२०१९च्या सुरुवातीला मी चीनमधील भारतीय राजदूताच्या कार्यकाळाची मुदत संपवून केंद्र सरकारमधून नुकताच निवृत्त होऊन पुण्यास स्थाईक झालो होतो. दरम्यान, गेली अनेक वर्षं परिचित असलेले दिल्लीतील पत्रकार विजय नाईक मला भेटले व चीनविषयी पुस्तक लिहिण्याच्या त्यांच्या संकल्पनेबाबत माझ्याशी बोलले. मला त्याचा अर्थातच आनंद झाला. कारण, बव्हंशी भारतीयांना चीनविषयी फारशी माहिती नाही व नाईक यांनी हे पुस्तक लिहिल्यास आपल्या उत्तरेकडील शेजाऱ्याला समजण्यास मदत होईल, असं मला वाटलं.
इतिहास व संस्कृती यांचा चीनच्या मानसावर खोलवर परिणाम होतो. पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाला कोण प्रवृत्त करतो? त्याच्या शासनप्रक्रियेचं अंतरंग काय आहे? आज दिसणारी सुबत्ता चीनने कशी मिळवली? तसंच चीनची राष्ट्रीय लक्ष्यं व उद्दिष्टं काय आहेत, याची पर्यटक म्हणून ज्यांनी चीनला भेटी दिलेल्या आहेत, त्यांनाही त्यांच्या वैचारिक प्रक्रियेची कल्पना येत नाही.
आमचं बोलणं संपण्यापूर्वी विजयने मला शी जिनपिंग आणि भारत व चीन संबंध या पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिण्याची विनंती केली. ती मी ताबडतोब मान्य केली. करोना विषाणूचा प्रसार, लॉकडाउनमुळे होणारे परिणाम व लोकांच्या येण्या-जाण्यावर असलेली बंधनं, यांमुळे विजयचं पुस्तक प्रकाशित होण्यास विलंब झाला असेल, पण, त्याचं पुस्तक अधिक प्रसंगोचितच नव्हे, तर महत्त्वाचं असून, वाचकासाठी चीनच्या अनेकांगांची सखोल माहिती देणारं आहे…
…चीनचे विद्यमान अध्यक्ष शी जिनपिंग यांचा उदय कसा झाला, कम्युनिस्ट पक्षाच्या अगदी तळागाळापासून अखेर ते पक्षाचे महासरचिटणीस, नंतर चीनचे अध्यक्ष व सेंट्रल मिलिटरी कमिशनचे अध्यक्ष कसे झाले, याचा सुरेख विश्लेषणात्मक आलेख विजयने दिला आहे. शी जिनपिंग आता चीनचं स्वप्न साकार करण्याच्या दिशेने चालले आहेत. आर्थिक वृद्धीबरोबरच उत्तम शैक्षणिक संस्थांच्या साहाय्याने चीन तंत्रज्ञान क्षेत्रातील केवळ मोठी सत्ताच नव्हे, तर नवनव्या संशोधनास प्रोत्साहन देणारी यंत्रणा बनल्याने जागतिक सत्ताही बनला आहे.
अमेरिका या एकमेव महासत्तेला उगवता चीन आव्हान देत आहे, हे आज आपण पाहत आहोत. येत्या दशकात ही स्पर्धा जगात सर्वत्र दिसणार आहे. आंतरराष्ट्रीय संबंधांच्या सिद्धान्तानुसार, या प्रकारच्या स्पर्धांचं रूपांतर शिगेला पोहोचणाऱ्या युद्धखोरीत वा कधी कधी युद्धात होतं. परंतु, विद्यमान युग हे अण्वस्त्रांचं आहे, हे लक्षात घेता, अमेरिका व चीन दरम्यान शीतयुद्ध सुरू राहील, असं दिसतं…
…अमेरिकेने आपला इरादा स्पष्ट केला आहे, की, चीनला प्रमुख प्रतिस्पर्धी मानून कोणत्याही परिस्थितीत त्यापुढे नमतं घेतलं जाणार नाही व सर्व शक्ती पणाला लावून अमेरिका चीनला कधीच आपल्यापुढे जाऊ देणार नाही. म्हणूनच दोन्ही देशांत व्यापार व तंत्रज्ञान युद्ध सुरू झाल्याचं आपण पाहत आहोत.
या परिस्थितीचे भारत व चीनच्या संबंधांवर काय परिणाम होतील? चीनने निर्माण केलेल्या आव्हानांचा भारत कशा प्रकारे सामना करणार? २०२०च्या उन्हाळ्यात लडाखमध्ये चीनने जी घुसखोरी केली आहे, त्यातून दोन संकेत मिळतात. एक, चीनच्या डावपेचांतून स्पष्ट दिसतं की, भारताबरोबरचा सीमाप्रश्न कायम ठेवून प्रदेश बळकावयास मिळावा, यासाठी चीन लष्करी बळाचा वापर करावयास तयार आहे, व दोन, प्रत्यक्ष ताबारेषा कोणती हे एकतर्फी ठरवण्यासाठी सर्वंकष राष्ट्रीय सत्तेचा चीनला वापर करायचा आहे. त्यातून चीन भारताला दाखवू पाहत आहे की, चीनची राष्ट्रीय सत्ता (साम्यवादी एकाधिकारशाही) ही भारताच्या राष्ट्रीय सत्तेपेक्षा (लोकशाही प्रणाली) कितीतरी पटीने अधिक शक्तिशाली आहे. म्हणूनच भारताने आशियातील चीनचं वर्चस्व स्वीकारलं पाहिजे. सारांश, भारताने या परिसरात (आशियात) आपल्या राष्ट्रीय शक्तीची कुवत ध्यानात घेऊन त्यानुसार आपलं स्थान काय आहे, हे ओळखलं पाहिजे…
…१९८८मध्ये जेव्हा माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी चीनला ऐतिहासिक भेट दिली, तेव्हा दोन्ही देशांचं सकल राष्ट्रीय उत्पादन जवळजवळ एकमेकांच्या नजीक म्हणजे सुमारे ३०० अब्ज डॉलर्स होतं. परंतु त्या वेळी चीनमध्ये आर्थिक सुधारणांची प्रक्रिया सुरू होऊन दहा वर्षं लोटली होती व चीन पुढील तीन दशकांच्या वेगवान आर्थिक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू लागला होता. भारत मात्र परकीय चलनाच्या संकटाच्या उंबरठ्यावर उभा होता. तसंच, १९९१मधील आर्थिक उदारीकरणाच्या प्रक्रियेपासून दोन वर्षं मागे होता. तेव्हापासून भारत व चीनच्या प्रगतीची वाटचाल विषमतेकडे सुरू झाली व पुढे मोठ्या प्रमाणावर ती वाढतच गेली…
…ढोबळमानाने सकल राष्ट्रीय उत्पादन हे राष्ट्राच्या सर्वंकष राष्ट्रीय प्रबळतेचं प्रमाण समजलं जातं. त्या दृष्टीने पाहता, चीन आज भारतापेक्षा पाच पटींनी अधिक प्रबळ आहे. असं असल्यामुळेच चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी भारतीय सीमेवर अधिक आक्रमक होण्याचा प्रयत्न करत आहे. कळीचे प्रश्न आहेत ते, आशियातील चीनचं वर्चस्व भारत घटवू शकेल काय? आर्थिक व सत्ता संतुलन बदलू शकेल काय? आणि हे साध्य करण्यासाठी आवश्यक आहेत, त्या पुढील टप्प्याच्या (सेकंड जनरेशन) आर्थिक सुधारणा…
…हे सारे प्रवाह व घडामोडी यांचा सविस्तर परामर्ष विजय नाईक यांनी त्यांच्या पुस्तकात घेतला आहे. शी जिनपिंग यांचं चीनचं स्वप्न काय आहे, गेल्या काही दशकांत भारत व चीन यांचे संबंध कसे सुधारले व जिनपिंग यांच्या स्वप्नपूर्तीच्या उद्देशाने चीन कशी अर्थपूर्ण वाटचाल करत आहे, याचं विश्लेषण त्यात वाचायला मिळेल. त्यात वूहान व महाबलीपुरम इथे झालेल्या अध्यक्ष शी जिनपिंग व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनौपचारिक शिखर परिषदा, २०१७मधील डोकलम व २०२०मधील गलवानच्या खोऱ्यातील चीनची घुसखोरी, करोनाचं चीनप्रणित जागतिक संकट व भारत व चीन यांचे झपाट्याने बदलत असलेले दृष्टिकोन व धोरणं यांवरही दृष्टिक्षेप टाकलेला आहे. भारत व चीनदरम्यानच्या घटना व आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्यांची स्पंदनं जाणून घेणाऱ्यांसाठी या पुस्तकाची मी नेहमीच शिफारस करीन. तसंच, सामान्य वाचक व दुतर्फा संबंधांचं अध्ययन करणाऱ्यांना ते निश्चितच उपयोगी ठरावं. आंतरराष्ट्रीय संबंधांच्या विद्यमान पैलूंवर प्रकाशझोत टाकण्याचे विजयचे प्रयत्न माझ्या दृष्टीने निश्चितच प्रशंसनीय आहेत.
– गौतम बंबावाले
माजी सनदी अधिकारी, भारतीय राजदूत म्हणून चीनमध्ये नियुक्त (२०१७-१८)
(पुणे, ऑगस्ट २०२०)
- शी जिनपिंग यांचा विस्तारवादी चीन आणि भारत चढती कमान…वाढते तणाव
- लेखक : विजय नाईक
पूर्वप्रकाशित :रोहन साहित्य मैफल मार्च २०२१
रोहन शिफारस
शी जिनपिंग यांचा विस्तारवादी चीन आणि भारत
चीनचे विद्यमान अध्यक्ष शी जिनपिंग यांचा उदय कसा झाला, कम्युनिस्ट पक्षाच्या अगदी तळागाळापासून अखेर ते पक्षाचे महासरचिटणीस, नंतर चीनचे अध्यक्ष (२०१३) कसे झाले, याचा सुरेख विश्लेषणात्मक आलेख लेखकाने दिला आहे. ते आता चीनचं स्वप्न साकार करण्याच्या दिशेने चालले आहेत… चीन आता जागतिक सत्ताही बनला आहे…. अमेरिकेला आव्हान देण्याची चीनची अंतःस्थ महत्वाकांक्षा असून, आंतरराष्ट्रीय राजकारणात श्रेष्ठत्व प्राप्त करायचं आहे… या परिस्थितीचे भारत व चीनच्या संबंधांवर काय परिणाम होतील? चीनने निर्माण केलेल्या आव्हानाचा भारत कशाप्रकारे सामना करणार?… आशियातील चीनचं वर्चस्व भारत घटवू शकेल काय? अशा अनेक प्रश्नांच्या चर्चेसह डोकलम, गलवान ते लडाख संबंधीचे वाढते तणाव अशा अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा परामर्ष विजय नाईक यांनी त्यांच्या या पुस्तकात घेतला आहे… भारत व चीन दरम्यानच्या घटना व आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्यांची स्पंदन जाणून घेणाऱ्यांसाठी या पुस्तकाची मी नेहमीच शिफारस करेन. – गौतम बंबावाले, माजी सनदी अधिकारी, भारतीय राजदूत म्हणून चीनमध्ये नियुक्त (२०१७-१८)
₹250.00Add to Cart
दिल्लीस्थित ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक यांच्याबद्दल जाणून घ्या…
१९७१ सालातील भारत-पाकिस्तान युद्धात ‘युद्धवार्ताहर’ म्हणून त्यांनी वार्तांकन केलं आहे. तसंच, त्यांनी ‘आयपीकेएफ’च्या श्रीलंकेतील तमिळ वाघांविरुद्ध लष्करी मोहिमेचे सात वेळा तेथे जाऊन वार्तांकन केलं आहे.