद्देश एवढाच की, केवळ आपलं कुलदैवत आहे म्हणून नव्हे, किंवा आत्यंतिक भक्तिभावाने नव्हे, तर ठोंबरे यांनी ‘खंडोबा’विषयीचं हे काम अतिशय तटस्थपणे केलेलं आहे. त्यामुळे ‘खंडोबा’विषयीचं हे पुस्तक म्हणजे केवळ त्यांचा भावनिक उमाळा नसून, ते पूर्वसूरींच्या अभ्यासपूर्ण परंपरेला अनुसरूनच आहे.
‘माझी निवड’ म्हणून या पुस्तकाची निवड मी हेतुपुरस्सर केली आहे. एकूणच मराठी साहित्यात कथा-कादंबरी व कवितेला प्रातिभा-सर्जन मानण्याची परंपरा आहे. कारण ‘नवनवोन्मेषशालिनी प्रज्ञा प्रतिभा मता’… म्हणजेच नवनवीन उन्मेष धारण करणारी प्रज्ञा म्हणजे प्रतिभा, असं भारतीय साहित्यशास्त्राने सांगितलं आहे खरं… परंतु, ही प्रतिभा केवळ कथा-कादंबऱ्यांसाठीच लागते असं नाही, तर ती अभ्यासात्मक-संशोधनात्मक गोष्टींसाठीही लागते. ऐतिहासिक किंवा कालातीत सत्य सांगण्यासाठी वस्तुनिष्ठ पुराव्याची गरज असतेच. परंतु, अशावेळी जेव्हा पुरावे उपलब्ध नसतात, तेव्हा क्षणकाळासाठी का होईना, अंधाऱ्या जागा उजळण्याकरिता या कल्पकतेची, सर्जनतेची गरज लागतेच. म्हणजे, किमान अभ्यासाची काहीएक दिशा मिळण्याची शक्यता निर्माण होते. ही कल्पकतेची झेप संशोधकाकडे नसेल तर कधी कधी अभ्यासविषयातील गुह्यं ही ‘गुह्यं’च राहण्याची शक्यता असते. आपल्याकडच्या वि. का. राजवाडेंपासून ते रा.चिं. ढेरे यांच्यापर्यंतच्या अनेक संशोधकांनी आपल्या मतांना शास्त्र-काट्याची कसोटी लावतानाच वेळप्रसंगी प्रातिभाशक्तीचाही असा वापर केलेला आहे आणि म्हणूनच कथा-कादंबऱ्यांप्रमाणेच संशोधनात्मक अशा पुस्तकांनाही इथे स्थान मिळावं, म्हणून मी मुद्दाम डॉ.विठ्ठल बापूजी ठोंबरे यांच्या ‘कुलदैवत खंडोबा’ या पुस्तकाची निवड केली!

-मुकुंद कुळे

कुलदैवत खंडोबा / डॉ. विठ्ठल बापूजी ठोंबरे / जयमल्हार प्रकाशन.

 • मला आवडलेली इतर काही पुस्तकं
  • माझा धनगरवाडा / लेखक- धनंजय धुरगुडे / रोहन प्रकाशन.
  • उजव्या सोंडेची बाहुली / लेखक-प्रवीण बांदेकर / शब्द पब्लिकेशन्स.
  • लोकशाहीवादी अम्मीस दीर्घपत्र / मूळ लेखक- सईद मिर्झा / अनु. : मिलिंद चंपानेरकर / रोहन प्रकाशन.
  • आदिवासी बोधकथा / लेखक- प्रदीप प्रभू, शिराझ बलसारा / मनोविकास प्रकाशन.
  • शून्य एक मी / लेखक- पी. विठ्ठल / कॉन्टिनेन्टल प्रकाशन.
  • लोककवी साहिर लुधियानवी / मूळ लेखक- अक्षय मनवानी / अनु. : मिलिंद चंपानेरकर / रोहन प्रकाशन.

पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल फेब्रुवारी २०१९


रोहन शिफारस

माझा धनगरवाडा

आत्मभान जागृत झालेल्या एका धनगराचं हे विलक्षण आत्मकथन… या कथनात लेखक धनंजय धुरगुडे धनगर समाजाच्या रूढी-चालीरीती आणि जीवनपद्धती यांचं जिवंत चित्रण करतात. त्यांचे पारंपरिक धनगरी खेळ, गजीनृत्य व सण-उत्सव यांचं शब्दचित्र रेखाटतात, आणि शिक्षणामुळे झालेला आपला विकास सांगत धनगर समाजाचं वास्तववादी दर्शन घडवतात. एका धनगराने अस्सल धनगरी शैलीत प्रथमच चितारलेला हा – माझा धनगरवाडा!

Majha_Dhangarwada

500.00Add to cart

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *