‘एन्ड ऑफ द वर्ल्ड’ पुस्तकातील निवडक अंश

ड्रेक पॅसेजच्या अक्राळ-विक्राळ रूपाबद्दल बरंच ऐकलं, वाचलं होतं. निसर्गाचं भयानक तांडव खऱ्याखुऱ्या अर्थाने तिथे पहायला व अनुभवायला मिळतं. आता क्रुझ सफरी खूपशा सुरक्षित झाल्या असल्या तरीही ड्रेक पॅसेजमधला प्रवास भल्या-भल्यांच्या पोटात भीतीचा गोळा आणतो, तर सर्वसामान्य प्रवाशांचं काय? व मनुष्यवस्ती नसलेल्या ‘अंटार्टिंक’ या सातव्या खंडावर आयुष्यात एकदातरी पाय ठेवायचाच, अशी मनापासून इच्छा असलेल्या पर्यटकांना ‘ड्रेक पॅसेज’ शिवाय पर्याय नाही. कारण पृथ्वीचं अखेरचं टोक ‘केप हॉर्न’ इथून निघाल्यानंतर दोन दिवसांच्या ‘ड्रेक पॅसेज’ व अंटार्टिंकाहून परत येतानाही ‘ड्रेक पॅसेज’चा सहवास हा चुकणारा नाही..
अंटार्टिंकाची सहल निश्चित करण्याआधी, ट्रॅव्हलेक्स चॅनेलवर एक फिल्म बघितली होती. त्या फिल्ममध्ये धाडसाचे आणि भयंकर आपत्तींचे प्रसंग दाखवण्यात आले. सुमारे १५०-२०० प्रवाशांना घेऊन अंटार्टिंकाची क्रुझ उश्वायाहून निघाली. तुफानी वारे, उसळणाऱ्या लाटा यांचा तडाखा त्यांना केप हॉर्नपासूनच बसायला लागला. रात्री सात-आठच्या सुमारास क्रुझने ड्रेक पॅसेजमध्ये प्रवेश केला. साधारणत: आठ-दहा फूट उंचीच्या लाटा तिथे नेहमीच असतात. मात्र या वेळचं तांडव काही निराळंच वाटत होतं. वीस-तीस- चाळीस-पन्नास फुटांच्या लाटांचे तडाखे बसायला लागले. त्यात हिमवृष्टी, पाऊस, सोसाट्याचा वारा… सात-आठ मजल्यांच्या त्या क्रुझच्या सातव्या मजल्यापर्यंत लाटा पोहोचल्या. कप्तानाने आणीबाणी जाहीर केली. प्रत्येकाला घट्ट पकडून झोपून राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. तेव्हा सी-सिकनेसने बेजार नसलेला एकही जण बोटीवर नव्हता. या तुफानी वादळात ही अजस्र बोटही तुटण्याची, नादुरुस्त होण्याची भीती कप्तानाला वाटत होती. त्याने सारं कौशल्य पणाला लावलं. पुढच्या हवामानाचा अंदाज घेतला. पण हवामान अधिकच खराब होतं. त्यामुळे त्याने बोट माघारी वळवायचं ठरवलं. मागे वळवणंही फार कठीणच होतं. कप्तान अनुभवी असल्याने कसंबसं ते शक्य झालं. चार-पाच तासांनंतर त्यांनी केप हॉर्न ओलांडून उश्वायाच्या दिशेने कूच केलं. लाटांच्या तडाख्यामुळे क्रुझ चांगलीच नादुरुस्त झाली होती. तेथील क्रुझ मेकॅनिकने सांगितलं की, ड्रेक पॅसेजमधून ती पुढे नेली असती तर फार भयंकर प्रसंग उद्भवला असता. नंतर ती बोट दुरुस्त करण्यासाठी जवळजवळ एक महिन्याचा कालावधी लागला.

एखाद्याला बोट लागते, तर एखाद्याला अजिबात लागत नाही. योग्य वेळी गोळी घेतली तर त्रास न होणारेही बरेच असतात. पण लाटांचं तांडव सुरू झालं की, बोट कमालीची हेलकावते आणि मग अनेकांना सी-सिकनेस जाणवतोच! याबाबत ग्रीनलँडच्या क्रुझ सफरीत बोटीवरच्या सहल संचालकाने घडलेला एक गमतीदार किस्सा सांगितला, त्याची नेहमी आठवण येते. तो अंटार्टिंकाच्या सहलीवर गेला होता. ड्रेक पॅसेजच्या एकूण चार दिवसांच्या प्रवासात क्रुझवर नानाविध विषयांवरची लेक्चर्स ठेवण्यात येतात. म्हणजे प्रवाशांचा वेळही जातो आणि क्रुझच्या हेलकावणाऱ्या प्रवासातून लक्षही जरा दुसरीकडं वळतं. सहल संचालक म्हणाला, “आमच्या टीममध्ये मला कधीच सी-सिकनेस जाणवायचा नाही. त्यामुळे त्या चारही दिवसांत जास्तीतजास्त लेक्चर्स देण्याची जबाबदारी माझ्यावर असायची. एकदा मात्र अगदी उलटा अनुभव आला. त्या दिवशी लाटा फार नाही, पण २०-२५ फुटांपर्यंतच होत्या. मी शर्टाच्या कॉलरला माईक लावून लेक्चर देत होतो. कसा कोणास ठाऊक मला एकदम सी-सिकनेसचा त्रास जाणवू लागला. ‘माफ करा’ असं सांगून मी बाथरूमच्या दिशेने पळालो. हे एवढं अनपेक्षित होतं की, शर्टावरील माईक काढण्याचं भानही मला राहिलं नाही. आणि पुढची पंधरा-वीस मिनिटं, मी सी-सिकनेसने कसा बेजार झालो होतो, याचे ‘आवाज’ प्रेक्षक सभागृहातील खुर्च्यांवर बसून आरामात ऐकत होते! तो प्रसंग कायमचा लक्षात राहिला.” आमच्या परिचयाचा एक तरुण, मुंबईहून अंटार्टिंकाच्या सहली घेऊन जातो, पण त्याने या ड्रेक पॅसेजचा एवढा धसका घेतला की, ही सहल घेऊन जाण्याचं काम त्याने पत्नीवर सोपवलं. तिला समुद्र सफारीचा फारसा त्रास होत नाही. ‘प्रवासातले चार दिवस केवळ हिरवी सफरचंदं खाऊन रहा, म्हणजे त्रास फारसा जाणवत नाही’ हे आपल्या यशाचं रहस्य ती अन्य प्रवाशांना आवर्जून सांगते.

असा हा ड्रेक पॅसेज आहे तरी कसा? ड्रेक पॅसेज सुमारे ६५० कि.मी. लांबीचा सागरी पट्टा आहे. या पट्ट्यात अटलांटिक व पॅसिफिक (प्रशांत) महासागर एकमेकांत मिसळतात. सुसाट वारा, पाण्यातले वेगवेगळे अंडर करंट्स आणि दोन्ही महासागरांच्या पाण्याचे भिन्न भिन्न तापमान यांमुळे इथे समुद्र सदैव खवळलेलाच असतो. तसंच दक्षिण ध्रुवावर जवळजवळ भूभाग नसल्याने चिली, केप हॉर्न येथील बिगल चॅनेल, मॅगेलान स्ट्रेट इथून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाला कोणताही अडथळा राहत नाही.

प्रशांत व अटलांटिक महासागर जिथे मिळतात, तिथे तर हा पाण्याचा ओघ अतिप्रचंड असतो. सर्व पाणी तिथल्या तिथेच गोलाकार फिरत राहतं. या सर्वांमुळे तिथे मोठमाठ्या लाटा तयार होऊन त्या क्रुझवर जोरजोरात धडकत असतात. कधी कधी त्यांची उंची चाळीस-पंचेचाळीस फुटांपर्यंत जाते. काही वेळेस मात्र हा ड्रेक पॅसेज अगदी शांत असतो. हाच का तो अक्राळविक्राळ रूप धारण करणारा ‘ड्रेक पॅसेज’ असा प्रश्न पडावा इतका तो निद्रिस्त असतो. सोळाव्या शतकात अत्यंत धाडसी, आक्रमक दर्यावर्दी ‘फ्रान्सिस ड्रेक’याने हा पट्टा यशस्वीरीत्या पार केला. त्याच्या अचाट धाडसाचं जगभर कौतुक झालं. त्याचंच नाव या पॅसेजला देण्यात आलं. आणि तो ‘ड्रेक पॅसेज’ म्हणून ओळखला जाऊ लागला…

…क्रुझ निश्चित करताना, कोणत्या मजल्यावरची कोणती केबिन बुक करायची याचाही बारकाईने अभ्यास जयंती करते. तुम्ही जितके वरच्या मजल्यावर असाल, तितकं बाहेरचं दृश्य अधिक चांगलं दिसतं. त्यामुळे वरची बाल्कनी किंवा मोठ्या खिडकीची खोली आम्ही पसंत करतो. ती थोडी महाग असते, पण बाहेरचं सृष्टिसौंदर्य पाहण्यासाठी सतत उठून डेकवर जावं लागत नाही. अलास्काचा इनसाईड पॅसेज, ग्रीनलँडमध्ये अजस्र हिमनगांचं दर्शन आम्हाला आमच्या खोलीत बसूनच झालं होतं. अंटार्टिंकात बाल्कनीची खोली फारच महाग होती. त्यामुळे त्याचा विचारच करणं शक्य नव्हतं. मोठी खिडकी असणारी जास्तीतजास्त वरच्या मजल्यावरील खोली घेण्याचा आमचा विचार होता. पण त्याच वेळी एक महत्त्वाची माहिती जयंतीला समजली. तुम्ही वरच्या मजल्या वरील खोलीसाठी जरी जास्त पैसे देत असाल तरी तुम्ही जितक्या खालच्या मजल्यावर तितकी बोट कमी लागते. किंबहुना अंटार्टिंकाच्या प्रवासात खालच्या मजल्यावरील खोलीतच मुक्काम करावा, असा अनुभव काहींनी आवर्जून नमूद केला होता. आमच्या सुदैवाने चवथ्या मजल्यावर मोठ्या खिडकीच्या काही केबिन्स उपलब्ध होत्या. पैसेही कमी व त्यातून बाहेरचं सर्व दृश्यही उत्कृष्ट दिसत होतं व सर्वच दृष्टीने तो निर्णय अगदी योग्य ठरला. खवळलेल्या सागरातून नेहमी प्रवास करणारे प्रवासी याच केबिन्सवर डोळा ठेवून असतात.

  • एन्ड ऑफ द वर्ल्ड
  • लेखक : जयप्रकाश प्रधान

पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल एप्रिल २०१९


हे पुस्तक खरेदी करण्यासाठी…

End of the World cover

एण्ड ऑफ द वर्ल्ड भटकंती

पृथ्वीच्या दक्षिण व उत्तर टोकावरच्या थरारक सफरी…

पृथ्वीच्या दक्षिण टोकावरील शेवटचं गाव ‘प्युर्टो विल्यम्स’, खलाशांचं कबरस्तान ‘केप हॉर्न’, ९८% बर्फानेच वेढलेलं ‘अंटार्क्टिका’, अवघ्या तीन हजार लोकवस्तीचं ‘फॉकलंड आयलंड’, तर उत्तर टोकावरील ‘आर्टिक सर्कल’, ‘नॉर्दन लाईट्स’चं मनोहारी दर्शन, हिमनगांची जागतिक राजधानी ‘ग्रीनलँड’ आणि लँड ऑफ फायर अँड आईस ‘आइसलँड’… पृथ्वीवरच्या अशा दोन टोकांवरील वेगळ्या दुनियेची सफर प्रधान या पुस्तकातून घडवून आणतात.

थरारक सफरींचा अविस्मरणीय अनुभव देणारं कथन…

250.00Add to cart


Jayprakash-Pradhan Photo
विख्यात लेखक व पर्यटक जयप्रकाश प्रधान यांचा परिचय

पृथ्वीवरील सात खंडांवर प्रधान पती-पत्नीचे पाय लागले आहेत. अंटार्क्टिका खंडावर मनुष्यवस्ती नाही. राहिलेल्या सहा खंडांमधील एकूण देशांची संख्या २१०च्या घरात जाते. त्यांपैकी ७८ देश त्यांनी आतापर्यंत पाहिले आहेत.

वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *