हवा हवाई
विजय नाईक
हवाई बेटसमूहाची सर्वसामान्यांमधली ओळख एका बाजूला नितांतसुंदर, निसर्गरम्य पर्यटनस्थळ म्हणून असते, तर दुसऱ्या बाजूला अमेरिकेचं पन्नासावं घटकराज्य म्हणून जगाच्या नकाशावरचं त्याचं स्थान काहीसं अपरिचित असतं….
मात्र, एवढं निश्चित की ‘हवाई बेट’ हा अनेकांच्या कुतूहलाचा विषय असतो. हे कुतूहल या पुस्तकातून अनेक अंगाने शमवलं जातं. हवाई बेटांची मूळ पॉलिनेशियन संस्कृती, राजकीय इतिहास, लोक-संस्कृती, तेथील निसर्गसौंदर्य आणि त्यातील वैविध्य या सर्वांची सविस्तर ओळख या पुस्तकातून होते.
ही ओळख करून देता देता आजवर त्रेपन्न देशांची भ्रमंती केलेले ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक हे जगप्रसिद्ध लेखक विचारवंत मार्क ट्वेन, कॅ. जेम्स कुक अशा हस्तींच्या तेथील वास्तव्याचा मागोवा घेतात. तसेच अमेरिकेचे भूतपूर्व अध्यक्ष बराक ओबामा यांची जन्मभूमी म्हणूनही ते ‘हवाई’कडे दृष्टिक्षेप टाकतात आणि तेथील स्थलांतरित भारतीयांचीही माहिती देतात. दुसऱ्या महायुद्धातील ‘पर्ल हार्बर’वरील जपानचा हल्ला तेथे म्युझियमरूपात कसा ‘जीवंत’ आहे, हेही नाईक पुस्तकात सांगतात.
या पुस्तकाचं खास वैशिष्ट्य असं की लेखकाचं तेथील दीर्घ वास्तव्य आणि त्या वास्तव्यादरम्यान पाहिलेलं, अनुभवलेलं, अभ्यासलेलं ‘हवाई’ ते आपल्या डोळ्यासमोर उभं करतात.
हवाईचा सर्वस्पर्शी छोटेखानी एन्सायक्लोपेडिया… हवा हवाई!